
भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या विषयी माहिती सांगणारी ४ भागांची विशेष मालिका
सुलभ सोपे रे नाम केशवाचे…
सर्वसमावेश भक्ती, भक्तश्रेष्ठ नामदेवांनी आचारसंपन्न केली, त्याप्रमाणेच ती सर्वसामान्य सामाजिकाला पेलेल व पचेल एवढी सोपी केली. सगुण ईश्वराचा आदर्शच विठ्ठलरुपाने त्यांनी सर्वासमोर उभा केला. पण या सगुणतेत त्यांनी पूजाविधीचा अडसर बिलकूल आणला नाही. भजनकीर्तनाची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आगळी परंपरा प्रवर्तित करून, त्यांनी नामस्मरणाचा महिमा वाढवला. अडाणी, अशिक्षित व भोळ्याभाबड्या जनतेला चटकन वेधून घेईल, अशी ‘नामभक्ती’ त्यांनी सांगितली. पंढरीनाथाबद्दलचा एक विश्वास त्यांनी जनसामान्यात निर्माण केला.
पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार।
बाळ्या भोळ्या पार दावीतसे ।। (संत नामदेव ४९०)
असे आश्वासन त्यांनी देवाच्यावतीने सर्वांना दिले. केवळ एका नामोच्चाराने तो जोडला जातो, एवढे सुलभत्त्व त्यांनी देवभक्तीला आणले.

सुलभ सोपारे सेवा माझा स्वामी।
म्हणतां जोडे नामीं एका वाचे।। (संत नामदेव १३)
उत्कट भक्तीलाच परमेश्वर प्रसन्न होतो आणि ही भक्ती करण्यासाठी, श्रद्धेशिवाय अन्य अधिकाराची वा योग्यतेची गरज नाही हे संत नामदेवांनी आवर्जून कथन केले. ते म्हणतात
अ) न पढावे वेद नको शास्त्रबोध। नव्हे ब्रह्मज्ञान न होय वैराग्य।
नामाचे प्रबंध पाठ करा।। साधा भक्तिभाग्य संतसंगे ।। (संत नामदेव २०३५)
आ) पुराण व्युत्पत्ति न लगे त्या श्रुति। हरिनाम पंथी मुनि गेले।। (संत नामदेव १११३)
सोवळ्या ओवळ्याची, विटाळकिटाळाची आणि स्पर्शास्पर्शाची चिकित्सा भक्तीच्या क्षेत्रात करण्याची गरज नसल्याचे, त्यांनी म्हटले.
सोवळे ओवळे उंच नीच वर्ण। नाही येथे गुणदोष काही ।। (संत नामदेव १०९०)
या सोप्या सर्वसमन्वयशील आणि उत्कट भक्तीचे, संत नामदेव हे चालते बोलते आदर्श होते. “सुंभाचा करदोटा रकट्याची लंगोटी। नामा वाळुवंटी कथा करी।।” हे संत नामदेवांचे रूपडे, जनसामान्याच्या मनात केवढा आशावाद निर्माण करून गेले, त्याची खरी कल्पना आजच्या काळात येणे कठीण.
सुगम भक्तीचे स्वानुभवी भाष्य करणाऱ्या संत नामदेवांनी, आणखी एक नवा सामाजिक पैलू भक्तीला पाडला. भक्तीच्या अनुषंगाने उपेक्षितांना आणि स्त्रियांना त्यांनी व्यक्तिप्रतिष्ठा मिळवून दिली. लोकांनी परस्परांना नमस्कार करण्याची प्रथा वारकरी संप्रदायात, संत नामदेवांनी रूढ केली. हा नमस्कार करताना वर्णयातीची उच्चनीचता, स्त्रीपुरुष भेद, लहानथोर वयांतील अंतर किंवा गरीब श्रीमंतीच्या आर्थिक कल्पना यांचे वैषम्य कुणाच्याच मनाला शिवत नाही.

एवढेच नव्हे तर गुरुशिष्यातील श्रेष्ठकनिष्ठपणाही या ठिकाणी मावळतो. “परसा येतो लोटांगणी। नामा लागला त्याचे चरणी।।” या अभंगात, संत नामदेव स्वतःच आपला शिष्य परिसा भागवताच्या पाया पडताना दिसतात. गुजरातच्या, मरूभूमीत संत नामदेवांच्या भक्तिबळावर “गडगडीत कूप कल्पांतीच्या सिंधूप्रमाणे उदके ओसंडून येताच” योगी ज्ञानदेव संत नामदेवांच्या चरणी लागले. (“चरणासी लागला ज्ञानदेव ।। – संत नामदेव २३१) एकमेकांना नमस्कार करण्याच्या या परंपरेमुळे सामाजिक जीवनात समतेचा आविष्कार झाला. भारतीय संस्कृतीत व्यक्तिप्रतिष्ठेचे नवे नैतिक मूल्य, या परस्पर चरणवंदनाच्या रूपाने, संत नामदेवांनी निर्माण केले.
या मूल्याचे सार्वजनिक महत्त्व स्पष्ट व्हावे म्हणून, संत चोखामेळ्यांसारखे आपल्या शिष्याचे चरित्र त्यांनी लिहिले. संत चोखोबांच्या निर्वाणानंतर मंगळवेढ्याहून संत चोखोबांच्या अस्थी आणून, विठ्ठलाच्या महाद्वारात त्यांनी त्यावर समाधी बांधली. ही एका गुरूने बांधलेली शिष्यसमाधी ! स्वतः संत नामदेवांनी आपले समाधिस्थळ म्हणून पंढरीच्या पांडुरंग मंदिराची पहिली पायरी निवडली. त्याचे कारण काय तर..
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे। संतपाय हिरे वर देती।। (संत नामदेव १७३२)
भक्तिविनम्रतेच्या पायावर त्यांनी व्यक्तिप्रतिष्ठा उभी केली. त्यांच्या या अनन्यसाधारण कार्याची सतत आठवण राखली पाहिजे. मानव हे इथून तिथून एक आणि समान असतात, हा व्यक्तिस्वातंत्र्यवादी कुळाचार, मध्ययुगीन भारताच्या समाज मनात, संत नामदेवांनी प्रक्षेपित केला आणि विठ्ठल संप्रदायाला सर्वांगीण धार्मिक लोकशाहीचे प्राणभूत अधिष्ठान दिले.
क्रमशः