HinduismNews

क्रूरकर्मा औरंगजेबाला पुरून उरणारे धर्मवीर संभाजीराजे

chhatrapati sambhaji maharaj jayanti 2024

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।

अर्थ : संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे (प्रभे) शोभते आणि राजमुद्रेची आश्रित असलेली लेखा कोणावरही अंमल गाजविते अशी ही शिवपुत्र शंभूची मुद्रा प्रकाशित आहे.

हिंदुस्थानाला अतिशय पराक्रमी, लढवय्या अशा चक्रवर्ती सम्राटांची, राजा-महाराजांची ऐतिहासिक देणगी लाभली आहे. देशाचे अखंडत्व आणि हिंदुत्वाचे सत्त्व कायम ठेवण्यासाठी अनेक राजांनी प्रसंगी आपले प्राणांचे बलिदानही दिले. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज अशा या सम्राटांनी देशाचे नाव उंचावणारी कामगिरी केली. अनेक राजांनी परकीय आक्रमणांपासून देशाचे रक्षण केले, माताभगिनींना आश्वस्त केले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशालाच प्रातःस्मरणीय आहेत. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत त्यांनी महाराष्ट्र धर्म जगवला, जागवला आणि वाढवला. या माळेतलाच एक लखलखीत मोती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हिंदू मनाला अभिमान वाटावा असेच त्यांचे कर्तृत्व राहिले आहे. धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक असे त्यांचे वर्णन केले जाते. हिंदु धर्माचे संरक्षण आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षण ही कर्मकठीण आव्हाने त्यांनी लीलया पेलली.

शेर शिवाचा छावा अशी ज्यांना उपमा दिली जाते त्या छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व हे त्यांच्या वर्णनाला साजेसे असेच राहिले. अवघ्या ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवण्यासाठी प्राण असेपर्यंत मुघलांना लढत दिली.ऐतिहासिक, वाङ्यीन अशा अनेक माहितीस्रोतांतून ही महती अनेकदा दिसून आली आहे. त्यांचे वर्णन मराठा लढवय्या अशाच शब्दात केलेले आढळते. या माहितीस्रोतांत यात पत्रे, सनदा, बखरी अशा अनेक स्रोतांचा समावेश होतो.

संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि परकीय शक्तींपासून हिंदू धर्माला अभय दिले. त्यांच्यापुढील आव्हाने वेगळी होती. तर संभाजी महाराजांपुढे स्वराज्य रक्षण एवढेच आव्हान नव्हते. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने आणि मुघलांना झालेल्या अटकावाने चिथावलेल्या औरंगजेबाला त्यांना तोंड द्यायचे होते.

संभाजीराजांनी औरंगजेबाच्या ५ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भुई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्‍त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.

हिंदु धर्म संरक्षण, धर्मांतरास विरोध तसेच साधूसंतांबद्दल आदरभाव व राजाश्रय

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि हिंदूधर्म संरक्षक होते. त्यांचाच धर्मरक्षणाचा वसा संभाजी महाराजांनीही तसाच पुढे चालविला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नऊ वर्षे त्यांनी स्वराज्याचे व येथील रयतेचे रक्षण केले. ज्याप्रमाणे नेताजी पालकर यांना शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात आणले. त्याचपद्धतीने औरंगजेबाच्या बळजबरीने मुस्लिम झालेल्या गंगाधर कुलकर्णी यांना संभाजी महाराजांनी स्वधर्मात परत आणले. शिवाजी महाराजांइतकाच संभाजी महाराज यांनाही स्वधर्माबद्दल ज्वलंत अभिमान होता.

धर्मांतराला ठाम नकार

आपले पिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच महापराक्रमी आणि रयतेची काळजी धर्मवीर संभाजी महाराज यांनी जीवनाच्या अखेरीपर्यंत केली. हिंदुत्वाच्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झुंज दिली. शिवाजी महाराजांनी धर्मांतराला विरोध केला होता, हिंदुंची अस्मिता जपली होती. त्याचेच प्रत्यक्ष दर्शन आपल्या मृत्यूसमयीही धर्मांतरित न होता संभाजी महाराजांनी घडवले. अभय देण्यासाठी औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा दिलेला पर्याय या स्वाभिमानी हिंदू राजाने घेतला नाही. अवघ्या ३२ वर्षी बलिदान स्वीकारून धर्मरक्षण करणाऱ्या आणि मराठ्यांच्या पराक्रमाच्या परंपरेला कायम ठेवणाऱ्या छत्रपती संभाजी राजे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत कोरले गेले आहे. अतोनात यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे, ‘संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजीमहाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेकपटींनी उज्ज्वलतम आणि बलशाली केली !’

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Back to top button