बंगळूरच्या कलासाधक संगमात समरसतेचा मंत्र जागृत
sanskar bharti akhil bhartiya kalasadhak sangam 2024
कलाकार हा त्याच्या भोवताली असणाऱ्या विचार, संस्कृती आणि प्रवृत्तीच्या अनुभवांतून तावून-सुलाखून निघतो. तो त्याच्या भावभावनांतून काही सादर करतो. मग चित्रातून, शिल्पातून, नाटकातून, लेखणीतून अशा नानाविध माध्यमांतून हे सादरीकरण होते. कलाकाराच्या हृदयापासून आलेले हे भाव त्याच्या सभोवतीच्या परिस्थितीचे रेखाटन करणारे असतात. म्हणूनच तर कलेला समाजाचा आरसा देखील म्हटले जाते. ही हृदयापासून हृदयापर्यंत जोडत जाणारी कला जोपासावी लागते, त्या कलेला मंच द्यावा लागतो, त्या कलेला ओळख द्यावी लागते, तिचं संवर्धन करावं लागतं, कलाकारांना प्रोत्साहन द्यावं लागतं. याच जपणुकीसाठी संस्कार भारती ४० वर्षांपासून उभी आहे. कलाकारांच्या आयुष्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरं सोडवत, कलाकारांना संगठीत करून कोणत्याही जाहिरातबाजी शिवाय, कलेचं पोषण करणारी संस्कार भारती ही कला क्षेत्रातली शिखर संस्था आहे.
संस्कार भारती दर ३ वर्षांतुन एकदा देशभरातील विख्यात, प्रस्थापित, विद्यार्थी अशा सर्व पातळीवरील कलाकारांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या कलेचे आणि विचारांचे आदानप्रदान घडवण्यासाठी, कलेवर चर्चा घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय कलासाधक संगम आयोजित करत असते. हा देशांतील विविध भागात आयोजित केला जातो. भारतीय कलासंस्कृतीवर विश्वास असणाऱ्या कलासाधकांचे हे मोठे एकत्रीकरण असते. कलेच्या सादरीकरणासोबत वैचारिक परिसंवाद आणि विमर्श याचा अंतर्भाव या संगमात प्रामुख्याने असतो. या संगमातून कार्यकर्ता, कलासाधक आणि कलारसिकजन यांची ‘भारतीय कलादृष्टी’ विकसित करून आपले अंतरंग व्यक्त करण्याची इथे संधी मिळत असते.
या वर्षीचा अखिल भारतीय कलासाधक संगम २०२४ हा श्री श्री रविशंकर महाराजांच्या बंगळुरू येथील आश्रमात होणार आहे. १ ते ४ फेब्रुवारी कलेच्या गौरवासाठी सुमरे २ लाख कलाप्रेमी नागरिक आश्रमात भेट देण्यासाठी येतील असा अंदाज आहे. या चार दिवसीय कार्यक्रमाचे उदघाटन, कलारसिक आणि कलेचे जतन करणारे आणि आश्रयदाते विख्यात म्हैसूरच्या राज घराण्याचे माननीय राजा यदुवीर वाडियार जी तसेच विजयनगर साम्राज्याचे वंशज माननीय श्री क्रृष्णादेवराय जी यांच्या उपस्थितीत होईल.
या प्रसंगी विख्यात लोक कलाकार पद्मश्री मांजम्मा जोगती जी, वरिष्ठ तबला वादक रविणारा यावगल जी आणि इतिहासकार डॉ.विक्रम संपत जी हे सुद्धा उपस्थित असतील.कलासाधक संगमात संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दोन दिवस (दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी) उपस्थित राहणार आहेत.
या वर्षीच्या कलासादाक संगमापासून ‘भरतमुनी सन्मान’ हा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण सन्मान जोडण्यात आला आहे. सन २०२३ साथीचा हा पुरस्कार “दृश्यकला” आणि “लोककला” या प्रकारासाठी असणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील सर्व स्तरांतील २५०० कलाकारांनी प्रातिनिधीक दृष्ट्या नोंदणी केली आहे. संस्कार भारतीचा ‘भरतमुनी सन्मान २०२३’ मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार विजय दशरथ आचरेकर आणि सिंधुदुर्ग इथले लोक कलाकार गणपत सखाराम मसगे याना देण्यात येणार आहे.हि निश्चितच कोकण प्रांताची अभिमानाची बाब आहे.
या वर्षी कलासाधक संगमात देशाच्या विविध भागांतून येणारे साहित्यिक आणि कलावंत, साहित्य आणि कलेच्या माध्यमातून “समरसता” ह्या विषयाचे विविध पैलू सादर करणार आहेत. त्य्यामध्ये विविध सत्रांतून परिसंवाद, चर्चा, विविध रंगमंचीय कलाविष्कार, प्रदर्शनी यांचे आयोजन केले जाणार आहे.समाजातील जातीपातीच्या भेदभावाला दूर सारत समाजात समरसता निर्माण करणाऱ्या विषयांवर निर्मित कला, कलासाधक संगमाला व्यापून टाकणार आहेत. देशभरातील विविध प्रांत समरसतेच्या जागृतीसाठी विविध विषय सादर करतील. आंध्र प्रदेश प्रांतातून “जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी दिलेले समरसतेच्या धडे” या विषयावर नाट्य सादरीकरण होणार आहे.
ईशान्य भारत लोकनृत्याचे सादरीकरण करणार आहे.कलासाधक संगमाच्या नाट्यमालिकेत श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले नितीश भारद्वाज पुन्हा एकदा श्रीकृष्णाच्या भूमिके “समरसता का रथ” या नाटकातून प्रेक्षकांना भेट देतील. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांच्या भक्तीने आणि कौशल्याने तयार झालेला रथ हा त्यांच्याच स्पर्शाने अपवित्र होऊ शकत नाही. अपवित्र-पवित्रता अशा विचारांना कर्मयोगात आणि भक्तीत स्थान नाही असं संदेश हे अभूतपूर्व असे नाटक देईल.
संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने वारकऱ्यांच्या वारीतील हजार वर्षांच्या वारीतील समरसतेचा विषय अधोरेखीत करणारे नाटक “वारी वारी जन्माची वारी” हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी कलासाधक संगमात उपस्थित असेल. प्रसिद्ध अभिनेते, निर्देशक,केंद्रीय नाट्यविधाचे अध्यक्ष श्री.प्रमोद पवार यांनी “वारी वारी जन्माची वारी” नाटकाचे लेखन, निर्देशन केले आहे.
हजार वर्षांची वारकरी परंपरा वेळोवेळी समाजातीळ विषमता दूर सारून समरसतेचा मंत्र महाराष्ट्रातील संतांनी ओवींच्या ओळींत गुंफून ही जन्माची वारी कशी समृद्ध केली आहे या नाटिकेतून प्रकर्षाने जाणवते. या वारीतील कान्होपात्रेच्या ओळी प्रेक्षकांच्या अंगावर शहरे आणते. पुरुषरूपातील देवाला आई म्हणणारी आपली ही वारकरी परंपरा सर्व जातीभेद दूर सारून समाजात भक्तिरसाचा आणि समरसतेचा संचार कसा करते याचे दाखले देणारे हे नाटक आहे.हे नाटक बघता बघता समरसतेच्या दोन ओळी मनात घर करून जातात.
ज्ञानियाचा व तुक्याचा तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे.