HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग १५

ayodhya ram temple inauguration

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

हिंदू अस्मिता जागी झाली..

उत्तर प्रदेशात सत्तांतरण घडले होते. कल्याणसिंग यांचे सरकार आले होते.मुलायमचे शासन गेले आणि रामभक्तांचे शासन आले. गोळीबाराची शक्यता शून्य झाली. तरीसुद्धा केंद्रात असलेले नरसिंहराव यांचे सरकार अयोध्येत कारसेवकांवर सैन्य घालू शकत होते. याची जाणीव असल्यामुळे ६ डिसेंबर, १९९२ रोजी अयोध्येत जे कारसेवेला गेले, त्यांनी आपल्या घरी सर्व निरवानिरव केली होती. आपण एका अशा कामासाठी आणि अशा ठिकाणी चाललो आहोत, जेथे काहीही घडू शकते. प्राणदेखील जाऊ शकतो आणि काय आश्चर्य, घरातील माता-भगिनी-पत्नी यांनी आपल्या पतीला, भावाला, मुलाला धैर्याने आणि शौर्याने निरोप दिला. त्यांच्याकडून अपेक्षा केल्या की, यश घेऊन या!

डिसेंबर ६ ला खरं म्हणजे मंदिर उभारण्याची कारसेवा करायची होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली नाही आणि कारसेवा कशी करावी, याचा आदेश दिला. तेथे जमलेल्या सर्व कारसेवकांनी कारसेवा कशी करायची, याचा निर्णय केला. ते बाबराच्या तिन्ही घुमटावर चढले आणि हिंदू समाजाच्या डोक्यावरील तीन जळत्या भट्ट्या हाताने बुक्के मारून, पायाने नाचून, दगडाने ठेचून आणि मिळेल त्या साधनाने जमीनदोस्त केल्या. हे घुमट जमीनदोस्त करावे, ही विश्व हिंदू परिषदेची योजना नव्हती.

क्रांती कधीच योजना करून होत नसते. फ्रेंच जनतेने १७८९ रोजी पॅरिसमधील बॅस्टाईल तुरुंग फोडला, ही फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात समजण्यात येते. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध १६ डिसेंबर १७७३ रोजी बोस्टन बंदरातील टी पार्टीने झाली. या दोन्ही घटना पूर्वनियोजन करून झालेल्या नाहीत. जनतेने त्या उत्स्फूर्तपणे केलेल्या आहेत.

काही तथाकथित विद्वान म्हणतील बाबरी ढाचा जमीनदोस्त करणे, यात म्हटले तर कसला पराक्रम नाही. एका तथाकथित मशिदीचे तीन घुमट पाडणे, यात कसला आला पराक्रम? पाकिस्तानमध्ये जाऊन लाहोर जिंकणे किंवा जेथे आपली तक्षशिला होती, तो भाग जिंकणे, हा पराक्रमाचा भाग म्हणता येईल. पण, तरीही बाबरी ढाचा पाडणे हा पराक्रमाचा विषय आहे. कारण, या दिवशी हिंदू समाजाने साडेचारशे वर्षांच्या अपमानाची निशाणी जमीनदोस्त केली. ही घटना त्या दिवसापुरती मर्यादित नाही, तिचा एक भविष्यकालीन संदेश आहे. तो संदेश असा की, आता इथून पुढे हिंदू समाज कोणत्याही अपमानाच्या खुणा आपल्या देहावर बाळगू इच्छित नाही. ही एक सुरुवात आहे.

हिंदू समाजाच्या अपमानाच्या निशाण्या भरपूर आहेत. जागोजागी पाडली गेलेली मंदिरे या जशा अपमानाच्या निशाण्या आहेत, तशा आपल्याच धर्मातून आपलेच बांधव परधर्मात गेले आणि त्यांच्या माथ्यावर धार्मिक गुलामी आली, या देखील अपमानाच्या निशाण्या आहेत.त्यांना धार्मिक गुलामीतून मोकळे करून पुन्हा आपल्या घरी सन्मानाने आणावे लागेल.

एक बाबरी अपमानाची निशाणी मिटवून काय होणार? अशा शेकडो निशाण्या भविष्यकाळात मिटवाव्या लागतील. १९९२च्या पिढीने डोक्याला कफन बांधून अयोध्येत एक पराक्रम करून दाखविला. इतिहासाची पुनरावृत्ती करता येत नाही, करण्याची गरजही नाही. काळ बदलतो, नवीन परिस्थिती निर्माण होते, नवीन आव्हाने येतात. ती समजून नव्या पिढीने आपल्या सत्व रक्षणासाठी आणि आपल्या अस्मिता जागवण्यासाठी विषय हाती घ्यावे लागतात. ६ डिसेंबर ही त्याची आठवण करून देणारा दिवस आहे. अयोध्या आंदोलनाने भारताचा राजकीय नकाशा बदलला, असे जे वर लिहिले आहे म्हणजे काय केले, हे समजून घेतले पाहिजे.

