सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली माहिती..
रा.स्व. संघाची वार्षिक अ.भा. प्रतिनिधी सभा सध्या नागपूर येथे होत आहे. पत्रकार परिषदेला संबोधताना सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी विशेषतः रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी झालेल्या अक्षता वितरण अभियानाबाबत (Akshata Vitaran Abhiyan Details) माहिती दिली. एकूण १९ कोटीहून अधिक परिवारांपर्यंत संपर्क झाल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला (ABPS Update) शुक्रवार, दि. १५ मार्च रोजी सुरुवात झाली. तत्पूर्वी रा.स्व.संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी रामसेवकांकडून झालेल्या अक्षता वितरण अभियानाची आकडेवारी मांडली. देशभरातील एकूण १९ कोटी ३८ लाख परिवारांपर्यंत संपर्क झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर व अ.भा. सह प्रचार प्रमुख आलोक कुमार देखील उपस्थित होते.
डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार,श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी झालेल्या अक्षता वितरण अभियानात एकूण ४४ लाख ९८ हजार रामसेवक सहभागी झाले होते. त्यांनी एकूण ५ लाख ९८ हजार ७७८ गावांपर्यंत म्हणजेच देशभरातील ९० टक्के गावांपर्यंत संपर्क साधला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासने केलेल्या आवाहनानंतर २२ जानेवारी रोजी देशभरात ५ लाख ६० हजार स्थानांवर एकूण ९ लाख ८५ हजार कार्यक्रम झाले. यात २७ कोटीहून अधिक लोक सहभागी झाले होते.
अ.भा. प्रतिनिधी सभेला १५०० कार्यकर्ता उपस्थित आहेत. त्यापैकी देशभरातील शाखांमधून निवडलेले २०३ अ.भा प्रतिनिधी, अ.भा. कार्यकारी मंडलातील ४३५ प्रतिनिधी, ४५ प्रांतांचे शारीरिक, बौद्धिक, व्यवस्था, सेवा, संपर्क, प्रचार विभागांचे प्रमुख, विविध संघटनांचे कार्यकर्ता, ४४ महिला प्रतिनिधी सभेला उपस्थित आहेत.
भारतामध्ये संघदृष्ट्या एकूण ९२२ जिल्ह्यांमध्ये ९९ टक्के संघकार्य सुरु आहे. तसेच ५८९८१ मंडल असून सध्या ४७ टक्के मंडलांपर्यंत संघकार्य पोहोचले आहे. संघ शताब्दी वर्षापर्यंत सर्व मंडलांपर्यंत संघाचे कार्य पोहोचावे असा फोकस आहे. सध्या संघाच्या ७३,११७ दैनंदिन शाखा सुरु असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ४४६६ शाखांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर साप्ताहिक मिलनांची संख्या २७,७१७ असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ८४० ने त्यामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर ४४ प्रांतांमध्ये झालेल्या ४६० महिला संमेलनांमध्ये ५ लाख ६१ हजार महिलांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.
रा.स्व.संघाने यावर्षापासून आपल्या संघ शिक्षा वर्गाच्या रचनेत काही बदल केले आहेत. सर्वप्रथम तीन दिवसांचा प्रारंभिक वर्ग होईल, त्यानंतर सात दिवसांचा प्राथमिक वर्ग, प्रथम वर्ष ऐवजी १५ दिवसांचा ‘संघ शिक्षा वर्ग’ होईल. त्यानंतर २० दिवसांचे होणारे द्वितीय वर्ष क्षेत्रशः होईल. त्यास ‘कार्यकर्ता विकास वर्ग १’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शेवटी होणाऱ्या तृतीय वर्षाला ‘कार्यकर्ता विकास वर्ग २’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये शिक्षार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर नेऊन प्रशिक्षण देण्यात येईल. संघ शिक्षा वर्गांचा अशाप्रकारे नवा पाठ्यक्रम असेल.
साभार :- मुंबई तरुण भारत