CultureNewsSpecial Day

स्वामी विवेकानंद जयंती – युवक दिन

swami vivekananda national youth day 2024

दि १२ जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंती – युवक दिन

स्वामी विवेकानंद – म्हणजे हिंदुत्वाचा हुंकार, हिंदू अस्मितेचा प्रवक्ता, आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाला प्रस्थापित करणारा संन्यासी योद्धा….. कितीही विशेषणं लावली तरी ज्याच्या कर्तृत्वाला आणि कार्याला गवसणी घालता येणार नाही असा हा महानायक….. नव्हे विश्वनायक…. त्यांची आज जयंती.

नरेंद्रनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद हा एक अद्भुत प्रवास आहे. प्रत्येकाने अभ्यासावे असे या महानायकाचे चरित्र आहे. त्या काळी मरगळलेल्या हिंदू समाजाला झडझडून जागं करण्याचं काम या संन्यासी योध्याने केलं…… दुर्दैवाने आजच्या पिढीला हा महामानव माहितीच नाही. मी ज्या महाविद्यालयात शिकवायचो तिथे सर्वांना Gita and Ethics या विषयाचा एक पेपर असायचा…. याचे मार्क रिझल्ट साठी धरत नसायचे, पण विद्यार्थ्यांना संस्कृती बद्दल माहिती असावी हा स्तुत्य उद्देश. हा विषय शिकवायला काही विद्वान मंडळी यायची. माझ्या माहितीत कधी कधी चिन्मय मिशन चे संन्यासी सुद्धा यायचे.

अर्थात हा विषय हा optional असल्याने त्यांच्या लेक्चर ला उपस्थितीही यथातथाच असायची….. तर त्याच्या एका प्रश्नपत्रिकेत जोड्या लावा हा प्रश्न होता, त्यात संत आणि काही राष्ट्रपुरुष आणि त्यांची मूळ नवे यांच्या जोड्या लावायच्या होत्या…. त्यात एक नाव स्वामीजींचे होते. मी त्यावेळी सुपरव्हिजन करत होतो… पाहत होतो कोण काय लिहिताय…. मला आश्चर्याचा धक्का बसला की त्या वर्गातील एकही मुलाला त्यांचे नरेंद्र हे नाव माहिती नव्हते!! आपल्या एकूणच समाजमनाची ही अवस्था !! अहो मोठ्या मंडळींनाच माहिती नाही तिथे कॉलेज विद्यार्थ्यांचा प्रश्नच येत नाही…

एकूण काय…. तर स्वामीजींची जयंती याला नुसतं युवक दिन घोषित करून भागणार नाही तर त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल….. खरच अत्यंत स्फूर्तिदायक आणि मार्गदर्शक असे हे चरित्र आहे….. हिंदूंमध्ये आज जी काही जागृती दिसते आहे त्याचे प्रेरणा स्रोत हे स्वामीजी आहेत…… हिंदु धर्माचा प्रसार (प्रेमाने बरं का, बळाने नव्हे)…. दर्यापार संपूर्ण जगात करणारे महान व्यक्तित्व होते हे!!…. स्वामीजींनी हिंदुत्वाला वाहिले असले तरीही त्यांनी केवळ पुस्तकी धर्म सांगितला नाही तर त्याची व्यावहारिक मांडणी केली. नर सेवा हीच नारायण सेवा आहे हे जोरदार पणे मांडले.

हिंदूंमधल्या निंदनीय आणि त्याज्य रुढींवर टीकेचे आसूड ओढले, तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीचे जागरण केले, गीता शिकणे जेव्हढे महत्वाचे तेव्हढेच मैदानी खेळ खेळा हेही महत्वाचे हे सांगितले. (मैदानी खेळाच्या सल्ल्याचा वापर करून दुर्दैवाने आज डावी मंडळी स्वामीजींनी गीता नाकारली होती असे म्हणत आहेत आणि बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत) तरुणांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. मला राष्ट्रभक्तीने प्रेरित १०० तरुण द्या मी देशाचे चित्र पालटून टाकीन असे ते म्हणत.

अध्यात्माची सामान्य माणसाला पटेल अशी मांडणी त्यांनी केली. अमेरिकेहून परत आल्यावर जहाजातून उतरताच मातीत लोळण घेऊन मातृभूमीची धूळ मस्तकी लावणारा असा हा महानुभाव. भारताच्या कानाकोपऱ्यात फिरून धर्म जागृती केली, रामकृष्ण मिशन च्या माध्यमातून अध्यात्मिक चळवळ उभी केली तसेच असंख्य सेवाकार्य सुद्धा सुरू केली…. आणि मिशन चे हे व्रत आजही सुरू आहे….. भारताच्या अगदी सुदूर असलेल्या पूर्वांचालत सुद्धा मिशन चे मोठे कार्य आजही अविरतपणे सूरु आहे….. टाटा यांना भारतात उद्योग सुरू करायला प्रेरणा देणाराही हाच महानुभाव !!

या भरातभूमीला पुन्हा जगद्गुरूपदी विराजमान करण्याचे स्वप्न पाहणारा हा योद्धा संन्यासी….. तरुण वयात संबंध जगात हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा दिग्विजय करणारा हा योद्धा संन्यासी…. तरुणाईने आजही आदर्श म्हणून जोपासाव असे यांचे चरित्र….. या त्यांच्या आदर्शमुळेच हा दिवस युवक दिन म्हणून सरकारने घोषित केलाय….. अर्थात हे किती जणांना माहीती आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे…. सरकारी स्तरावर हा नकळत साजरा केलाही जात असेल…. प्रश्न हा आहे की हिंदू समाज पुन्हा एकदा ग्लानीतून आणि मरगळीतून बाहेर काढणाऱ्या या वीर पुरुषाला आणि राष्ट्रपुरुषाला आपण विसरलो आहोत का???

जे जे काही हिंदूंचे भूषण, जे जे काही भारतीय संस्कृतीचे प्रतीक त्याला दूषणे देणे आणि त्यांचा उल्लेखही टाळणे आणि शक्य तेव्हा बदनाम करणे हा आत्ता पर्यंत डावे, काँग्रेसी, तथाकथित लिबरल इत्यादी मंडळींचा अजेंडाच राहिला आहे. Gods Own Country असे बिरुद मिरवणाऱ्या राज्यात तर हिंदुत्वाला प्रखर विरोध केला जातोय…. ज्या प्रदेशातून स्वामी विवेकानंद आहेत त्या बंगालमध्येच स्वामींना आणि हिंदू धर्म संस्कृतीला हिंसक विरोध सुरू आहे. लांगुलचालनासाठी दुर्गा पूजेस विरोध सूरु आहे!! आणि आता हीच डावी मंडळी स्वामीजी हे कसे सेक्युलर होते आणि हिंदू धर्माचे विरोधक होते असे नारेटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व हिंदूविरोधी प्रयत्नांमुळे स्वातंत्र्या नंतरच्या पिढ्या ह्या आत्मविस्मृत, आपला इतिहास माहिती नसलेल्या आणि झालेच तर या धर्माला आणि संस्कृतीला नाकारणाऱ्या निपजल्या….. दोष त्यांचा नाही….. पण ही घोडचूक सुधारण्याची वेळ आली आहे.

Vivekananda Kendra, Kanyakumari.

फार लांबचे उदाहरण नको… फेकसत्ता मध्ये स्वामीजींची अवहेलना करणारा लेख एक तथाकथित डाव्या बुद्धीमंत म्हणवणाऱ्या भंपक माणसाने लिहिला होता…. दुर्दैव हे की या अशा लेखांना कोणी उत्तर दिले तर फेकसत्ता ते छापणार नाही कारण त्याचा सुमार बुद्धीचा दरिद्री संपादक याला ते पचणारे नाही…… हल्ली तर स्वामींना सेक्युलर कसे दाखविता येईल असे प्रयत्न सुरू आहेत…. मध्यंतरी रामकृष्ण मिशन च्या काही मंडळींनी आम्ही हिंदू नाही असेही म्हणायला सुरवात केली होती, अर्थात त्याला फार प्रतिसाद मिळाला नाही!!

असो…. आज जगभरातून स्वामीजींच्या अध्यात्मिक आणि सामाजिक कामाचा अभ्यास होत आहे. त्याचा प्रसार होत आहे. मग यात आपण भारतीयांनी आणि हिंदूंनी मागे राहून कसे चालेल…… त्यासाठी आपण स्वतः स्वामीजींबद्दल जाणून घेऊ, आपल्या मुलांनाही सांगू आणि त्यांच्या समृद्ध वारश्याला पुढे नेऊयात…… विवेकानंद केंद्राकडे यासंबंधी छोट्या छोट्या पुस्तिका आणि ग्रंथ ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा….

स्वामीजींचा एक संदेश जो सर्वांनाच मार्गदर्शक आणि स्फूर्तिदायक आहे…. तो नित्य स्मरणात ठेवुयात…..

उत्तीष्ठत, जाग्रत…. प्राप्य वरान्निबोधत..

युवक दिनाच्या युवांना आणि तुमच्या माझ्यात अजूनही लपलेल्या तरुणाईला शुभेच्छा !!!

स्वामीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!!

लेखक :- अरविंद श्रीधर जोशी

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8_(%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4)

Back to top button