NewsRSSSpecial Day

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, मी संघाकडे आपलेपणाने पाहतो

Dr Babasaheb Ambedkar and RSS...

१९४० मध्ये दिली संघाच्या कराड शाखेला भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा शताब्दी वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पुढील वर्षी विजयादशमीला संघस्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. संघाच्या आजवरच्या वाटचालीत संघाने अनेक आव्हानांना तोंड दिले. त्याच्यावर आरोपही अनेक झाले, पण त्याने ते सारे आरोप खोडून काढले आणि समाजासाठी असलेली संघटनेची उपयुक्तताही सिद्ध केली. विविध कारणांनी संघावर तीन वेळा बंदी आली. त्यातून संघ सहीसलामत बाहेर पडला. संघात अस्पृशांना स्थान नाही, संघ केवळ ब्राह्मणांचा असे लागलेले आरोपही आज गळून पडलेले आहेत.

१९३४ मध्ये वर्धा येथील शिबिरात महात्मा गांधींनी भेट दिली, त्यावेळी त्यांना संघात विविध जाती-धर्माचे स्वयंसेवक असल्याचा बोध झाला होता. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला की शिबिरातील कोणत्याच स्वयंसेवकाला ना आपल्या जातीबद्दल ना दुसऱ्या स्वयंसेवकांची जात जाणून घेण्याबद्दल औत्सुक्य होते. सगळ्यांच्या मनात आपण हिंदू आहोत हीच एकमेव भावना होती. म्हणूनच त्यांच्यात एकत्र राहणे, एकत्र उठणे, बसणे, जेवणे आदी दैनंदिन व्यवहार सहजतेने होत होते. गांधीजींना हे बघून अतिशय आश्चर्य वाटले होते. त्यांची दुसऱ्या दिवशी सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्यक्रम आपण यशस्वीपणे चालविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी डॉ. हेडगेवार म्हणाले, ‘संघात अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम राबविला जात नाही. आम्ही केवळ भावनात्मम भूमिकेतून सर्वांना आम्ही हिंदू आहोत म्हणून सांगतो. एकात्मतेच्या भावनेमुळे संघात जात-पात अथवा असभ्य़तेची जाणीव होत नाही. त्यांना आपण हिंदू आहोत हीच एकमेव बाब ध्यानात राहते.’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भगव्या ध्वजाप्रमाणे तिरंग्याला मान दिला नाही, अथवा संघात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला राष्ट्रध्वज फडकवला जात नाही, असेही आरोप केले गेले. पण त्याही आरोपातून संघाची मुक्ती झालेली आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेला नाही, हे देखील नाकारले गेले. पण ज्यावेळी दस्तुरखुद्द संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जंगल सत्याग्रहाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदविल्याची सचित्र बातमी दाखविली गेली, तेव्हा लोकांचा आणि विरोधकांचा त्यावर विश्वास बसला. त्याचप्रमाणे संघावर दलितविरोधी असल्याचेही आरोप झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघाबद्दलही विविध प्रकारचे भ्रमही पसरविले गेले. पण आता डॉ. आंबेडकर आणि संघाबद्दलचा एक दस्तावेज हाती आला असून, यातून उभयतांमधील संबंधांवर अधिक प्रकाश पडला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती याचा एक सबळ पुरावा नुकताच हाती आला आहे. त्यानुसार २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कराड (जिल्हा सातारा) येथे गेले होते. तेव्हा त्यांनी संघाच्या शाखेस भेट दिली व तेथे उपस्थित संघ स्वयंसेवकांसमोर भाषण सुद्धा केले. या भाषणात ते म्हणाले, “कांही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातो,” या भेटी बाबतची बातमी पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या केसरी वृत्तपत्रात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.

दैनिक केसरीमधील बातमी शब्दशः अशी… ” ता. २ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कऱ्हाड येथे गेले असतांना तेथील म्युनिसिपालिटीत मानपत्र देण्याचा समारंभ झाला. यानंतर त्यांनी तेथील रा. स्व. संघाच्या शाखेस भेट दिली. याप्रसंगी भाषण करतांना डॉ. आंबेडकर म्हणाले, कांही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातों,”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्तीनिर्माणासोबतच जातीभेद, विषमता विरहित हिंदू संघटन करण्याचे कार्य गेली ९९ वर्षे करीत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे जातीच्या भिंती तोडून समाज जोडण्याचे काम संघ स्थापनेपासून करीत आला आहे. डॉ आंबेडकरांनी संघाबद्दल जो आपलेपणा व्यक्त केला आहे तो याच प्रामाणिक कामाची पावती आहे.

संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पुण्यात १९७४ मध्ये वसंत व्याख्यानमालेत “सामाजिक समता व हिंदू संघटन” या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी अतिशय सुधारणावादी भूमिका मांडली होती. “….आता बेटी व्यवहार (आंतरजातीय विवाह) सर्रास व्हावा. अस्पृश्यता ही चूक आहे. It must go lock, stock and barrel! ती सर्वतोपरी गेली पाहिजे. ती संपूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. If untouchability is not wrong. nothing in the world is wrong!” अस्पृश्यता वाईट नसेल तर मग जगात काहीच वाईट नाही! आज जी जातिव्यवस्था आहे, ती अव्यवस्था आहे. ती विकृती आहे…. जी जाऊ घातली आहे. ती आता नीट कशी जाईल याचाच सर्वांनी विचार केला पाहिजे. जे अस्पृश्यता-जातिभेद पाळतात, त्यांच्याकडे गेले पाहिजे. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे. जे असले भेद मानतात त्यांच्यावर तुटून पडण्यापेक्षा, संघर्ष निर्माण करण्यापेक्षा, त्यांना भेटायचे, त्यांच्याकडे जाऊन समजावून सांगायचे हे केले पाहिजे. असे करणे हाही कामाचा एक प्रकार होऊ शकतो. कारण हे सर्व बंधू आपलेच आहेत आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झाले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे.” असे मत बाळासाहेब देवरसांनी स्पष्टपणे मांडले.

यानुसारच संघ काम करीत आहे. मात्र रा. स्व. संघाबद्दल विरोधकांनी अतिशय गैरसमज समाजात पसरवले आहेत. असे पुरावे समोर आल्याने संघाची प्रामाणिक भूमिका समोर येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाजसुधारणेचे काम संघ १९२५ पासूनच करत आला आहे. संघाची कार्यपद्धती मात्र भिन्न राहिली आहे. संघटना म्हटली की काही मर्यादा, कमतरता, अडचणी या असणारच. अनेक जाती-जमाती, समाज घटकांचा विशाल हिंदू समाज संघटीत करताना, विविध स्तरातील हिंदूंना एकत्रित करून कार्य पुढे नेताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. कधी मोठे यश येते. तर कधी त्रुटी राहतात आणि त्यातूनही समज, गैरसमज, मतभेद, वाद निर्माण होतात. पण यावर हळूहळू मात करून, आपल्यातील त्रुटी दूर करत संघ प्रामाणिकपणे बंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे.

डॉ. अम्बेडकर और सामाजिक क्रान्ति की यात्रा या’ दत्तोपंत ठेंगडी लिखित ग्रंथातही संघ आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यातील ‘डॉ. अम्बेडकर और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या आठव्या प्रकरणाच्या प्रारंभी दत्तोपंत म्हणतात, ‘डॉ. अम्बेडकर को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पूरी जानकारी थी । संघ स्वयंसेवकों का उनसे नित्य सम्पर्क था । वे स्वयंसेवकों से चर्चा किया करते थे । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिन्दुओं का संगठन करनेवाला एक अखिल भारतीय संगठन है, इसकी भी उनको जानकारी थी । वे यह भी जानते थे कि अन्य हिन्दुत्वनिष्ठ दल अथवा हिन्दुओं का संगठन करनेवाली संस्थाओं और संघ में अन्तर है । संघ की शक्ति बढने की गति को लेकर उनके मन में शंका थी । इस दृष्टि से डॉ. अम्बेडकर और संघ के विषय में विश्र्लेषण करना आवश्यक है।

याच प्रकरणात दत्तोपंत पुढे म्हणतात, उन्होंने (डॉ. हेडगेवार) जाति भेद रहित, वर्ण भेद रहित सामाजिक समतायुक्त समाज का एक छोटा माडल निर्माण करके सबको दिखाया था। वे प्रतिज्ञापूर्वक कहते थे कि मानसशास्त्र के आधार पर, तब तक किसी के द्वारा न अपनाये हुए तन्त्र से सामाजिक समता निश्चितरूप से निर्माण की जा सकती है व उस समरसता के फलस्वरूप सामाजिक समता निश्चितरुप से निर्माण की जा सकती है। डा. हेडगेवार की तरह बाबासाहब की भी धारणा थी कि सामाजिक समरसता निर्माण हुए बिना, समाजिक समता स्थापित नही हो सकेगी। या उदाहरणांद्वारे संघ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील दुवे अधिक प्रकाशमान व्हावेत.

डॉ. आंबेडकरांनी कराड संघ शाखेतील भाषणातून आपल्याला समरसतेचा, बंधुतेचा संदेश दिला. त्याचेच स्मरण करून सामाजिक ऐक्यासाठी त्याच संघ शाखेत (भवानी मैदान, सोमवार पेठ) लोक कल्याण मंडळ ट्रस्ट, कराडतर्फे गुरुवार, २ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आपुलकी मेळावा आणि ‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. समरस भारताच्या निर्मितीसाठी आपण या उपक्रमाचे स्वागत करूया…

लेखक :- चारुदत्त कहू

Back to top button