CultureNewsSpecial Day

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर-स्त्रीसत्वाची कर्तृत्वपूर्ण रुजवण करणारी धोरणी राज्यकर्ती

जन्म वैशाख वद्य सप्तमी इ.स.१७२५ (३१ मे १७२५) , चौंडी, अहमदनगर

पुण्यश्लोक, लोकमाता, राजमाता, वीरांगना, गंगाजलापरी निर्मळ अशी विविध नामाभिधाने ज्यांना जनसामान्यांनी बहाल केली त्या महाराणी अहिल्यादेवी होळकर. ही सर्व नामाभिधाने त्यांनी आपल्या उच्च कर्तृत्वाने प्राप्त केली होती, सिद्ध केली होती. एका सामान्य धनगर परिवारात जन्मलेल्या आणि भविष्यात होळकर संस्थानच्या सिंहासनावर बसलेल्या अहिल्यादेवी होळकर यांनी धुरंधर प्रशासक, योद्धा, धोरणी राज्यकर्ती, उद्योजकतेला प्राधान्य देणारी, महिला सैन्याची स्थापना करणारी, धर्मस्थानांचा जीर्णोद्धार करून हिंदुधर्मास चैतन्य प्राप्त करून देणारी राज्यकर्ती अशा आपल्या वेगवेगळ्या पैलूंमधून स्वतःचे अस्तित्व इतिहासाच्या पटलावर सिद्ध केले व प्रखर नारीशक्तीची जाणीव करून दिली.  

बालपण, विवाह, पार्श्वभूमी

अहिल्यादेवींचा जन्म वैशाख वद्य सप्तमी इ.स.१७२५ (३१ मे १७२५) रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. विशेष म्हणजे ज्या काळात  महिलांनी शिकण्याची परंपरा नव्हती त्या काळात माणकोजी रावांनी अहिल्यादेवींना मूलभूत शिक्षण दिले होते. अहिल्यादेवी या प्रखर शिवभक्त होत्या.एके दिवशी शिवमंदिरातून पूजा करून परत येत असता सुभेदार मल्हारराव होळकर(पहिले) यांनी त्यांना आपल्या सुनेच्या रुपात हेरले व आपला पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह लावला. मालेराव आणि मुक्ता अशी त्यांची अपत्ये होती.

१७५४मध्ये आग्रा अजमेरच्या सुभ्यावरून मराठ्यांचे सुरजमल जाटाशी मतभेद होऊन युद्ध सुरू झाले. कुंभेरी किल्ल्यातील खंदकांचे निरीक्षण करताना गोळी लागल्याने खंडेराव धारातीर्थी पडले. तत्कालीन परिस्थितीत महिलांनी पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा रुजली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या परंतु सासरे मल्हारराव यांनी त्यांना तसे करण्यापासून थांबवले. ज्या परकीय आक्रमणाच्या काळात हिंदू स्त्रियांची असुरक्षितता ऐरणीवर आली होती – ज्यातून पुढे सतीप्रथेसारख्या काही प्रथा उदयाला आल्या असे म्हटले जाते – अशा परिस्थितीत अहिल्यादेवींचे सती प्रथेपासून  दूर राहणे दिशादर्शक व अनुकरणीय होते.

बारा वर्षांनंतर मल्हाररावांचेही निधन झाले. मल्हाररावांनंतर सूभेदार पदाची सूत्रे नातू मालेराव याच्याकडे आली मात्र १७६७ साली मालेरावाचेही निधन झाले व पुढे अंतिम श्वासापर्यंत म्हणजेच १७६५ पर्यंत अहिल्यादेवींनी माळवा संस्थानावर राज्य केले. मृत्यूपूर्वी अर्थात १७६५ साली मल्हाररावांनी लिहिलेल्या पत्रात अहिल्यादेवीमध्ये युद्धाची परिस्थिती हाताळण्याची क्षमता असल्याचे नमूद केले होते. मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सूचनांचे पालन करता करता त्यांना व्यावहारिक शिक्षण मिळत गेले ज्याचा उपयोग त्यांना पुढे प्रत्यक्ष राज्यकारभार करताना झाला.

अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. इंदोर स्टेट गॅझेटिअरमध्ये असे म्हटले आहे की मल्हारराव होळकर जेव्हा जेव्हा बाहेर जात तेव्हा कारभार सूनेवर सोपवून जात. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सुनेवर मल्हाररावांचा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. इ.स. १७३३ मध्ये बाजीराव पेशवे यांच्याकडून सुभेदार मल्हारराव होळकर यांना त्यांच्या पत्नीच्या गौतमाबाई यांच्या नावे खासगी जहागिरी मिळाली होती. पुढे हा खासगी जहागिरीचा प्रदेश वाढत जाऊन अशीच जहागिरी अहिल्यादेवींनाही मिळत गेली. शिंदे वा गायकवाड या सरदारांच्या स्त्रियांकरिता अशी व्यवस्थ नव्हती.

प्राचीन भारतीय( indian culture) संस्कृतीत गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा अशा विदुषी होऊन गेल्या. पुढे महाराणी पद्मावती, महाराणी अब्बक्का, राजमाता जिजाबाई भोसले अशा अनेकींनी भारतीय इतिहासात उल्लेखनीय असे कर्तृत्व सिद्ध केले. भारतीय स्त्रीशक्ती, भारतीय संस्कृती, धर्मरक्षण, धर्मजागरण अशा विविध क्षेत्रात या महिलांनी केलेले कार्य अद्वितीय असेच आहे. त्याच पावलावर पाऊल टाकीत अहिल्यादेवी होळकर यांनी बुद्धिमान आणि पराक्रमी अशा प्रशासनकर्तीचा एक वस्तुपाठ घालून दिला. परकीय शक्तींच्या आक्रमणानंतर झाकोळून गेलेले स्त्रीचे स्वातंत्र्य जिजाबाई, अहिल्याबाई अशा स्त्रियांच्या माध्यमातून पुन्हा एकदा झळाळून उठले. स्त्रीस्वातंत्र्याचा आणि स्त्रित्वाचा भारतीय आयाम यामुळे प्रकाशात आला.

शिवभक्ती व भारतभरातील तीर्थक्षेत्रांचा विकास

उत्तम राज्यकर्त्या असलेल्या अहिल्यादेवी या प्रखर शिवभक्तदेखील होत्या. अहिल्यादेवींची ही शिवभक्ती व्यक्तिगत स्वरुपातच मर्यादित होती असे नव्हे तर त्यांनी मंदिर उभारणी, जीर्णोद्धार व घाट बांधण्याचे केलेले कार्य हे तत्कालीन मुघल साम्राज्याच्या काळात धर्माला पुनर्चेतना देणारे होते. परकीय मुस्लीम आक्रमणाच्या काळात देशभरातील हजारो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. अहिल्यादेवीच्या प्रशासनकालात मुघलांच्या उतरणीचा काळ सुरू झाला होता. हिंदू धर्म पुनर्जागरणासाठी त्यावेळी परकीय शक्तींनी उद्ध्वस्त केलेल्या स्थळांची पुनर्बांधणी कोणीतरी करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने कालाच्या पटलावर अहिल्यादैवींचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. 

भारतातील अशा विपन्नावस्थेतील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून अनेक धर्मशाळा त्यांनी बांधल्या तसेच नदीघाट बांधले. बरेचसे घाट हे स्थापत्यशास्त्र व सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट नमुने आहेत. आज २०० वर्षे उलटूनही हे घाट सुस्थितीत आहेत. यात प्रामुख्याने देवप्रयाग(धर्मशाळा), अयोध्या(मंदिर, घाट), वाराणसी(मंदिर, घाट), जगन्नाथपुरी(मंदिर), ओंकारेश्वर(मंदिर), महेश्वर ( मंदिर), गोकर्ण (अन्नछत्र), पंढरपुर (मंदिर), पंढरपुर (मंदिर), उज्जैन (मंदिर), सोमनाथ (मंदिर),द्वारका (धर्मशाळा), वृंदावन(मंदिर), हरिद्वार (मंदिर), ॠषीकेश (घाट) ही त्यातील काही प्रमुख उदाहरणे आहेत. तसेच काही ठिकाणी पाणपोया व विहिरींचेही बांधकाम त्यांनी केले. भीमाशंकर, जेजुरी, उज्जैन या त्यातील काही प्रसिद्ध विहिरी आहेत. अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या धर्मशाळामध्ये अन्नछत्रे, सदावर्ते सुरू करण्याच आली होती. प्रत्येक धर्मशाळेत मंदिर तसेच तुळशीवृंदावन होते हा सूक्ष्म फरकही लक्षात घेतला पाहिजे. केदारेश्वर, उत्तरकाशी, हरिद्वार, अयोध्या आणि उज्जैन या त्यापैकी उल्लेखनीय धर्मशाळा आहे.

शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली. इंदोरचे रुपांतर एका छोट्या गावातून एका समृद्ध शहरात करण्याचे सर्वाधिक श्रेय अहिल्यादेवींना जाते. वरील बांधकामाबरोबरच त्यांनी बागा, पूल, रस्ते याचेही बांधकाम केले. अनेक सण उत्सवांना, यात्रांना खासगीतून देणग्या दिल्या. अजिंठा येथील कैलास मंदिरातील पुरातन चित्रांना पुनरुज्जीवन दिले.

३४ देवस्थांनाना वर्षातून एकदा गंगाजल पाठविण्याची व्यवस्था केली. देशाची एकजूट करण्याचे धोरण यामागे होते.  त्यांनी केवळ देवळे बांधली नाहीत, तर देवळाच्या व्यवस्थेसाठी प्रशिक्षित पुरोहितांचीही नेमणूक करून दिली.

अहिल्यादेवी – कुशल प्रशासक

अहिल्यादेवी होळकर यांनी होळकर संस्थानची राजधानी इंदूर येथून महेश्वर येथे हलवली. मालेरावाच्या मृत्यूपश्चात अहिल्यादेवी होळकर या प्रशासकीय कारभार पाहू लागल्या. सुभेदार मल्हाररावांच्या प्रशासकीय व्यवस्थेत अहिल्यादेवी यांनी काही सुधारणा केल्या. खासगी व सरकारी खर्चाचा हिशेब त्या अत्यंत चोख ठेवत असत. होळकरशाहीत दिवाण हा सर्वोच्च अधिकारी होती. अहिल्याबाईंच्या दरबारात गंगाधर चंद्रचूड, नारो गणेश शौचे आदि दिवाण लाभले होते. या सर्वांनीच अहिल्याबाईंना घरी बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु आपले प्रशासकीय कामकाज अहिल्यादेवींनी व्यवस्थित सुरू ठेवले. परगण्याच्या प्रमुख अधिकाऱ्याला अर्थात कमाविसदाराला आपल्या प्रजेशी योग्य आचरणावरही त्यांचे कटाक्षाने लक्ष असे. त्यांची प्रशासन व्यवस्था चोख असे. दैनंदिन पत्रव्यवहार, हिशेब वगैरे गोष्टी त्या रात्र रात्र जागून पूर्ण करत. आपले त्या त्या दिवसाचे काम त्या त्याच दिवशी पूर्ण करीत. त्यातूनच त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता दिसून येते.

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण होते. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र शांतता व सुव्यवस्था होती. यातील प्रमुख कारण म्हणजे मुळात हा भूप्रदेश सुपीक होता आणि दुसरे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे तेथील शेतीची प्रगती. अहिल्याबाईंनी शेतीबाबत मल्हारराव होळकरांच्या काळच्या कायद्यात अनेक सुधारणा केल्या. करपद्धती कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून सारा वसूल केला जात असे. अहिल्याबाईंच्या कारकीर्दीत महसुलाची रक्कम रोख व धान्याच्या रुपात स्वीकारली जात असे. त्यांनी महसुलाची निश्चिती केली असली तरी त्यांनी वाजवीपेक्षा अधिक महसूल कधी घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या राज्यात प्रजा व शेतकरी खूश होते.

