(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)
चक्रवर्ती विक्रमादित्य…
अयोध्येचे महात्म्य आणि तिला गतवैभव प्राप्त करून देणारे सम्राट विक्रमादित्य !
श्रीराम निजधामास गेल्यावर पुष्कळ काळ अयोध्यानगरी उदास स्थितीत होती. अयोध्येवर दृष्टी फिरवल्यास जिकडे-तिकडे घनघोर अरण्ये, वानरसेना आणि शरयू नदी या ३ गोष्टी दिसत होत्या. याशिवाय चौथे मारुतीचे स्थान होते. इतर कोणत्याही वस्तू अवशिष्ट (शेष) राहिल्या नाहीत. कालांतराने प्रभु श्रीरामाचे पुत्र लव-कुश यांनी स्वर्गद्वार तीर्थावर श्रीनागेश्वरनाथ महादेवाची स्थापना केली आणि पुन्हा अयोध्यानगरी यथायोग्य वसवली. ही कथा त्रेता आणि द्वापर युगांतील आहे.
२ सहस्र वर्षांपूर्वी उज्जयिनीमध्ये सम्राट विक्रमादित्य राज्य करत होता. एकदा श्रीरामाच्या कृपेने त्याला काही विचार स्फूरले. तो विचार करू लागला, ‘माझा जन्म क्षत्रिय कुळात सूर्यवंशात झाला आहे आणि सूर्यवंशाची मातृभूमी, तर अयोध्या आहे. ती प्रभु श्रीरामचंद्रांचीही जन्मभूमी आहे. त्या भूमीचा शोध लावला पाहिजे.’ असा विचार करून सम्राट विक्रमादित्य अयोध्येत आला आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांसमवेत श्रीरामजन्मभूमीचा शोध घेऊ लागला; परंतु ‘जन्मभूमी हीच आहे’, असा निश्चयात्मक दाखला त्याला कुठेही मिळाला नाही.
सम्राट विक्रमादित्य पश्चात्तापयुक्त मनाने शरयू नदीच्या जवळील निर्मली कुंडाच्या ठिकाणी विचार करत बसला. इतक्यात त्याला दिसले की, एक दिव्य पुरुष काळ्या रंगाचा पोशाख घालून आणि काळ्या घोड्यावर बसून तेथे आला. त्याने निर्मली कुंडात स्नान केले, तसेच त्याच्या घोड्यालाही तेथे स्नान घातले. केवळ स्नानमात्रे त्या दोघांची कांती कापरासारखी दिव्य झाली. एकाएकी त्या पुरुषाच्या शरिराचा रंग पालटला. हा चमत्कार पाहून सम्राट विक्रमादित्य फार चकित झाला. ‘हा कुणीतरी दैवी पुरुष आहे’, असा विचार करून राजाने त्याला नमस्कार केला.
आपला परिचय देऊन राजाने त्याला श्रीरामचंद्रांची जन्मभूमी दाखवण्याची विनंती केली आणि हात जोडून समोर उभा राहिला. राजाची भक्ती पाहून तो पुरुष म्हणाला, ‘‘राजा, तू धन्य आहेस आणि तुझा प्रश्नही उत्तम आहे; परंतु मला येथे कालापव्यय करता येत नाही. त्यामुळे हे राजन, तुझ्या प्रश्नाचे उत्तर काशीक्षेत्री सम्राट विश्वनाथाच्या दरबारात मिळेल.’’ तो स्वत:चा परिचय देत म्हणाला, ‘‘मी तीर्थराज प्रयाग आहे. जनतेच्या पापरूपी काळीमेला नित्य या निर्मली कुंडात धुतो. मग फिरून जगाची पातके ग्रहण करण्यासाठी माझ्या स्थानी जातो. त्यामुळे मला लवकर निघाले पाहिजे.’’ या वेळी त्याने ‘श्रीराम तुझे मनोरथ पूर्ण करोत’, असा आशीर्वाद राजाला दिला आणि तीर्थराज तेथेच अदृश्य झाले.
सम्राट विक्रमादित्याने श्रीरामाचे स्मरण केले आणि श्रीकाशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे त्याने भगवान विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि प्रभु श्रीरामाची जन्मभूमी समजण्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना करून सम्राट अन्न-जल विरहित, तसेच निश्चयपूर्वक शिवनामाचा जप करत तेथेच शिवद्वारी धरणे धरून बसला. राजाचा हा निग्रह पाहून परम करुणामयी भगवान श्री शंकराने एका वृद्ध व्यक्तीचे रूप धारण केले. एका हाती पुस्तक आणि दुसर्या हाती वृद्ध गाय घेऊन ब्राह्मणाच्या रूपात शिवराज त्याच्या समोर येऊन उभे राहिले.
ते राजाला म्हणाले, ‘‘ही अन्नपूर्णानगरी आहे. येथे निरव (निराहारी) रहाण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या वचनावर विश्वास असेल, तर तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल. ही कामधेनु आणि ही पोथी घेऊन तू अयोध्येला जा. तेथे शरयू नदीच्या तिरावर या गायीला चरण्यास सोड. जेथे तिच्या आचळातून दुधाची धारा वाहू लागेल, ‘तिथेच मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आहे’, असे निश्चित समज. या पोथीच्या आधाराने अयोध्यानगरीची पुनर्रचना कर. श्री विश्वेश्वर तुझ्यावर प्रसन्न असून तुझा मनोरथ पूर्ण होईल.’’ हे सांगितल्यावर वृद्ध ब्राह्मणरूपी विश्वेश्वर तेथेच अंतर्धान झाले. त्यानंतर राजाने ती पोथी आणि गाय यांच्या समवेत श्री विश्वेश्वराला नमन करून अयोध्येला प्रयाण केले.
