ChristianityNews

योद्धा संन्यासी.. “विष्णुबुवा ब्रह्मचारी”.. भाग ४

Vishnubuva Brahmachari

९ ऑगस्ट (श्रावण शु. ५) विष्णु बुवांचे द्विशताब्दी जयंती वर्ष प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने विष्णुबुवांची महती सांगणारी ५ भागांची विशेष मालिका..

वेदोक्त हिंदू धर्माचे महत्व

वेदांनी सांगितलेला धर्म आबालवृद्धांना कळावा व शाळांतून मुलांना शिकवावा या हेतूने विष्णुबुवांनी ‘वेदोक्त धर्मप्रकाश, हा ग्रंथ सन १८५९ मध्ये मराठीत लिहिला. हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. वैदिक धर्माच्या सर्व अंगोपांगांची मांडणी या ग्रंथात केलेली आहे. या ग्रंथात तत्वज्ञान, आचार, नीतिनियम, वर्ण – जाति, संस्कार, कर्म, उपासना इत्यादी अनेक धार्मिक आणि सामाजिक विषयांची चर्चा विष्णुबुवांनी केलेली आहे. त्यांच्या प्रगल्भ विचारांची, आक्रमक आणि कुशाग्र वृत्तीची चमक या ग्रंथातून दिसून येते.

वेदोक्त धर्माचे ज्ञान झाल्यामुळे लोकांची विचारशक्ती वाढेल, त्यांना शांती लाभेल, त्यांच्यात पापभीती राहील व ते ज्ञानयुक्त परमेश्वराचे भक्त होतील, असा विष्णुबुवांचा दृढ विश्वास होता. या ग्रंथात एकूण २५ प्रकरणे आहेत. पंचविसाव्या प्रकरणात विष्णुबुवांनी ‘हकिकत’ या नावाने आपले आत्मचरित्र थोडक्यात लिहिले आहे.

विष्णुबुवांचा स्त्रिया आणि बहुजनासंबंधी दृष्टीकोन अत्यंत विधायक होता.सर्वाना शिक्षण मिळाले पाहिजे, मनाप्रमाणे व्यवसाय करता आले पाहिजेत असे त्यांनी आग्रहाने सांगितले. ते अस्पृश्यतेच्या आणि जातीभेदांच्या संपूर्ण विरोधात होते.त्यांनी बालविवाहाला कडाडून विरोध केला. विधवा पुनर्विवाह, मुलींना मनाप्रमाणे पती निवडण्याची मुभा, घटस्फोटाचा हक्क यासंबंधी आपली स्पष्ट मते मांडून समाजप्रबोधन केले.

‘वेदोक्त धर्मप्रकाश’ या ग्रंथातील ‘अनेकमतांच्या लोकांस सुबोध’ या प्रकरणात विष्णुबुवा म्हणतात, “ हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्व लोक वेदोक्त / वेदप्रतिपाद्य हिंदू धर्माचे पालन करीत होते. वेद हेच आपले मुख्य धर्मपुस्तक आहे. वेदांमध्ये ब्रह्मदेव, शंकर, विष्णु, देवी, गणपती, दत्तात्रेय, सूर्य, परमेश्वराच्या दशावतारांची, सर्व ऋषींची आणि ब्रह्मनिष्ठांची स्तुती केलेली आहे. वेगवेगळ्या अवतारांना मानणाऱ्या लोकांनी अन्य अवतारांची निंदा करू नये, ईश्वराने हे सर्व अवतार उपदेशार्थ आणि भक्तसंरक्षणार्थ धरलेले आहेत, त्यांचे ध्यान प्रेमयुक्त बुद्धीने करा, म्हणजे त्यांच्या प्रसादाने तुमची बुद्धी शुद्ध होईल, तुम्हाला परमेश्वराच्या निराकार स्वरूपाचे निश्चयात्मक दृढ ज्ञान होईल. “

“ आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका या चार खंडात ‘मनुष्याच्या बुद्धीला जे इष्ट वाटेल /आवडेल तेच खरे मानणारे लोक, यहुदी – इस्राएल, ख्रिस्ती आणि महंमदी (मुसलमान) या चार मतांचे लोक आहेत. त्यांचे पूर्वज वेदोक्त धर्मातील चार वर्णांचे होते. गुणांची व कर्मांची परीक्षा करून चार वर्णांत त्यांना मिसळावयाचे ही चाल कोणी शास्ता नसल्यामुळे लोकांनी सोडली. मत मतांतरे उत्पन्न झाली.चारही खंडांतील लोक वेद, शास्त्रे, पुराणे या मूळ वेदोक्त धर्माच्या चक्षूंना पारखे झाले. “ पारशी समाजाला उद्देशून ते म्हणतात की “ तुमचा धर्म वेदोक्तधर्मातूनच निर्माण झाला आहे. “ यासाठी त्यांनी अनेक सप्रमाण उदाहरणे दिली आहेत.

