ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास :–
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया अशी सर्वत्र घोडदौड करत असलेल्या इस्लामचा गेल्या सुमारे १०० वर्षांतला प्रामुख्याने इंग्लंडमधला प्रवास आणि प्रभाव याचं वर्णन एड हुसेन या लेखकाच्या Among the Mosques: A Journey Across Muslim Britain या पुस्तकात वाचायला मिळतं.
जन्माने ब्रिटिश मुस्लिम असलेल्या लेखकाचे आईवडील हे बांग्लादेशी मुस्लिम आहेत. १९६१ मध्ये त्याचे आईवडील ब्रिटनमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. एड हुसेनचं हे इस्लामविषयक तिसरं पुस्तक असून The Islamist आणि The House of Islam या दोन पुस्तकांत त्याची पूर्वाश्रमीची जडणघडण, इस्लामकडे आकर्षित होणं, इस्लामचा अभ्यास याबद्दल तपशीलवार माहिती आहे. कालांतराने त्यातला फोलपणा कळून आल्यानंतर इस्लामचा ब्रिटनमधला प्रवास जाणून घेण्याच्या दृष्टीने केलेला प्रवास सद्य पुस्तकात पाहावयास मिळतो.
या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने युकेमधील महत्वाच्या मुस्लिमबहुल शहरांमधून प्रवास केला, तेथील सामान्य नागरिक, प्रमुख व्यक्ती, मौलवी, राजकारणी, टॅक्सी ड्रॉयव्हर अशा सर्व लोकांशी चर्चा करून, त्यांना प्रश्नं विचारून, बोलतं करून त्यांच्या अनुभवांचं एकत्रीकरण करून इस्लामचा गेल्या साधारण १०० वर्षांमधला युकेमधला प्रवास शब्दबद्ध केला आणि अमंग द मॉस्क्स या आपल्या पुस्तकातून वाचकांसमोर आणला. ब्लॅकबर्न, ब्रॅडफर्ड, बर्मिंगहम, बेलफस्ट (नॉर्दर्न आयर्लंड), एडिनबर्ग आणि ग्लास्गो (स्कॉटलंड) आणि लंडन या प्रमुख मुस्लिम बहुल शहरांमधील अनेक धक्कादायक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. या पुस्तकात त्या शहरांमधील आणि पर्यायाने ब्रिटनमधील मुस्लिम जीवन, त्यांच्या चालीरीती, कट्टरपणा, धर्मद्वेष्टेपणा या सगळ्यासगळ्याचे हादरवून सोडणारे अनुभव वाचायला मिळतात.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच परिचयाच्या प्रकरणात लेखकाने ब्रिटन आणि तेथील मुस्लिम लोकसंख्येचा धक्कादायक विस्फोट याची सप्रमाण माहिती दिली आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी असलेल्या इंग्लंडमध्ये आज किमान दोन हजार मशिदी आहेत. इंग्लंडमधील पहिली मशीद लिव्हरपूलमध्ये सन १८८९ साली उभारण्यात आली. इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केलेल्या २० ब्रिटिश मुस्लिमांनी तिची स्थापना केली होती. शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी असणाऱ्या इंग्लंडमधील लंडन, ल्युटन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ड्यूसबरी, ब्लॅकबर्न, कीली, नेल्सन इत्यादी शहरांचं आकाश आता मशिदींचे घुमट, मिनार, मनोरे यांनी भरून गेलेलं आढळतं.
ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकस (ONS) च्या अधिकृत आकडेवारीनुसार २००१ ते २०१६ या पंधरा वर्षांत संपूर्ण ब्रिटनची लोकसंख्या ४.९ कोटींवरून सुमारे ११ टक्क्यांनी वाढून ५.४ कोटींवर जाऊन पोचली मात्र याच कालावधीत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या मात्र पंधरा लाखांवरून थेट बत्तीस लाखांवर गेली. थोडक्यात १०७.३ टक्क्यांची अविश्वसनीय आणि धोकादायक वाढ !!! सन २०५० पर्यंत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या एक कोटी तीस लाखांच्या वर जाऊन पोचेल असा अंदाज आहे.
लेखक :-हेरंब ओक
(क्रमशः)