‘वो मंदिर भी उडाता है, वो मस्जिद भी उडाता है, फिर भी बडे फक्र से वो खुद को “जिहादी” कहलाता है…’
‘जिहादमध्ये सहभागी होऊन अल्लाहचे खास सेवक बना’ असं म्हणून जाळ्यात फसणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला हा चित्रपट योग्य धडा शिकवतो. निरपराध लोकांना मारून जन्नत मिळत नाही किंवा जन्नतमधील ७२ हुरेंही भेटत नाहीत. कारण कोणताच धर्म लोकांना द्वेष करायला शिकवत नाही, असा संदेश ७२ हूर चित्रपटातून मिळतो.
जेव्हा जेव्हा भारताने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला, तेव्हा त्या देशाने पाठित खंजीर खुपसल्याच्या घटनांना इतिहास साक्षीदार आहे. हे करताना शेजारच्या देशाने अनेकदा दहशवादाचा मार्ग निवडल्याचंही संपूर्ण जगाला माहीत आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना फसवणं, त्यांना जन्नतमधील हुऱ्यांची सोनेरी स्वप्नं दाखवून दहशतवादाच्या जाळ्यात अडकवणं आणि या सापळ्यात अडकलेल्या लोकांच्या माध्यमातून भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणणं, ही आपल्या शेजारील देशासाठी काही नवीन गोष्ट नाही. आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी ’७२ हुरें’ या चित्रपटातून या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. धर्माच्या नावाखाली निव्वळ अधर्म करणाऱ्यांना त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून चपराक मारली आहे.
काय आहे ७२ हुरे ची कथा?
हकीम (पवन मल्होत्रा) आणि साकिब (आमिर बशीर) यांची ही कथा आहे. चित्रपटाची सुरुवातीला असं दिसतं की हकीम त्याच्या हाताला अमेरिकेचं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी खेळणं म्हणुन वापरत असते.
एका मौलानाच्या शब्दात सांगायचे तर, हे दोन मध्यमवयीन माणसे जन्नत आणि ७२ हुरेंच्या लालसेने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातून भारतात येतात.
एकीकडे धर्म आणि जिहादच्या गप्पा मारणाऱ्या या दोघांचा हेतु आणि उद्देश स्पष्ट नाही हे दिसचं. हे दोन आत्मघाती हल्लेखोर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर अल्लाहच्या नावाने बॉम्बस्फोट करतात.
हकीम आणि साकिबचा ७२ हुरें मिळवण्याचा प्रवास मृत्यूनंतर सुरू होतो. त्यांचे आत्मे जन्नतपर्यंत पोहोचतात का..?, त्यांना ७२ हुरे मिळतात का..?, मौलवींच्या प्रवचनानुसार या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अल्लाहचे दूत येतात का..?, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये ७२ हुरे पाहावी लागतील. एकुणच धर्माच्या नावाने तरुणांची माथी कशी भडकवली जातात, याचं उत्तम चित्रण पहायला मिळतं.
लेखन आणि दिग्दर्शन –
या चित्रपटासाठी लेखक आणि दिग्दर्शकांनी खूप संशोधन आणि मेहनत केली आहे, हे चित्रपट पाहताना स्पष्ट जाणवतं. अनिल पांडे लिखित या चित्रपटाच्या कथेने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पण धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना यातून चांगला धडा मिळू शकेल. दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी त्यांच्या व्यंगात्मक शैलीत निष्पापांचं ब्रेनवॉश करणाऱ्यांबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. दमदार स्क्रीनप्ले आणि प्रभावी संवाद या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरतात. दिग्दर्शकांनी अत्यंत संवेदनशील विषय जबाबदारीने आणि गांभीर्याने मांडला आहे.
७२ हुरें हा चित्रपट आपण सर्वानी सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहावा..