(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)
हिंदूद्वेष्टा, क्रूरकर्मा औरंगजेब…
बादशहा शहाजहानने ऑगस्ट १६५८ पर्यन्त राज्य केले आणि देशाचे दुर्भाग्य असे की त्यानंतर आला हिंदू संस्कृतीचा खरा शत्रू औरंगजेब, सिंहासनावर बसताच औरंगजेबाने अयोध्येतील तथाकथित बाबरी मशिदीच्या आत असलेला चबुतरा आणि छोटेसे राममंदिर पाडण्याचा निश्चय केला. अधिक प्रचार न करता आपला एक प्रमुख हिंदुद्वेषी सेनापती जाँबाज खान याच्या नेतृत्वाखाली एक मोठी सेना रामजन्मभूमीवर आक्रमण करण्यासाठी पाठवली.
मशिदीच्या समोरच चबुतरा आणि मंदिर स्थापित करावे असा आदेश ८०-९० वर्षांपूर्वी अकबर बादशहाने दिला होता, तेव्हापासून हिंदू अबाधितपणे य मंदिरात सतत पूजा अर्चा करीत आले होते. रामनवमी आणि इतर सर्व शुभप्रसंगी विशाल मेळावे भरविण्याचा कार्यक्रमही अखंडपणे चालू होता.
जाँबाज खान रात्रीच्या अंधारात रामजन्मभूमी पाडायला नावा घेऊन निघाला निघाला.. जेव्हा त्या नावा शरयूच्या प्रवाहाच्या मध्यभागी पोहोचल्या तोच जयजयकार करणाऱ्या वीरांच्या ‘जय बजरंग’, जय श्रीराम’ या मेघगर्जना दोन्ही तटांवर ऐकू येऊ लागल्या. दोन्ही बाजूंनी एकदम हजारो बाण हवेत सन्न- सन्न करीत सुटू लागले. मोगल सैन्य जायबंदी होऊ लागले. म्हणजे हिंदू प्रतिकारासाठी सज्ज होते ! शत्रू भ्रमात राहावा हेच त्या हिंदू वीरांच्या आतापर्यन्तच्या मौनाचे कारण होते, शत्रूला समजेना की कोणत्या दिशेला जावे. दोन्ही बाजूला यमराज उभे होते. या अनपेक्षित आक्रमणामुळे आणि जीवघेण्या मान्याने मोगल सैन्यात हाहाहाकार उडाला. चीत्कार, आरडाओरडा आणि कण्हणे यांनी सर्व वातावरण अतिदुःखप्रद होऊन गेले.
जाँबाज खान तर कसलेला योद्धा होता, पण त्यालाही सुचेना काय करावे ते. बाणांच्या माऱ्यातून ते वाचणार कसे ? जळते बाण नावेत येऊन पडत होते. मोगल सैनिक किनाऱ्याला लागले तोपर्यन्त त्यातील निम्मे अधिक सैनिक खलास झाले होते.
हे असे कसे आणि कोणामुळे झाले तर, अहिल्या घाटावर परशुराम मठ होता आणि त्या ठिकाणी बाबा वैष्णवदास राहत होते, जे महाराष्ट्रातील समर्थ रामदासांचे शिष्य होते.
‘जय जय रघुवीर समर्थ’…
‘जय जय रघुवीर समर्थ’ असा भारदस्त नाद त्या मठाच्या आसपास सर्वत्र निनादत होता. विदेशी शक्तींपासून देश आणि धर्म सोडविण्याचे, वाचविण्याचे आवाहन महाराष्ट्राच्या बाहेरही साऱ्या देशात पसरू लागले होते. समर्थांचे प्रमुख शिष्य बाबा वैष्णवदास यांनी परशुराम मठाला केंद्रबिंदू बनवून हिंदू संस्कृतीचा प्रसार आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी १०,००० चिमटाधारी साधूचे संघटन करून ठेवले होते. मठ जागृत नित्य सिद्ध शक्तीच्या रूपात स्थापन झाला होता. महाकवी तुलसीदासांच्या रामचरितमानसाच्या चौपाईमधील गाथेचे ढोलकीवर थाप मारून गावा-गावांतून गुंजन सुरू झाले होते.
