महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित १३ महानुभावांचा अल्प परिचय सांगणारी १३ भागांची विशेष मालिका..
पद्मश्री पुरस्कार..
उदय देशपांडे (खेळ)
उदय देशपांडे हे क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. 50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली.
मल्लखांब हा अस्सल मराठी मातीतील मर्दांचा खेळ. समर्थ रामदासांनी त्याची रुजवात महाराष्ट्रात केली, असेही पुरावे आढळतात. संपूर्ण महाराष्ट्राला संघटित करणाऱ्या आणि बलोपासनेतून तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या खेळाचा जगभरात प्रचार-प्रसार मात्र उदय देशपांडे यांनी केला. अशा या मल्लखांबचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उदय देशपांडे यांना नुकताच भारत सरकारने ‘पद्मश्री‘ पुरस्कार जाहीर केला आहे. २०१९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार दिला आहे.
मल्लखांबाच्या नियमित सरावाने केवळ हाता-पायांच्या स्नायूंनाच नव्हे, तर शरीरातील इतर अवयव आणि संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, चयापचय क्रिया यांना फायदा होतो. आरोग्याची गुरुकिल्ली आपण पाठीच्या कण्याला म्हणतो, त्याचे सर्वाधिक चलनवलन मल्लखांबावर होते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. मधुमेह, रक्तदाब, डोकेदुखी, अर्धशिशी आणि निद्रानाश अशा अनेक समस्यांवरचा जालीम उतारा म्हणजे मल्लखांब! या मल्लखांबाला विश्वास जोडणारे, मल्लविद्येतील उदयस्तंभ म्हणजे उदय देशपांडे.
क्रमशः