कुडीसहित झाला गुप्त तुका (हात धरोनिया देवे नेला तुका)
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram maharaj )जीवनावर सध्या समाजामध्ये जे निरनिराळे वाद प्रचलित आहेत त्या संदर्भात पडताळणी करत असताना प्रज्ञालोक या त्रैमासिकाचा विशेषांक माझ्या हाती आला. त्यातील विचारवंतांचे अभ्यासपूर्ण लेख आणि त्यांनी मांडलेल्या विचारांचा धांडोळा घेत मी हे संकलन सादर करतो.
वैकुंठ म्हणजे काय?
जीवनात कुठल्याही कंठेला स्थान नसणारी अवस्था म्हणजे वैकुंठ. वैकुंठ ही मनाची निरामय, निर्विकल्प आणि भावातीत शांत अवस्था. घटाकाशात महदाकाश प्रस्थापित होणे म्हणजे वैकुंठगमन. तुकाराम महाराजांच्याच शब्दात सांगायचे तर..
अणुरणिया थोकडा | तुका आकाशाएवढा ||
देहात असुनही ती अनुभूती मिळण्याचा तो दिव्य क्षणच तर सदेह वैकुंठ गमन नसेल ना ?
सदेह वैकुंठगमन
तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले की नाही यावर बरेच तर्कवितर्क आणि काथ्याकुट केला जातो. पण त्याकडे आध्यात्मिकदृष्ट्या पाहिले तर तो प्रश्न सोपा होतो. ऐतिहासिक तथ्यांश पाह जाता पुढील गोष्टींकडे निर्देश केला जातो.
देहू येथील वाड्यात सखे १५७१ विरोधी नाम संवत्सर शीमगा वद्य द्वितीया ते दिवशी प्रातःकाली तुकोबांनी तीर्थास प्रयाण केले असा संदर्भ आहे. संवत्सर, शक आणि तिथी मृत्यू दिनाची आहे.
श्री तुकारामांचे पुत्र नारायण बुवा यांनी शके १६०२ म्हणजे इसवी सन १६८० साली ताराबाई पुत्र शिवाजी दुसरे यांना लिहिलेल्या पत्रात “तुकोबा गोसावी देहू येथे भागवत कथा (कीर्तन) करताना अदृश्य झाले ही गोष्ट विख्यात आहे”, असे लिहून कळविले.
शिवाजी महाराजांचे निर्वाणानंतर काही महिन्यातच आणि वैकुंठगमनानंतर ३० वर्षात.
तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळ बुवा देहकर यांनी आपल्या तुकाराम चरित्रात श्री तुकारामांचे वैकुंठगमन देहासहित गुप्त होणे हा योगशास्त्राचा पुढचा टप्पा आहे याबद्दल लिहिले आहे.
तुकारामांचे वंशज श्रीधर महाराज देहूकर यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे त्यात ते लिहितात “इंद्रायणी काठी तुकोबांचे कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना आम्ही वैकुंठाला जात आहोत तुम्ही माझ्यासोबत चला असे सांगितलं. १४ टाळकरी यांनी क्षेमालिंगन दिले. “सकळही माझी बोळवण करा । परतुनी घरा जावे तुम्ही ||” अशी सूचनाही केली आणि भागवत कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.”
या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके ३० च्या देह गावच्या सनदेत आहे असेही श्रीधर महाराजांनी लिहिले आहे. “तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोक सागरात बुडाली तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तसेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वर शास्त्रींनी निर्णय दिला तुकोबा सदेह वैकुंठास गेले.”