होळकरशाहीत स्वतःची नाणी पाडण्याची सुरुवात मल्हाररावांनी केली. १७५१ला त्यांनी चांदवड येथे तर पुढे अहिल्यादेवींनी इंदोय येथे १७६६मध्ये टांकसाळ सुरू केले. अहिल्याबाईंच्या काळात नाण्यावर शिवलिंग, बेलपत्र, चंद्राचा वा सूर्याचा मुखवडा असून गव्हाची लोंबी वा अफूच्या झाडाचे चित्र, टांकसळीचे नाव असे. पुढे त्यांनी महेश्वर येथेही टांकसाळ सुरू केली.

अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था

इतिहासतज्ज्ञ सर जॉन माल्कोम यांनी अहिल्यादेवींच्या मृत्यूपश्चात ४० वर्षांनी लिहून ठेवले आहे की, प्रशासन व्यवस्थेबाबत अहिल्यादेवींचे मुख्य तत्त्व होते ते जमीनदार तसेच गावातील पाटील,देशमुख वगैरे अधिकारी वर्गाच्या हक्कांबाबत असणारी आदरयुक्त भावना आणि मध्यम मूल्यांकन. त्या प्रत्येकाची तक्रार शांतपणे ऐकत असत आणि दरबारातील प्रत्येक खटल्याचा न्यायबुद्धीने निवाडा होत आहे की नाही परामर्श घेत असत. निवाड्यासाठी अधिकाऱ्यांकरिता त्या कायम वेळ देत असत. सर्व बिंदू जोडून न्याय देण्याच्या कर्तव्याची त्यांची जाणीव अत्यंत प्रबळ होती.

होळकरांच्या राज्यात नियमबद्ध न्यायाची मूहुर्तमेढ अहिल्याबाईंच्या काळापासून रोवली गेली. प्रजेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी न्यायालये स्थापन करून त्यावर योग्य न्यायमूर्तींच्या नेमणुका केल्या. पंचायती स्थापन करून त्यांना न्यायदानाचे विस्तृत अधिकार दिले. न्यायालयात होणाऱ्या प्रत्येक कामकाजाचे वर्णन नियमाने राज्याच्या उच्च अधिकाऱ्याकडे व अहिल्यादेवींकडे पोहोचविण्यात येई. त्या स्वतः संपूर्ण प्रकरण ऐकून निवाडा करीत असत. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशी दिली.

होळकर संस्थानातील संरक्षण व्यवस्था

आपल्याकडील सैन्यात कवायती फौज होती असे अहिल्याबाई यांचे मत होते. इंग्रजांबद्दल त्या म्हणत, वरकड व्याघ्रादिक श्वापदे बळ युक्ति प्रयुक्तिने मारतील परंतु, अस्वलाचे मारणे कठीण आहे. सुरत धरून मारले तर मरेल अन्यथा अस्वलाच्या लपेटीत कोणी सापडला तर गुदगुल्या करून त्यास मारील तद्वत ही इंग्रजांची लढाई आहे. पाहता त्यास मारणे कठीण. या वरून त्यांचे इंग्रजांबद्दलचे मत स्पष्ट होते. इंग्रजांबाबत पेशव्यांनी काय काळजी घ्यावी याविषयीही त्यांनी वेळोवेळी सूचन दिल्याचे उल्लेख ग्रंथांतून मिळतात. इंग्रजांसारखया शत्रूंना शह देण्यासाठी कवायती फलटण उभी करणे त्यांना आवश्यक वाटत होते. इ.स. १७९२-९३च्य सुमारास कर्नल जे.पी.बॉईड नामक अमेरिकन अधिकाऱ्यामार्फच पाश्चात्य पद्धतीची पलटण तयार केली. अमेरिकन कर्नल बॉईडला सेवेत घेतले. मात्र आमच्या देशाच्या विरोधात आम्ही लढणार नही अशी अट घालत जे. पी. बॉईड करार केला, ज्यात त्यांची राजकीय दृष्टी दिसून येते. अहिल्याबाईंनी त्याला जहागिरी न देता केवळ पगारी ठेवले होते. केवळ एक अधिकारी परकीय असून बाकी सर्व फौज देशी राहणार होती. संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी अहिल्याबाईंनी महेश्वर, चांदवड, हिंगलाज गरड, सेंधवा असिरगड याचे बांधकाम केले होते. त्यांच्या होळकरशाहीत  किल्ले, भुईकोट व वाडे असे १००हून अधिक होते.

