(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)
रणचंडीचा अवतार..महाराणी जयराजकुमारी..
भारतमातेच्या केवळ पुत्रांनीच नाही, तर सुकोमल महिलांनीही रणचंडीचे रूप घेऊन रामजन्मभूमीचे, भारतीय परंपरेचे रक्षण करण्यासाठी संघर्ष केला आहे.
अयोध्येपासून ७०-८० मैलांवर हंसवर राज्य होते. कोशल राज्याच्या अंतर्गत असलेले पण प्रभावशाली असे हे राज्य होते. महाराजा रणविजयसिंह आणि विशेषतः महाराणी जयराजकुमारी यांनी आपले सैन्य आधुनिक शस्त्रांनी सज्ज केले होते. हंसवर राज्याचे पूर्वजही सालार मसूदशी लढले होते आणि त्यांनी रणांगणावर त्याला तोबा – तोबा म्हणायला लावले होते. महाराणीने तीन सहस्र स्त्रियांची रणनिपुण सशस्त्र सेना सिद्ध केली होती. कोशल राज्यात हा एक नवा आणि लक्षणीय प्रयोग होता.
महाराज रणविजयसिंहाना गुप्तहेरांकडून बातमी मिळाली की बाबराने अत्यंत संतापून जाऊन मीर बाकीच्या साहाय्यार्थ एक मोठी सेना पाठवली आहे. पंडित देवीदीन पांडे हे महाराजांचे कुलपुरोहित होते आणि त्यांच्या बलिदानामुळे महाराजांच्याही मनात दुःख आणि संतापाची ज्वाला धुमसत होती. महाराज रणविजयसिंहानी आपल्या मनातील विचार महाराणीला सांगितला.
“जय! या आततायांचे अनाचार आता सहन होईनासे झाले आहेत. एक तर त्यांना मारून पिटाळले पाहिजे किंवा वीराप्रमाणे युद्धभूमीवर लढता लढता मेहताबसिंह आणि देवीदीन पांडे यांच्या पंक्तीला गेले पाहिजे. मी तर त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याचा निश्चय केला आहे. मला फक्त तुझीच चिंता आहे.” त्यावर महाराणी जयराजकुमारी म्हणाली, “आपण वीरपुत्र आहात, आपल्या कुलात अनेक प्रतापी राजे झाले आहेत. त्याच परंपरेतील आपण आहात. स्वामी आपण चिंता करू नका. यशस्वी व्हा आणि विजयश्री मिळवून परत या. नाही तर .. मीही क्षत्राणी आहे, आपली अर्धांगिनी आहे. ईश्वर करो आणि वाईट न घडो .. पण बरेवाईट जर काही झाले तर मीही मुस्लीमशाही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.”
महाराणीचे हे बोलणे ऐकून महाराजांच्या मनावरील ओझे हलके झाले. महाराणीच्या मुखावर आत्मविश्वासाची रेषा झळकली. राज्याची जबाबदारी महाराणीवर सोपवून महाराज रणविजयसिंह २५००० चे सैन्य घेऊन मीर बाकीवर तुटून पडले.
मीर बाकी अजून मेहताबसिंह आणि देवीदीन यांच्या भयंकर आघातातून पुरता सावरला नव्हता. तोच ह्या अप्रत्याशित प्रचंड हल्ल्याने त्याची नस-न्-नस ढिली झाली. मीर बाकीची उरलेली सेना महाराज रणविजयसिंहांच्या सैन्यापुढे टिकू शकली नाही. असे म्हणतात की मीर बाकी खान युद्धभूमीवरून कसा अदृश्य झाला समजले नाही. तो कदाचित जाणून बुजून, रणनीतीला अनुसरून किंवा भयग्रस्त होऊन किंवा कुमक येईल या आशेने गायब झाला होता.
१५ दिवस महाराज रणविजयसिंहांच्या हाती रामजन्मभूमी मुक्त राहिली. ती अगोदरच ध्वस्त झाली होती. तिचा जीर्णोद्धार करण्याचा विचार महाराजांच्या मनात चालू झाला होता. तेवढ्यात नव्या सैन्याची शक्ती घेऊन मीर बाकीने महाराजांवर पुनः आक्रमण केले. ८-९ दिवस महाराज रणविजयसिंह बाबरी सैन्याशी लढत राहिले. शेवटी तेही वीरगती मिळवून हुतात्म्यांच्या पहिल्या पंक्तीत स्थिर झाले. महाराज रणविजयसिंहांच्या नेतृत्वाखाली झालेला हिंदूंचा हा तिसरा हल्ला होता.
महाराणीला महाराज स्वर्गवासी झाल्याचे वृत्त समजले. तिच्या मुखावर मानवसुलभ दुःखाचे चिन्ह लेशमात्रही उमटले नाही. दुर्गेप्रमाणे ती म्हणाली, “महाराज मेले नाहीत, माझे सौभाग्य रामाच्या बलिवेदीवर चढून अमर झाले. महाराजांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे, रामजन्मभूमी मुक्ती हीच माझ्या अवशिष्ट जीविताची इच्छा आहे. रामजन्मभूमीची पुनः प्रतिष्ठा हे माझे स्वप्न आहे.” स्वामी महेश्वरानंद यांनी महाराणीला खूप समजावले, “बेटा, आम्ही असतांना तुला तलवार हातात घेण्याची काय आवश्यकता आहे?” पण राणीचा बिनतोड युक्तिवाद ऐकून ते निरुत्तर झाले, महाराणी म्हणाली, “रामजन्मभूमीच्या उद्धारासाठी महाराज लढता लढता गेले. ज्या क्षणी ते गेले त्याच क्षणी खरेतर महाराणीदेखील त्यांच्याच बरोबर गेली. आता हा तिचा दुसरा जन्म आहे. महाराजांच्या ध्येयासाठी मरण पत्करणे हाच सच्चा सौभाग्यधर्म आहे.”
