ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शके १५९६ ( इसवी सन १६७४ ) रोजी शिवाजी महाराजांचा(shivaji maharaj) राज्याभिषेक होऊन (rajyabhishek sohala) ते छत्रपती म्हणजेच सार्वभौम राजा होणे ही हिंदूस्थानच्या इतिहासातील विलक्षण घटना होती .
“या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा , मऱ्हाठा पातशहा येवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही” , असं वर्णन सभासद बखरीत करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य म्हणजेच सतराव्या शतकातील हिंदवी साम्राज्य हे हिंदुस्तान , हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे रक्षण तसेच उत्कर्ष करणारे होते. अनेक शतकांच्या पराभूत आणि निराशाजनक मानसिकतेतून हिंदू समाज बाहेर पडून पुन्हा शक्तिशाली बनला. याच काळात हिंदू संस्कृतीचे पुनरुत्थान सुरू झाले.
महाराजांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती, इतिहास त्याचा साक्षीदार राहिलेला आहे. राज्यव्यवहारांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे फारसी व दख्खनी उर्दूतील शब्द , यांच्या ऐवजी संस्कृत पर्यायवाची शब्द ( गीर्वाण भाषा) वापरून राज्यव्यवहाराचे मराठीकरण करण्याची योजना, शिवप्रभूंनी दक्षिण दिग्विजयानंतर जाणीवपूर्वक आखली. राज्यव्यवहारातील मराठीचे स्वरुप अधिक शुद्ध असावे, असा जाणीवपूर्वक प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हे त्या महापुरुषाच्या चतुरस्त्र प्रतिभेची साक्ष आहे.
राज्यकारभारातील अरबी व फारसी भाषेचे स्तोम महाराजांनी मोडून काढले. राज्यकारभारातील १३८० अरबी व फारशी शब्द बदलून त्या जागी गीर्वाण भाषेतील शब्द आणले. राज्यव्यवहारकोश तयार केला.
अशा प्रकारे गीर्वाण भाषेतील (देवांची भाषा देवनागरी /संस्कृत/sanskrit ) एक कोश तयार करण्याचे काम, शिवरायांनी आपला मुत्सद्दी व प्रशासक रघुनाथ नारायण हनुमंते उपाख्य रघुनाथ पंडित यांच्याकडे सोपवले . त्यांनीही बहुदा शेवटी शेवटी धुंडीराज व्यास या विद्वान सहकाऱ्याच्या साह्याने हा राज्यव्यवहारकोश (राजकोश) सिद्ध केला. राज्यव्यवहारकोशाच्या सुरुवातीला रघुनाथ पंडिताने, राज्यव्यवहारकोश लिहिण्याचे प्रयोजन काय ? यासंबंधी पुढील प्रमाणे म्हटले आहे.
कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला –
वसंतसेनात्यर्थ यवनवचनैर्त्युप्तसराणिम्।
न्युपव्याहारार्थ स तु विबुधभाषां वितनितुम्
नियोक्तोभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना।।
“या पृथ्वीतलावरुन म्लेच्छांचा पूर्ण उच्छेद केल्यानंतर सूर्यवंशाला ललामभूत ठरलेल्या त्या छत्रपती शिवाजीने यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार पद्धतीचा संस्कृत भाषेतून प्रसार करण्यासाठी (रघुनाथ) पंडिताची नियुक्ती केली.”
महाराष्ट्रातील पूर्वीच्या ३०० वर्षे नांदलेल्या राजवटीमुळे फारसी,अरबी आणि दक्षिणी उर्दू या भाषांना राजभाषांचे स्वरुप प्राप्त झाले होते. पण विविध थरात उदा. इनामे, दानपत्रे, नेमणुका, वतने इत्यादी बाबतीत मराठीचा (marathi) वापर हा अपरिहार्य होता. मराठीवरील फारसी आणि दक्षिणी उर्दूच्या संस्करणामुळे राज्यव्यवहार व लोकव्यवहार या दोन्ही क्षेत्रात शेकडो फारशी शब्द, मराठी कागदपत्रांतून वापरण्यात येऊ लागले होते. त्या काळात उत्पन्नाचे मुख्य साधन जमीन आणि शेतसारा हे असल्याने जमिनीसंबंधी शेकडो फारशी शब्द मराठीतून सामान्यांच्याही तोंडी खेळू लागले होते.