अहिल्यादेवीनी स्वतः लष्करी शिक्षण घेतले होते. होळकर संस्थानातील संरक्षण क्षेत्रातील लक्षणीय योगदान म्हणजे त्यांनी सैन्यात महिलांची विशेष तुकडी तैनात केली होती.

उद्योजकीय दृष्टीकोन

महेश्‍वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. अहिल्याबाई होळकर यांनी आपली राजधानी महेश्वरला हलविल्यानंतर महेश्वरी साड्यांच्या विणकरांना प्रोत्साहन दिले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. त्यांनी कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. आज महेश्वरी साड्यांना व कापडांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली आहे त्यामागे अहिल्यादेवींचे लक्षणीय योगदान आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांना होळकर संस्थानात विशेष प्रोत्साहन दिले गेले.

कला आणि संस्कृतीस प्राधान्य व मान्यवरांना राजाश्रय

अहिल्याबाईंच्या कार्यकालात महेश्वर हे साहित्य व कलेचे माहेरघर झाले होते. त्यांनी १८व्या शतकातील सर्वोत्कृष्ट असा अहिल्या महाल बांधला. गडकिल्ल्यांचे बांधकाम करणाऱ्या अनेक वास्तुविशारद, शिल्पकार, कलाकार यांना त्यांच्या दरबारात राजाश्रय होता. याच अहिल्या राजवाड्याच्या शहरातच विणकरांनी कलात्मक महेश्वरी कापड उद्योग उभा केला. त्याच काळात महेश्वर साहित्य, मूर्तीकला, संगीत आणि कला क्षेत्राचा बालेकिल्ला झाला होता. मराठी पंडीत कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी अशा महनीय व्यक्ती या कालात होऊन गेल्या. त्यांचाही आदर सत्कार होळकरशाहीत करण्यात आला.

हिंदू धर्म तसेच अन्य धर्माबाबतही आदरयुक्त भावना असणाऱ्या अहिल्याबाई या शिवशंकराच्या निस्सीम भक्त असल्याचे व त्यांना आध्यात्मिकतेची विशेष ओढ असल्याचे त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकट होते. अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, अनुवेदान्त, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. महाराष्ट्र, माळवा, तेलंगणा, गुजरात येथील विद्वान पंडीत, ज्योतिषी, वैद्य, कीर्तनकार प्रवचनकार यांची दरबारात ये जा असे.

हुंडाबंदीचा कायदा

अहिल्याबाईंनी २५० वर्षांपूर्वीच हुंडाबंदी केल्याचे उल्लेख  साप़तात. एकदा दरबारात चार ब्राह्मण आले असता त्यांनी मुलींच्या लग्नाला हुंड्यामुळे समस्या येत असल्याचे कथन केले. यावर बाईंनी कारभाऱ्यांना सांगून, यापुढे कुठल्याही जातीजमातीत कन्येच्या पालनकर्त्याकडून पैसे घेतल्यास तो गुन्हा समजण्यात येईल असे स्पष्ट केले. जो द्रव्य घेईल त्याला दामदुप्पट, जो देईल त्याला जेवढ्यास तेवढे व मध्यस्थास जे मिळाले असतील ते त्या प्रमाणात सरकार दरबारी जमा करावे लागतील, असा कायदा केला. याच्या प्रती काढून प्रांतोप्रांता पाठवल्या. अहिल्यादेवींनी अडीचशे वर्षांपूर्वी कायदा करून न्यायाचा वेगळाच वस्तुपाठ शासनव्यवस्थेपुढे घालून दिला.

विधवांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार

१८व्या शतकात स्त्री अनेक प्रथा, रुढी, अंधश्रद्धा यात अडकली होती. आपल्या प्रजेला, विशेषतः महिलांना हितकारक ठरतील असे निर्णय घेऊन एका अर्थाने त्यांचे पुनर्वसनच अहिल्यादेवींनी केले. तत्कालीन समाजजीवनात अपत्यहीन विधवांचे धन सरकार जप्त करत असे व ती स्त्री निर्धन अवस्थेत दुसऱ्याच्या आश्रयावर जगत असे. पंरंतू हा नियम रद्द करून अशा विधवांना पुत्र दत्तक घेण्याचा व धनाचा उपयोग करू  देण्याचा नियम त्यांनी केला. अठराव्या शतकात विधवांचे प्रश्न समजून घेऊन तिला समाजात बरोबरीचे स्थान मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटना ही त्यांचा कार्यलौकिक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.

पशुपक्ष्यांसाठी कार्य

अहिल्यादेवींच्या राज्यात गरीबांना ज्याप्रमाणे दैनंदिन भोजन व विशेष प्रसंगी मेजवानी मिळत असे त्याचप्रमाणे रानातील पशुपक्षी, मासे यांच्यासाठीही खाणे पाठविले जात असे. गाईंकरिता गवत कापण्यासाठी विशेष खर्चाची तजवीज करण्यात आली होती. जेजुरीतील वाघ्या मुरळी यांना कऱ्हे पठारावरील गवत कटाईचे काम देऊन त्याच्याकरिता रोजगार निर्मिती ही करण्यात आली होती. धान्याची कोठारे वा उभ्या पिकांची शेते विकत घेऊन गाईगुरांसाठी राखून ठेवत असत.

भिल्ल, गोंड(bhil and gond tribes) झाले रक्षक

कारभार करत असताना प्रजेच्या, यात्रेकरूंच्या, व्यापाऱ्यांच्या व प्रवाशांच्या लूटमारीच्या तक्रारी अहिल्यादेवींच्या कानावर येऊ लागल्या. लूट करणाऱ्या भिल्ल गोंड आदि जनजातीय लोकांवर जरब बसविण्यासाठी त्यांनी यशवंतराव फणसे यांना सैन्यासह पाठवले. त्यांनी भिल्लांच्या पुढाऱ्यांना त्यांच्यापुढे आणून उभे केले. अपराधी गुन्हा का करतो हे लक्षात घेऊन मगच त्याचा योग्य तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे व अपराध्याला योग्य न्याय दिला पाहिजे या भूमिकेतून अहिल्याबाईंनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कमाईचे साधन नसल्याने हे लोक वाटसरूंकडून भिलकवडी नावाचा कर वसूल करत. त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून त्यांच्या वस्तीशेजारील जमीन देऊन शेतीसाठी प्रवृत्त करण्यात आले. त्याचप्रमाणे डोंगरमाळ, जंगली भागातील रस्ता व तेथून जाणाऱ्या प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आले. त्याचप्रमाणे कोणास लुटले गेले तर ते लुटारूंकडून परत मिळवून मालकाच्या ताब्यात देण्याची अभतपूर्व व्यवस्थाही लावली.

शिक्षणकार्य

स्वतःला राजधर्म कळावा म्हणून अहिल्यादेवींनी अहिल्याकामधेनू नावाचा ग्रंथ विद्वानांनकडून तयार करून घेतला. या ग्रंथाने ज्ञानप्रसाराचे कार्य तर केलेच.त्याचवेळी पूर्वापार विद्या, कला व त्यांचे प्रणेते यांचा कोश बनला तसेच या सर्व कला व विद्या जतनही झाल्या. ज्ञानसंरक्षण व ज्ञानवर्धन यासाठी काशी येथे ब्रह्मपुरी वसवली. त्याचप्रमाणे महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा सुरू केल्या.

तब्बल तीस वर्षे यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळल्यानंतर १७९५मध्ये अहिल्यादेवींनी देह ठेवला. मुलगी, जावई तसेच अन्य आप्तांच्या वियोगाचे दुःख त्यांना सहन झाले नाही व १३ ऑगस्ट १७९५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तुकोजीराव होळकर यांनी संस्थानचा कार्यभार सांभाळला.