वेदोक्त हिंदू धर्म हाच मूळ धर्म आहे, या धर्मापासून दूर गेलेल्या मंडळींना त्यांच्या कल्याणासाठी परत हिंदू धर्मात आणले पाहिजे आणि त्यासाठी पण सर्व प्रयत्न केले पाहिजेत असे आग्रहाने सांगितले आहे.

पृथ्वीवरीलमनुष्यमात्र II म्लेच्छादिकसकलजात II

उपदेशासअधिकारीनिश्चित II हीचमाझीआज्ञाअसे II (भावार्थ सिंधू , ५/९१)

भारत भ्रमण –

विष्णुबुवांचे वेदोक्त धर्माच्या रक्षणाचे आणि प्रसाराचे कार्य महाराष्ट्रापुरतेच सीमित नव्हते. त्यांनी मद्रास (चेन्नई), कलकत्ता (कोलकाता) आणि वाराणसी या शहरांमध्ये तसेच गुजरातमध्ये प्रवास केला, सभा घेतल्या. तेथील प्रतिष्ठित, विद्वान मंडळींशी चर्चा केली.

सन १८६१ मध्ये विष्णुबुवा मुंबईहून समुद्रमार्गे मद्रासला गेले. तेथे त्यांच्या परिचयाचे कोणीही नव्हते. ओळख पटेस्तोवर त्यांना लष्करी पहाऱ्यात राहावे लागले. एका सेनाधिकाऱ्याच्या कानी या साधूच्या आगमनाची वार्ता गेल्यानंतर चौकशीअंती त्यांची सुटका करण्यात आली. मद्रास शहरातील नाना पंथांच्या आणि मतांच्या मंडळींना ते भेटले, तेथील अनेक विद्वान आणि भाविक मंडळींशी त्यांचा घनिष्ठ परिचय झाला, पुढे त्यांचा पत्रव्यवहारही होत राहिला.

मद्रासमध्ये या काळात रॉबर्ट काल्डवेल हा ब्रिटिश प्रॉटेस्टंट ख्रिस्ती मिशनरी कार्यरत होता. यानेच आर्य आणि द्रविड या वादाचे बीजारोपण केले. विष्णुबुवांची आणि काल्डवेलची किंवा अन्य मिशनऱ्यांची गाठभेट झाली का नाही याची माहिती मिळालेली नाही.

मद्रासहून आगबोटीने बुवांनी कलकत्त्याकडे प्रयाण केले. तेथे काही दिवस श्री. माधवराव अनंत दलाल यांच्या घरी मुक्कामास राहिले. नंतर भाड्याची जागा घेऊन ते स्वतंत्रपणे राहू लागले. बुवा दोन वर्षे कलकत्त्यात राहिले. हिंदी भाषेतून त्यांनी व्याख्याने दिली. कलकत्त्यात त्या काळी प्रसिद्ध असलेल्या ब्राह्मो समाजाच्या मंडळींशी त्यांच्या चर्चा झाल्या. विष्णुबुवांचा स्वभाव लक्षात घेता विष्णुबुवांची कोलकत्यातील ख्रिस्ती मिशनऱ्यांशी नक्कीच संपर्क आला असेल. याकाळात अलेक्झांडर डफ हा स्कॉटिश ख्रिस्ती मिशनरी कार्यरत होता. विष्णुबुवांची आणि अलेक्झांडर डफ आणि अन्य मिशनऱ्यांची गाठभेट झाली का नाही याबद्दलही माहिती मिळालेली नाही.

जलमार्गाने कलकत्ता सोडल्यानंतर ते श्रीक्षेत्र काशीला (वाराणसी) पोहोचले. वाराणसी येथील आबाशास्त्री पटवर्धन यांनी विष्णुबुवांना तेथील वास्तव्यात सहकार्य केले. काशी क्षेत्रातील अनेक संन्यासी मंडळी आणि पंडितांबरोबर त्यांच्या चर्चा आणि सभा झाल्या.

