योद्धा संन्यासी.. “विष्णुबुवा ब्रह्मचारी”.. भाग १
Vishnubuva Brahmachari

९ ऑगस्ट (श्रावण शु. ५) विष्णु बुवांचे द्विशताब्दी जयंती वर्ष प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने विष्णुबुवांची महती सांगणारी ५ भागांची विशेष मालिका..
आधुनिक भारताच्या उभारणीत अनेक ज्ञात अज्ञात महापुरुषांचा सहभाग आहे. यातीलच एक नररत्न म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या निर्भीड, संन्यासी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य अढळ अशा ध्रुव ताऱ्यासारखे सर्वांना मार्गदर्शक आहे.
जातीभेद निर्मूलन, बाल विवाह, विधवा विवाह, शिक्षण, कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी हिंदू समाजाचे आग्रहपूर्वक, पोटतिडकीने प्रबोधन केले. त्यासाठी निंदानालस्ती, उपेक्षा सहन केली. जातिभेदांमुळे आपला समाज विस्कळीत झाल्याने आपण पारतंत्र्यात गेलो असा वस्तुनिष्ठ विचार मांडला. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालविलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा आपल्या लेखणी आणि वाणीने कठोर प्रतिकार केला. भारताचे उत्थान वेदोक्त धर्माच्या – वेद आणि उपनिषदांनी सांगितलेल्या चिरंतन जीवनमूल्यांच्या आचरणातून होईल असा त्यांचा विश्वास होता.

जडण घडण
विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव – श्री. विष्णू भिकाजी गोखले असे होते. त्यांचा जन्म अधिक श्रावण शुद्ध ५ , शके १७४७ (२० जुलै १८२५) या दिवशी रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील शिरवली या गावातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव उमाबाई आणि वडिलांचे नाव भिकाजी असे होते. विष्णुबुवा ११ अपत्यांपैकी १० वे अपत्य होते. वयाच्या ५ वर्षी त्यांचे वडील वारले. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांना फार शिक्षण घेता आले नाही. परंतु आईकडून त्यांना धार्मिक आणि नीतिमूल्यांचे संस्कार लाभले. वयाच्या ९ व्या वर्षी विष्णुबुवा तहसीलदार कचेरीत नोकरीला लागले.
वर्षभराने आईने त्यांना आपल्या मदतीला परत बोलावून घेतले. १ – २ वर्षे आईला घरकामात मदत करणे, गुरे सांभाळणे, गवत कापणे अशा रीतीने गेली. वयाच्या १२ व्या वर्षी महाडला गांधी नावाच्या व्यापाऱ्याकडे किराणा मालाच्या दुकानात नोकरी सुरु झाली. तेथे ते २ वर्षे राहिले. १४ व्या वर्षी संगमेश्वरला ३ महिने कस्टम्स खात्यात आणि पुढे ७ वर्षे साष्टी, ठाणे, कल्याण, वसई आणि उरण येथे कस्टम्स खात्यात कायमची नोकरी झाली. फावल्या वेळात विष्णुबुवा संन्यासी, कीर्तनकार यांच्या सहवासात आणि भजन, कीर्तन, प्रवचन या गोष्टींमध्ये दंग असत.
उरणमध्ये वास्तव्य असताना त्यांना परमेश्वरी दृष्टांत झाला आणि त्याला अनुसरून त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन अध्यात्माचा मार्ग पत्करला. गुरूच्या शोधासाठी त्यांची भ्रमंती सुरु झाली परंतु त्यांना गुरु काही लाभला नाही. म्हणून नाशिकला सप्तशृंगी डोंगरावर जाऊन तपश्चर्या करण्याचे ठरवले. तेथे ७ वर्षे कठोर तपश्चर्या करून त्यांना दैवी साक्षात्कार झाला. दत्तगुरूंचे भक्त असलेल्याविष्णुबुवांनी शिरवली येथे दत्ताच्या पादुका देखील स्थापन केल्या.श्रीदत्तगुरूंनी त्यांना वेदोक्त धर्माची स्थापना, वेदोक्त धर्माचे मंडन करणे आणि परमतांचे (विधर्मी मतांचे) खंडन करण्याचे जीवन जीवन ध्येय दिले.