श्रीरामचंद्रांचे ध्यान करत सम्राट मोठ्या आनंदाने शरयूच्या तिरावर येऊन पोचला. तेथे त्याने यथाविधी शरयूमातेचे पूजन केले. त्यानंतर नदीला साष्टांग नमस्कार करून प्रभु श्रीरामाची जन्मभूमी दाखवण्याची गायीला प्रार्थना केली. त्यानंतर ती कामधेनु स्वच्छंदपणे शरयूतिरी हिंडू लागली. राजाही तिच्या मागोमाग फिरत होता. कालांतराने एका ठिकाणी तिच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. हे पाहून राजाला अतिशय आनंद झाला. ‘आज मी धन्य झालो, कृतकृत्य झालो’, असे म्हणून त्याने त्या भूमीचे आणि कामधेनूचे विधीवत् पूजन केले. मग वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांना बोलावून त्यांचेही पूजन करून त्यांना संतुष्ट केले. पूर्वी घडलेला सर्व वृत्तांत सांगून त्याने ती पोथी ब्राह्मणांच्या पुढे ठेवली. त्यांना हात जोडून प्रार्थना केली, ‘हे भूदेवांनो, या अयोध्यानगरीची पुनर्रचना करण्याची माझी इच्छा आहे, ती पूर्ण करावी.’ यानंतर त्या ब्राह्मणांनी या पोथीच्या आधारे अयोध्येची सीमा आणि सर्व तीर्थस्थाने यांचा शोध लावला. इतर स्थाने आणि जेथे जाताच प्रभूच्या चरित्राची माहिती समजते, अशी मंदिरे आणि मूर्ती स्थापित केल्या.
सम्राट विक्रमादित्याने सर्वप्रथम ५ मंदिरे उभारून त्या ठिकाणी प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्तींची स्थापना केली, तसेच पूजा, नैवेद्य इत्यादींची व्यवस्था केली.
पहिले मंदिर : हे जन्मस्थळी, म्हणजे ज्या ठिकाणी कामधेनूच्या आचळातून दुधाच्या धारा वाहू लागल्या, तेथे बांधण्यात आले. तेथे एका मोठ्या शाळीग्राम शिळेवर राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि रामाच्या चरणाशी मारुति अशा पाचही मूर्ती कोरल्या. तसेच श्री रामयंत्रासहित मूर्तीची स्थापना केली.
दुसरे मंदिर : येथे रत्नसिंहासन आहे. येथेच श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक झाला होता. तेथे पट्टाभिषेक राम-सीतेची मूर्ती स्थापन केली.
तिसरे कनक भवन : तेथे राम-जानकीचे विहारस्थान होते. तेथेही श्रीराम-जानकीच्या मूर्ती स्थापित केल्या.
चौथे मंदिर : हे सहस्रधारातीर्थावर आहे. येथे लक्ष्मण बालाजीची चतुर्भूज मूर्ती स्थापन केली.
पाचवे मंदिर : हे आदिशक्तीच्या स्थानावर बांधले आहे. तेथेही एकाच भव्य शिलेमध्ये श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती या आदिशक्ती त्रिमूर्ती यंत्रासहित स्थापित केल्या. हे स्थान सध्या ‘देेवकाली’ या नावाने प्रसिद्ध आहे.’
अयोध्येचे भाग्य उदयाला आले आणि पुनः एकदा स्फूर्तिस्थान झाले. तिथे ३६० मंदिरे बांधली गेली. कदाचित वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतीक म्हणून ही ३६० देवळे बांधली असावीत. रामजन्मभूमी स्थानाच्या सभोवती देवळेच देवळे होती. बहुधा त्याच काळापासून सर्व देशात पसरलेल्या प्रत्येक जाती, पंथ, भाषा आणि विविध आखाडे यांनी अयोध्येत आपापली देवळे बांधण्यास आरंभ केला. अयोध्येचे वैभव पुनः एकदा परत आले. पंधराव्या शतकापर्यंत लहानमोठे राजवंश बदलत राहिले, राजसत्ता बदलली पण अयोध्या आणि रामजन्मभूमीची शोभा दिवसागणिक सतत वाढत गेली.
स्वदेशी राजसत्तांच्या अंतर्गतदेखील कितीतरी संघर्ष झाले, पण श्रीराम सर्वांच्याच श्रद्धेचे केंद्र राहिले. इसवीसनपूर्व ५० पासून नवनिर्मित राममंदिरामुळे सर्वांचेच लक्ष अयोध्येकडे वेधले गेले, हा रामजन्मभूमीचाच महिमा होय. राममंदिरामुळे अयोध्यानगरी पुनः एकदा वैभवशाली बनून हिंदू एकतेचे आणि अस्मितेचे प्रतीक म्हणून अनेक वर्षे राहिली. रामजन्मभूमीला लक्ष्य मानून तेथील मंदिरांवर जो दुसरा हल्ला मुस्लिमांकडून झाला, तेव्हा अयोध्येतच वाढलेल्या एका वीर पुत्राने त्यांना असा जबरदस्त तडाखा दिला की, पुढे दोनशे वर्षांपर्यंत कोणत्याही विदेशी आक्रमकाला तिकडे नजर वळवून पाहण्याचे धाडस झाले नाही.
क्रमशः