ऋणानुबंध – मंगलाताई नारळीकर
आज सकाळीच पूजा करताना मंगलाताई आता आपल्यात नाहीत अशी बातमी आली. ज्ञानाचे भांडार असणाऱ्या मंगलाताई यांचे जाणे चटका लावून गेले. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातील पैलू आणि त्यांचे कुटुंब, त्यांंची परखड मते आणि ऊतम सहचारिणी डॉ. सौ. मंगलाताई नारळीकर (Mangala Narlikar:-Indian mathematician) यांची एकता मासिकासाठी मार्च २०२१ मध्ये घेतलेली मुलाखत..
(नाशिक येथे मार्च २०२१ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक आणि वैज्ञानिक जयंत नारळीकर( jayant narlikar:-Indian astrophysicist) होते. त्यांच्या पत्नी लेखिका, संशोधक, गणितज्ज्ञ डॉ.सौ.मंगलाताई नारळीकर यांची मुलाखत )
आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगाल का ?
माझी कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्याबरोबरीच्या इतर मुलांच्या मानाने असाधारण होती. माझे वडील मी सहा महिन्यांची असताना कॅन्सरने वारले. माझा मोठा भाऊ तेव्हा दोन वर्षांचा होता तर माझी आई फक्त एकवीस वर्षांची होती. तिचं आजोळ सुधारक जोशींचं होतं. तिला पुनर्विवाहाचा पर्याय देखील होता. पण तिने असाधारण निर्णय घेतला. मला आणि भावाला माझी आजी, काका-काकू यांच्याकडे मुंबईला सोपवून ती पुण्यात तिच्या आई-वडिलांच्या कडे राहिली. वैद्यकीचे शिक्षण घेऊन तिने रुग्णसेवा करण्याचे तिचे स्वप्न पुरे केले आणि डॉक्टर झाली. ताराचंद रामनाथ हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापन केले. दीड वर्षांची असल्यापासून माझी आजीच मला आईच्या जागी होती. माझी काकू माझी सख्खी मावशी होती, तिच्याकडूनही मला खूप प्रेम मिळालं. कधी कधी काही जण मला आई वडिलांचं छत्र नाही म्हणून सहानुभूती दाखवत असत ते मला अजिबात आवडत नव्हतं. मला एक आई नसून तीन माता आहेत. आजी, काकू आणि पुण्यात राहणारी आई असे मी समजे.
सुट्टीत आम्ही पुण्याला गेलो किंवा ती कधी दोन – चार दिवसांसाठी मुंबईत आली, तर आम्ही तिच्या जवळ राहत असू. वास्तविक घरची आर्थिक स्थिती उत्तम नव्हती. काका त्यांच्या लेबर ऑफिसरच्या व्यवसायाचा अभ्यास करत होते. घरी जास्त नोकर ठेवणे परवडत नव्हते. आजी आणि काकू घरचे सर्व काम करत होत्या, तरी आजीने विशीच्या आतल्या काकूला कॉलेजमध्ये जाऊन तिचे बी ए पर्यंतचे शिक्षण पुरे करण्यास उत्तेजन दिले. काका-काकू, आजी, इतर नातेवाईकांना माझी आई घेत असलेल्या शिक्षणाचा, तिच्या कामाचा अभिमान होता. एकूण त्या चौघांची एकमेकांवरची माया, विश्वास आणि एकमेकांचा आदर यामुळे एक आदर्श एकत्र कुटुंब आम्ही अनुभवलं. अंगभूत हुशारी आणि कष्टांच्या जोरावर बाळासाहेब राजवाडे अर्थात माझे काका काका त्यांच्या व्यवसायात खूप पुढे आले. त्यांनी लेबर कोर्टात लढवलेल्या केसेसची, मिटवलेल्या अनेक तंट्याची अजून काही लोक आठवण काढतात. पुण्यात आईचे म्हणजे वैद्य निर्मला राजवाडे यांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पेशंट तिची आठवण आजही विसरत नाहीत.
शाळेच्या अभ्यासात मी हुशार गणली गेले. गणित माझा खास आवडता विषय, तरी सगळ्या विषयात चांगले मार्क असत. शेजारच्या आवारात म्युनिसिपालीटीची शाळा होती. जवळची काही मुले त्या शाळेत जात. मीही त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट करी. वयाने लहान असल्याने मला बिगरीत प्रवेश मिळाला. ती शाळा ठीक होती, १९४८ ते १९५१ चा तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा उत्साहाचा काळ होता. अनेक शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम निष्ठेने करत हे जाणवते. मी चौथीत असताना मला व अनिलला (मोठ्या भावाला) जरा लांबच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या जास्त चांगल्या शाळेत घालण्यात आले. आता आम्ही टिळक ब्रिजच्या सुरुवातीचा अत्यंत गर्दीचा रस्ता क्रॉस करू शकू असे आमच्या पालकांना वाटत होते. मी प्रायमरी शाळेत, तर अनिल किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये जाऊ लागलो. तिथे प्रथम मी शाळेत जाण्यास नाखूष होते, कारण एक तर सगळी मुले, शिक्षक अनोळखी होते. एक मुलगा जवळ राहणारा थोडा माहीत होता, पण त्यानेच मी म्युनिसीपालिटीच्या शाळेतून आले असल्यामुळे मला “म्युन्सिपाल्टी उलटी पाटी”असे चिडवायला सुरुवात केली. हळूहळू माझा अभ्यास पाहून शिक्षक माझ्यावर खूष होत गेले, स्कॉलरशिप परीक्षेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश झाला. स्कॉलरशिप आणि डबल प्रमोशन मिळवून मी हायस्कूलमध्ये सहावीत गेले. चित्रकला, वाचन, मैत्रिणींबरोबर खेळणे हे माझे छंद होते. शाळेत असताना नववी, दहावीला माझ्या डोक्यात एक किडा शिरला होता, तो म्हणजे विशेष अभ्यास न करता “सहज” परीक्षा द्यायची. हीच खरी हुशारी अशी एक कल्पना होती. त्याचा परिणाम नंबर घसरण्यात झाला. अकरावीला, म्हणजे एसएससीला ७७ % मार्क मिळाले. तेव्हा कोणत्याही कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळाला असता. पण मला गणिताचा अभ्यास करायचा होता, मी रुईया कॉलेजमध्ये आर्ट्सला प्रवेश घेतला. गणित आर्ट्स आणि सायन्स कडे सारखंच शिकवलं जातं, आर्ट्स कॉलेज फक्त सकाळचं, मग चित्रकला किंवा आणखी काही करायला भरपूर वेळ मिळेल असा मला सल्ला दिला गेला. आर्ट्स ला अर्थशास्त्र, चारही भाषा, जगाचा इतिहास हे इतर विषय होते. पण पदार्थविज्ञान, रसायन शास्त्र आणि त्यांची प्रक्टिकल नव्हते. गणिताचा अभ्यास चांगला झाला, तरी त्याचे उपयोजन, म्हणजे applied mathsहे शिकले नाही हा तोटाच होता हे नंतर लक्षात आलं. इंटर, बी ए, एम ए, या सर्व परीक्षात मी विद्यापीठात पहिली आले. अनेक बक्षिसे, स्कॉलरशिप मिळाल्या. सतत पहिली येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आर्ट्सला हुशार विद्यार्थी कमी असत, ते जास्त करून सायन्स कॉलेज मध्ये जाऊन इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याचा प्रयत्न करत, अजूनही तशीच प्रथा दिसते.
सरांची आणि आपली भेट,लग्न कसे झाले याविषयी ?
एम ए झाल्यावर, ऑगस्ट १९६४ पासून TIFR च्या गणित विभागात संशोधन करत होते, त्यात प्रगती होत होती. तिथे काम करत असताना माझा विवाह श्री जयंत नारळीकर यांच्याशी ठरला. मला काही माझ्या अभ्यासात किंवा थोडा वेळ केलेल्या नोकरीत जोडीदार भेटला नाही. त्यामुळे पाहून ठरवूनच लग्न करावे लागणार हे उघड होते. १९६३ च्या सुमाराला काही हितचिंतकानी “ स्थळे ”सुचवली होती, त्यात जयंत नारळीकर हे नाव देखील होते. मामा बाळासाहेब चितळे हे पुण्यात प्रथम बांधकाम कॉन्ट्रॅक्टर होते नंतर श्रेयस हॉटेलचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाले. तेव्हा लग्नाची बोलणी करणे वगैरेची जबाबदारी काका आणि मामा यांची होती. त्याप्रमाणे काकांनी नारळीकरांच्या कडे पत्राने एक प्रस्ताव धाडला होता. पण त्यावर प्रगती झालेली नव्हती कारण जयंत इंग्लंडमध्ये, त्याचे आईवडील अजमेर मध्ये तर आम्ही मुंबईत होतो. १९६४ च्या जूनमध्ये जयंतचे फ्रेड हॉइल यांच्या बरोबरचे गुरुत्वाकर्षणावरील काम प्रसिद्ध झाले आणि एकदमच तो जगप्रसिद्ध असा तरूण शास्त्रज्ञ झाला. त्याच वेळी मी एम ए च्या परिक्षेत सुवर्ण पदक मिळवून पहिली आले होते. लगेच आधी सांगितल्याप्रमाणे टी आय एफ आर मध्ये संशोधनाला सुरुवात झाली. जयंत १९६५ च्या हिवाळ्यात त्याच्या प्रसिद्ध भारत भेटीवर आला, त्यावेळी माझी टी आय एफ आर मध्ये संशोधनाला सुरुवात झाली होती. लोकांनी पहिले की एकाच विषयात काम करणारा तरुण आणि तरुणी, एका समाजाची,दोघेही खूप हुशार,योग्य वयाची आहेत, तर त्यांचे लग्न व्हावे,किंवा ते होईलच! काही लोकांना राजवाड्यांच्या कडून गेलेल्या जुन्या प्रस्तावाची माहिती असावी. परंतु दोनही घरांच्या लोकांची एकमेकांशी भेट किंवा परिचयही झालेला नव्हता. जयंत तर CSIR ने आखलेल्या त्याच्या दौऱ्यात अतिशय व्यग्र होता. या ट्रीपमध्ये लग्नाचा विचारही करू शकत नव्हता. त्याने तसे आईवडील आणि त्याचे मामा वगैरे ना सांगितले होते. पुण्यात तो व त्याचे आई वडील त्याच्या मामांच्या कडे, प्रा. हुजूरबाजारांच्या कडे असताना माझे मामा त्यांना भेटण्यास गेले त्यावेळी त्यांच्यावर अचानक अग्निवर्षाव झाला. नारळीकर याचं लग्न मंगला राजवाडे हिच्याशी ठरल्याची अफवा लोकांच्या मध्ये पसरली होती, अर्थात ती खोटी होती पण त्यामुळे लग्नासाठी इतर प्रस्ताव किंवा बोली भाषेत अपेक्षित मुली सांगून येणं होत नव्हतं. ही अफवा राजवाडयांच्या लोकांनी मुद्दाम पसरवली असा नारळीकरांचा समज झाला होता. त्यामुळे श्री तात्यासाहेब नारळीकरांनी या लोकांची खरडपट्टीच काढली. तेव्हा माझ्या मामांनी शांतपणाने त्यांना एवढं पटवून देण्याचा प्रयत्न केला की अशी अफवा पसरणं मुलीच्या दृष्टीने अधिक धोक्याचं असतं कारण एकदा ठरलेले लग्न मोडले, तर आपल्या समाजात मुलीची जास्त नाचक्की होते, तेव्हा अशी अफवा पसरण्यासाठी आम्ही जबाबदार नाही. त्यानंतर अर्थात हा प्रस्ताव पूर्ण बारगळला असे आमचे लोक समजून चालले.
