मणिपूरमधल्या कुकी समाजाचे अंतरंग
मणिपूरमध्ये(manipur) या महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवा वादंग आणि गृहयुद्धजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यात भर म्हणून आता कुकी (kuki) आमदार स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र प्रशासकीय प्रदेशाची मागणी करू लागले आहेत. आता अशी आततायी मागणी मैतेई समाजाचे लोक मान्य करणे शक्यच नाही. यानिमित्ताने गेल्या रविवारच्या लेखात आपण मैतेई समाज आणि संस्कृतीची माहिती करून घेतली होती. आजच्या लेखात कुकी समुदायाविषयी जाणून घेऊया...
कुकी जनजाती भारतातील मणिपूर, मिझोराम बांगलादेशचा चितगाँग आणि म्यानमारच्या आग्रेय भागातील एक पहाड़ी वांशिक गट आहे. ईशान्य भारतात, ते अरुणाचल प्रदेश वगळता सर्व राज्यांमध्ये आहेत. अरुणाचलातही त्यांच्या काही उपजाती कमी प्रमाणात दिसतात. भारतातील कुकी लोकांच्या सुमारे ५० जमातीना ‘अनुसूचित जमाती’ म्हणून ओळखले. जाते. त्या विशिष्ट कुकी समुदायाद्वारे बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेवर तसेच, त्यांच्या मूळ प्रदेशावर आधारित, म्यानमारचे चिनी लोक आणि मिझोरामचे मिझो लोक हे कुकी जनजातीमधीलच समजले जातात. या सगळ्या उपजातींना एकत्रित संबोधण्यासाठी त्यांना ‘झो समाज’ असे ओळखले जाते.
कुकी मुळात कुठून आले? त्यांचा प्रारंभिक इतिहास किंवा ते प्रामुख्याने कोणत्या अर्वाचीन समुदायाशी निगडित आहेत? इत्यादी माहिती बरीच अनिश्चित आणि अत्यंत तोकडी आहे. ‘कुकी’ या शब्दाचा उगम कुठे कधी, कसा आणि का झाला, याविषयीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. विविध कुकी जनजातीच्या विशेषत: साधारणपणे एकत्र दर्शवणारा हा एक शब्द आहे. मुळात कुकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमातींना स्वतःचे असे नावच नसावे. ब्रिटिश लेखक अडम स्कॉट रोड ज्यांच्या मते, ब्रिटिश रेकॉर्डप्रमाणे ‘कुकी’ शब्दाचा सर्वांत जुना संदर्भ १७७७ सालचा आढळतो. प्राचीन संस्कृत पौराणिक साहित्यात किंवा कथांमध्ये आपण ‘किरात’ या जनजातीचा उल्लेख ऐकतो, काही लोकांच्या मते, हे कुकींच्या सामाजिक, धार्मिक इत्यादी धारणा या किरात जनजातीसारख्या आहेत. मणिपूरच्या संदर्भात कुकी लोकांचा संदर्भ साधारण १६व्या शतकापासून मिळतो. परंतु, मोठ्या प्रमाणावर कुकी लोक १९व्या शतकाच्या पूर्वार्धातच मणिपूरमध्ये स्थलांतरित झाले.
डब्लू. मॅककुल्लोघ यांनी १८५९ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या लेखात तसेच, आर. बी. पेमबर्टोन यांनी १८३५ मध्ये प्रकाशित केलेल्या पूर्व सरहद्दीसंदर्भातील त्यांच्या अहवालात १९व्या शतकाच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये कुकींचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याचे सूचित केले गेले आहे. आज आपले स्वत्व गमावून मिझो लोकांपासून जीव वाचवून पळणारे रियांग लोकही ‘कुकी- रियांग’ मानले जात. या समाजाने आजच्या बांगलादेश (चितगाँग), त्रिपुरा, मिझोराम भागात ब्रिटिशांविरोधात मोठा सशस्त्र लढा उभारल्याचे इतिहासात वाचायला मिळते. त्याची थोडक्यात गोष्ट यानिमित्ताने सांगते.
दि. ३१ जानेवारी १८६० रोजी कुकी- रियांग गटांनी बंगाली आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची वस्ती असलेल्या छगलनैया मैदानावर (तेव्हा हा भाग द्विप्रा राज्याच्या प्रशासनाखाली होता) छापा टाकण्यासाठी हिल टिप्पेराच्या कुकींना एकत्र केले. त्यांनी बख्शगंजचा परिसर लुटला आणि बसंतपूरच्या कमाल पोद्दार या अधिकाऱ्याचा खून केला. या सगळ्या चकमकीत १८५ ब्रिटिशांची हत्या करण्यात आली. त्यापैकी १०० अपहृत करण्यात आले होते. या मैदानी प्रदेशात हे कुकी गट एक ते दोन दिवसच राहिले. त्यांना दडपण्यासाठी नोआखली, टिपराह (कोमिल्ला) आणि चितगाव (बांगलादेशचे भाग) येथून ब्रिटिश सैन्य आणि पोलीस स्वाना करण्यात आले. पण, कुकी ही फौज यायच्या आधीच त्यांच्या हातावर तुरी देऊन संस्थानाच्या अखत्यारितील जंगलांत पळून गेलेले होते. हे गट पुन्हा छगलनैयाला कधीच परत गेले नाहीत. असे उठाव ईशान्य भारतात जागोजागी केल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. दुर्दैव हे की, भारतीय मुलांना हा इतिहास कधीच शिकवला जात नाही.
