“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीनदिवसीय अखिल भारतीय प्रांतप्रचारक बैठक रविवार, दि. १४ जुलै रोजी रांची येथे संपन्न झाली. दरम्यान अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बैठकीत झालेल्या विषयांबाबत माध्यमांना संबोधित केले. समाजातील युवावर्ग विविध प्रकारचे समाजकार्य करण्यास पुढे येत असून राष्ट्राला पुढे नेण्यात, समाजात परिवर्तन घडवून आणण्यात त्यांची विशेष भूमिका दिसते आहे,” असे ते यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेदरम्यान झारखंड प्रांत संघचालक सच्चिदानंद लाल हेदेखील उपस्थित होते.
सुनील आंबेकर म्हणाले, “देशातील तरुण मोठ्या संख्येने संघात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आणि त्यात सहभागीसुद्धा होत आहेत. संघाने २०१२ साली जॉईन आरएसएस अंतर्गत ऑनलाईन माध्यम सुरू केले होते. या अंतर्गत दरवर्षी एक ते १.२५ लाख लोक ऑनलाईन माध्यमातून संघासोबत विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. यावर्षीही जून अखेरपर्यंत ६६ हजार, ५२९ लोकांनी संपर्क साधून संघात यावे,” अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदूंच्या लोकसंख्येबाबत नोंदवलेल्या निरीक्षणावर बोलताना ते म्हणाले, “लोकसंख्या असंतुलनाच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली आहे. हा गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. संपूर्ण समाजासाठी हा चिंतेचा विषय आहे. संघ स्वयंसेवक ग्राऊंड लेव्हलला याविषयावर काम करत आहेत.”
https://x.com/VSKKokan/status/1812824873972215831
चर्चासत्रांच्या माध्यमातून जनमत सुधारण्याचे काम नुकतेत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले, “संघ निवडणुकीच्या कामात थेट सहभागी होत नाही. जनमत सुधारण्याचे, जनमत जागृत करण्याचे काम संघ करतो. यावेळीही छोट्या-छोट्या चर्चासत्रांच्या माध्यमातून जनमत सुधारण्याचे काम स्वयंसेवकांनी केले होते. लोकशाहीत जनता सर्वोच्च असते. सर्व पक्ष आपापली मते घेऊन पुढे येतात आणि जनतेने त्यावर आपला निकाल दिला आहे. प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे.”
दीड लाख गावांमध्ये सकारात्मक संदेश
मार्च महिन्यापर्यंत देशातील ५८ हजार, ९८१ मंडलांपैकी ३६ हजार, ८२३ मंडलांमध्ये शाखा आहेत, त्याचप्रमाणे, शहरी भागात २३ हजार, ६४९ वस्त्यांपैकी १४ हजार, ६४५ वस्त्यांमध्ये संघाचे कार्य आहे. उर्वरित साप्ताहिक किंवा मासिक मिलन आहेत. सध्या देशात ७३ हजार, ११७ शाखा आणि २७ हजार, ७१७ साप्ताहिक मिलन चालतात. याशिवाय, जिथे शाखा कार्य किंवा संपर्क नाही, संघ अशा १ लाख, ५८ हजार, ५३२ गावांमध्ये जागरण मासिकांच्या माध्यमातून सकारात्मक संदेश, आध्यात्मिक विचार आणि संतांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा जीवनाचा संदेश देशभर पोहोचवण्याचे कार्य समाजातील विविध संस्थांसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मे-जूनच्या कालावधीत झालेल्या संघ शिक्षावर्गांबाबत त्यांनी आकडेवारी सांगितली. या कालावधीत एकूण ७२ वर्ग झाले, त्यांपैकी ६० संघ शिक्षावर्ग (सामान्य), ११ कार्यकर्ता विकासवर्ग प्रथम, एक कार्यकर्ता विकासवर्ग द्वितीय घेण्यात आले. ४० ते ६५ वयोगटातील लोकांसाठी आयोजित केलेल्या १८ वर्गांत ३ हजार, ३३५ शिक्षार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत संघटनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह सर्व सहसरकार्यवाह, प्रांत प्रचारक, सहप्रांतप्रचारक, क्षेत्रप्रचारक, सहक्षेत्रप्रचारक व अ. भा. कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते, सोबतच संघ प्रेरित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्रीदेखील उपस्थित होते.
साभार :- मुंबई तरुण भारत