जनजाती जननायक भगवान बिरसा मुंडा
भगवान बिरसा मुंडा(bhagwan birsa munda) यांचा जन्म झारखंड मधील उलीहातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला.तो काळ होता भारतावर ब्रिटिश सरकारचे राज्य असण्याचा. मौल्यवान वनसंपत्ती व प्राण्यांची शिकार यासाठी ब्रिटिशांच्या नजरा वनांकडे वळल्या आणि वनांचे संरक्षण करणाऱ्या जनजाती समुहा सोबत त्यांचा संघर्ष सुरू झाला. ब्रिटिशांच्या आधुनिक बंदुका पुढे जनजाती समुदायाच्या पारंपारिक तिर कमठा अपुरा पडला. शस्त्राच्या बळावर ब्रिटिशांनी जनजाती समूहावर अनन्वित अत्याचार करून त्यांना ईसाई धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. बिरसा मुंडा यांचे वडील सुगन मुंडाचे जबरदस्तीने केलेले धर्मांतरण यामुळे त्यांना ख्रिस्ती मिशनरी यांच्या विषयी प्रचंड राग होता.
मिशनरी शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना भोळ्या भाबड्या जनजाती समुदायाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या मूळ धर्मापासून तोडून त्यांना इसाई धर्मात प्रवेश करवून घेण्याचा सपाटा लावला व त्यांना जल, जंगल आणि जमिनी पासून बेदखल करण्याचा कपटीपणा सुरू केला त्याला तत्कालीन जमीनदार यांनी पण ब्रिटिशांना साथ दिली यावर 15 वर्षीय युवा बिरसा यांनी “साहेब साहेब एक टोपी” अर्थात धर्मांतरण करणारे ईसाई मिशनरी आणि जल जंगल जमीन वर कब्जा करणारे जमीनदार हे सारखेच जनजाती समुदायाचे शोषक आहे.
जनजाती समुदायाच्या सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात या परकियांचे अतिक्रमण वाढू लागले तेव्हा तरुण गरम रक्ताच्या बिरसाच्या मनात असंतोष निर्माण होऊन जनजाती समुदायाला जागृत करून एकत्रित करण्याचे काम बिरसाने केले.”उलगुलान”( ulgulan) म्हणजेच एकाच वेळी सर्व ठिकाणावरून एकत्रित रित्या अन्याय विरुध्द केलेला उठाव आणि या महा विद्रोहाचे नेतृत्व बिरसा ने केले.जमीनदार आणि ब्रिटिश यांना जेरीस आणून निकराने प्रतिकार केला त्यांच्या पराक्रमामुळे मुंडा जनजाती त्यांना “धरती आबा” म्हणू लागली त्यांना आपले दैवत मानून त्यांच्या धार्मिक उपदेशामुळे अनिष्ट प्रथा, व्यसनाधीनता , वाईट सवयींचा त्याग केला एक सामाजिक परिवर्तन त्यांनी घडवून आणले .
साम , दाम ,दंड ,भेद यांचा संपूर्ण वापर करत धोक्याने इंग्रजांनी बिरसाला कैद करून तुरुंगात टाकले तेथे त्यांच्यावर खूप अत्याचार केले असे म्हणतात की त्यांच्यावर विष प्रयोग सुध्दा केले यातच तरुण वयात 9 जून 1900 रोजी रांची येथील तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला .
अन्याय,अत्याचार,शोषण आणि धर्मांतरण विरोधात लढा देणारा जनजाती समुदायाचा आत्मा गेला परंतु अन्याय विरूद्ध प्रतिकार व संघटित लढा देण्याची ऊर्जा देवून गेला . भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र जी मोदी यांनी गत वर्षी 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस “राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस” (rashtriya janjati gaurav divas) म्हणून घोषित केला व खऱ्या अर्थाने बिरसा व जनजाती समूहाचा सन्मान केला. त्यांच्या बलिदान दिनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या स्व धर्माचे रक्षण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल !
लेखक – दिनेश अंबादास शेराम,(अधिसभा सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.)
साभार :- विश्व संवाद केंद्र, विदर्भ.