(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)
अयोध्येत राम मंदिरच का पाहिजे?
माणसाला जगण्यासाठी जसे बळ लागते, तसे राष्ट्राला उभे राहण्यासाठी बळ लागते. व्यक्तीचे बळ त्याच्या शिक्षण, संस्कार आणि धनात असते. राष्ट्राचे बळ, राष्ट्राच्या अस्मितेत असते, राष्ट्राच्या श्रद्धेत असते. ही श्रद्धाकेंद्रे उभी करावी लागतात. त्याची प्राणपणाने जपणूक करावी लागते. ही श्रद्धा केंद्रे राष्ट्राची जपणूक करतात.
अमेरिकेचे उदाहरण घेऊया…न्यूयॉर्कच्या लिबर्टी बेटावर ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ उभा आहे. ९३ मीटरचा हा स्टॅच्यू आहे. अनेक वर्ष त्याचे काम चालले. अमेरिकेच्या अस्मितेचे ते प्रतीक आहे. तो उभा करण्यासाठी करोडो डॉलर लागले. अनेकजण हे अवघड काम करताना प्राणास मुकले. तेथे कुणी असा प्रश्न उभा करणारा झाला नाही की, कशाला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पाहिजे? त्याऐवजी हॉस्पिटल काढा, शाळा काढा. असं जर कुणी बोलला असता तर, अमेरिकेत रस्त्यावर शेण मिळत नसल्याने अमेरिकन जनतेने त्याच्या तोंडात काय घातले असते, हे मी सांगू शकत नाही.
अमेरिकेचे दुसरे उदाहरण… साऊथ डकोटा या राज्यात माऊंट रशमोर (rushmore mount) या पर्वतावर अमेरिकेचे राष्ट्रनिर्माते जॉर्ज वॉश्मिंटन, थॉमस जेफरसन, अब्राहम लिंकन आणि थिओडोर रुझवेल्ट यांची भव्य शिल्पे आहेत. आकाराने महाकाय आहेत. एक-एक शिल्प जवळजवळ १८ मीटरचे आहे आणि फक्त चेहरेच आहेत. ते बघण्यासाठी दरवर्षी २०-२५ लाख अमेरिकन जातात. हे शिल्पाचे काम चालू असताना, कुणी असा प्रश्न केला नाही की, ‘या शिल्पांची गरज काय? तेवढ्याच पैशात आपण हॉस्पिटल बांधू, गरिबांना अन्न देऊ.’ असा जर तिथे कुणी काही बोलला असता तर त्याच्या डोक्यावर अमेरिकन माणसाने डोंगर पोखरून जी खडी बाहेर काढलेली होती, ती हाणली असती.
राष्ट्राला अस्मिता देण्यासाठी त्याच्या महापुरुषांच्या स्मृती जागृत ठेवाव्या लागतात. बाबर, अकबर, औरंगजेब हे आमचे राष्ट्रपुरुष नव्हेत. हे आक्रमक आणि रक्तपिपासू नराधम होते. त्यांचे आमच्यावरील राज्य हा एक इतिहासातील काळा अध्याय आहे. आमचा देश रामाचा देश आहे. त्याची स्मृती जागृत ठेवणे, म्हणजे राष्ट्रपुरुषाची स्मृती जागृत ठेवणे आहे.
हिंदू समाजाचे दुर्दैव असे आहे की, त्याला संघर्ष हिंदूंशीच करावा लागतो. राम झाला की नाही, रामायण खरे की खोटे, रामाच्या जन्मतारखेचा दाखला आहे की नाही, वानर रूपातील हनुमान खरोखरच अस्तित्त्वात होता का? असले प्रश्न मुसलमान विचारत नाहीत, ख्रिश्चन विचारत नाहीत. विचारणारे हिंदूच असतात. ते स्वतःला पंडित समजतात, इतिहासकार समजतात, संशोधक समजतात. माध्यमांत त्यांचे भाऊबंद बसलेले असतात. ते त्यांना प्रसिद्धी देतात आणि सत्तेत बसलेले तुष्टीकरणवादी त्यांना संरक्षण देतात. त्यांची ताकद खूप मोठी आहे. त्याविरुद्ध सामान्य हिंदू लढू शकत नाही. त्यांच्या आवाजाला हे महापंडित भीक घालत नाहीत.
या भावनेचे प्रतिबिंब म्हणजे.. २ लाख, ७५ हजार खेड्यांतून करोडो हिंदूंनी १९८९ साली श्रीरामाचे मंदिर जन्मस्थानावर उभे केले जावे, या रामजन्मभूमी न्यासाच्या मागणीला पाठिंबा दिला. (रामशिला पाठविल्या) रामाच्या मंदिराची प्रतिकृती घरोघर पोहोचली. सर्व हिंदू भावनिकदृष्ट्या या प्रतिकृतीशी संलग्न झालेले आहेत. प्रतिकृतीप्रमाणे पत्थर कटाईचे काम अयोध्येत सुरू झाले.