समन्वय महर्षी संत प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज मुमुक्षू मासिकाला लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात, “तुकाराम बुवा वैकुंठात गेले नाहीत असे प्रतिपादन करणे म्हणजे “न बुद्धीभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम” या भगवंताच्या आज्ञेस झुगारून देण्यासारखे आहे. माझा विश्वास तुकाराम महाराज देहासह वैकुंठास गेले असाच आहे व तो असाच राहावा ही मी जन्म जन्म आशा करतो,”
आम्ही वैकुंठ निवासी | आलो याची कारणासी | बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया || या अभंगात स्वतःचे अवतारत्व तुकाराम महाराजांनीच कबूल केले आहे. अवतार देह माया कार्य असतो म्हणून त्याला वैकुंठात राहण्यास हरकत नाही.” असे गुलाबराव महाराज म्हणतात. वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणतात, “प्रयाणकाळी देवे | विमान पाठविले | कलीच्या काळामधी | अद्भुत वर्तविले || मानव देह घेऊन | निजगामा गेले । निळा म्हणे सकल संता तोषविले ||.” हे वचन वारकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले यावर वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे.”
आता वैकुंठ गमन आणि विमानाचे संदर्भ असलेले तुकाराम महाराजांचेच काही अभंग पाहू. अजामिळा अंत मरणासी आला । तोवरी सारला नाही तुज । प्राणजातेवेळी म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविले|| ३०३६
शोधीताची नये म्हणोनी वोगळतो पाय | आता दिसू नये जना | ऐसे करा नारायणा || ३६०६ गरुडाचे पायी | ठेवी वेळोवेळी डोई || वेगी आणावा तो हरी । मज दीनाते उद्धरी || पाय लक्ष्मीच्या हाती | म्हणून येतो काकुळती || तुका म्हणे शेषा | जागे करा हृषिकेश || ३६११
तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत | एवढा करा उपकार। देवा सांगा नमस्कार || भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा || तुका म्हणे मजा आठवा | मूळ लवकरी पाठवा || ३६१२ आपुल्या माहेरा | जाईन मी आता। निरोप या संता | हाती आला | सुखदुःख माझे | आईकेले कानी | कळवळा मनी करुणेचा | करुनी सिद्ध मूळ साउले भातुके । येती दिसे एके न्यावयासी || त्याची पंथे
माझे लागलेसे चित्त | वाट पाहे नित्य माहेराची || तुका म्हणे आता येतील न्यावया | अंगे आपुलिया मायबाप || ३६१३ चिन्हे उमटती अंगी । शकुनाजोगी उत्तम | आठवला बापमाय | येईल काय मुळ नेणो || उत्कंठित झाले मन । हीच खूण तेथेचि । तुका म्हणे कामा वारी | आळस घरी करमेना ||३६१४ पैल आले हरी | शंख चक्र शोभे करी || गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे । मुकुट कुंडलांच्या दीप्ती । तेजे लोपला गभस्ती || मेघश्याम वर्ण हरी| मूर्ती डोळस साजिरी। चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रुळती । पितांबर झळके कैसा | उजळल्या दाही दिशा || तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ || ३६१७
शंख चक्र गदा पद्म | पैल आला पुरुषोतम । ना भी ना भी भक्तराया | वेगी पावलो सखया । दुरुनी येता दिसे दृष्टी | धाके दोष पळती सृष्टी| तुका देखोनि एकला | धोका दे कोणी एकला | वैकुंठाहूनी हरि आला || ३६१८
पैलं दिसतील भार। दिंड्या पताका अपार । आला पंढरीचा राणा। दिसतील त्याच्या खुणा । सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती | उठले गजर नामाचे | दळभार वैष्णवांचे || तुका करी रिता ठाव । त्यासी बैसावया वाव ||३६१९
