HinduismNews

सामाजिक समरसतेचे अग्रणी: – भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज.. भाग २

sant namdev maharaj

भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या विषयी माहिती सांगणारी ४ भागांची विशेष मालिका

जातिभेदातीत धार्मिक समरसतेचा पुरस्कार..

भारतीय लोकजीवनातील कर्मकांडाचा निचरा करताना, खुद्द संत नामदेवांनाच, वर्णभेद आणि जातिभेद यातून उफाळणाऱ्या विषमतेचे चटके सहन करावे लागले. त्यांच्या कालखंडात, वर्गांचे आणि जाति-उपजातींचे वेगवेगळे, सवतेसुभे स्वतःच्या चौसीमा ठरवून, सामाजिक व्यवहार करीत होते. प्रत्येक जमातीने स्वतःभोवती एकेक कुंपण घातले आणि एकमेकात दुरावा निर्माण केला. या पंक्तिप्रपंचामुळे समाज विस्कळीत झाला. वर्णात आणि जातीत उच्चनीचतेची भावना रुजली. अंत्यजांना समाजात स्थान उरले नाही. वंचितांना गावसीमेवर टाकले गेले. उपक्षितांच्या जीवनाची परवड झाली. नैराश्य आणि वैफल्य यांच्या अंधारात चाचपडत ते कसेबसे जगू लागले. देवमंदिरांचे दरवाजे सर्वसामान्यांना बंद झाले. संत नामदेवांच्याच जीवनातील पुढील प्रसंग जातिभेदांच्या दाहक परिणामावर भेदक प्रकाश टाकून जातो..

हीन दीन जात मोरी पंढरीके राया। ऐसा तुमने नामा दरजी कायकू बनाया।।
टाळ बिना लेकर नामा राऊलमें आया। पूजा करते बह्मन उन्नें बाहेर ढकाया ।।
(संत नामदेव २१४२)

संत नामदेवांचे शिष्य संत चोखामेळा, हे तर अंत्यज. त्यांना आलेला अनुभव यापेक्षा विदारक होता. विठोबा घरी आल्यावर चोखोबांनी त्याला दही पाजले. ही गोष्ट षटकर्णी झाली आणि या घोर अपराधाबद्दल चोखोबांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली. संत चोखामेळ्याचे चरित्र लिहिताना, संत नामदेवांनी या घटनेचा उल्लेख पुढीलप्रमाणे केला आहे…

म्हणती या महारानें देव बाटविला। जिवें मारा याला बैला जुंपा।। (संत नामदेव २३५०)

जातिभेदाच्या या भस्मासुराविद्ध संत ज्ञानदेवांपासून संत तुकारामांपर्यंत सर्वच वारकरी संतांनी, आवाज उठविला आहे. संत नामदेवांनी मंदिरातला विठ्ठल उघड्या वाळवंटात आणून उभा केला आणि टिपेच्या आवाजात सांगितले..

1) देव दयानिधी भक्तांचा कैवारी।
नाममात्रे तारी सर्वांलागी ।।
नाहीं यातिकुळ उचनीच भेद।
भाव एक शुद्ध पाहातसे।। (संत नामदेव १०३५)

2) अंत्यज आणि जातिवंता।
मुखीं नाम घेतां उडी घाली ।। (संत नामदेव १०१६)

संत नामदेव वर्णविरहित , जातीभेद विरहित भक्तीचा उच्चार करून थांबले नाहीत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी तळमळणाऱ्या संत चोखामेळ्यांचे अश्रू गुरुकृपेचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून, त्यांनी म्हटले.

हीन माझी याती देवा।
कैसे घडेल तुझी सेवा ।।
मज दूर, दूर हो म्हणती ।
तुज भेटूं कवण्या रीती।। (संत चोखामेळा)

म्हणून करुणार्त स्वराने धावा करणारे संत चोखामेळा, संत नामदेवांचे प्रकट शिष्यत्व लाभताच..

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । का भुललासी वरलिया रंगा ।
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा । का भुललासी वरलिया रंगा ।।

असे आत्मविश्वासाने बोलू लागले.

संत चोखामेळ्यांच्या मस्तकावर गुरूकृपेचा अभिषेक करणारा संत नामदेवांचा एक हात विराजमान असताना, त्यांचा दुसरा उदार हस्त संत परिसा भागवतांसारख्या भक्ताच्या माथ्यावर होता. जातिभेदांची बंधने दृढ असताना, चौदाव्या शतकाच्या धार्मिक पार्श्वभूमीवर, वाटेवरून निघालेल्या संत नामदेवांना पाहून, त्या समचरण समदर्शी आणि सर्वसमावेशक विश्वात्मक विठ्ठलाला केवढी धन्यता वाटली असेल!

जातिजातीतील उच्चनीचपणाचे अडसर भक्तिबळाने संत नामदेवांनी दूर सारले. त्यामुळे धार्मिक लोकशाहीचा उदय वारकरी संप्रदायात झाला. संत ज्ञानदेवांनी, “म्हणौनि कुळें जाती वर्ण। हें आघवेंचि गा अकारण। एथ अर्जुना माझेपण। सार्थक एक।।”, असे भाष्य या लोकशाहीवर केलेच होते. संत नामदेवांना जातिभेदातीतता केवळ भक्तिक्षेत्रापुरती मर्यादित अशी नको होती. त्यांना ती प्रत्यक्ष सामाजिक जीवनात हवी होती. म्हणून चोखामेळियानें पाजियले दहीं”, असा समाजसुधारक विठ्ठल, त्यांनी आपल्या अभंगांत उभा केला.
जाति- समानतेची यापुढील पावलेही टाकण्याचे धैर्य, संत नामदेवांच्या ठिकाणी होते. तीर्थावळीच्या अभंगातून संत नाम देवांच्या या क्रांतदर्शित्वाचा साक्षात्कार होतो. संत ज्ञानदेव नामदेव तीर्थयात्रा उरकून, पंढरीला परत आल्यावर विठ्ठलाने संत नामदेवांना सूचना केली आहे की…

तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण।
करी का उद्यापन विधियुक्त।। (संत नामदेव २३४)

विठ्ठलाच्या आज्ञेवरून संत नामदेवांनी भोजनाची तयारी करताच, पंढरीतील ब्राह्मणादिकांना विठ्ठलाने स्वतःच भोजनाला बोलावून आणले आहे. त्या भोजनप्रसंगी..

नामयांचे उच्छिष्ट स्वीकारिलें देवें। कवतुक अवधें पाहती द्विज ।।

पंढरीपासून,पंजाब,पेशावरपर्यंत त्यांनी संचार केला, तो त्यांना मान्य असलेल्या जातिभेदातीत धार्मिक लोकशाहीच्या प्रवर्तनासाठी. संत नामदेवांच्या उत्तर भारतातील शिष्यपरंपरेत बहुजन समाजातील शिष्य आहेत. तथाकथित अस्पृश्योद्धाराचे महान कार्य करीत असतानाच, त्यांनी भारतीय समाजात एकात्मताही प्रस्थापित केली.

क्रमशः

Back to top button