बाबरी ढाचा पडल्यानंतर अनेक लोकांनी मातम सुरू केला. तेव्हा ‘नवाकाळ‘ ने एक संपादकीय लिहिले होते. त्याचे शीर्षक होते, ‘भाडोत्री छाती कशाला पिटवून घेता?’ अनेक दिवस अंधाऱ्या कोठडीत राहिल्यानंतर जर एखादा मनुष्य बाहेर आला, तर त्याला सूर्यप्रकाश सहन होत नाही, त्यामुळे तो डोळ्यावर हात धरतो.

हजारो वर्षे मार खात जगण्याची सवय लागली, ‘जी हुजूर,’ ‘येस सर’ म्हणण्याची सवय लागली. कुर्निसात करणे आणि सॅल्यूट ठोकण्याची सवय लागली, जे जे परकीय ते ते चांगले आणि जे जे स्वकीय ते ते घाणेरडे, अशी मनःस्थिती झाली, त्यांना हिंदू समाजाचे तेज कसे सहन होणार? म्हणून अशा हुजऱ्या आणि कुर्निसाती लोकांचे आलाप गाढवाच्या ओरडण्यासारखे समजले पाहिजेत आणि हिंदू समाज तेच समजला. प्राचीन काळापासून आपली परंपरा सर्व उपासना पंथांचा आदर करणारी आहे. ज्याची जिथे श्रद्धा त्याने तिथे जावे, ज्याला जी देवता आवडेल, त्याची पूजा करावी. अशा प्रकारचे पूजा स्वातंत्र्य ही आपली खास ओळख आहे. यालाच घटनाकाराने ‘सेक्युलॅरिझम‘ म्हटले आहे.

तो आमच्या रक्तात आहे. परंतु, त्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी असा केला की, ‘जे जे हिंदू ते ते निंदूआणि जे जे मुस्लीम, ख्रिश्चन ते ते वंदू.’ त्यांना डोक्यावर घेऊ आणि हिंदूंना पायदळी तुडवू. बंधने हिंदूंवर घालू आणि धर्मांध,जिहादी मुसलमान, ख्रिश्चनांना मोकळे रान देऊ. हिंदू मंदिरे ताब्यात घेऊ, मशिदी आणि चर्चना हात लावणार नाही. यात्रांवर कर बसवू आणि हजला सबसिडी देऊ. हे सर्व करणे म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’ असे सांगायला सुरुवात झाली. भाडोत्री, लाचार आणि पायचाटे विद्वानांनी त्यावर ग्रंथांचा आणि पुस्तकांचा रतीब घातला. १९९०च्या रथयात्रेने आणि १९९२च्या कारसेवेने या सर्वांचे थोबाड असे फोडले आहे की, ही सर्व मंडळी घरात आता पडलेले दात मोजत बसली आहेत. हिंदू समाजाला सेक्युलॅरिझम सांगणे म्हणजे, देवगडला जाऊन आंब्याचे महत्त्व सांगण्यासारखे आहे!

६ डिसेंबर १९९२ने राजकारणाच्या राष्ट्रीयकरणाचा म्हणजे हिंदूकरणाचा मार्ग मोकळा केला. बाबरी ढाचा पडणे म्हणजे केवळ चुना, रेती, विटा खाली पडणे नव्हे, हे एक वैचारिक संक्रमण आहे. म्हणून ज्या पिढीने वैचारिक संक्रमणाचा, देशातील वैचारिक क्रांतीची पायाभरणी केली, त्या पिढीला आदराचा मुजरा ! त्यातील अनेक जण आज दिवंगत झाले असतील, त्यांच्या सर्वांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम आणि त्यातील जे आज हयात आहेत, त्यांनादेखील प्रणाम! त्यांनी एक मार्ग मोकळा केला आहे, त्यावरून त्यांच्यानंतर आलेली पिढी चालत गेली आहे, पुढे येणाऱ्या पिढीलाही त्या मार्गावरून चालत जायचे आहे आणि त्याचे अंतिम गंतव्यस्थान भारतमातेला विश्वगुरूच्या पदावर बसविण्याचे आहे.

क्रमशः

Back to top button