पुढे नारळीकर कुटुंब महाराष्ट्रात इतर शहरात गेले, त्यावेळी असे लक्षात आले, की त्या त्या शहरात कुणी योग्य वयाची स्कॉलर मुलगी असेल, तर तिचे लग्न जयंत नारळीकरशी ठरल्याची अफवा आहे. मग त्यांचा गैरसमज दूर झाला. जयंत त्याचा दमवणारा दौरा आटोपून इंग्लंडला परत गेला. नंतर त्याच्या आईवडिलांनी लग्नासाठी आलेले अनेक प्रस्ताव तपासले,विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या उपवर तरुणींची माहिती होती. काही मुलींची भेट घेण्याचे ठरले. आता त्यांचे गैरसमज दूर झाले होते. तात्यासाहेबानी, म्हणजे जयंतच्या वडिलांनी सप्टेंबर मध्ये माझ्या काकांना पत्र पाठवून तसे कळवले व भेटण्यास मला अजमेरला घेऊन येण्याचे सुचवले. जयंत डिसेंबर मध्ये येणार होता, त्यावेळी जमल्यास लग्न ठरवायचे होते. त्यावेळी मी मामाबरोबर तिथे जाऊन आले. नंतर डिसेंबर मध्ये जयंतशी भेट होणार होती, तेव्हा काका माझ्या बरोबर होते. जयंत आणि मी अजमेरच्या फाय सागर तलावाभोवती फिरायला गेलो आणि थोड्या गप्पा मारल्या. प्रथम मी जरा बिचकत होते, पण केम्ब्रिजच्या जीवनातील मजेदार गोष्टी सांगून जयंतने मला हसवले आणि मी मोकळेपणाने बोलू लागले. लग्नासाठी जयंतने एकच मुलगी पाहिली, मीही एकच मुलगा पाहिला आणि आमचे लग्न ठरले. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे त्याने मला पत्र लिहून प्रपोज केले ते मी स्वीकारले.
टी आय एफ आर(TIFR ) मध्ये राजीनामा देऊन लग्न करून मी केम्ब्रिजला गेले, तिथे संसार मांडताना अर्थात उत्साह होता, पण स्वयंपाक, घर चालवणे हे अनुभवातून शिकायचं होतं. करियर चा खास विचार नव्हता. गणित विषयाची आवडणाऱ्या शाखांची लेक्चर्स ऐकणं, तिथे पार्ट 3 चा अभ्यास करणाऱ्यांना एक लेक्चर कोर्स देणं आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यान्ची ट्यूटोरियल्स घेणं एवढंच केलं. मात्र स्वयंपाक शिकणं आणि करणं, घराची देखभाल,विविध मित्र-मैत्रिणी जोडणं, नदीवर पंटिंग करायला शिकणं, इंग्लंड मधील सर्व ऋतुबदल उत्सुकतेने अनुभवणं, मुंबईत कधीच न मिळालेलं बागकाम करणं, जयंतचा कामानिमित्त प्रवास होई तेव्हा त्याच्याबरोबर प्रवास, या सगळ्याचा भरपूर आनंद घेतला.
लेखक संशोधक आणि पती यातील सरांची भूमिका वेगळी असते का ? कोणती भूमिका आपल्याला भावते ?
कोणतेही काम करताना भूमिका त्या त्या कामानुरूप असते. संशोधक आणि पती या दोन्ही भूमिका भिन्न आहेत. संशोधक सत्यशोधक असतो. पती संसारी, कुटुंबावर प्रेम करणारा असावा, दोन्ही भूमिका जयंतने समर्थपणे निभावल्या.
विज्ञान गुढकथा सर लिहिता. प्रत्यक्ष ते आणि त्यांचा स्वभाव तसाच गूढ आहे का ?
जयंत गूढकथा लिहीत नाही, विज्ञान कथा लिहितो. त्यांचा स्वभाव गूढ नाही,तर्कशुध्द विचार आणि स्पष्ट सांगणे असते. कधी कधी तो मजेत कोडीसुद्धा घालतो.
तुमच्या करिअरसाठी लेखन प्रवासात सरांचे पाठबळ कसे मिळते ?
माझ्या लेखन कामात त्यांचे प्रोत्साहन असते. कायमच ते मिळत आले आहे.
१९७२ च्या सप्टेंबरमध्ये दोन लहान मुलींना घेऊन आम्ही मुंबईत राहण्यास आलो. जयंतने टी आय एफ आर मध्ये पदार्थ विज्ञान विभागात प्रोफेसर पद स्वीकारले. एकत्र कुटुंबात सासू सासरे यांची सेवा आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत होते. आम्हाला रहायला टी आय एफ आर च्या समोरच्या कॉलनीत सदनिका होती. त्याच संस्थेच्या गणित विभागात मी पूर्वी काम करत होते. सात वर्षात माझे जुने मार्गदर्शक संस्था सोडून गेले होते, माझाही अभ्यासात खंड पडला होता, तरी आम्हाला संस्थेच्या समोरच राहायला घर होते. मी बराचसा स्वयंपाक उरकून मुलींना शाळेत पाठवून दोन तास वेळ काढू शकत होते. नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मी पुन्हा गणित विभागात लेक्चर्स ऐकायला जाऊ लागले. अभ्यासाची शाखा बदलली, मला त्या अभ्यासात गोडी आहे हे समजून त्या विषयाची लेक्चर्स माझ्या सोयीच्या वेळी होऊ लागली आणि मी पुन्हा पार्टटाईम संशोधक झाले. काही काळाने प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले आणि पी एच डी देखील मिळाली. यावेळी राहण्याची जागा संस्थेजवळ होती याचा फायदा झाला. मुंबईत दूर अंतरावर राहत असतो, तर जाण्या येण्यात प्रचंड वेळ गेला असता, असा अभ्यास करायला मिळाला नसता. माझ्या पी एच डी च्या कामाची तुलना मी श्रावणी सोमवारच्या कहाण्यांतील म्हातारीच्या कहाणीशी करते. घरातील सर्वांच्या गरजा पुरवून उरलेले वाटीभर दूध घेऊन तिने ते शंकराच्य़ा मंदिरात अर्पण केले, त्याने तो गाभारा भरून गेला.
तुमच्या कामात सरांचा सहभाग आणि त्यांच्या कार्यात आपला सहभाग याविषयी ?
त्यांच्या कामात माझे प्रोत्साहन असते. त्यांच्या एका मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर मी केले आहे. त्याच्या मराठी विज्ञान लेखनाची बहुधा मी पहिली वाचक असे. कधी कधी वाचकांना ते समजण्यास सुलभ होण्यासाठी माझ्या सूचना असतात, क्वचित भाषा सुधारते.
सामाजिक कार्याची आवड आपल्या उभयंतांना आहे त्याची प्रेरणा कुठून मिळाली?
आम्हा दोघांनाही समता, स्वातंत्र्य यांची मूल्ये मान्य आहेत. त्यामुळे त्यासाठी सामाजिक कार्य आवश्यक आहे याची जाणीव आहे. पारंपरिक भारतीय समाजात समता हे मूल्य दुर्लक्षिले गेले, जातीसंस्थेमुळे काही लोकांच्यावर अन्याय झाला, त्यामुळे आपली खूप हानी झाली.
संशोधन निमित्ताने सर कदाचित सतत बाहेर असतील आणि आपले सुद्धा करिअर आणि कुटुंब याची सांगड कशी घालता ?
संशोधनासाठी आता जयंतला फार प्रवास करावा लागत नाही. अनेकदा आम्ही बरोबर प्रवास करतो. त्यातूनच माझे “ पाहिलेले देश, भेटलेली माणसे “ हे पुस्तक लिहून झाले.
आपली पुढील पिढी कशात शिक्षण/ करिअर करत आहे. साधारण डॉक्टर चा मुलगा डॉक्टर होतो तसे आपल्याकडे कसे आहे ? त्यांचे करिअर त्यांनी निवडले आहेत का ?
आमच्या तीनही मुली संशोधनाच्या वेगवेळ्या क्षेत्रात काम करतात. मोठी गीता, सॅन फ्रान्सिस्को मध्ये केमिस्ट्रीची प्राध्यापक आहे. दुसरी गिरीजा कम्प्युटर इंजिनियर असून तीही कॅलिफोर्निया मध्ये काम करते. तिसरी लीलावती पुण्यात NCL मध्ये संशोधन करते. तिचा विषय बायोलॉजी मध्ये कंप्युटरचा उपयोग असा आहे. आम्ही त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे काम करण्यास मुभा दिली होती. तिघींचेही गणिताचे प्राथमिक ज्ञान उत्तम आहे.
सरांसोबत भावलेला अविस्मरणीय प्रसंग ?
आम्ही पॅरिसमध्ये होतो. तेथील विज्ञान संस्थेने जयंतला खास सुवर्णपदक देऊन गौरवले तो प्रसंग अविस्मरणीयआहे. निवडक लोकांच्या उपस्थितीत तो सोहळा झाला.