रामचरितमानसाने अबालवृद्ध सर्व स्त्रीपुरुषांच्या जिभेवर आणि मनामध्ये रामाला बसवले होते. मरताना राम, जीवनाच्या श्वासाश्वासात राम, सुखात राम, दुःखात राम, सगळीकडे रामच राम. बाबा वैष्णवदासांच्या प्रेरणेने गावा-गावांतून हनुमान मंदिरे आणि वड-पिंपळ- निंबाच्या झाडांखाली हनुमानाच्या छोट्या प्रतिमा स्थापन झाल्या होत्या. ही सर्व स्थाने सामाजिक प्रेरणा आणि देवाण-घेवाण यांची केंद्रे बनली होती. आखाड्यातून तरुण व्यायाम करत कुस्ती खेळत होते. बाबांचे शिष्य त्यांना लाठी, फरीदगा, तलवार, चिमटा फिरवणे हे शिक्षण देत असत.
समर्थ रामदासांचे काव्य आणि तुलसीदासांची रामायणकथा प्रत्येक गावात आकर्षक स्वरात निनादे, तेव्हा लोक डोलू लागत. राष्ट्रीय आणि सांस्कृतिक भावनांनी भारलेली युवकांची तरुण मने उसळून जात. याशिवाय प्रचार, योगसाधना, हेरगिरी आणि युद्धविद्या यातही ते सिद्धहस्त होत होते. औरंगजेबाचा काय हेतू आहे, याची बातमी बैरागी हेरांद्वारे बाबा वैष्णवदास यांना अगोदरच मिळाली होती. त्याविरुद्ध आक्रमणाची योजना गुप्तरूपाने बाबांच्याकडे होत होती. मोगलांच्या स्वारीचा पराभव करण्याची तयारी आतल्याआत योजनाबद्ध रीतीने चालू होती. यामुळेच जाँबाज खानाची फजिती झाली. त्याचे मेलेले-थकलेले-ठोकलेले सैन्य शरयू पार करून कसेतरी किनाऱ्याला लागते न लागते तोच, हिंदूंचे संघटित सैन्य त्यांच्यावर भुकेल्या लांडग्याप्रमाणे तुटून पडले. मुगल सैन्य पळू लागले. पळणाऱ्या सैन्याला बाबांनी आपल्या चिमटाधारी साधुंच्याबरोबर जाऊन उर्वशी कुंडाजवळ गाठून घेराव घातला.
चारही बाजूने घेरल्या गेलेल्या मुसलमानी सैन्याला एका बाजूने शस्त्रप्रहाराचा व दुसऱ्या बाजूने बाबांच्या चिमट्यांचा मार खावा लागला. त्यांचा धुव्वा उडाला. खानाची सगळी ऐट खलास झाली. तो काही सैनिकांबरोबर अत्यंत वाईट अवस्थेत आपल्या दुर्दशेची राम-कहाणी सांगण्यास औरंगजेबाकडे पळाला.
एकापाठोपाठ एक फक्त पराजयाच्याच बातम्या ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकास पोहोचली. रागावून त्याने जाँबाज खानाला पदच्युत केले. जाँबाज खानाची मनातली इच्छा पूर्ण झाली, जीव वाचला हेच नशीब, काही काळ गेल्यावर औरंगजेबाने सरदार सय्यद हसन अलीबरोबर ५०,००० सैनिक दिले आणि त्याला रामजन्मभूमी नष्ट-भ्रष्ट करण्यास रवाना केले. हिंदूही बेसावध नव्हते. बाबा वैष्णवदास यांना हे पक्के माहीत होते की, औरंगजेब याचा सूड नक्कीच घईल. बाबांच्या हेरांचे जाळे चारी बाजूंना पसरले होतेच. मोगलांचे सैन्य किती आहे, कशा प्रकारचे आहे, त्यानुसार आपल्या बाजूला किती शक्ती आवश्यक असेल याचा आढावा बाबा वेळोवेळी घेत. ते उत्तम संन्यासी होतेच, पण त्याबरोबरच कुशल सिद्धहस्त रणनीतीज्ञही होते.
