हिंदु ऐक्य घोष हा निनादु द्या दिगंतरी.. जाग जाग बांधवा, प्राण संकटी तरी..
आमार शोनार बांग्ला, मां,
तोर बोदोनखानी मोलीन होले
आमि नोयोन जॉले भाशी।
बांगलादेशचे हे राष्ट्रगीत. याचा अर्थ आमचा सोन्यासारखा बांगलादेश. माझी आई (बांगलादेश) तुझा चेहरा उदास झाला, तर आमचेही नेत्र अश्रृंनी भरून येतात. पण, आज या शोनार बांगलाची परिस्थिती फार बिकट आहे..
बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार अद्याप थांबलेला नाही. बांगलादेशातील हिंदू त्यांच्याच मायभूमीत परका आणि पोरका झाला. का? तर केवळ ते मुस्लीम नाहीत म्हणून ! मात्र, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ म्हणत कुणीही सेक्युलर, पुरोगामी पुढे आला नाही, की कुणीही निर्धाराने मेणबत्त्या पेटवल्या नाहीत. दुःख झाले ते केवळ हिंदू म्हणून अस्मिता बाळगणाऱ्या हिंदूंनाच !
‘ऑल आईज ऑन पॅलेस्टाईन‘ म्हणत काही लोक कण्हत, कुंथत होते. पण, त्यांचे डोळे बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत फुटले आहेत. त्यांचे मौन बरेच काही सांगून जाते.
‘बांगलादेश मुक्ती संग्राम’मध्ये तिथल्या मुस्लिमांसोबतच हिंदूंचे अतुलनीय योगदान होते. त्याच बांगलादेशमध्ये शेख हसीना सत्तेत असताना नोबेल पुरस्कारप्राप्त आणि आज तेथील हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पुढे ऑगस्ट महिन्यात आरक्षणविरोधात विद्यार्थी आंदोलन तीव्र झाले. शेख हसीना यांना सत्तेतून अत्यंत दुःखदरित्या पायउतार व्हावे लागले. तेव्हा हसीना यांच्या विरोधकांनी मोहम्मद युनूस यांना पायघड्या घातल्या.
‘बांगलादेश मुक्ती संग्राम’च्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या कुटुंबीयांना आरक्षण नको म्हणत सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हा खरा तर हिंदूविरोधी आंदोलनासाठीचा मुखवटा होता. या मुखवट्यांच्या आंदोलनाचा मुख्य हेतू हिंदूंचा विनाश, वंशविच्छेद आणि हसीना सरकार यांना उलथवणे, हाच होता..
जगणे हा जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही माणसाचा मूलभूत अधिकार. मात्र, बांगलादेशमधला हिंदू या अधिकाराला पारखा झाला आहे. हिंदू स्त्रियांवर अगदी बालिका ते वृद्ध यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत. हिंदूंची संपत्ती लुटली जात आहे. घरदार पेटवून हिंदूंच्या जागांवर तिथले कट्टरपंथी जिहादी त्यांचा हक्क सांगत आहेत. काही हिंदूंना जीवदान दिले आहे. पण, कसे? तर त्यांच्याकडून जीवंत राहण्यासाठी चक्क खंडणी घेतली जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंचे जगणे असे नरक झाले आहे.
बांगलादेश सरकार आणि प्रशासनामधील हिंदूंची हकालपट्टी केली आहे. हिंदू प्राध्यापक आणि शिक्षकांना सक्तीने घरी बसवले आहे. हिंदूंची दुकाने, कंपन्या आणि कारखाने यांच्यावर सक्तीने हक्क सांगितला गेला आहे. हिंदूंची मंदिरे तोडली गेली, फोडली गेली. मूर्त्यांची विटंबना करणे हे तर त्या कट्टरपंथीयाच्या ‘डीएनए’ मध्येच असल्याने तिथे देवळे, चर्च आणि बौद्धविहार मठही तोडले गेले. लुटले गेले. पुजाऱ्यांना, भंतेजींवरही अत्याचार केले गेले. ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना तर अटकच करण्यात आली. त्यांची चौकशी करण्यास गेलेल्या आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी या साधूंनाही अटक करण्यात आली. इतका अत्याचार झाल्यानंतर हिंदूंना समर्थन करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराने आवाज उठवू नये, म्हणून हिंदू पत्रकारांनाही तुरुंगात डांबण्यात आले, तर पीडित हिंदूंना न्याय मिळवून देऊ शकतील, अशा हिंदू वकिलांची यादी करून त्यांनाही तुरुंगात डांबण्यात आले. हिंदू साहित्यिक, हिंदू कलाकार यांनाही शोधून शोधून मारण्यात आले.
‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणत हे लोक भारतात आंदोलन करत होते. ‘ऑल आईज ऑन पॅलेस्टाईन’ म्हणत हेच लोक भारतात इस्रायलविरोधात मोर्चे काढत होते. मग बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक हिंदू ,त्यातही बौद्ध आणि जनजातीय समाजाचे दुःख यांना दिसत नाही का?
बांगलादेशमधील हिंसा अचानक सुरू झाली का? तर नाही. २००४ साली एकरामुल हक बुलबुल आणि मसूद मिलाद यांनी 2004 साली विश्वविद्यालयामध्ये ‘जमातीकरण’ यावर एक अहवाल प्रकाशित केला होता. त्याचकाळात ढाका विश्वविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रा. मेशबाह कमाल यांनी मत मांडले होते की, “विश्वविद्यालयामध्ये कट्टरपंथी विद्यार्थ्यांचा शिरकाव वाढत आहे. ते मदरशांमधून शिकून येतात. त्यांच्यामुळे ढाका विश्वविद्यालय म्हणजे कट्टरपंथीयांचा अड्डा होत आहे, असे दिसते.” तेव्हा बांगलादेशमधल्या कुणीही त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही.
मदरशांमधून इस्लामिक धार्मिक शिक्षण घेतलेले तरुण बांगलादेशमधल्या महाविद्यालयात नेतृत्व करू लागले. अशीच एक संघटना ‘हिज्ब-उत-तहरीर.‘ बांगलादेशमध्ये जे हिंसक आंदोलन झाले, त्यात या संघटनेचे सदस्य असलेले विद्यार्थी सामील होते.
आंदोलनामध्ये कलमा ध्वज..
दुसरीकडे ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा वारसा चालवणारी ‘अंसार-अल-इस्लाम’ ही दहशतवादी संघटना सक्रिय झाली. मग एका बांगलादेशी विचारवंत अब्दुल्लाहिल अमन आजमीने म्हटले की, “भारताच्या रविंद्रनाथ टागोरांचे राष्ट्रगीत हे बांगलादेशचे राष्ट्रगीत होऊच शकत नाही,” तर ‘जमात-ए-इस्लामी बांगलादेश’ या पक्षाने म्हटले की, भारताच्या संविधानाचा प्रभाव असलेले बांगलादेशचे संविधान बदलून टाका. ‘नुरुल हक नूरोफ़ गोनो ओधिकार परिषद सार’च्या कट्टरपंथी इस्लामी समूहाने बांगलादेशचे संविधान हटवा, यासाठी समर्थन दिले. त्यानंतर इथल्या आंदोलनामध्ये कलमा ध्वज दिसू लागला. हा कालिमा ध्वज म्हणजे इस्लामवर श्रद्धा आणि इस्लामसाठी बलिदान याचे प्रतीक.
बांगलादेशमधील तरुणाई प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांवर सक्रिय आहे. या समाजमाध्यमांवर युट्यूब आणि अन्य समाजमाध्यमांचा वापर करून कट्टरपंथीयांनी देशातील ९२ टक्के मुस्लिमांना कट्टरेतेचे धडे द्यायला सुरुवात केली. त्याशिवाय, त्याचवेळी बांगलादेशमध्ये सोशल मीडिया स्टार आणि लोकप्रिय असलेल्या व्यक्तींनी समाजमाध्यमांवर इस्लाम, संस्कृती सध्याची बांगलादेशाची परिस्थिती यांवर युवकांची मते बनवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला होता. एकंदर भारत आणि हिंदूविरोधात बांगलादेशामध्ये जनमत तयार करण्याचे काम अनेक दशके सुरू होते. हे सगळे लिहितानाही ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवण येतेच येते. नशीब, भारताचे केंद्र सरकार सक्षम आहे आणि ‘ब्रेकिंग इंडिया’ला पुरून उरले आहे.
चीनचे लांगुनचालन..
दुसरीकडे चीनची सध्याच्या बांगलादेशबद्दल काय भूमिका आहे, हे पाहणेदेखील तितकेच गरजेचे आहे. भारत आणि बांगलादेशाचे आधीचे सौख्य चीनला खूपतच होते. भारताला त्रास देता यावा म्हणून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला चीन हरप्रकारे मदत करत असतोच. बहुसंख्य मुस्लीम असलेल्या बांगलादेशला ‘इस्लामिक बांगलादेश’ बनवून भारताची पूर्व सीमा अशांत करावी, असा चीनचा मनोदय नक्कीच आहे. त्यामुळेच यापूर्वी भारत आणि बांगलादेशमध्ये जो काही विवाद असेल, तो विवाद चिघळवण्याचे काम चीन नित्यनेमाने करत आला आहे.
शेख हसीनांच्या सत्ताकाळात बांगलादेश आणि भारताचे संबंध चांगले होते. त्यामुळे चीनचा मदतीचा हात बांगलादेशाने स्वीकारला नव्हता. मात्र, शेख हसीना यांची सत्ता गेली आणि बांगलादेशामध्ये कट्टरतावादी मुस्लिमांचे राज्य आल्यासारखे वातावरण तयार झाले. अशा काळात ‘जमात- ए-इस्लामी’, ‘इस्लामी छात्र शिबीर’, ‘हिफाजत-ए-इस्लाम‘ आणि ‘खिलाफत मजलिस’ या संघटनांचे २० पेक्षा जास्त प्रतिनिधी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने यांना आमंत्रित केले. चीनमध्ये मुस्लिमांना कशी वागणूक मिळते, हे जगजाहीर. बांगलादेशमध्ये जसे हिंदूंचे शिरकाण होत आहे, तसे चीनमध्ये उइघूर मुस्लिमांचे शिरकाण होते. मात्र, आता चीनला बांगलादेशातील मुस्लिमांचा पुळका आला आहे.
बांगलादेशमध्ये अत्याचाराविरोधात हिंदू संघटित होत आहे. ‘आमार शोनार बांगला’ म्हणत स्वधर्म, स्वदेशासाठी लढत आहेत. बांगलादेशातील हिंदूंसाठी भारतीय हिंदूंचा जीव हा तळमळणाराच! बांगलादेश मुक्ती संग्रामच्या वेळी भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता बांगलादेश हिंदू संवर्धनासाठी भारत नक्कीच भूमिका बजावेल, यात शंका नाही.
‘हिन्दवः सोदराः सर्वे, न हिन्दूः पतितो भवेत्।’