चला जाऊ रे सामोरे । पुढे भेटू विठ्ठल धुरे। तुका म्हणे आनंदला मनी । कैसा जातो लोटांगणी । फेडावया वणी | प्रेम सुखाची आजी | पुढे आले कृपावंत | मायबाप साधू संत | तुका आळंगिला बाही | ठेवीला विठोबाचे पायी || ३६२०
पाहणे घरासी । आजी आली हृषीकेशी || काय करू उपचार। कोंप मोडकी जर्जर। दरदरीत पाण्या । माजी रांधियेल्या कण्या । घरी मोडकिया बाजा। वरी वाकळांच्या शेजा || मुखशुद्धी तुळशी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ || ३६२१
बोललो ते आता पाळावे वचन | ऐसे पुण्य कोन माझे गाठी || जातो जाता आज्ञा घेऊनिया स्वामी । काळाक्षेप आम्ही करू कोठे || न घडे यावरी न धरावे धीर । पीडता हे राष्ट्र देखुनी जग || हाती धरोनिया देवे नेला तुका | जिथे नाही लोका पराश्रम || ३६२५
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । | सकळा सांगावी विनंती माझी । वाड वेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलवितो । अंतकाळी विठो आम्हासी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका || ३६२७ अशा अभंगांमुळे सदेह वैकुंठगमनाची कल्पना समोर आली असावी असे काही लोकांचे म्हणणे आहे. आत्महत्या केली नाही
डॉ.शं. दा. पेंडसे यांनी ‘साक्षात्कारी संत तुकाराम’ ग्रंथात अभंगाच्या आधारे तुकाराम तीर्थयात्रेस गेले असता त्यांनी त्रिवेणी संगमी देह विसर्जन केले असावे असा तर्क केला. पण तुकाराम महाराजांनी गंगेत जीव दिला हे मानणे शक्य होत नाही कारण त्यांची पुढील वचने आत्महत्येविरोधी आहेत हे नीश्चीतपणे म्हणता येते.
तुकारामांची वचने…
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ||
तुका म्हणे दंड साहिल यमाचे। न करी जो वाचे बोले तसे || आतित्याई देता जीव | नये कीव देवासी ||
थोड्या साठी राग आला। जीव दिला गंगेत त्यासी परलोकी नाही मुक्ती । अधोगती चुकेना । तुका म्हणे कृष्ण राम । स्मरता श्रम वारीत || न लगे द्यावा जीव । सहजची जाणार आहे तो विचार जाणा काही ||
मरण जो मागे गाढवाचा बाळ | बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ।
तुका म्हणे काही होईल स्वहित । निधान जो थित टकू पाहे ||
वर्ग संघर्ष?
पुर्वीपासून वारकरी आणि सर्व सामान्यांच्या परिपाठीत ज्यांच्या अभंगांचा समावेश होत आलेला आहे त्या संत तुकारामांवर इ.स. १८६६ साली अलेक्झांडर ग्रांटने एक निबंध वाचला. तेव्हापासून सुशिक्षितांचे लक्ष व आकर्षण श्री तुकाराम महाराज ठरले.
साम्यवादी विचारांचे संशोधक त्याच्या सोयीचे प्रतिपादन करु लागलेत आणि त्यातून संभ्रम निर्माण होऊ लागला. विठ्ठल विरहित तुकाराम तेवढा घेतला आणि भागवत संप्रदायात नसलेला वर्गसंघर्ष शोधला.
तुकारामांचा खून ब्राह्मणांनी केला नाही
कुठलाही पुरावा नसताना राजकीय अनिवार्यतेतून व सामाजिक समरसता बिघडवण्यासाठीच असे मत मांडल्या जात असावे कदाचित.
याउलट तुकारामांच्या १४ टाळकऱ्यांमध्ये रामेश्वर भट यांचा समावेश होतो व त्यांनी तुकारामांची आरतीसुद्धा रचली आहे.
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरु धामा | सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा || धृ || राघवे सागरात | पाषाण तारीयेले । तैसे या तुकोबाचे | अभंग उदकी रक्षयेले ।
तुकीता तुलनेसी | ब्रह्म तुकाशी आले । म्हणोनी रामेश्वरे। चरणी मस्तक ठेविले || अशी ती आरती आहे.