कुकी समाजाच्या इतिहासातील एक महत्त्वाची नोंद म्हणजे मिशनरींचे आगमन आणि त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात झालेला ख्रिस्ती धर्माचा प्रसार, मिशनरी संस्थांच्या कामाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिणाम लक्षणीय स्वरूपाचे होते. ख्रिश्चन धर्माच्या स्वीकारामुळे आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराने कुकी लोकांना आधुनिक युगाची ओळख झाली. ‘अमेरिकन बाप्टिस्ट मिशन युनियन द्वारे पाठवला गेलेला विल्यम पेटीग्रेव नावाचा पहिला परदेशी मिशनरी दि. ६ फेब्रुवारी, १८९४ रोजी मणिपूरला आला. त्यानी डॉ. क्रोझियर यांच्यासोबत मणिपूरच्या उत्तर आणि पूर्वोत्तर भागात एकत्र काम केले. दक्षिणेत, वेल्श प्रेस्बिटेरी मिशनच्या वॉटकिन्स रॉबर्ट यांनी १९१३ मध्ये ‘इंडो-बर्मा थाडौ-कुकी पायोनियर मिशन’चे आयोजन केले. पुढे हे ‘मिशन’ सर्वसमावेशक असावे, म्हणून त्याचे नाव बदलून ‘नॉर्थ ईस्ट इंडिया जनरल मिशन’ असे करण्यात आले. या सगळ्या मिशनरी कारवायांमुळे स्वाभाविकपणे कुकी त्यांच्या पूर्वजांच्या चालीरिती, परंपरा आणि नैसर्गिक जीवनशैलीपासून दूर लोटले गेले. त्यांना बहवून आपल्याला हवे ते त्यांच्या डोक्यात भरणे देशविघातक शक्तींना सोयीचे होऊ लागले.
चर्चमार्फत( christian missionaries) आपल्याला हवे तसे या लोकांना वापरणे ब्रिटिशांनाही सोयीचे झाले. स्वताच्या मुळापासून तुटलेले धर्मातरित जनजातीय स्वतःच्याच मुळावर घाव घालू लागल्याचे पुढच्या काळात दिसून येऊ लागले. असो. १९१७-१९ चे ब्रिटिश वर्चस्वाविरोधातले कुकी वडही बरेच प्रसिद्ध आहे. परंतु, नंतर त्यांचा प्रदेश ब्रिटिशांनी ताबूत घेतला आणि तो ब्रिटिश भारत आणि ब्रिटिश बर्माच्या प्रशासनांमध्ये वाटून घेतला. १९१९ पर्यंत कुकी हे स्वतंत्र लोक होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान आपले गेलेले स्वातंत्र्य परत मिळवण्याची संधी पाहून, कुकी गावांनी ‘इम्पिरियल जपानी आर्मी’ आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिशांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याशी लढा दिला. परंतु, इंफाळमध्ये लढल्या गेलेल्या या युद्धात ब्रिटिशांनी जपानी सैन्याला हरवले व त्यांना पळून जायला भाग पाडले. दुसऱ्या महायुद्धातील मित्रराष्ट्रांच्या यशाने त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळत असतानाही आताच्या बांगलादेश, काही बर्मा भागातील जनजातीय लोकांना भारतात सामील होण्याची खूप इच्छा होती. परंतु, तसे व्हायचे नव्हते. त्यामुळे आज या जनजातींचे लोक आपल्याला भारत, म्यानमार व बांगलादेश या तिन्ही देशांत पाहायला मिळतात. या सगळ्या इतिहासाचा गैरफायदा घेऊन छोटे-मोठे कुकी लोक ‘छड़उछ खच’च्या ‘नागलीम फॉर ख्राईस्ट’प्रमाणे कुकी राष्ट्राची मागणी करू लागले. त्यासाठी सशस्त्र दहशतवादी गट तयार झाले. या गटांना आर्थिक, सामरिक, राजकीय, सर्व प्रकारची मदत चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशातील अतिरेकी कारवाया करणारे लोक करतात. विविध प्रकारच्या तस्करीमध्येही या गटांचा वापर केला जातो. इतर भारतात ज्याप्रकारे नक्षली कारवाया करतात, त्याच धर्तीवर याचे कामही चालते.
मणिपूरमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवा वादंग आणि गृहयुद्धजनक स्थिती निर्माण झाली आहे, हे आपण सर्व जाणतोच. त्यात भर म्हणून आता कुकी आमदार स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र प्रशासकीय प्रदेशाची मागणी करू लागले आहेत. आता अशी आततायी मागणी मैतेई समाजाचे लोक मान्य करणे शक्यच नाही. त्यांच्या मते, १९६१ सालापर्यंत मणिपूरच्या भूमीवर जो कोणी वस्ती करून राहत होता, ती प्रत्येक व्यक्ती मणिपुरी आहे, म्हणजेच पर्यायाने भारतीय नागरिक आहे.
परंतु, त्यानंतर आलेल्या कोणत्याही जनजातीच्या व्यक्तीला मणिपूरची भूमी सोडून आपल्या देशात परत जावे लागेल आणि त्याच साठी ‘एनआरसी’ मणिपूरमध्ये लागू केले जावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. म्हणजे या अराजकाचा फायदा घेऊन कुकी नेते मणिपूरला तोडू पाहत आहेत. पण, मणिपूर आणि केंद्र सरकार चोरावर मोर होऊन ‘एनआरसी’ लागू करायचा आपला मानस यानिमित्ताने जनमानसात रुजवू लागले आहे. सामाजिक प्रश्नही राजकीय कुशाग्रतेनेच सोडवता येऊ शकतात. याचे हे सुंदर उदाहरण आहे. अजून या सगळ्या प्रकरणात बरेच काही घडणार आहे. आज यानिमित्ताने कुकी जनजातींची थोडी माहिती या लेखाद्वारे दिली.
लेखिका :- अमिता आपटे
साभार :- मुंबई तरुण भारत