हिंदूधर्म रक्षक संत गाडगे महाराज..भाग १
संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका..
शीर्षक वाचून आपल्यालाच नक्कीच आश्चर्य वाटले असणार “हिंदूधर्म रक्षक संत गाडगे महाराज” कसे काय ? याचाच उहापोह आपण जाणून घेणार आहोत..
“जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेचि जाणावा ॥”
या संत शिरोमणी तुकारामांच्या अभंगाच्या ओळी वाचल्या की एकच नाव समोर येतं ते म्हणजे “संत गाडगेबाबा…”
विविधतेने नटलेला हा आपला भारत देश, या राष्ट्रावर अनेक संकटे आली, अनेक आक्रमणे झाली. धर्म, संस्कृती नाहीशी करण्याचे अनेक प्रयत्न झाले. अशाही परिस्थितीत या देशाची आदर्श असणारी संस्कृती दिवसेंदिवस वृधिंगतच होते आहे.याचे मुख्य कारण म्हणजे विविध संप्रदायातील संतांचे अतुलनीय योगदान होय.
संत गाडगेबाबा म्हणजे विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे! वैराग्याचा एक मूर्तीमंत आविष्कार या संताच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला अनुभवयास मिळाला. ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ असे भजन-कीर्तन करत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगेबाबा महाराष्ट्रातील लोकशिक्षणाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. विज्ञानावर आधारित समाजप्रबोधन करणारे ते एक लोकोत्तर महापुरुष होते.
आध्यात्मिक विचारांमुळे भिन्न भिन्न संस्कृती, विचार, आचार असूनही सकल भारतात आपल्याला एकात्म भावना पाहायला मिळते. समाजाला एकात्म भावनेने जोडणारे,स्वच्छतेचा पुरस्कार करून समाजाला परमार्थाचा मार्ग दाखवणारे संत म्हणजे श्री गाडगे महाराज..
संत गाडगे महाराज स्वच्छतेचे अग्रदूत होते.पंढरपूरची वारी हे त्यांचं व्रत होतं. मंदिरातील देवापेक्षा जनता-जनार्दनाच्या पूजेतच ते अधिक रममाण होत असत. त्यांनी अंधश्रद्धा, अज्ञान, कुप्रथा याविरुद्ध आपल्या किर्तनातून जनजागरण केले. गरीब वारकरी व रुग्णांकरिता त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. महत्वाचे म्हणजे आपल्या माघारी त्यांनी कुटुंबातल्या कोणाही माणसाला या धर्मशाळांच्या ट्रस्टवर विश्वस्त नेमले नाही.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव या नावाच्या आटपाट नगरात, २३ फेब्रुवारी १८७६ ला, परीटाचा व्यवसाय करणाऱ्या झिंगराजी आणि सखुबाई यांच्यापोटी एक जगावेगळा बालक जन्मला. त्याचे नाव डेबूजी ठेवले गेले. त्या भागात त्या काळात परीटांच्याच काय, तर अनेक मागासवर्गीयातही बारशापासून तेराव्यापर्यंत, प्रत्येक कार्यक्रमाची सांगता दारू आणि बकऱ्याच्या नैवेद्याने होत असे.
तान्ह्या मुलापासून अतिवृद्धाच्या आजारपणावर, देवऋषीचे अंगारे धुपारे ताईत आणि शेवटी पशुबली, हेच रामबाण उपाय असत. हे उपाय करूनही ते मूल तडफडून मेले, तरी आपले काही चुकते आहे, किंवा वैद्यकीय उपचार केले असते तर ते मूल वाचले असते, असे कोणाच्या मनातही येत नसे. अर्थात या सर्व गोष्टींसाठी कर्ज काढणे हे नित्याचेच होते. कर्ज घेणाऱ्याची निरक्षरता आणि सावकाराविषयीचा अंधविश्वास, यामुळे कर्जाचे व्याजच काय, तर मुद्दल फिटूनही जमिनी वा गहाणवट वस्तू सावकारांच्याच ताब्यात रहात! अशा परिस्थितीत कर्ज देणारे सावकार यांचे ‘चांगभलं’ झाले नाही तरच नवल. याच प्रथेपायी झिंगराजी या तिन्ही गोष्टीत, नको तितका रूतत गेला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या सर्व प्रसंगांनी डेबूच्या मनात कर्ज, दारू, सावकारी आणि पशुबली या तिन्हीविषयी कमालीचा तिटकारा निर्माण झाला.