घरात सर वडील /नवरा असतात की घरात सुद्धा वैज्ञानिक(scientist) म्हणून वावर असतो.?
जयंतने संशोधक, पुत्र, पती, पिता या सर्व भूमिका उत्तम निभावल्या आहेत. पिता म्हणून मुलींना शिस्त लावणे आणि लाड करणे दोन्ही केले आहे. वेळच्या वेळी अभ्यास, खेळ, संगीत शिक्षण करायला उत्तेजन देत होता. माझे सासू सासरे आम्ही मुंबईत आल्यापासून आमच्याकडेच होते. सासरे १८ वर्षे तर सासूबाई २४ वर्षे आमच्या बरोबर होत्या. TIFR कॉलनीमध्ये अनेक लोक आमच्या एकत्र कुटुंबाचे कौतुक करत. मी घर सांभाळून फावल्या वेळात संशोधन करू शकले कारण जयंतचे सहकार्य होते. रोज रात्री जेवण झाल्यावर सासूबाईनी सुचवलेली काही संस्कृत स्तोत्रे मुलींना शिकवल्यानंतर मी घरात आवराआवर, भांड्यांची सफाई वगैरे करायला जात असे, तेव्हा जयंत त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे गोष्टी रचून सांगे. उडणारा गालिचा, चांगल्या व वाईट चेटकिणी, जादूगार, मजेदार प्राणी यापैकी काहीतरी मुलींना हवे असे. पुढे मुली १२-१४ वर्षांच्या झाल्यावर त्या आळीपाळीने रात्री भांडी धुवत. कारण आमच्या कडे काम करणारी बाई फक्त सकाळी येत असे. त्यामुळे बहुतेक बशा भांडी कामकाज आम्ही करत असू. जयंत देखील जरुरीप्रमाणे भांडी धुण्यात मदत करत असे. पाश्चात्य देशात राहिलेल्या पुरुषांना या कामाची सवय असते बहुधा. कारण तिथे नोकर फार कमी असतात. मुली स्वत:चा अभ्यास करत, त्याना काही शंका असल्यास आम्ही लवकर निरसन करण्याचे काम करत असू. गणितातल्या शंका मी, पदार्थविज्ञानातील शंका जयंतने, तर संस्कृतमधील शंका सासूबाई यांनी सोडवायच्या असे ठरलेले असे.
आपल्या कुटुंबात सण, समारंभ आणि त्यात सरांचा संपूर्ण कुटुंबात सहभाग कसा असतो ?
आमच्या कुटुंबात कर्मकांडे नव्हती. देवांच्या काही मूर्ती आहेत, पण रोज पूजा वगैरे सासूबाई देखील करत नव्हत्या. सासरे व सासूबाई,दोघांचे वाचन खूप असे. ते दोघे मिळून रोज थोडा वेळ मूळ संस्कृत भागवत व त्याचे हिंदी भाषांतर वाचत. त्यांनी त्याची २-३ पारायणे केली होती.सासऱ्यांनी अनेक धर्मांची पुस्तके वाचली होती. घरात संस्कृत स्तोत्रे म्हटली जात, सणासुदीला खास स्तोत्रे, देवाला फुले वाहणे व मुख्य म्हणजे सुक्यामेव्याचा प्रसाद. गणेश चतुर्थीला आरती आणि मोदक! पूजा व आरती नेहमीच्या मूर्तीची होत असे. मोठ्या एकादशीला दुपारी खास उपवासाच्या पदार्थांचे ताट सगळ्यांना आवडे. पण संध्याकाळी नेहमीचं साधंच खाणं किंवा सूप असे. सासऱ्यांच्या काळापासून कोणत्याही कर्मकांडाचे खास पालन नाही. कोणत्याही कारणासाठी पत्रिका पाहणे, फलज्योतिषाचा सल्ला घेणे होत नाही. बुद्धिवादाची प्रथा आहे. दिवाळीला सफाई, रांगोळी, आकाशकंदील हे सणाचे वातावरण देतात, फराळाचे जिन्नस सगळ्यांना हवेच असतात. शक्य असेल तर भावाने बहिणीकडे जाणे, हे देखील होते. आम्ही इंग्लंडहून छत्रीसारखी घडी घालून ठेवण्याचे ख्रिसमस ट्री आणले होते. अनेकदा २३ डिसेंबर पूर्वी ते उभे करून आम्ही त्याचे सुशोभन करत असू. ख्रिसमस केक सर्वांना आवडतो.
