सिंहासनाधिश्वर छत्रपति शिवराय
भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेलेला प्रसंग या शुभ प्रसंगाने हिंदुस्थानचे भाग्य उजळले होते. भारतमातेच्या भाग्याचा दिवस उगविला होता. शेकडो वर्षापासून हिंदुसमाजाला ग्लानी मुक्त करण्यासाठी भगवंतानी घेतलेले अवताराचे रूप प्रगटले होते.
इतिहासाचे सुवर्ण पृष्ठ सांगतो आहे ”ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ आनंदनाम संवत्सर तारीख ६ जून १६७४ या दिवशी तीन घटिका रात्र उरली असता पहाटे पाच वाजता शिवाजी महाराज (shivaji maharaj rajyabhishek) सिंहासनावर बसले. ‘तक्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. रायरीचे नाव रायगड म्हणोन ठेविले.
तक्तास स्थळ तोच गड नेमिला. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ मासी शुद्ध त्रयोदशीस मुहूर्त पाहिला. ते दिवशी राजियानी मंगलस्नाने करून श्री महादेव व श्री भवानी कुलस्वामी व उपाध्ये प्रभाकर भटांचे पुत्र बाळभट कुलगुरू व भट गोसावी वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरूष अनुष्ठित यांची सर्वांची पूजा यथाविधी अलंकार वस्त्रे देऊन केली. सर्वास नमन करून अभिषेकास सुवर्ण चौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर सज्जनांनी स्थळास्थळाची उदके करून सुवर्णकलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळास नमस्कार करून सिंहासनावर बसले. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी अष्टप्रधानांनी उभे राहावे. पूर्वी कृतायुगी, त्रेतायुगी, द्वापारी, सिंहासनी बैसले. त्यापद्धती प्रमाणे शास्त्रोक्त सर्वही साहित्य निराळे केले. अष्टखांबी अष्टप्रधान उभे राहिले. छत्र जडावाचे मोती व झालरीचे करून मस्तकावर धरिले. छत्रपति असे नाव चालविले. क्षत्रिय कुलावंतस श्री राज शिवछत्रपती सिंहासनावर बसले. त्या दिवसापासून राज्याभिषेकशक नियम चालविला.’’
महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत बनवली. त्यावेळच्या तरूणांना त्यांनी एकत्र केले. त्यांच्यासोबत जसे तरूण होते तसे वर्षानुवर्षे परकीयांच्या सेवेत असलेले नामवंत सरदारही होते. मात्र या सर्वांसमोर त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी आपलेसे केले, वचक बसवला, प्रसंगी शिक्षा दिल्या आणि प्रेमही दिले.
स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्तीमध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रुंचे अडथळे शिवाजी महाराजांनी केले होते. त्यांचे शत्रुही त्यांच्यापेक्षा कित्येक पट बलशाही होते. त्यात केवळ हिंदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे विशाल आकारमानाचे मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील भक्कम आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेचे इंग्रज, फ्रेंच, जंजिऱ्याचे सिद्धी, कोकणातील छोटी छोटी राज्ये आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांचेही शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते. पण शिवाजींनी आपल्या प्रत्येक शत्रुचा संपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करुन त्याच्या बलस्थानाबरोबरच दुर्बल स्थानांचाही विचार करुन आपल्या उत्कृष्ट सेनापतीत्वाखाली सर्व शत्रुंना नामोहरम करुन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या कार्यात त्यांच्या जीवाभावाचे सखेसोबती, हजारो मावळ्याच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झालीच व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले.
स्वराज्य (swarajya) निर्माण करुन त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते. असा खोडसाळ शोध विदेशी इतिहासाकारांनी लावला असता. संपूर्ण भारतवर्ष परकीय इस्लामी, जुलमी शासकांच्या प्रचंड अत्याचाराखाली भरडला जात होता. दक्षिण भारतात अल्लाउद्दीन शिलजीच्या स्वारीनंतर पुढील ३०० वर्षात महाराष्ट्राला मोगल, आदिलशहा, निजाम शहा, सिद्धी या परकियांनी गुलाम केले. इ.स. १३१७च्या दिल्ली सुलतान अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती.
संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना, दु:ख आणि संकटांचा भीषण काळोख पसरला होता. भयावर मोगल काळात हिंदु जनमनात गुलामीचा काळाकुट अंधार पसरला होता. आपल्या हिंदुस्थानात हिंदु राजा कधीच होणार नाही अशी पराभूत मानसिकता निर्माण झाली होती. या भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटविली. पण खरे दुर्दैवी कारण आपण या सोहळ्याचे भाग प्रत्यक्ष होऊ शकलो नाही परंतु शिवरायांच्या या सुवर्ण सोहळ्याचे वाचन करून, अभ्यास करून आणि शिवरायांना आठवून आपण हा भूतकाळातील सोहळा मनापासून अनुभवू शकतो. शिवचारित्र आपल्या अभ्यासासाठीच नव्हे आपल्या राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायक आहे.
शिवरायांच्या प्रेरक विचारातुन आपले राष्ट्र वैभवशाली करण्याचा संकल्प करूया! आपुल्या राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.
लेखक :- अमोल तपासे सीताबर्डी,नागपूर
साभार :- विश्व संवाद केंद्र विदर्भ