शरयू किनाऱ्यालगत दाट पानांच्या झाडांची जंगले गुप्त कार्याच्या दृष्टीने बाबांची उत्तम आश्रयस्थाने बनली होती. ती त्यांच्या चिमटाधारी साधूना लपण्यास अतिशय उपयुक्त ठिकाणे होती. त्या ठिकाणांचा कोपरा-न्-कोपरा त्यांना माहीत होता. बाबा वैष्णवदासांची दृष्टी खूप व्यापक आणि राष्ट्रीय होती. तसेच पंजाबमध्ये हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी गुरू गोविंदसिंह मुसलमानांशी संघर्ष करत होते. त्यांनी औरंगजेबाला कित्येकदा धूळ चारली होती. जरी कार्यक्षेत्रे भिन्न होती तरी, त्या दोघांच्याही कार्याचे लक्ष्य एकच होते. गुरुगोविंदसिंहांशी त्यांचे जुने संबंध होते.
हसनअली दिल्लीहून विशाल सेना घेऊन निघाला आणि बाबा वैष्णवदास यांनी गुरू गोविंदसिंह यांना पत्र लिहिले. त्यावेळी आग्रा येथे गुरुगोविंदसिंह मोगलांशी लढत होते. रामजन्मभूमीवर हसन अली चालून येत आहे, ही बातमी मिळताच ते सैन्य घेऊन सरळ अयोध्येच्या मार्गाला लागले. गुरुगोविंदसिंह शिखांचे सैन्य घेऊन ब्रह्मकुंडावर बाबांना येऊन मिळाले. त्यांनी त्याच ठिकाणी आपले बस्तान बसविले.
बाबांच्या हेरांनी बातमी दिलीच होती की, हसन अलीबरोबर एक मोठा तोफखानाही आहे. गुरुगोविंदसिंह आणि बाबा वैष्णवदास यांनी व्यूहरचना अशी केली की, मोगलांच्या पूर्ण सैन्याला परत जाता येऊ नये, त्यांचा विनाशच व्हावा आणि कोणत्याही परिस्थितीत हिंदूंना विजय मिळावा. प्रथम दारूगोळा आणि तोफखाना यांवर कब्जा मिळवावा, असा व्यूह रचला. सर्व सैन्य तीन ठिकाणी विभागले गेले. प्रत्येक विभागाला आपापले निश्चित कार्य समजावून दिले गेले.
अयोध्येपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर कसबा रुदौली लागतो. सर्वप्रथम त्या ठिकाणी हसन अलीला पहिली टक्कर देण्याचा विचार पक्का झाला. जय जय महांकालचा उद्घोष ऐकून हसन अलीचे कान टवकारले गेले. रुदौलीजवळ हिंदू सैन्य सय्यद हसन अलीच्या सैन्यावर तुटून पडले. मोगल सैन्याला अनपेक्षितपणे लढाईला तोंड द्यावे लागले. मोगल सैन्याची फार मोठी हानी झाली. हिंदू सैन्य अगोदरच ठरल्याप्रमाणे मागे हटले. हसन अलीला वाटले आपण हिंदू सैन्याचा पाडाव केला, त्यामुळेच ते पाठ दाखवून पळत आहेत. म्हणून मोगल सैन्य निश्चिंत होऊन बिनविरोध पुढे सरकले. ते अयोध्येपासून १० किलोमीटरजवळ सादतगंजजवळ पोहोचतच होते, तोच उसाची शेते आणि जंगले यात लपलेले शीख वीर ‘जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल’ चा जयघोष करीत मोगलांवर शिकारी पक्ष्याप्रमाणे धडकले.