पलायनवाद नव्हे भक्ति मार्ग
म.रा. जोशी आपल्या लेखात म्हणतात,
“….साम्यवादी लोकांनी असे प्रतिपादन केले की तुकाराम हे शके १५४९-५० च्या दुष्काळाने खचले व दुष्काळाने झालेली विपन्नावस्था पाहून ते भक्तीकडे वळले. अर्थात तुकारामांनी स्वीकारलेला भक्ती मार्ग हा पलायनवाद (escapism) होता. लौकिक जीवनातील संकटे त्यांना पेलवत नाहीत ते ईश्वर भक्तीकडे वळतात अशा स्वरूपाचा आक्षेप घेऊन तुकारामाची विठ्ठलापासून फारकत केली. सर्व साम्यवादी नास्तिक असतात. तुकाराम महाराज दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होते..
ठेविले अनंत तैसेची रहावे । चित्ती असू द्यावे समाधान || या उक्तीचा आधार घेत विपरीत अर्थ काढून तुकाराम दैववादी होते असे मत काही लोकं मांडतात. पण प्रयत्नांती मिळालेल्या कर्मफळाचा स्विकार आनंदी किंवा दुःखी न होता समाधानपूर्वक करावयाचा असेच इथे सुचवावयाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. विठ्ठलामध्ये कर्मयोग सांगणाऱ्या योगेश्वर श्रीकृष्णास पाहणारे संत तुकाराम दैववादी कसे असतील ?
तसे असते तर असाध्य ते साध्य । करिता सायास | कारण अभ्यास । तुका म्हणे. असे ते का म्हणाले असते?
त्यांनी विठ्ठल विरहित तुकाराम सादर करण्याचे भरपूर प्रयत्न केले. त्यांनी असाही पुकारा केला की तुकारामांची अशी कोणतीच विद्या परंपरा होऊ शकत नाही तुकारामांना शिष्यच नव्हते व नाहीत असे समजणे संपूर्णपणे चुकीचे निराधार आहे. आपल्याला रामकृष्ण मंत्र बाबार्जीनी दिला असे तुकाराम सांगतात.
बाबाजी चैतन्य तुकारामांचे गुरु होते त्यांनी तुकारामांना उपदेश दिला सद्गुरु राये कृपा मज केली
असे तुकोबा सद्गुरु बाबाजींचा स्पष्ट उल्लेख करतात. सद्गुरु गुरु परंपरा मंत्र दीक्षा शिष्य म्हणून स्वीकृती व त्याची तिथी सर्व स्वप्न झाले असे तुकाराम सांगतात. यावरून शिष्यावर अनुग्रह देण्याची पदधत व (तीही स्वप्नात) वारकरी संप्रदायात होती हे स्पष्ट होते.
रामेश्वर भट हे शिष्य होते हे सांगितलेच आहे. तुकारामांची दुसरी शिष्या बहिणाबाई आहे. बहिणाबाई म्हणते,
बहिणी म्हणे तुका सद्गुरू सहोदर भेटता अपार सुख होय….
विद्रोही नव्हते..
प्रत्येक संत बंडखोरच म्हणजे समाज सुधारकच असल्याचे आपल्याला दिसून येईल परंतु ही बंडखोर वृत्ती संस्कार युक्त व शालीन होती व राष्ट्र पुनर्निर्माणास पुरक होती. तुकारामांचा तथाकथित विद्रोह देव, धर्म, परंपरा, व्रतवैकले, वेद, मूर्तीपूजा इ. विरुद्ध नव्हता. असलास तर तो समाजात असलेल्या विकृती विरुद्ध होता.
त्या बड्या बंड वाल्यात, ज्ञानेश्वर माने पहिला
मोठ्यांच्या सिद्धांताचा घेतला पुरा पडताळा
कविवर्य ‘बी’ आपल्या ‘डंका’ कवितेत म्हणतात, प्रेमाच्या पायावरती समतेची इमारत रचली ||
कवी पुढे म्हणतात,
हिमतीने आपल्या प्रांती, उत्क्रांती शांतीमय केली
धर्मरक्षणासाठी आणि आत्मोन्नतीसाठी आणि पर्यायाने देश व संस्कृती रक्षणासाठीच तर सगळा खटाटोप चालला होता हे खालिल ओळींमधुन स्पष्ट होते.