१९व्या आणि २०व्या शतकातील भारतीय, ब्रिटिश आणि अमेरिकन अशा सर्वच इतिहासकारांनी हे एकमताने मान्य केले आहे की, अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा ही माळवा आणि महाराष्ट्रात एखाद्या संताप्रमाणेच राहिली आहे. कोणाही अभ्यासकाने त्यांचे श्रेय आजवर नाकारलेलेल नाही. अहिल्यादेवी होळकर ही उदात्त व्यक्ती, सक्षम राज्यकर्ती आणि प्रबळ सम्राज्ञी होती.

त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २५ ऑगस्ट १९९६मध्ये एक टपाल तिकीट जारी केले. इंदोरच्या नागरिकांनी १९९६मध्ये त्यांच्या नावाने पुरस्कार स्थापित केला. असाधारण कर्तृत्वासाठी ऋषितुल्य नानाजी देशमुख यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गौरवोद्गार

अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेली स्कॉटिश कवयित्री जोआना बेली म्हणते, 

“For thirty years her reign of peace,

The land in blessing did increase;

And she was blessed by every tongue,

By stern and gentle, old and young.

Yea, even the children at their mothers feet,

are taught such homely rhyming to repeat

“In latter days from Brahma came,

To rule our land, a noble Dame,

Kind was her heart,

and bright her frame,

And Ahilya was her honoured name.”

“Ahilyabai’s extraordinary ability won her the regard of her subjects and of the other Maratha confederates, including Nana Phadnavis. With the natives of Malwa … her name is sainted and she has styled an avatar or Incarnation of the Divinity. In the soberest view that can be taken of her character, she certainly appears, within her limited sphere, to have been one of the purest and most exemplary rulers that ever existed.”

— John Malcolm, A Memoir of Central India

**

“This great ruler in Indore encouraged all within her realm to do their best, Merchants produced their finest clothes, trade flourished, the farmers were at peace and oppression ceased, for each case that came to the queen’s notice was dealt with severely. She loved to see her people prosper, and to watch the fine cities grow, and to watch that her subjects were not afraid to display their wealth, lest the ruler should snatch it from them. Far and wide the roads were planted with shady trees, and wells were made, and rest-houses for travelers. The poor, the homeless, the orphaned were all helped according to their needs. The Bhils who had long been the torment of all caravans were routed from their mountain fastnesses and persuaded to settle down as honest farmers. Hindu and Musalman alike revered the famous Queen and prayed for her long life. Her last great sorrow was when her daughter became a Sati upon the death of Yashwantrao Phanse. Ahalya Bai was seventy years old when her long and splendid life closed. Indore long mourned its noble Queen, happy had been her reign, and her memory is cherished with deep reverence unto this day.”

— Annie Besant

**

“From the original papers and letters, it becomes clear that she was the first-class politician, and that was why she readily extended her support to Mahadji Shinde. I have no hesitation in saying that without the support of Ahilyabai, Mahadji would never have gained so much importance in the politics of northern India.”

— Historian Judunath Sarkar

**

“It reveals beyond doubt that all ideal virtues described by Plato and Bhattacharya were present in her personalities like Dilip, Janak, Shri Ram, Shri Krishna, and Yudhishthir. After thorough scrutiny of the long history of the world, we find only one personality of Lokmata Devi Ahilya that represents an absolutely ideal ruler.”

— Arvind Javlekar

**

“Ahilyabai Holkar, the ‘philosopher-queen’ of Malwa, had evidently been an acute observer of the wider political scene. In a letter to the Peshwa in 1772, she had warned against association with the British and likened their embrace to a bear-hug: “Other beasts, like tigers, can be killed by might or contrivance, but to kill a bear it is very difficult. It will die only if you kill it straight in the face, Or else, once caught in its powerful hold, the bear will kill its prey by tickling. Such is the way of the English. And in view of this, it is difficult to triumph over them.”

— John Keay, India: A History (2000)

**

संदर्भ :-

Back to top button