स्वातंत्र्यातून स्वत्वाची जाणीव निर्माण करणारे श्रीमंत योगी..
chhatrapati shivaji maharaj jayanti-2024
मोहम्मद जरूद्दीन बाबर हा मोगल राज्याचा संस्थापक संपूर्ण मध्य आशिया फिरून जेव्हा भारताच्या सीमेत प्रवेश करतो तेव्हा तो भारावून जातो आणि येथील पाने, फुले, झाडे, बर्फाळ प्रदेश, घनदाट जंगले, ओढे, नद्या असा सगळा समृद्ध परिसर बघितल्यानंतर त्याच्या तुझुकी बाबरी या त्याच्या ग्रंथात भारताचे वर्णन पृथ्वीवरचा स्वर्ग असे करतो. परंतु ज्या बाबराने भारत भूमीचे वर्णन पृथ्वीवरचा स्वर्ग असे केले आहे त्याच्याच वारसदारांनी सामान्य जनता, येथील नैसर्गिक संसाधने ओरबाडून संपूर्ण हिंदुस्थानात त्यांचा अंमल बसवण्यासाठी वापर केला. हिंदुस्थानात स्थापन झालेली इस्लामी सत्ता उभी राहिली होती सामान्य माणसाच्या समृद्ध जीवनावर वरवंटा फिरवून .
भारतातील सर्व सल्तनती या एक तर त्या धार्मिक होत्या आणि बऱ्याचदा त्या खलिफा किंवा तत्सम धार्मिक अधिकाऱ्याच्या सल्ल्याने काम करीत असे. अर्थात त्या आधुनिक संकल्पनेत सार्वभौम कधीच नव्हत्या.
जी सत्ता कोणाच्या दबावाखाली काम करीत नाही व केवळ जनता व राष्ट्राचे हित पाहते. कोणत्याही परकीय सत्तेचे अंकित असत नाही तीच सत्ता सार्वभौम असते. मध्ययुगात इस्लामी सल्तनतींच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्यच केवळ सार्वभौम होते. त्याचे व्यवस्थापन जगात सर्वश्रेष्ठ होते. हिंदू नीतिशास्त्रात सांगितले आहे, ”राजा गुणी असेल तर प्रजेचे कल्याण आणि तो अवगुणी असेल तर प्रजेचे अवकल्याण राजा कालस्य कारणम् !” या नियमाने छत्रपती शिवरायांचे राज्य हे जगातील एक आदर्श राज्य होते.
छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या मानदंडाने मराठा राज्य चालले, ते भारतभर पसरले किंबहुना मराठा सत्ता ही अखिल भारतीय सत्ता झाली, मोगलांनाही मराठी सत्तेचे मंडलिक व्हावे लागले. त्याचे एक कारण म्हणजे मराठा सत्तेने जनतेसाठी केलेले जलव्यवस्थापन याचा विचार आपण करणार आहोत.
इस्लामी सुलतान, बादशहा तसेच ब्रिटिश सत्ताधीश हे परकीय होते. त्यांना या भूमीशी व येथील जनतेशी काही घेणे देणे नव्हते. त्यांनी येथील सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर गोळा केला. परंतु त्या प्रमाणात त्यांनी येथे जनतेला सुविधा निर्माण करून दिली नाही. त्या काळात शेतीसाठी जलसिंचन आवश्यक होते कारण भारतीय शेती ही मान्सून पावसावर अवलंबून आहे आणि त्या काळीसुद्धा होती. किंबहुना ज्या काळात पाऊस कमी पडत असे त्यावेळी सुद्धा जबरदस्ती शेतसारा वसुली केली जात असे. येथील महिला व लहान मुले यांना पकडून अरबस्तानच्या बाजारात विकले जात असे.
ब्रिटिश सत्ता तर याहून भयंकर होती. त्यांनी भारतीय जनतेचे चौफेर शोषण केले. वरील विवेचनाचे कारण असे की जेव्हा जेव्हा भारतावर परकीय सत्ता आल्या त्यांनी येथील समृद्धीचा केवळ स्वतःच्या धर्मासाठी, देशासाठी आणि मौजमजेसाठी वापर केला. त्यांच्यासाठी भारताची जनता, तिने निर्माण केलेले अन्नधान्य, येथील साधनसंपत्ती यांचा वापर केवळ उपभोगासाठीच होता. येथे कोणतेही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क त्यांना करायचे नव्हते जेणेकरून येथील स्थानिक जनता सुखी होईल.
जेव्हा जेव्हा भारतामध्ये अहिंदू सत्ता अस्तित्वात आल्या तेव्हा तेव्हा जलसमृद्ध भारतात दुष्काळ पडल्याचे आपल्याला दिसून येते. या दृष्टीने भारतात पाण्याचे कारंजे मोठ्या प्रमाणात बांधणाऱ्या इस्लामी सत्तांनी येथील हिंदू जनता समृद्ध व्हावी म्हणून जलसिंचनाच्या सोयी कधी निर्माण केल्या नाही. अपवाद उदाहरणे असतील परंतु त्याचा उद्देश कर वाढवणे हा होता, जनकल्याण नव्हे. हाच कित्ता मराठा सत्ता संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी गिरविला आणि भारताला दारिद्रय रेषेखाली नेले.
आपले छत्रपती शिवराय हे उत्तम प्रशासक होते. त्यांचे जलविषयक तत्वज्ञान सांगताना आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य लिहितात, “तसेच गडावर आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी, पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे अशी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जसे तसे पाणीही पुरते, म्हणून तितकियावरीच निश्चित न मानावी. किं निमित्य की झुंजांमध्ये भांडियांचे आवाजाखाली पाणी स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरियाचे पाणी म्हणून दोन चार टाकी तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे.
गडाचे पाणी बहुत जतन राखावे.” वरील आज्ञापत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे नियम पुढे मराठा सत्तेच्या वारसदारांनी तंतोतंत व निष्ठेने पाळले. छत्रपती संभाजी महाराजांनी मिळालेल्या अल्प सत्तेत शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी केलेला प्रयत्न असो की पुण्यात व सासवडमध्ये पेशव्यांनीं बांधलेले तलाव असतील किंवा अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले तलाव विहिरी हे सगळे जनतेसाठी, त्यांच्या समृद्धीसाठी होते.
छत्रपती शिवरायांनी आपल्याला जलव्यवस्थापनाची दृष्टी दिली. त्यांनी सुलतानी काळात लुप्त झालेल्या स्वातंत्र्याच्या प्रवाहाला पुन्हा ज्या प्रमाणे जीवंत केले तसेच सुलतानी काळात पडणाऱ्या दुष्काळाने होरपळणाऱ्या सामान्य जनतेला जल व्यवस्थापनाचा आदर्शच घालून दिला.
आपणही सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करून आपल्या भारत भूमीला अधिक समृद्ध करू. पाणी रयतेचे कल्याण करते आणि रयतेच्या कल्याणासाठी सारे जीवन खर्ची करणाऱ्या राजाला आपण अभिवादन पाण्याचे संवर्धन करण्याच्या संकल्पातून करूया.
लेखक :- श्रीकांत देवेंद्र जोशी