श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त ५ भागांची विशेष मालिका (३-५)
महानुभावीय वाङ्मय:-
सूत्रपाठ :
महानुभावांचे तत्त्वज्ञान( mahanubhav panth) विवेचन करणारा ग्रंथ. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी निरूपीत तत्त्वज्ञान यात आले आहे. श्रीचक्रधरांनी आपल्या परिभ्रमणाच्या काळात अनेकदा भक्तांना, शिष्यांना उद्देशून वेळप्रसंगी निमित्त करुन उपदेश केला, निरूपण केले. निरूपणातील हा उपदेश अतिशय मोजक्या शब्दात पण सूत्ररूपाने आला आहे. निरूपणातील महत्त्वाच्या, ठळक, आशयगर्भ विधानांना सूत्र म्हटले जाऊ लागले.( जशी बसवेश्वरांची ‘वचने’ तशी चक्रधरांची ‘सूत्रे’).
म्हाइंभटाने संकलित केलेल्या लीळाचरित्रातून श्रीचक्रधर चरित्र आले आहे. यातील लीळांमध्ये, प्रसंगामध्ये श्रीचक्रधरांचे तत्त्वज्ञानपर, आचारधर्मपर, वर्तन नियमन करणारी वचने आली आहेत. ही श्रीचक्रधरमुखीची वचने निवडून नागदेवाचार्यांसारख्या अधिकारी पुरुषांकडून त्यातली सत्यापसत्यता पडताळून, त्यांचे वर्गीकरण करुन, परस्पर अन्वय जोडून केशिराजबास यांनी सूत्रपाठ सिद्ध केला आहे.
लीळाचरित्र (श्रीचक्रधरस्वामी चरित्र) पं. म्हाइंभट्ट :-
चक्रधरांचे चरित्र लीळाचरित्र या आद्य मराठी ग्रंथात म्हाइंभटाने संकलित केलेले आहे. त्यातून निवडलेली चक्रधरांची वचने व त्यांनी निरूपलेले दृष्टांत, केसोबासाने (केशवराज सूरी) सुत्रपाठ व दृष्टांतपाठ या ग्रंथांत संकलित केलेले आहेत. महानुभाव तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे हे आधारग्रंथ होत.
महानुभावीय वाङ्मयात ‘लीळाचरित्र’, ‘श्रीगोविंदप्रभुचरित्र’, ‘दृष्टांतपाठ’, ‘मूर्तिप्रकाश’, ‘स्मृतिस्थळ’, ‘महदंबेचे धवळे’, ‘मातृकी रुक्मिणीस्वयंवर’, साती ग्रंथ इत्यादी महत्त्वपूर्ण वाङ्मय आढळते. साती प्रथामध्ये ‘शिशुपालवध, उद्धवगीता अथवा एकादशस्कंद’, ‘वछाहरण’. रुक्मिणी स्वयंवर’, ‘ज्ञानप्रबोध’, ‘सह्याद्रिवर्णन’, ‘श्रीऋद्धिपुरवर्णन’ यांचा समावेश होतो.
महानुभाव संप्रदायातील म्हाइंभट यांना मराठीतील आद्य संशोधक व चरित्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी ‘लीळाचरित्राप्रमाणेच ‘ऋद्धिपुरवस्त्रि’ म्हणजेच गोविंदप्रभूचे चरित्रही लिहिले. या चरित्रग्रंथामुळे तेराव्या शतकातील मराठी भाषा, व्याकरण व वाड्मय यांवरच नाही तर इतिहास, धर्म, समाज इत्यादिकांवरही फार मोठा प्रकाश पडतो.
महानुभाव पंथाचे कार्य :-
सुमारे ८०० वर्षापूर्वीच्या सामाजिक परिस्थितीतील सलणाऱ्या, बोचणाऱ्या विधिनिषेधाच्या गोष्टीवर प्रहार करून आचारधर्माचा एक नवीन प्रवाह निर्माण केला गेला. तो म्हणजे महानुभाव पंथ त्यांनी गीता, उपनिषद आदी ग्रंथातील तत्त्वज्ञान स्वतः आचारधर्माच्या रूपाने आवरून दाखविल्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रातील ७-८ वर्षांच्या परिभ्रमणात एकूण ५०० शिष्य, १३ शिष्यिणी असा शिष्य परिवार त्यांना लाभला.
या पंथातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वेदकालापासून वैदिक पंचांनी मानलेल्या देवतांची उपासना यात त्याज्य ठरविली. देवतांपेक्षा परमेश्वर हा ‘अनादिनित्य’ आहे, असे ते मानतात. पंचकृष्णांखेरीज इतर देवतांना त्यांनी तुच्छ लेखले.
या पंथात स्त्री- वंचितांना धर्म-मंदिरात इतरांच्या बरोबरीने प्रवेश मिळाला. मोक्षाधिकार स्त्रियांना आणि शूद्रांना आतापर्यंत वैदिक मतानुयायांनी नाकारला होता. त्यामुळे समाजातील मोठा वर्ग इतर देवादिकांच्या, कर्मकांडांच्या उपासनेतच गुरफटून गेला होता. त्यातून त्यांना मुक्त करून मोक्षप्राप्तीचा मार्ग सर्वांना मोकळा आहे, असे चक्रधरांनी उद्घोषित केले.
” तुमचा काई जीवु आणि यांचिया काई जीवुलिया तुमचे आनदेवो राखता आणि याते आन देवो राखता? ऐसे काई एथ असे ? “
पुरुषांचा जीव आहे व स्त्रियांना जीवही नाही. पुरुषांचा एक देव व स्त्रियांचा दुसरा देव असे मानण्याचे काही कारण नाही, असे त्यानी सारंगपंडिताला एका प्रसंगी सांगितल्याचा लीळाचरित्रात उल्लेख आहे.
महानुभाव पंथात परंपरागत चालत आलेल्या चातुर्वर्ण्याला मान्यता तर दिली नाहीच, पण त्याविरोधात आपले टीकास्त्र उपसले. त्यांनी जे विधिनिषेध आपल्या अनुयायांना घालून दिले होते, त्यामुळे आपोआपच या चातुर्वर्ण्याचा अडसर दूर झाला होता.
या पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्त्रीपुरुषांना संन्यास घेण्याची मोकळीक ठेवली गेली होती. वैदिक पंथीयांनी जो संन्यास स्त्रियांना निषिद्ध ठरविला आहे, त्यालाच येथे मान्यता मिळालेली दिसते. महानुभाव पंथीयांनी स्त्री-पुरुषादिकांकरिता पुरस्कारिलेला संन्यास मार्ग सर्वांना पेलण्यासारखा नव्हता. या पंथाने चातुर्वर्ण्यासोबतच शूचिअशूचित्व, श्रेष्ठकनिष्ठादी कल्पनांचादेखील त्याग केलेला दिसतो. तद्वतच सोवळ्याओवळ्याच्याही कल्पना ते मानताना दिसत नाही. स्त्रियांनी मासिक धर्मामुळे विटाळ पाळण्याची आवश्यकता नाही.
महानुभावांच्या कामगिरीपैकी शेवटची पण अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांची वाङ्मयसंपदा. काव्यगुणाच्या दृष्टीने सरस व उत्कृष्ट ग्रंथ लिहूनही त्यांचे वाङ्मय विपुल व बहुविध आहे. मराठी भाषेत उपलब्ध झालेली ग्रंथसंपत्ती याच पंथाने निर्माण केली आहे. त्यास ‘मराठी वाङ्मयाची गंगोत्री’ म्हणून संबोधले जाते.
क्रमशः
संदर्भ :-