डॉ. फ्रॅंक कॉनलॉन (वॉशिंग्टन विद्यापीठ) हे आपल्या The Religious Controversy In British India या पुस्तकातील विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यावरील लेखात लिहितात – नोकरीच्या निमित्ताने विष्णुबुवा उरण, ठाणे या ठिकाणी राहिल्याने त्यांचा मुंबईशी संबंध आला असणार. तेथे त्यांना ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कुटील कारवाया, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या हिंदूंच्या धर्मांतराची – ख्रिस्तीकरणाची नक्कीच माहिती मिळाली असेल. विष्णुबुवांचा चौकस स्वभाव लक्षात घेता त्यांनी या सर्व गोष्टींची दखल घेऊन, त्यावर चिंतन केले असावे.
सप्तशृंगीवरील वास्तव्यानंतर हा तेजस्वी ब्रह्मचारी काही काळ नाशिकच्या पंचवटी येथे राहिला. त्यानंतर पंढरपूर तीर्थक्षेत्री जाऊन विठ्ठल – रखुमाईचे दर्शन घ्यावे आणि तेथे येणाऱ्या असंख्य यात्रेकरूंना वेदोक्त धर्माचा परिचय करून द्यावा असा उद्देश मनी बाळगून त्यांनी पंढरपूरकडे प्रयाण केले. तेथे त्यांनी विठ्ठल – रखुमाई मंदिराच्या सभामंडपात एकनाथ स्वामींच्या ओवीबद्ध ‘भावार्थ रामायणाची’ तीन वेळा पारायणे केली. पाहता पाहता तीन वर्षे निघून गेली.
पंढरपूरला येणारे यात्रेकरू विष्णुबुवांच्या व्याख्यानांच्या प्रभावी प्रस्तुतीकरणाने भारावून जात. सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या वेदोक्त धर्माचा विचार श्रोत्यांना प्रभावित करू लागला. पंढरपूर क्षेत्रातील वास्तव्यातच १८५६ मध्ये विष्णुबुवांनी ‘भावार्थ सिंधु’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील ओवीतून त्यांचा ध्येयवाद आणि पुढील मार्ग स्पष्ट होतो.
सकलव्दिपेंसकलखंडे II मुक्तेंफिरावीउदंडे II
मोडूनिमतवादांचीबंडे II उपदेशज्ञानाचाकरावा II (भावार्थ सिंधू , ५/९३)
भारतवर्षातच नव्हे तर या पृथ्वीतलावर वेदोक्त धर्मविरोधी मते माजली आहेत, त्यांचा वादविवादाने बिमोड करावा आणि वेद उपनिषदांमधील ज्ञानाचा सर्वाना लाभ करून द्यावा असा त्यांच्या मनीचा भाव दिसतो.
पंढरपुरात त्यांचा ब्रिटिश सरकारच्या शिक्षण विभागातील तपासनीस (इन्स्पेक्टर) श्री. महादेवशास्त्री कोल्हटकर यांच्याशी परिचय झाला. विष्णुबुवांचे अलौकिक वक्तृत्व, विवरण आणि प्रवचन ऐकून महादेवशास्त्री आणि इतर अनेक जाणती मंडळी बुवांकडे आकर्षित झाली. त्यांच्या विनंतीनुसार बुवांनी महाराष्ट्रात सर्वत्र फिरून वेदोक्तधर्माच्या प्रचारासाठी व्याख्याने देण्याच्या दृष्टीने प्रवास आखला. या दौऱ्यात सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर अशा विविध शहरांमध्ये बुवांनी व्याख्याने दिली.

मनुष्यजातीअसेएक II हेंचज्ञानसम्यक II
ऐसाजाणोनिविवेक II मुक्तेंउपदेशकरावा II (भावार्थ सिंधू , ५/९२)
त्यांच्या सभांना अलोट गर्दी जमत होती. महाराष्ट्रात त्यांचे नाव कर्णोपकर्णी वाऱ्यासारखे पसरू लागले. विष्णुबुवा समाजधुरिणांना मुलामुलींच्या शाळा काढण्याचे, ग्रंथालये आणि आत्मविचार करण्याच्या संस्था स्थापन करण्याचे आवाहन करीत असत. बुवांच्या स्वतंत्र आणि नवीन विचारांची श्रोत्यांवर मोठी छाप पडत असे.
क्रमशः
लेखक : – सुरेश गोखले
अधिक माहितीसाठी :-