येथे फार मजेशीर गोष्ट घडली. विष्णुबुवा तेथे दशाश्वमेध घाटावर रोज जात असत. एकदा काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेर त्यांनी गर्दी जमलेली पाहिली. चौकशी केली असता एक ख्रिस्ती मिशनरी हिंदूंना एकत्र जमवून गप्पा गोष्टी करत असतो आणि त्या माध्यमातून ओळख वाढवून त्यांचे ख्रिस्तीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो, असे त्यांना कळले. विष्णुबुवा त्या ठिकाणी गेले आणि त्या ख्रिस्ती मिशनऱ्याशी बोलू लागले. थोड्या वेळाने त्याने विष्णुबुवांना ‘तुम्ही कोण?’ असे विचारले. परिचय मिळाल्यावर त्याने ‘ते तुम्ही मुंबईचे विष्णुबुवा ब्रह्मचारी काय?’ असे विचारले. ‘होय.’ म्हटल्यावर तो त्वरित पळून गेला आणि विष्णुबुवा तेथे असेपर्यंत परत फिरकला नाही.

काशी क्षेत्रातील वास्तव्यातच त्यांनी संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. परमहंस दीक्षा घेतली. तेथून ते पुन्हा कलकत्त्याला गेले. सन १८६३ मध्ये ते मुंबईला परतले.

सन १८६७ मध्ये लिहिलेल्या ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ (Essay On Beneficent Government) या पुस्तकात विष्णुबुवांनी आदर्श राज्य आणि राज्यव्यवस्थेची चर्चा आणि विवेचन केले आहे. इंग्रज शासन काळात भारतात मोठया प्रमाणात यांत्रिकीकरण झाले. कारखानदारी निर्माण होऊन कामगार वर्ग उदयास आला. विष्णुबुवांनी कामगारांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण आणि त्यांच्या संबंधीचे विचार या ग्रंथात मांडले आहेत.

अक्कलकोटचे राजे श्री. मालोजी भोसले यांच्या आमंत्रणावरून विष्णुबुवा अक्कलकोटला गेले आणि तेथे त्यांची ८ दिवस राजवाड्यात वेदोक्त हिंदू धर्मावर व्याखाने झाली. त्यांना स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद लाभला .

काळबादेवी येथील विठ्ठल मंदिरात विष्णुबुवा नियमितपणे भग्वद्गीतेवर निरूपण करीत असत .अनेक दिवस हा उपक्रम चालला. परंतु १८ व्या अध्यायाच्या १७ व्या श्लोकावर भाष्य केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि वेगाने खालावली. महाशिवरात्री, माघ कृ. १४ , शके १७९१ (१८ फेब्रुवारी १८७१) या दिवशी त्यांचा अंत झाला.

या निरूपणाची टिपणे विष्णुबुवांचे सहकारी श्री. नेरुरकर करीत असत. त्याचे संकलन आणि प्रकाशन ‘सेतुबंधनी टीका’ (१८९०) या ग्रंथरूपाने श्री. रामचंद्र पांडुरंग राऊत यांनी केले. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा सेतू (पूल) असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. ‘सेतुबंधनी टीका’ या ग्रंथांमध्ये विष्णुबुवांनी शास्त्रीय परिभाषेचा – भौतिक, रसायन आणि जीवशास्त्राचा अवलंब करून विवेचन केलेले आहे. उरलेल्या ६१ श्लोकांवरील निरूपण वेदशास्त्रसंपन्न श्री. अप्पाशास्त्री बडवे यांनी केले.

विष्णुबुवांनी आपल्या जीवनप्रवासात सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करताना ब्राह्मण समाजातील विशिष्ट गटाचा रोष ओढवून घेतला होता. त्यामुळे अंत्यविधीमध्ये ते विघ्ने उभी करतील अशी शंका त्यांना आली असावी. त्यांनी आपल्या अंत्यविधीसंबंधी पुढील सूचना केली होती. “मृत्यू पावलो म्हणजे माझे प्रेत उचलण्यास ब्राह्मणांनी हरकत केल्यास आरक्षकांना कळवून ते कचरा पेटीत टाकावे. प्रेत उचलण्यास हरकत न झाल्यास ताबडतोब सोनापुरात नेऊन दहन करून श्री वाळुकेश्वर क्षेत्री रामकुंडानजीक रक्षा वगैरे समुद्रात फेकून द्यावी.” परंतु संस्कारपूर्वक दहन होऊन रक्षा वाळकेश्वर रामकुंडात टाकली गेली.आपल्या मृत्यूनंतर आपल्या निर्माल्य देहाविषयी असली कलंदर वृत्ती व्यक्त करणारे महात्मे जगाच्या इतिहास फार विरळ आढळतील.

क्रमशः

लेखक : – सुरेश गोखले

अधिक माहितीसाठी :

https://www.vishnubuvabrahmachari.com/

Back to top button