आज एका विशेष फिल्मच्या स्पेशल स्क्रिनिंग ला जाण्याची संधी मिळाली. फिल्ममध्ये साधारण २०१० मधली परिस्थिती चित्रित करण्यात आली आहे. वरती नाव लिहिले आहे त्याप्रमाणे बस्तर, दांतेवडा इत्यादी नक्षल प्रभावित क्षेत्रातील ही गोष्ट आहे. नक्षलींचे अनन्वित अत्याचार, आदिवासी समाजाची अतिशय दयनीय अवस्था, CRPF, आर्मी, पोलिस, अधिकारी वर्ग, राजकारणी, अर्बन नक्षल, त्यांचे लॉबिंग, मीडिया, लेफ्ट लिबरल, न्याय व्यवस्था (की दुरावस्था?), विविध परकीय भारतविरोधी शक्ती, असे अनेक परस्परपूरक आणि विरोधी गट भारतातील रेड कोरीडोर म्हणजेच नक्षलबाडी, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांत काम करत आहेत. गरजेप्रमाणे आणि ओतल्या जाणाऱ्या पैशानुसार नक्षली कारवायांची frequency गेल्या ५७ वर्षांत कमीअधिक होत राहिली. (चारू मुजुमदारनी १९६७मध्ये चीनमधील माओ प्रमाणे इथे नक्षल मूव्हमेंट सुरू केली असे धरत आहे.)
नेपाळलगत असणाऱ्या नक्षलबाडी गावात सुरू झालेला नक्षली गटांचा हा खुनी खेळ आज २०२४ आले तरी संपत नाही. पण या सगळ्या काळात त्यांनी घडवलेल्या लालेलाल इतिहासाची उत्तम माहिती या चित्रपटाद्वारे आपल्यासमोर उलगडत जाते. अनेक धागेदोरे मनात आपोआप जुळत जातात. गेल्या ५७ वर्षांत ५०,००० खून या नक्षलींनी घडवून आणले. त्यामागचे सूत्र समजत जाते. सूत्रधारांचे बुरखे टराटर फाटत जातात.
गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने नक्षली कारवायांचे लगाम चांगलेच कसले आहेत. जेव्हा नक्षल संघटना पूर्ण भरात होती तेव्हा २०० भारतीय जिल्हे यांच्या प्रभावक्षेत्राखाली होते. सप्टेंबर २१ मध्ये सरकारी बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या आकड्यानुसार २०१० मध्ये १० राज्यातील ९६ जिल्ह्यांत नक्षली कार्यरत होते. आज ही संख्या ४१ जिल्हे आहे. त्यांची ताकदही कमजोर पडत चालली आहे. त्यांचे funding चे मार्ग FCRA मध्ये reforms घडवून आणून गृहमंत्रालयाने बंद करत आणले आहेत.
नक्षल प्रभावित क्षेत्रात संपर्क, संवाद, चांगल्या जीवनासाठी चांगल्या मदत योजना वगैरे सुरू झाल्या आहेत. समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी आणि जागृती आणण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. नक्षली नेत्यांचा बंदोबस्त केला जात आहे. दलमचे अनेक नक्षली शरण येत आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न चालू आहेत. केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी चार दिवसांपूर्वीच अर्णवला दिलेल्या जाहीर मुलाखतीत सांगितले आहे की येत्या ३ वर्षांत भारत नक्षलवादमुक्त देश असेल. या सरकारने आजवर सांगितलेली कामे पुरी करून दाखवली आहेत. त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवायला हरकत नाही.
तर जनतेच्या डोळ्यांवर झापड लावून त्यांना आपल्या सोयीने हाकणाऱ्या बॉलिवूडला आपण आता चांगलेच ओळखू लागलो आहोत. अनेक सो कॉल्ड मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांना बॉक्सऑफिसवर जोरदार आपटवून भारतीय समाजाने आपण जागृत होत आहोत ही जाणीव जगाला करून दिली आहे. याच माध्यमाचा उपयोग करून, नक्षलींची कृष्णकृत्ये समाजासमोर आणण्यासाठी फिल्म्स हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. विपूल शहाने या प्लॅटफॉर्मचा उत्तम वापर केलेला आहे. माझी आवडती नटी kerala files फेम अदा शर्मा यात प्रमुख भूमिकेत आहे. बाकी एकही नामांकित नट औषधाला सुध्धा नाही. पण सर्वांचा उत्तम अभिनय, प्रसंगांची लय, स्क्रिप्टला न्याय देणारी फ्रेम यामुळे चित्रपट प्रभावी होतो. नक्षल संघटना, कार्यपध्दती, त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा जिवंत, धगधगता अनुभव देणारी ही फिल्म Commercial असली तरी एका अर्थाने डॉक्युमेंटरीच आहे.
भारतीय म्हणून आपल्या जाणिवा सुस्पष्ट करणारी, आपल्याला भानावर आणणारी, गदागदा हलवून जागे करणारी फिल्म आहे. A certificate असणारी film आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकाने जरूर पहावी असेच सांगावेसे वाटते.
लेखिका :- अमिता आपटे