“समतेचा मूलमंत्र देणारे संत रामानुजाचार्य”
वैष्णव पंथातील एक प्रमुख नाव आणि विशिष्टाद्वैत या मताचे प्रमुख आचार्य श्री रामानुजाचार्य हे दक्षिण भारतातील प्रमुख संतांपैकी एक. वैशाख शु.६, शके १०५९ हा त्यांचा समाधी दिवस !
श्रीरामानुजाचार्य (Ramanujacharya) यांचा जन्म तिरुपती येथील असुरी केशव भट्टर यांच्या कुटुंबात चैत्र शु.५, शके ९३९ या दिवशी झाला. चेन्नईपासून ४५ कि.मी. अंतरावरील छोटे गाव श्रीपेरुंबूदूर (भूतपुरी) हे रामानुजाचार्यांचे जन्मस्थान. कांजीवरम येथील यादवप्रकाश यांच्याकडे त्यांनी वेदांचे अध्ययन केले. प्रथमपासूनच त्यांचा कल यामुनाचार्य यांच्या विशिष्टाद्वैताकडे होता. त्यामुळे त्यांनी अळवारांच्या (तमिळ संतांची परंपरा) प्रबंधांचें कांचीपूर्ण व महापूर्ण या दोन थोर पुरुषांजवळ अध्ययन केले. रामानुजाचार्यांच्या अगोदर ६०० वर्षांपासून आळवार हा वैष्णव साधुसंतांचा संप्रदाय तमिळनाडूत(tamilnadu) होता. त्यांचे तमिळ भाषेतील उच्च धार्मिक आशय असलेले साहित्य होते. त्यांना ‘प्रबंध’ म्हणतात. या प्रबंधांना वेदांच्या बरोबरीने महत्त्व होते, म्हणून त्यांना ‘द्राविड वेद’ असेही म्हटले जाते.
रामानुज मनाने उदार व श्रद्धावान असून अतिशय बुद्धिमान होते. सर्व दर्जाच्या व जातींच्या लोकांना त्यांनी भक्तिमार्गास जोडले. अत्यंजांना सुद्धा त्यांनी जवळ केले. रामानुजाचार्य यांच्या शिष्य परम्परेतूनच रामानंद हे मोठे आचार्य झाले. पुढे समतेचा पुरस्कार करणारे कबीर, रैदास आणि सूरदास हे संत याच रामानंदांचे शिष्य होत. म्हणूनच एक प्रकारे सनातन धर्माच्या समतावादी तत्त्वज्ञानाचे ते अग्रणी होत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कावेरी तीरावर यामुनाचार्यांच्या अंत्यविधीचा समारंभ हजारो वैष्णव करीत असलेले पाहून त्यांना खेद झाला. ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहावे ही यामुनाचार्यांची शेवटची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा रामानुजांनी केली. हे भाष्य लिहून त्यांनी भक्तिमार्गाला ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा अधिक माहात्म्य प्राप्त करून दिले.
यानंतर कुरेश, दशरथी, गोविंदयति, गोविंदभट्ट, यज्ञमूर्त असे अनेक शिष्य त्यांच्याभोंवती गोळा झाले. ‘वेदार्थसंग्रह’ या ग्रंथात रामानुज यांनी आपले तत्त्वज्ञान मांडले आहे. उपनिषदांतील तत्त्वज्ञान द्वैतपर आहे, अशी जोरदार मांडणी त्यांनी केली. वेदांत- सूत्रांवरील ‘भाष्य’ हा त्यांचा प्रमुख ग्रंथ. याशिवाय ‘वेदांतसार’, ‘वेदांत- दीप’, ‘गीताभाष्य’ असे अनेक ग्रंथ रामानुजांनी लिहिलेले आहेत.
श्रीरंगम्, कुंभकोणम, तिरुमंगाई, मलबार, त्रावणकोर, गिरनार, द्वारका, मथुरा, बद्रिनारायण अशा भारतातील सर्व पवित्र क्षेत्री भ्रमण करून त्यांनी आपल्या तत्त्वांचा प्रसार केला. रामानुज हे श्रेष्ठ प्रकारचे पुरुष होते. त्यांची कृष्णभक्ती अनुपम होती.
महाराष्ट्रातील महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी ‘अद्वैतामोदः‘ या ग्रंथात रामानुजांच्या तत्त्वज्ञानाचे निरुपण केले आहे.
रामानुजाचार्य यांच्या या सामाजिक समतेच्या कार्याला मानवंदना म्हणून ५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी हैद्राबाद येथे समतामूर्तिचे (Statue Of Equality) अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा तब्बल २१६ फूट उंच आहे.
लेखक :- देविदास देशपांडे, पुणे.
(संत साहित्याचे अभ्यासक)