प्रत्याक्रमणाची नवी योजना आणि व्यूहरचना तयार झाली. शत्रूला मारा आणि दबा धरून बसा. एकाएकी त्याच्यावर हल्ला करा आणि जोराचा घाव घालून पळून जा. शत्रूला दमवणे आणि खूप वेळपर्यंत मारमारून त्याचे मनुष्यबळ आणि धनबळाचे नुकसान करणे असे ‘छापामार’ युद्ध हीच आपली गनिमी काव्याची रणनीती. कसेही करून विजय मिळवणे हेच आपले साध्य आहे असे म्हणून राणीने सिंहगर्जना केली. राज्याची सूत्रे मुलाच्या हाती सोपवून महाराणी बाहेर पडली. पतीचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी. स्वामी महेश्वरानंद तिला पूर्णपणे साहाय्य करीत होतेच. जी कालपर्यंत महालात राहणारी सुकुमारी राजकुमारी होती ती रणचंडी बनून मुसलमानांवर चाल करून गेली. सुखात वाढलेली, फुलाची कळी आता आगीची ठिणगी झाली, अशी ठिणगी की जिने वणवा भडकवून यावनी सत्ता भस्मसात केली.
नशेत असलेल्या त्या सैन्याच्या छावणीत अचानक पळापळ सुरू झाली. काय झाले आहे कोणालाच काही समजत नव्हते. काही जण तलवारी घेऊन तर काही निःशस्त्र असे गडबडीत इकडून तिकडे धावत होते. अंधार असल्यामुळे मुसलमान शिपाई पुष्कळ वेळ एकमेकांना शत्रू समजून नकळत आपसातच लढत राहिले. ‘या अल्लाह’ सारख्या आरोळ्या ऐकल्यावर त्यांना कळे की ते त्यांच्याच सैन्यातील शिपाई आहेत. छावणीवर चारही बाजूने प्रचंड वेगाने संघटित सैन्याचा हल्ला झाला होता. नवीन हल्लेखोरांची संख्या बरीच कमी होती, पण दहशत इतकी बसली होती की, त्यांना सर्वत्र शत्रूच दिसत होता. त्यांच्यावर त्यांच्याच लोकांचा तसेच शत्रूचा असा दुहेरी मारा होत होता. मीर बाकीची सेना घाबरली.
एका रात्री छावणीवर असाच हल्ला झाला. आपले प्राण वाचवण्यासाठी ज्याला जिकडे वाट दिसली तिकडे तो पळाला. पुष्कळशा मशाली कशा कोण जाणे आपोआप विझल्या होत्या. शेकडो साप इकडे-तिकडे फिरत होते सैनिकांच्या पायदळी गेल्यामुळे ते भयंकर कुद्ध झाले होते आणि कित्येक सैनिकांचा पिच्छा करून दंश करीत होते. पळापळीमुळे, चेंगराचेंगरी झाल्यामुळेही कित्येक सैनिक मेले. एकदम इतके साप आले कोठून आणि कसे आले ? मशाली आपोआप कशा विझल्या ? मोगली सैन्यातील कोणालाच या कोड्याचे उत्तर मिळू शकले नाही.
खरी गोष्ट अशी होती की हे सर्व साहसी हल्ले महाराणी जयराजकुमारीच्या सशस्त्र स्त्री सैनिकांकडून केले जात होते. ती ३००० वीरांगनांची सशस्त्र विशेष सेना होती. त्यांचे हे छापामार युद्ध तंत्र म्हणजेच गनिमी कावा या प्रकारचे तंत्र. पहिल्या रात्री जे हल्ले झाले ते स्वामी महेश्वरानंद यांच्या साधुदलाचे होते.
या सर्व त्रासाला कंटाळूनच मीर बाकी याने बाबराला पत्र लिहिले. त्याने लिहिले की, अयोध्येचे राममंदिर पाडून जी मशीद उभारली जात आहे तिच्या भिंती संध्याकाळच्या वेळी आपोआप पडतात. तुम्ही स्वतः येऊन पाहा आणि काय करावे ते सांगा. बाबर खरेच ते पाहायला आला. अयोध्येपासून ३ कोस पूर्वेला सिखा आणि घागरा नदीच्या संगमावर त्याने सात-आठ दिवस मुक्काम केला आणि त्याची खात्री पटली. त्याने अवलिया- फकीर यांना बोलावून त्यांच्यापुढे हा मामला विचाराकरता ठेवला. त्यावर त्या लोकांनी पुष्कळ दिवस विचार करून बांधकामात काही सुधारणा सुचवल्या.
क्रमशः