श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त ५ भागांची विशेष मालिका (2-5)
पंच अवतार –
१) भगवान श्रीकृष्ण द्वारकावतीचा राणा – द्वापार युगात मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत क्षत्रिय वर्णातील यादव कुळात वसुदेव – देवकीच्या पोटी श्रावण वद्य अष्टमीला अवतार घेतला. बालपणी गोकुळ-वृंदावनात खेळ करत दैत्यांना ठार केले व मथुरेत कंसाचा वध करून वसुदेव-देवकीला बंदिशाळेतून मुक्त केले. अर्जुनाला युद्धभूमीवर श्रीमद्भगवद्गीता सांगितली. उद्धव, कुंती, द्रौपदी, पांडव इत्यादी भक्तांचे रक्षण करून मोक्ष दिला.
प्रमुख तीर्थस्थाने:- मथुरा, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन.
२) श्री दत्तात्रेय प्रभू – त्रेतयुगात हिमालयातील बद्रिकाश्रामामध्ये ऋषीकुलात अत्रि-अनसुयेच्या पोटी मार्गशीष शुद्ध चतुर्थीला अवतार घेतला. यदुराजा, अलर्कारजा, राणी मदालसा आदी भक्तांना ज्ञान प्रेम देऊन मुक्ती दिली. श्रीदत्तात्रेय प्रभू अजूनपर्यंत विद्यमान आहेत. त्यांचे दर्शन अमोघ असल्यामुळे दर्शन सर्वांना होत नाही.
प्रमुख तिर्थस्थाने :- बद्रिकाश्रम, पांचाळेश्वर, माहूर.
३) श्री चक्रपाणी प्रभू- कलीयुगात फलटण ( जि. सातारा ) येथे ब्राह्मण वर्णातील कराड शाखेत जनकनायक-जनकाईसाच्या पोटी अश्विन वद्य नवमीला ( शके १०४२ , इ.स. ११२०) अवतार घेतला. अनेक दु:खी जीवांचे दु:ख दूर करून सुख दिले. उधळीनाथ इत्यादी ५२ पुरुषांना देवतेच्या विद्यांचे दातृत्व केले.
प्रमुख तीर्थस्थाने : फलटण, माहूर, द्वारका.
४) श्री गोविंदप्रभू- कलीयुगात काटसूरला ( जि. अमरावती) काण्वशाखेत अनंतनायक-नेमाइसाच्या पोटी भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला अवतार घेतला. ऋद्धपुरला वास्तव्य करून दु:खितांचे दु:ख दूर करता-करता ते संपूर्ण विदर्भाचे ‘राऊळ माय-राऊळ बाप’ झाले. आबाईसा, म्हाइंभट्ट, लक्ष्मीन्द्रभट्ट, कोथळोबा, इत्यादी भक्त त्यांची सेवा करायचे.
प्रमुख तीर्थस्थाने:– ऋद्धपूर आणि परिसर.
५) सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी- कलीयुगात भडोचला ( गुजरात ) लाडसामक शाखेत प्रधान विशालदेव-माल्हणीदेवी हे माता-पिता. भाद्रपद शुद्ध द्वीतीयेला ( शके ११४२, इ स. १२२०) अवतार घेतला. राज वैभव सोडून ऋद्धपुरला श्री गोविंदप्रभूपासून परावर शक्ती स्वीकार करून महाराष्ट्रभर पायी परिभ्रमण केले. नागदेवाचार्य, पंडित म्हाइंभट्ट, नागुबाईसा, नाथोबा, नीळभट्ट इत्यादी जीवांना ज्ञान-प्रेमाचे दातृत्त्व करून मुक्ती दिली. समाजातील विषमता दूर करून स्त्री शूद्रांना समान अधिकार देऊन दु:खीतांचे दु:ख हरण केले.
महानुभावांचे तत्त्वज्ञान :-
चक्रधरांच्या (shree chakradhar swami) काळात बाराव्या शतकात महाराष्ट्रात बजबजपुरी माजली होती. कर्मकांड, अज्ञान, अंधश्रद्धा इत्यादी वाईट चालीरीतींची जाणीव चक्रधरांना झाली व या अगतिक लोकांना परमेश्वरापर्यन्त पोहोचविण्याचा सहज सुलभ मार्ग दाखवण्याची आवश्यकता त्यांना जाणवली. ज्ञानदेवापूर्वीचे बंडखोर म्हणून चक्रधरांचा उल्लेख करता येईल. अशा चक्रधरांनी द्वैती तत्त्वज्ञान सांगितले. त्यांच्या मते चार वस्तू अनादि व नित्य आहेत. १) परमेश्वर, २) देवता, ३) जीव, ४) प्रपंच. या चारी गोष्टी परस्परांहून भिन्न आहेत. परमेश्वर-नित्यमुक्त, देवता -नित्यबद्ध, जीव- बद्धमुक्त, प्रपंच-जड.