मराठी कागदपत्रातूनही त्यांचा वापर होऊ लागला होता. ज्ञानेश्वर तसेच महानुभावकालीन मराठीचे स्वरुप जवळजवळ लुप्त होऊन गेले होते . रुढ झालेल्या शब्दांपूर्वी शुद्ध मराठी रुपे होती, हेही लोक विसरून गेले होते. आजही म्हणजेच ३५० वर्षानंतरही मराठीतील फारसी अगर त्यासारख्या शब्दांची संख्या कमी झाली असली, तरी ती १० टक्के अजूनही शिल्लक आहेच . इतकी ती सरमिसळून गेलेली आहे.
उदाहरणादाखल काही शब्द पाहू :- माल, मसाला, इमारत, फजिती, मोल ,मजुरी ,कारकून, गुन्हा ,मुभा ,समई ,बक्षीस ,गुलाब, शर्थ,गरम ,नाराज ,तुफान, बंदर, किल्ला ,जमीन ,जबरदस्ती, कलम, कायदा असे अगणित शब्द आजही वापरत आहेत, पार रुळले आहेत. ही जर आजची स्थिती तर ३५० वर्षांपूर्वी ७०/७५ टक्के शब्द सहज असणार.
त्या काळातील काही पत्रे जरी पाहिली , तरी त्याचा परिपूर्ण अंदाज येतो.
“शाब्बास तुमच्या दिलेरीची, रुस्तमिची आणि सफेजंगीची” या वाक्यात मराठी शब्द किती ? यातील “तुमच्या” व “आणि” हे दोनच मराठी शब्द आहेत.
दक्षिण दिग्विजयानंतर शिवाजी महाराजांना, राज्यव्यवहाराच्या दृष्टीने ही अडचण विशेषच जाणवली असली पाहिजे. महाराजांचे राज्य महाराष्ट्रात ६ जिल्हे , कर्नाटकात ४ जिल्हे व तामिळनाडूत २ जिल्हे, असे पसरलेले होते. मराठी रुढ असलेली परिभाषा, दक्षिणेत चटकन समजेलच अशी परिस्थिती नसावी. हे एक कारण या कोशाच्या रचनेबाबत संभवते. शिवाजी महाराजांची राज्यव्यवहार कोशामागील प्रेरणा ही उत्तम , सुगम आणि सुटसुटीत राज्यकारभाराची होती, हे स्पष्ट होते. राज्यव्यवहारकोशाच्या माध्यमातून पूर्वी प्रचलित असलेले आणि मध्यंतरी यवनांच्या राजवटीमुळे वापरातून गेलेले , अनेक शब्द पुन्हा व्यवहारात आणले गेले, हा मराठीचा मोठा लाभच झाला.
कोशातील शब्दांची १)राजवर्ग २)कार्यस्थानवर्ग ३)भोग्यवर्ग ४)शस्त्रवर्ग ५)चतुरंगवर्ग ६)सामंतवर्ग )दुर्गवर्ग ८)लेखनवर्ग ९)जनपदवर्ग व १०)पण्यवर्ग अशा दहा वर्गात विभागणी केली आहे.
मुळ प्रतीमधील राज्यव्यवहारकोश समजणे काहीसे कठीणच होते आताच्या मराठी वाचकांना. राज्यव्यवहारकोशाचे नावही राज्यव्यवहारकोश, राजव्यवहारकोश असे बदलत बदलत आता राजकोश इतके संक्षिप्त झालेले आहे.
अश्विनीकुमार दत्तात्रेय मराठे यांच्या १९८६ साली प्रकाशित झालेल्या राजकोश ( शिवकालीन उर्दू – मराठी राज्यव्यवहारकोश) या सेतुमाधवराव पगडी यांनी प्रस्तावना लिहिलेल्या , तसेच प्रचंड संशोधनानंतर सिद्ध केलेल्या या पुस्तकाला आपण आधारभूत मानले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक तयार करवून घेतलेल्या राज्यव्यवहारकोशात जे शब्द दिलेले आहेत ते शब्द शिवराज्याभिषेक दिनाचे अर्थात हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून आपण ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शके १९४५ ( ०२ जून २०२३) ते ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शके १९४६ ( २० जून २०२४) असे संपूर्ण वर्षभर दररोज एका शब्दाची ओळख करुन घेणार आहोत .