(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)
इस्लामी क्रूरकर्मा बाबर आणि रामजन्मभूमी…
सालार मसूदचा १४ जून १०३३ ला पाडाव झाल्यानंतर जवळ जवळ १२५ वर्षांपर्यन्त कोणाही विदेशी अथवा मुसलमानाला भारतावर पुनः आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही. अकराव्या शतकाच्या शेवटी पुनः त्यांचे हल्ले होण्यास आरंभ झाला. गौर वंश, गुलाम वंश, खिलजी आणि तुघलक यांच्या वंशातील शासकांच्या आक्रमणांची मालिका सुरू झाली. त्यांची धार्मिक धर्मांधता जिहादी वृत्ती दिसत होती, परंतु रामजन्मभूमी उद्ध्वस्त करण्याची हिम्मत त्यांच्यात आली नव्हती. हिंदूंचा कडवा विरोध हेच त्याचे कारण.
महंमद घोरीबद्दल योग्य समज न राखण्याची चूक जर पृथ्वीराजाकडून झाली नसती, तर कदाचित आपणा सर्वांचे श्रद्धाकेंद्र असलेल्या रामजन्मभूमीचा विध्वंस झाला नसता. हे खरे आहे की भगवद्गीतेचे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे ‘स्वधर्मे निधनं श्रेय‘ पण या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ आम्ही विसरलो. कृष्णाने सांगितले आहे की अन्यायी आणि अधर्मी कोणीही असो, शक्य त्या मार्गाने त्याचा पाडाव करणे हाच खरा धर्म आहे.
१६ मार्च १५२७ या दिवशी निर्णय झाला, रामजन्मभूमीच्या दुर्भाग्याचा, नव्हे भारताच्याच दुर्भाग्याचा. कलंकभूत टिळ्याप्रमाणे पराधीनतेची गर्द काळी रेषा भारताच्या भव्य ललाटावर कोरली गेली. खरे म्हटले तर बाबर पहिल्या लढाईत महाराणा सांगाकडून पराभूत होऊन गर्भगळीत झाला होता…
राणा सांगा जिवंत असेपर्यन्त हिंदूंचा तेजोभंग जमण्यासारखे नव्हते. पण अंधविश्वास, योगायोग किंवा बाबराची भाग्यरेषा यापैकी काही म्हणा, एका वर्षानंतर पुनः पूर्ण तयारीनिशी बाबराने महाराणा सांगावर पुन्हा आक्रमण केले.
बाबर आणि त्याच्या धार्मिक कट्टरतेत वाढलेले सैनिक खानवाहच्या मैदानात लढत होते. हिंदू वीरांच्या पुढे ते टिकले नाहीत. त्यांची पळापळ सुरू झाली. एक क्षणभर बाबराला मृत्यू दिसू लागला. दुर्दैवाने महाराणा सांगाचा हत्ती घायाळ होऊन वेदनेने कण्हत रणभूमीतून पळू लागला. राणाने त्याला थांबवण्याचा निकराचा प्रयत्न केला खरा, पण व्यर्थ. नेता आपल्याजवळ नाही असे दिसल्यावर हिंदू सैन्याचे धैर्य संपले आणि रणांगणातून तेही पळू लागले. मिळत असलेला विजय हिंदू गमावून बसले आणि पराजित होत असलेल्या मुसलमानांनी-बाबराने युद्ध जिंकले.
हाच तो १६ मार्च १५२७ चा काळा दिवस. रामजन्मभूमीच्या दुर्भाग्याचा. या लढाईत महाराणा सांगाने तीस हजार सैनिकांच्या आधारावर बाबराच्या एक लाख सैनिकांचे धैर्य खलास केले होते. बाबराचे काही हजार आणि राणाचे फक्त सहाशे सैनिक वाचले.
बाबरनाम्याच्या पुस्तकातून असे समजते की, इसवी सन १५२७ च्या मार्च महिन्याच्या अखेरीस बाबराचा मुक्काम अयोध्येच्या जवळ होता अयोध्येचा नाशाचे काम आपला मंत्री मीर बाकी यावर सोपवून बाबर परत दिल्लीकडे फिरला.
रामजन्मभूमीवरील मंदिर जमीनदोस्त करण्याची आज्ञा देऊन बाबर आयोध्येहून निघून गेला, ही बातमी पहाट उजाडताच विद्युतगतीने सगळीकडे पसरली. बाबराने हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली याचे खरे कारण म्हणजे तो अशा आक्रमकांपैकी होता, जे असा पक्का विचार करत की, जर हिंदुस्थानला गुलाम बनवून आपले राज्य स्थापन करावयाचे असेल तर, हिंदूंचा आत्मविश्वास आणि मनोबल नष्ट केले पाहिजे, म्हणून हिंदू समाजाचे जे जे प्रेरणास्रोत आणि मानबिंदू असतील ते अपमानित करून नेस्तनाबूत करायला पाहिजेत, जिंकायला पाहिजेत.
गाय, गीता, गंगा आणि देवळे ही सामाजिक आणि सांस्कृतिक चेतनेची केंद्रस्थाने आहेत, तेव्हा गोहत्या करणे, मंदिरांचा विध्वंस करणे, धर्मग्रंथ जाळणे, हिंदू महिला आणि बालिकांचे अपहरण करणे व त्यांच्या शीलावर आक्रमण, बलात्कार आणि सर्व प्रकारचे बीभत्स, अमानवी अत्याचार आणि अनाचार करून हिंदूंना भयभीत करणे, असे जेव्हा होईल, तेव्हाच आपले उद्दिष्ट साध्य होईल असाच विचार बाबराने केला. म्हणून त्याने मीर बाकीला आज्ञापत्र दिले की, अयोध्येला असलेले रामजन्मभूमी मंदिर पाहून त्यावर मशीद उभारावी. हे त्याचे फर्मान ६ जुलै १९२४ च्या मॉडर्न रिव्ह्यू या पत्रिकेच्या अंकात एका लेखमालेत प्रकाशितही झाले आहे.अनेक वीरपुत्रांनी स्वतःचे बलिदान केले. जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यन्त मीर बाकी राममंदिराला स्पर्शही करू शकला नाही.
सहस्रो हिंदूंच्या कलेवरावरच त्या दिवशी म्हणजे २३ मार्च १५२८ ला राममंदिर धुळीत मिळू शकले. हिंदूंनी बलिदानांचा एक नवा अध्याय आपल्या रक्ताने लिहून सुरू केला. हा इतिहास चिरकालापासून हिंदू समाजाला अमरतेचा संदेश आणि प्रेरणा देत आला आहे आणि पुढेही देत राहील.
क्रमशः