तकलादू सरकार असताना मंदिराचा विषय पुढे जाणे शक्य नव्हते. सेक्युलर राजकारणाचा तो विषय नव्हता. हिंदूंची मनस्थिती बदलत चालली होती. त्यांच्यातील रामतत्त्व आता हळूहळू जागे होऊ लागले होते. रावणशाही त्यांना समजू लागली होती. काळ बदलतो तसे रावण बदलतात. रामाच्या काळातील रावणाला दहा तोंडे होती. याचा अर्थ असे की, त्याची दहा शक्तिस्थाने होती. तुष्टीकरणवादाच्या काळात आणि बेगडी सेक्युलॅरिझमच्या काळात तोंडे दहाच राहिली, परंतु त्यांची रूपे बदलली. सेक्युलर, डावे, जडवादी, चंगळवादी, मॅकोलेपुत्र, मार्क्सपुत्र, तुष्टीकरणवादी, संस्कृतीभंजक, हिंदू निंदक, अशी ही दहा तोंडे झाली. त्यांनी खूप आग आणि विष हिंदू समाजावर ओकले. हिंदू, शंकराचाच अवतार असल्यामुळे ते विष त्याने प्राशन केले.
विषाचा एवढाच परिणाम झाला की, हिंदूंच्या मनात झोपलेले रामतत्त्व जागे होऊ लागले आणि त्याच्या लक्षात आले की, नुसत्या धार्मिक यात्रा, तीर्थयात्रा, देव-देवतांचे पूजा-महोत्सवा बरोबरच आता वेळ मतपेटीच्या पूजेची आलेली आहे. ते त्याने १९९८ पासून सुरू केले आणि २०१४ आणि नंतर २०१९ साली ही पूजा काय असते, हे जगाला दाखवून दिले. तुष्टीकरणवाद्यांचे सरकार २०१४ साली जाऊन रामभक्तांचे सरकार झाले. जनतेची अपेक्षा अशी राहिली की, आता सरकारने कायदा करावा. रामजन्मभूमी आपल्या ताब्यात घ्यावी आणि तेथे भव्य मंदिर बांधावे. प्रकरण न्यायालयात होते.
रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन, शिलान्यास, कारसेवा, बाबरी ढाँचा जमीनदोस्त, जमिनीचे सरकारी अधिग्रहण, अलाहाबाद हायकोर्टाचा जमीन विवादाचा निर्णय आणि जमिनीचे त्रिभाजन, सर्वोच्च न्यायालयातील खटला आणि जमिनीच्या मालकीचा विषय, असा सर्व प्रवास आहे. सर्वोच्च न्यायालयात जन्मस्थानावर मंदिर होते की नाही, हा विषय नव्हता, तर जमिनीची मालकी कुणाकडे आहे, हा होता. गुंतागुंतीचे प्रश्न केवळ कायद्याने सुटत नाहीत. ज्या विषयामागे धर्म आहे, न्याय आहे, ते प्रश्न धर्म-न्यायाचे आहेत म्हणून निकाली होत नसतात.
श्रीकृष्णाचा भगवद्गीतेत एक शाश्वत संदेश आहे ‘धर्माचा प्रश्न सोडवायचा असला तर त्याच्यामागे शक्ती उभी केली पाहिजे.’ समर्थ रामदास स्वामींनी संदेश देऊन ठेवला आहे की, ‘दुर्बलाला जगात कुणी विचारत नाही.’ ‘शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती-युक्ती जये ठायी, तेथे श्रीमंत धावती।’
हिंदू राष्ट्रात राहणारे सगळे हिंदू आहेत. पूजापद्धती भिन्न असतील. कुणी मशिदीत जातो, कुणी गुरुद्वारात, कुणी चर्चमध्ये, कुणी अग्यारीत, तर कुणी विहारात. आम्ही सर्व एका राष्ट्राचे अंग आहोत. हिंदू राष्ट्राचे अंगभूत घटक आहोत. ही भावना सर्व समाजात जागृत करून एक शक्तिशाली राष्ट्र उभे करणे, म्हणजे भव्य राम मंदिर उभे करणे होय. राम मंदिरातून जे राष्ट्रमंदिर उभे राहील, ते दगड, चुना, विटा यांचे नसेल. ते जिवंत माणसांचे असेल. आत्मिय भावनेने एकमेकांशी जोडलेली, समरसतेचा व्यवहार करणारी, परस्परपूरक जीवन जगणारी, ही राष्ट्रीय जनता असेल. मंदिरातून राष्ट्र मंदिराकडे जाण्याचा हा प्रवास आहे.
न्यायालयीन देखरेखीखाली झालेल्या शास्त्रशुद्ध उत्खननात त्या ठिकाणी जे अवशेष सापडले त्यामुळे तेथे पुरातन मंदिर होते व ते पाडण्याचा प्रयत्न झाला होता हे निर्विवादपणे सिद्ध झाले. वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे ‘रामजन्मभूमी’च्या अस्तित्वाबद्दलचा वाद आता पूर्णपणे संपला आहे.
क्रमशः