सरांची विशेष आवड निवड काय आहे ? त्यांना स्वयंपाक करता येतो का ? त्यांनी कधी आपल्याला आवडणारा किंवा स्वतःला आवडणारा पदार्थ करून खायला घातला आहे का ?
जयंतला स्वयंपाक करता येत नाही. एकदा तो पैज हरला होता, त्यावेळचा मात्र अपवाद. नलीनचन्द्र आणि प्रिया विक्रमसिंघे हे आमचे केम्ब्रिज मधील श्रीलंकेहून आलेले दोस्त. चंद्र आणि जयंत आधीपासून दोस्त होते, तर प्रिया आणि मी १९६६ मध्ये त्यांच्या पत्नी म्हणून केम्ब्रिजला आलो होतो. चंद्र आणि जयंत यांचा आणखी एक मित्र ब्रेंट विल्सन हा न्यू झीलंडचा. तो कायम ब्रह्मचारी राहणार अशी वल्गना करत असे. एकदा तो न्यूझीलंडच्या अॅना नावाच्या एका तरुणीला केम्ब्रिज दाखवायला घेऊन आला. प्रियाने भाकीत केले की, हे दोघे लग्न करणार. जयंतचा त्याच्या मित्राच्या निश्चयावर विश्वास होता. त्याने पैज घेतली की, ते अशक्य आहे. अटी अशा ठरल्या की जयंत जिंकला तर प्रियाने आम्हा चौघाना फ्रेंच रेस्तराँमध्ये जेवण द्यायचे , प्रिया जिंकली, तर जयंतने आम्हा चौघांना स्वत: जेवण बनवून द्यायचे. जयंत हरला कारण ६ महिन्यातच ब्रेंट आणि अॅनाच्या साखरपुड्याची बातमी आली. पैजेप्रमाणे जयंतला जेवण बनवावे लागले, त्यासाठी काही दिवस भात कसा शिजवायचा, पुरीसाठी कणिक कशी भिजवायची, चिकन करी कशी करायची हे शिकून घेतले. खरोखर उत्तम जेवण त्याने बनवले. पण तेवढे एकदाच! पुन्हा कधी अशी पैज घेतली नाही की जेवण बनवले नाही. मी विविध पदार्थ बनवते, त्यांचं थोडं श्रेय तो घेतो. कारण मला भरपूर उत्तेजन देतो,खास पदार्थ करायला सांगतो म्हणून श्रेय त्याचं. त्याला विविध चवींचे पदार्थ आवडतात. भारतीय जेवणात खास करून तळलेले पदार्थ, उदा. सामोसे, बटाटेवडे, कोफ्ता करी, बिर्याणी, भाजी-भाकरी, तर पाश्चात्य पद्धतीचे भाजलेले पदार्थ, रोस्ट चिकन, केक हे आवडतात.
कुटुंब निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग कसा असतो?
आम्ही घरात सगळे मिळून कौटुंबिक निर्णय घेतो.
सरांच्या आवडीनिवडी काय आहेत ? (वाचन,संगीत,भटकंती वैगरे त्यांच्या रुटीन कामाशिवाय )
वाचन, प्रवास दोन्हीची आवड आहे. कामानिमित्त अनेक देशातील संस्था व विद्यापीठे यांची आमंत्रणे येतात, त्यामुळे प्रवास होतो. घरातील जबाबदाऱ्या कमी झाल्यावर मी देखील बरोबर जाते. त्या प्रवासवर्णनांतूच माझे पुस्तक “ पाहिलेले देश, भेटलेली माणसे ” हे लिहून झाले. आता प्रकृतीच्या कारणाने प्रवास कठीण होत आहे. वाचन नेहमी असतेच. संगीत थोडावेळ ऐकायला आवडते, पण आता कान चांगले काम करत नाहीत.
संवादक – अंजली तागडे (संपादक, विश्व संवाद केंद्र पुणे )
(साभार एकता मासिक मार्च २०२१ )