गोड साखरेची कडू कहाणी…
आपला देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत विकसनशील देशाच्या यादीतून विकसित देशाच्या यादीमध्ये समाविष्ट लवकरच होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना,देशातील जनतेने नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे.असे असतानाही अजूनही समाजातील वंचित,दलित,आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांच्या जीवनात हलाखीचे जगणं नशिबी कायम असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
बीड जिल्हा म्हणजे नेत्यांना जन्म देणारा जिल्हा…
बीड जिल्हा म्हणजे साधू संताचा जिल्हा…
बीड जिल्हा म्हणजे विविध धार्मिक गड असलेला जिल्हा…
बीड जिल्हा म्हणजे कष्टकऱ्यांच्या जिल्हा…
हे सगळं असतानाही अजूनही ऊस तोड कामगारांचा (ustod kamgar) जिल्हा…बीड जिल्हा ही ओळख नाहीशी कोणीही करू शकलं नाही.
मागे हजारो महिला ऊसतोड कामगारांच्या गर्भाशयाचा विषय विविध मीडियामध्ये चर्चेला होता…सर्वांनी भरपूर लिहिलं …पण पुढं याचं शासन दरबारी काय झालं यावर कोणत्या राजकीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजूनही विषय मांडला नसल्याचे आढळून येते.राज्यात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी फालतू विषयावर अनेक पक्षांचे विविध राजकीय नेते पत्रकार परिषद घेत असतात.
महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्र हे अनेकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारे ठरले असले तरीही यातून अनेक हुकूमशाही मानसिकतेचे मानवी रूप पुढं आलेलं पाहून अस्वस्थ व्हायला होतं…
नुकतीच एक घटना घडली की,ऊसतोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत एका मुकादमाने बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या सहा मुलांना कुंभेज (जि. सोलापूर) येथे डांबून ठेवले होते.केज तालुक्यातील शिंदी येथील एक कुटुंब व गेवराई तालुक्यातील दोन कुटुंबे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात ऊसतोडणीसाठी गेले होते.
ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर करमाळा येथील एका ऊसतोड मुकादमाने मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचे सांगत आणखी तीन महिने काम करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी वाढीव तीन महिने काम केले; परंतु अद्यापही पैसे शिल्लक असल्याचा दावा मुकादमाने केला. पैसे द्या; अन्यथा तुमची मुले आमच्याकडे ठेवा, असे सांगत त्या ऊसतोड मुकादमाने ३ मुले व ३ मुली करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे डांबून ठेवण्यात आले होते.करमाळा पोलिसांच्या मदतीने त्या ६ मुलांची सुटका करण्यात आली. बीडमध्ये आणल्यानंतर त्या सहा मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांनी कुटुंबीयांकडे बुधवारी सुपुर्द करण्यात आले आहे.दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई वसंत माळी यांनी महत्वाची भूमिका घेऊन सदर प्रकरणाची माहिती सोलापूर जिल्हा चाइल्ड लाइन येथे दिल्यामुळे पुढील कारवाई लवकर होऊन बालकांची सुटका होण्यास मदत झाली.
यावर अजूनहीकोणत्याही राजकीय नेत्यांला (यामध्ये सर्व पक्षीय) पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवावा वाटलं नाही हे लक्षण राजकीय नेत्यांची मानवी संवेदनशीलता संपली असल्याचे स्पष्ट दिसत असूनही समाज या राजकीय धेंडानां नेतृत्व करण्यासाठी लायक समजून निवडून का? देतोय हेच कळत नाही.
लेखक :- अशोक तिडके (विवेक विचार मंच)