‘सूत्रपाठ’ या ग्रंथास ‘महानुभावांचा वेद’ असे म्हटले जाते. त्यातून महानुभावांचे सारे तत्त्वज्ञान विशद झाले आहे. हा पंथ द्वैत मताचा आहे. महानुभाव जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या वस्तू मुख्य व नित्य अशा मानतात.
प्रपंचास महानुभाव अनित्य मानतात. देवतांना महानुभाव पंथाने गौण मानले आहे. त्यांच्या मते देवता नित्यबद्ध आहेत. त्या ज्ञान ऐश्वर्य देऊ शकल्या तरी परमेश्वर होऊ शकणार नाहीत. वेदांत ‘ब्रम्ह’ हे अंतिम मानले असून ईश्वर हे त्याचे गौण स्वरूप म्हणून समजले गेले आहे. महानुभावीय तत्त्वज्ञानात याउलट स्थिती आहे. ते ईश्वरास प्रमुख स्थान देतात व ब्रम्हास त्याचा एक भाग मानतात, जीव-देवता, प्रपंच-परमेश्वर याचे परस्परांशी किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही, असे हा पंथ मानतो. म्हणूनच त्यास “द्वैतपथ” असे म्हणतात.
चक्रधरांनी आत्मज्ञान भक्ती आणि गुरुकृपा यांना अधिक महत्त्व दिले आहे. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा आहे. पण वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांच्या वचनांनाच प्रमाण मानतात. चक्रधरांची वचने ही महानुभावांची ‘श्रुती होय. नागदेवाचार्यांच्या वचनास ते ‘स्मृती’ म्हणतात.
वेदान्तातील कल्पनेच्या उलट महानुभावीय ईश्वरास प्रमुख स्थान देतात आणि ब्रह्मास एक भाग मानतात. त्यांच्या मते, ईश्वर हा अनादि, नित्य, अव्यक्त, स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी, ज्ञानमय, आनंदमय, सर्वसाक्षी व सर्वकर्ता असा आहे. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यदेह धारण करून अवतार घेतो. ईश्वराचे स्वरूप ज्ञानामुळे ओळखता येते. शब्दज्ञान, सामान्यज्ञान, अपरोक्षज्ञान व विशेषज्ञान असे या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ही मोक्षप्राप्तीची दोन प्रमुख साधने आहेत.
गुरूवर प्रीती करावी पण त्याला परमेश्वर समजू नये असे महानुभाव मानतात. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांच्या वचनांनाच प्रमाण मानतात.
महानुभाव पंथ :- आचारधर्म
महानुभाव पंथ प्रामुख्याने मुमुक्षूंचा अथवा साधकांचा पंथ आहे. त्यामुळे या पंथातील शिष्यांसाठी असणारे नियम आणि आचारधर्म यांविषयीच्या कल्पना कडक असणे स्वाभाविक आहे. संन्यस्त व गृहस्थ असे शिष्यांचे दोन वर्ग या पंथात केलेले असून संन्याशाने नित्य भ्रमंती, भिक्षाभोजन करावे. एकांतवास पत्करून परमेश्वराचे नामस्मरण करावे अशी अपेक्षा साधकांकडून केलेली दिसते.
जीव, देवता, प्रपंच आणि ईश्वर असे चार पदार्थ महानुभावीयांच्या दृष्टीने स्वतंत्र आहे. ते अनादी व अनंत आहेत. नित्य आहेत. प्रपंच हा जड परमेश्वर नित्यमुक्त, देवता नित्यबद्ध आणि जीव बद्धमुक्त आहे. हा पंथ द्वैतपंथ असल्याने जीव आणि ईश्वर यांचे द्वैत ते मानतात. “आचार-विचार-तत्त्वज्ञानावर विचार मांडताना कर्मकांड आणि सुखविलास यामध्ये रमणाऱ्या सामान्य संसारी जनांना हा आचारधर्म खड्गाच्या धारेप्रमाणे दुर्धर वाटल्यास नवल नाही,असे अभ्यासकांचे , विद्वानांचे मत आहे..”
क्रमशः
संदर्भ :-
-सिद्धान्त सूत्रपाठ
-उद्धव गीता
-महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय – शं.गो. तुळपुळे , व्हीनस प्रकाशन.
-यादव कालीन महाराष्ट्र सु.ग. पानसे, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मुंबई