महापराक्रमी भारतीय नौसेना… भाग १
नौदलदिनानिमित्त भारतीय नौसेनेची यशोगाथा सांगणारी ३ भागांची विशेष मालिका..
बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।
सानेगुरुजी यांच्या या काव्यपंक्ती प्रमाणे ओतप्रोत देशभक्तीचे दर्शन नौदलामध्ये आपणास घडते. यातील बलसागर या शब्दात सागर म्हणजे समुद्र व देशाच्या संरक्षणात समुद्र किनारपट्टीचे अनन्य साधारण महत्त्व दडलेले आहे.
१९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धात नौदलाने चढविलेल्या घातक क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे यश मिळाले. या युद्धात भारतीय नौदलाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात मिळवलेले यश आणि पूर्व पाकिस्तान नौदलाचे उच्चाटन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारताने पाकिस्तान विरुद्धची मोहिम आखली होती. त्याला “ऑपरेशन ट्रायडंट” असे नाव देण्यात आले होते. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. नौदलाच्या शौर्याला वंदन करण्यासाठी नौदल दिवस साजरा केला जातो.. या राष्ट्रीय नौसेना दिनानिमित्त नौसेनेचा अतुलनीय पराक्रम आपण जाणून घेऊया…
आधुनिक काळात, भारतीय नौदलाने ४ डिसेंबर, १९७१ या दिवशी भीमपराक्रम गाजविला. मुंबई आणि कराची यांच्या दरम्यान अरबी समुद्रात झालेल्या ‘ऑपरेशन ट्रायडंट’ नामक नाविक युद्धात भारताने पाकिस्तानची चार लढाऊ जहाजं बुडवली, त्यात ‘पीएनएस खैबर’ ही विनाशिकाही होती. कोणत्याही प्रगत देशासाठीही, एकाच लढाईत एकदम चार लढाऊ जहाजं गमाविणं, त्यातलं एक तर विनाशिका असणं, हे धक्कादायक असतं. भारतीय नौदलाने ते घडवून पाकिस्तानला तर हादरवून सोडलंच; पण पाकचे कैवारी असलेल्या अमेरिका आणि ब्रिटनलाही एक धक्का दिला.
भारतीय नौदल हे आता पश्चिम देश समजत होते, त्याप्रमाणे, ‘अंग्रेज तो चले गये, पर औलाद छोड गये,’ अशा स्वरूपाचं राहिलेलं नसून, त्याच्या धमन्यांमध्ये आता छत्रपती शिवराय, सरखेल कान्होजी आंग्रे आणि सरखेल आनंदराव धुळप यांचा पराक्रम सळसळू लागला आहे. याचा प्रत्यय भारताच्या शत्रूना तर आलाच; पण स्वतः भारतीयांनाही आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, नौदलाने भरसमुद्रात शत्रूच्या मोठ्या आरमाराशी लढलेली ही पहिली लढाई, पहिली कुस्ती.ती भारतीय नौसैनिकांनी चितपट मारली. नुसते कराचीच जाळले नाही तर भारताला पर्यायाने हिंदूंना नामोहरम,नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र आखणाऱ्या धर्मांध जिहादी पाकिस्तानला देखील जबरदस्त दणका दिला.. ४ डिसेंबर, १९७१ या दिवसाचं हे महत्त्व आहे.
कारस्थानी,पाताळयंत्री ब्रिटिश ..
इंग्रजी राज्यात सुरुवातीला २१ ऑक्टोबर हा ‘नौदल दिन’ म्हणून साजरा होत असे. कारण, २१ ऑक्टोबर, १८०५ या दिवशी प्रख्यात इंग्रजी नाविक सेनापती ॲडमिरल होरेशियो नेल्सन याच्या नेतृत्वाखाली इंग्रजी आरमाराने ट्रॅफल्गार इथल्या लढाईत फ्रेंच आरमाराचा साफ पराभव केला होता.इंग्रज साहेब पक्का धूर्त कोल्हा. आधुनिक आरमारी विद्या भारतीयांपासून त्याने कटाक्षाने दूर ठेवली. अगदी नाइलाज म्हणून अल्प प्रमाणात त्याने भारतीय लोकांना नौसेनेत घेतलं. पण, ते खलाशी म्हणून, अधिकारी म्हणून नव्हे.
पण, पहिल्या महायुद्धानंतर हळूहळू ‘रॉयल इंडियन नेव्ही’मध्ये भारतीयांची संख्या वाढू लागली. १९४७ साली इंग्रज साहेबाला भारत सोडून जावंच लागलं. १९५० साली भारत प्रजासत्ताक होऊन, ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची “INDIAN NAVY” झाली. पण, आमचा नौसेनाप्रमुख इंग्रजच. शेवटी १९५८ साली पहिला भारतीय अधिकारी नौसेनाप्रमुख बनला. त्याचं नाव ॲडमिरल रामदास कटारी. स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे, ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. पण, हे युद्ध मुख्यतः काश्मीरच्या भूमीवरच लढलं गेलं. त्यात नौसेनेच्या सहभागाचा प्रश्न आलाच नाही.
.. आणि पोर्तुगीजांना जोरदार रट्टा हाणला..
डिसेंबर १९६१ मध्ये भारतीय भूदलाने गोवा पोर्तुगीज अमलाखालून मुक्त करण्यासाठी गोव्यावर स्वारी केली. पोर्तुगाल ही एकेकाळची नाविक महासत्ता होती. आतासुद्धा पोर्तुगीज ‘अल्फान्सो डी अल्बुकर्क’ नावाच्या ‘स्लूप’ जातीच्या युद्धनौकेच्या भरवशावर गोव्याचा बचाव करण्याची स्वप्नं पाहत होते. पण, आता हे सोळावं शतक नव्हतं. भारतीय नौदलाच्या ‘बियास’ आणि ‘बेटवा’ या दोन ‘फ्रिगेट’ जातीच्या युद्धनौकांनी ‘अल्फान्सो डी अल्बुकर्क’ला पिटाळून लावलं… रणांगणातून पळ काढणारं ते लढाऊ जहाज बांबोळीच्या किनाऱ्याजवळ वाळूत घुसलं आणि १८० अंशांच्या कोनात कलंडून आकाशाकडे पाहत राहिलं. चीत झालेल्या पहिलवानाने अस्मान बघत पडावं तसं. स्वतंत्र भारतीय नौदलाने पाहिलेली ही पहिली ‘ऍक्शन.’ मात्र, ती खूपच छोटी होती.
हिंदी-चिनी भाई-भाई आणि धोका..
जिहादी पाकिस्तानच्या कागाळ्या..
सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. ७ आणि ८ सप्टेंबर, १९६५ ला काही भुरटी पाकिस्तानी जहाजं भारतीय तीर्थक्षेत्र द्वारकेवर बॉम्बफेक करून पळून गेली. यावेळी भारताचे नौसेनाप्रमुख होते ॲडमिरल भास्करराव सोमण. मूळचा बेळगावचा मराठी सेनानी. आता पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाऊन धडक मारायला ॲडमिरल सोमण आणि त्यांचे नाविक जवान आसुसलेले होते. पण, पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या युद्धात प्रत्याक्रमण फक्त भूदल आणि वायुदलच करेल; नौदलाने पश्चिम आणि पूर्व समुद्रीय प्रदेशात कडक बंदोबस्ताने राहून संरक्षण फक्त करावं, आक्रमण करू नये. नौसैनिकांचा नाइलाज झाला. आणखी सहा वर्षे उलटली.
क्रमशः