HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग १६

ayodhya ram temple inauguration

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

विश्व हिंदू परिषद.. आणि..श्रीरामजन्मभूमी..

विश्व हिंदू परिषद (VHP) सेवाकार्य करणारी देशातील एक प्रमुख स्वयंसेवी संस्था आहे. सकल हिंदू समाजातील उच्चनीचता, भेदाभेद दूर करून समग्र समाजाला एका समान पातळीवर संघटित करण्याचे कार्य विश्व हिंदू परिषद करते. या परिषदेची स्थापना १७ ऑगस्ट १९७४ मध्ये केली गेली..

अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलन सातत्यपूर्णरीत्या राबवणे, त्याचे नियोजन, कार्यवाही करणे, त्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बळ उभे करणे, आंदोलनाचे विविध टप्पे यशस्वी होण्यासाठी अविरतपणे त्यासाठी पडद्यामागच्या हालचाली बिनचूकरीत्या राबवणे, यासाठी विश्व हिंदू परिषदचे नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत होती..

आंदोलनाचे नायक…

अशोक सिंघल – रामजन्मभूमी मुक्तीसाठी झालेल्या आंदोलनाचे नायक म्हणून सिंघल यांचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. मेटॅलर्जिकल इंजिनियर असलेले सिंघल पदवी मिळाल्यानंतर १९८० मध्ये त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी आली. आंदोलनाला व्यापक रूप देण्यात अशोकजींचे अतुलनीय योगदान होते. ३० ऑक्‍टोबर १९९० रोजी मुलायमसिंह यादव यांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला भेदत त्यांनी गनिमी काव्याने अयोध्येत प्रवेश केला आणि कारसेवकांचे नेतृत्वसुद्धा केले. ते लाठीहल्ल्यात जखमीही झाले.

आंदोलनाचा तरुण चेहरा…

विनय कटियार – विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनय कटियार हे होते. या आंदोलनाचा तरुण चेहरा म्हणून त्यांचा उल्लेख होतो. कटियार यांनी देशभरातील युवकांमध्ये या प्रश्नावर जनजागरण केले. दोन्हीही कारसेवेच्या वेळी देशभरातून हजारो युवक कारसेवक अयोध्येत पोचले. त्या नियोजनाचे शिल्पकार कटियार होते.

या साऱ्या आंदोलनामागे धर्माचार्यांचे पाठबळ उभे करण्याची खरी जबाबदारी पार पाडली ती रामविलास वेदांती, महंत अवैद्यनाथ आणि महंत नृत्यगोपालदास यांनी. यातील महंत अवैद्यनाथ हे गोरखपूरच्या गोरखनाथ पीठाचे प्रमुख होते, तर महंत नृत्यगोपालदास अयोध्येच्या मणिरामदासजी छावणीचे महंत आहेत. रामविलास वेदांती हे धर्माचाऱ्यांच्या वर्तुळातील प्रमुख आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व मानले जातात.

१९९० ची कारसेवा, शिलान्यासाचा कार्यक्रम, राम मंदिरासाठी प्रत्येक खेड्यातून एक वीट (रामशिला) घेऊन जाण्याचा कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रमांमुळे रामजन्भूमी मुक्ती आंदोलन हे जनआंदोलन तयार झाले.विश्व हिंदू परिषद या संपूर्ण जनआंदोलनाचा प्रेरणास्रोत म्हणून अखंड कार्य करत होती..

रामजन्मभूमीवर बाबराने बांधलेले तीन घुमट होते. त्यातील एक घुमट रामाच्या जन्मस्थानावर होता. तेथे बालरामाची मूर्ती होती. हिंदीत तिला ‘रामलला‘ म्हणतात. तिची पूजाअर्चा होत असे. देशभरातून भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येत. स्थानाचा विवाद चालू होता. शासनाने रामललाच्या स्थानाला टाळे ठोकले. म्हणजे राम तुरुंगात गेला. तरुण रामाला चौदा वर्षांचा वनवास कैकयीने घडविला.

कलियुगातील कैकयांनी बालरामाला ३३ वर्षांचा कारावास घडविला. न्यायालयाने हे टाळे काढून टाकण्याचा आदेश दिला. रामललाच्या मंदिराचे दरवाजे उघडले. टाळे उघडले गेल्यामुळे भारतीय संस्कृतीप्रेमींच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती, विश्व हिंदू परिषद आणि सर्व साधू-संतगण यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला गेला .

VHP हिंदूंचे संघटन आहे, VHP नैतिक आचरणाचा,चारित्र्य निर्मितीचा तसेच व्यक्ती-व्यक्तीतील स्नेहमय संबंधांचा आग्रही पुरस्कर्ता आहे. भारत सनातन राष्ट्र आहे. त्याची एक जीवनपद्धती आहे. त्याची मूल्यव्यवस्था आहे. ही मूल्य जगणारी थोर माणसे झाली. श्रीराम त्यातील एक. कर्तव्याचा आदर्श म्हणजे राम. आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श राजा, म्हणजे राम. हा राम भारतातील प्रत्येकाच्या मनात असतो. जे स्वतःला ‘हिंदू‘ म्हणतात, त्यांच्या मनात त्याचे स्थान अढळ असते. जे आपले हिंदूपण विसरले आणि बळजबरीने मुसलमान, ख्रिश्चन झाले, त्यांच्याही रक्तात ‘राम’ असतोच.

हा राम आपला राष्ट्रीय आदर्श आहे. राम आहे, तर आपला देश आहे. राम असेल तर आपल्या देशात आणि जीवनात ‘राम’ आहे. त्याची श्रद्धा जागविणे म्हणजे दगडाच्या प्रतिमेची किंवा धातूच्या प्रतिमेची पूजा नव्हे. ते त्याचे रूप आहे. आपला देश वेगळी ओळख असलेला देश आहे आणि ही वेगळी ओळख ज्यांनी घडवून दिली, त्यात रामाचे स्थान अद्वितीय आहे. अशा रामाच्या जन्मस्थानावर बाबरने हल्ला केला. मंदिर पाडले, त्याजागी मशीद बांधली.

बाबराला मशीदच बांधायची होती तर अयोध्येत जमीन भरपूर होती. तो कुठेही बांधू शकत होता. पण, तो आक्रमक होता, त्याला भारतावर राज्य करायचे होते. भारतावर राज्य म्हणजे हिंदूंवर राज्य करायचे होते. राज्य करण्यासाठी त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे आवश्यक होते. त्यांच्या श्रद्धा भंग करणे आवश्यक होते. ‘मी मंदिर पाडू शकतो, मला हात लावायची कुणात हिम्मत आहे काय?’ हा त्याचा संदेश होता. त्याने मंदिर पाडणे आणि मंदिराच्या खांबावरच मशीद उभी करणे, हा केवळ एक प्रार्थनास्थळ गेले आणि दुसरे उभे राहिले, एवढा बदल नाही. हे आमच्या सेक्युलर महापंडितांना समजत नाही. त्यांना बाबराचे जोडे मिरवण्यात धन्यता वाटते.

हा बदल दोन संस्कृती बदलांचा निदर्शक आहे. एक आहे आक्रमक बाबराची, रानटी, अतिशय हिंसक, कमालीची असहिष्णू, सर्व मानवी मूल्ये पायदळी तुडवणारी, बापाला बाप न म्हणणारी आणि आईला आई न म्हणणारी संस्कृती आणि दुसरी संस्कृती आहे ‘पितृवचना लागे रामे वनवास केला’ हे मूल्य जपणारी. बाबराने आपली मानवी मूल्यांची संस्कृती अयोध्येत उद्ध्वस्त केली आणि त्याजागी स्वतःच्या रानटी संस्कृतीची निशाणी उभी केली. काळ विपरीत होता. आपण दुर्बल झालो होतो. महाशक्तिशाली रामाचे तेज आपण हरवून बसलो. रामबाणाची मारकता अत्यंत क्षीण झाली. त्याची असंख्य कारणे आहेत आणि जसजशी ही कारणे मिटत चालली तसतशी रामशक्ती, रामअनुभूती हिंदू जनतेत निर्माण होऊ लागली.

आपण दुर्बल असतानादेखील रामजन्मस्थानावरील बाबरी ढाँचा जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केला. चारशे वर्ष हा संघर्ष चालला. कैक हजार लोक त्यात हुतात्मा झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि त्यामुळे तत्कालीन सरकारला मंदिराचे टाळे काढावे लागले.

हा केवळ मंदिर बांधण्याचा खटाटोप नाही. मंदिराच्या संख्येत अयोध्येतील रामाचे आणखी एक मंदिर, असा हा तात्पुरता विषय नाही …

क्रमशः

Back to top button