धर्मरक्षावयासाठी | करणे आटी आम्हासी || वाचा बोलो वेदनीती | करी संती केले ते पुढे जाऊन वेदांचा अर्थ कळण्याचा अधिकार इतरांनाही आहे अस त्यांनी बजावलं.
वेदांचा तो अर्थ । आम्हासीच ठावा येरानी वाहावा भार माथा ||
सकळ शास्त्रांचे सार | हे वेदांचे गव्हर | पाहता विचार | हाची करिती पुराणे ||
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चांडाळांही अधिकार | बाळ नारी नर | आदी करुनी वेश्याही ||
या अर्थाचा भगवद्गीतेमध्येही श्लोक आहे.
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ भगवद्गीता ९.३२ ॥
व्रत वैकल्ये मानत होते
साधनशुचिता आणि एकादशी व्रताचे महात्म्य आणि आग्रह तुकाराम महाराज आपल्या खालिल अभंगातून करताना दिसतात.
जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी || त्याचे वय नित्य काळ लेखिताहे। रागे दात खाय करकर || जयाचिये द्वारी तुळशी वृंदावन । नाही ते स्मशानगृह जाणा ||
जये कुळी नाही एकही वैष्णव । त्याचा बुडे भवनदी ताफा || विठोबाचे नाम न उच्चारी जे तोंड ।
प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे || तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय कीर्तना न जाय हरीचिया ||३४ एकादशी व्रत सोमवार न करिती कोण त्यांची गत होईल नेनो काय करू बहु। वाटे तळमळ | आंधळी सकळ बहिर्मुख || ४९
काही नित्य नेमाविण अन्न खाय तो श्वान वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ || ९७ एकादशीस अन्न पान । जे नर करीती भोजन | श्वानविष्टे समान । अधम जन ते एक | ऐका व्रताचे महिमान | नेमी आचारती जन । गाती ऐकती हरी किर्तन | ते समान विष्णूशी || १७० करविता व्रत अर्ध पुण्य लाभे । मोडविता दोघे नरका जाती || शुद्ध बुद्धी होय दोन एक मान। चोरासवे कोण जिवे राखे || आपुले देऊनी आपुलाची घात । शन करावा थीत जाणुनिया || देऊनया वेच धाडी वाराणसी | नेदावे चोराशी | चंद्रबळ || तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग भक्ती हा मार्ग सोडू नये || १७१ पत्नीस उपदेश करताना खालिल अभंगात महाराज म्हणतात,
देव पहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत || दिन शुद्ध सोम सकाळी पातला | द्वादशी घडला पर्वकाळ | द्विजा पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी || ३५११
सडा संमार्जन तुळशी वृंदावन । अतिथी पूजन ब्राह्मणांचे। वैष्णवांची दासी होई सर्वभावे । मुखी नाम घ्यावे विठोबाचे || ३५१३
वरील अभंगातून हे ही सूचित होते की त्यांना ब्राह्मणांमध्ये कोण पूजनीय आणि कोण निंदनीय होते याचे तारतम्य होते. तसे नसते तर..
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरासी काय थोरपण ।
पायींची वहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणे ।
इतर तुळणें काय पुढ॥ पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोलीं ।
म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४
या शब्दात ज्ञानेश्वर माऊलींविषयी आपला भाव व्यक्त केला नसता. पुढे असेही म्हणतात
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ | अंगी ऐसे बळ रेडा बोले । करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगी || जयाने घातली मुक्तीची गवांदी | मेळविली मान्दी वैष्णवांची || तुका म्हणे तेथे सुखा काय उणे । राहे समाधानी चित्ताचिया || ३४०५
श्रद्धाळू वारकऱ्यांसाठी मात्र विठ्ठलही माऊली, ज्ञानेश्वरही माऊली आणि तुकारामही माऊलीच.
लेखक – संजय जोशी, उमरेड
संदर्भ :-
(वै. जोग महाराज सांप्रदायिक सार्थ श्री तुकाराम गाथा)
(अभंगक्रम वै. ह. भ. प. देवडीकर पारायण पद्धतीप्रमाणे)