मोगलांच्या सैन्यामध्ये अगोदरच शिखांच्या हल्ल्याविषयी धाक बसला होता. शीख अचानक इथे कसे आले? असा प्रश्न त्यांना पडला. या आकस्मिक आक्रमणामुळे मोगलांचे उरले सुरले धैर्यही नष्ट झाले. रुदौलीला असलेली हिंदू सेना ‘जय महांकाल’ अशी गर्जना करत सिंहाप्रमाणे मोगली फौजेच्या पाठीमागून सिंहाप्रमाणे अंगावर आली. शिखांनी मोगलांच्या तोफा मिळवल्या आणि मोगलांचाच दारूगोळा मोगलांनाच भस्म करू लागला. हसन अली कसाबसा सैन्याची एक तुकडी बरोबर घेऊन जीव वाचवण्यासाठी रामजन्मभूमीच्या रस्त्याने पळाला. तो तिथे पोहोचत नाही तोच, जालपा नाल्याच्या उंच सखल जमिनीवरील रानटी गवताच्या जंगलात लपून बसलेल्या बाबा वैष्णवदासांच्या चिमटाधारी साधूनी ‘सियावर रामचंद्र की जय’चा जयघोष करीत शंकराच्या रुद्राप्रमाणे त्याला पकडून ठेवले. चारही बाजूने घेरल्या गेलेल्या मोगली सैन्यावर जबरदस्त आघात होऊ लागला. रामजन्मभूमीच्या बलिवेदीवर सरदार हसन अलीला त्याच्या सैन्यासोबत बळी दिले गेले.
बाबा वैष्णवदासांनी औरंगजेबाच्या कारकिर्दीत एकूण तीस हल्ले केले. सराय, सिसिंडा, राजेपूर, नारे, सनाथू, इत्यादी अयोध्येच्या पूर्वेकडील कित्येक गावांतून गावकऱ्यांनी बाबांच्या नेतृत्वाखाली मोगलांवर हल्ले केले. सूर्यवंशी तहकूर, गजराज सिंह, कुंवर गोपालसिंह, कुंवर जगदंबासिंह यांनी मोठ्या शौयनि बादशाही सेनेबरोबर युद्ध केले आणि युद्ध करत असतानाच या सगळ्यांना वीरगती मिळाली. रामजन्मभूमीवरील चबुतरा आणि मंदिर जोपर्यन्त जमीनदोस्त होत नाही, तोपर्यंत औरंगजेबाच्या डोळ्यात ते कुसळाप्रमाणे झोंबत राहिले. राममंदिर एक आव्हान बनून राहिले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी, राजस्थानात राणा राजसिंह, पंजाबमध्ये गुरुगोविंदसिंह, बुंदेलखंडात छत्रसाल यांनी त्या धर्मांधाला भंडावून सोडले होते. करू किंवा मरू या अटीतटीच्या भावनेने प्रेरित होऊन त्याने इ. सन १६६४ साली रामजन्मभूमीवर पुनः आक्रमण केले. त्यावेळी तो स्वतः सैन्याबरोबर आला. आतापर्यंत विशाल मोगल सैन्याबरोबर सतत संघर्ष करीत राहिल्यामुळे हिंदू सैन्य क्षीण झाले होते. त्यामुळे या युद्धात हिंदूंचा पराभव झाला. दहा हजार हिंदूंचे बलिदान झाले. मंदिराच्या पूर्वेकडील दाराजवळ एक मोठी विहीर होती त्यात हिंदू वीरांची प्रेते टाकून बुजवून टाकली. त्याच कंदर्प कूपाला नंतर गंजशहीदा असे नाव मिळाले.
मुसलमानी सैन्याने चबुतरा आणि मंदिर पाडून टाकले. हे घडले तेव्हा १६६४ सालची रमजानची २७ तारीख होती, असे स्वत: औरंगजेबाने लिहिलेल्या नोंदवहीत नोंद केली आहे आणि तेव्हा रामजन्मभूमी शाही देखरेखीखाली गेली. असे जरी झाले असले तरी, पुष्कळ प्रयत्न करूनही औरंगजेब हिंदूंना पूजापाठ आणि रामाचे दर्शन यांपासून परावृत्त करू शकला नाही. दरवर्षी लक्षावधी भाविक हिंदू येत, चबुतरा आणि मंदिराच्या जागेवर एक खड्डा झाला होता त्याठिकाणी फूल-पाणी- अक्षता वाहात आणि जड मनाने संकल्प करीत की, आम्ही आमची रामजन्मभूमी परत मिळवू आणि रामाची पुनः प्रतिष्ठापना केल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही.
क्रमशः