पती निधनानंतर सखुबाई मुलाबाळांना घेऊन आपल्या भावाकडे दापुऱ्याला आली. अशिक्षित डेबू वयाच्या बाराव्या वर्षापासून मामाबरोबर शेतावर जाऊ लागला. लवकरच शेती, पोहणे, गुरे राखणे याबरोबर सांप्रदायिक भजनातही तो तरबेज झाला. जबरदस्त मेहनतीने तब्येतही सणसणीत झाली. सोळाव्या वर्षी त्याचे लग्नही झाले. पत्नीचे नाव होते कुंताबाई. पुढे शिक्षण नसल्याने निरनिराळया लोकांकडून पदोपदी होणारी फसवणूक आणि सावकारी कर्जापायी झालेला मामाचा मृत्यु, डेबुच्या फारच जिव्हारी लागला.
सर्व देणे देऊनही सावकार जमीन परत देईना, हे पहाताच डेबूने मनगटाच्या ताकदीवर आपली जमीन सोडावली. काही काळाने डेबूला एक मुलगी झाली. परंतु तिच्या बारशाचे वेळी डेबूने संबंधितांना दारू-कोंबडयाऐवजी लाडवाचे जेवण देऊन प्रस्थापितांविरूद्ध बंडाचे पहिले निशाण उभारले आणि जातभाईंचा रोष ओढवून घेतला!
जीवनात घडलेल्या अशा अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांनी डेबूच्या मनात वैराग्याचा उदय होऊ लागला. त्यातच एक दिवस शेतात काम करत असताना डेबूला एक अनामिक साधू भेटला. दोघांचे छान जमले. हा सत्संग धड दोन दिवसांचाही नव्हता पण ‘निमिषार्ध होता सत्संग, तेणे होय भवभंग’ या नाथोक्तीप्रमाणे डेबूला पूर्ण विरक्त बनविण्यास पुरेसा होता. त्या विरक्तीत डेबूने नेसत्या वस्त्रानिशी आपले घरदार सोडले, ते कायमचेच !!!
डोक्यावर भिक्षेसाठीचा गाडग्याचा तुकडा (खापर), अंगावर चिंध्यांपासून स्वतः शिवलेले कपडे, पायात असली तर तुटकी वा विजोड चप्पल, खिसा सदैव रिकामा, कुठे जायचे, रहायचे, खायचे अशा गोष्टीची फिकीर न करता हा फकीर गावोगावी फिरू लागला. पडेल ते काम आणि त्या बदल्यात मिळेल ते अन्न स्वीकारत आणि झाडाच्या सावलीपासून स्मशानापर्यंत कुठेही आसरा घेत असत.
हळूहळू त्यांनी समाजपरिवर्तन करण्यास सुरुवात केली. कणभर अन्नाच्या बदल्यात ते मणभर लाकडे फोडत . याशिवाय देणाऱ्याचे घर आणि अंगण आरशासारखे लख्ख झाडून देऊन, संडासापासून स्वैपाकघरापर्यंतच्या सर्वांगीण स्वच्छतेचे महत्त्व त्याला पटवून देत असत. आजारी मुलामाणसांना भोंदूंऐवजी डॉक्टरकडे नेण्यास उद्युक्त करीत. मध्येच हातात दगडाचे टाळ घेऊन ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ ही धून सुरू करून गावच्या जत्रेत कीर्तन करीत . कधी करूणारस, मध्येच हास्यरस, तर प्रसंगी रौद्ररसाचा वापर करून गाडगे बुवा जनमानसाचा ताबा घेत.
क्रमशः