EducationLiteratureNewsSpecial Day

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन…

Marathi Bhasha Gaurav Din..2025

‘जया नाही शास्त्रप्रतीती
जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती
तयालागि मर्‍हाटीया युक्ती
केली ग्रंथरचना’

कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक युगात देखील कालातीत आहे..

जगभरातील सुमारे १५ कोटी जनमानसाला एकत्र बांधून ठवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करताना कुसुमाग्रज म्हणतात “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे,” अश्या प्रतिभावान कवींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “कुसुमाग्रज” अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

मागच्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी आणि दिवाळीच्या अगदी तोंडावर आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा ‘अभिजात’ झाली आणि आपण सगळे आनंदी झालो. खरं तर दसरा-दिवाळीच साजरी झाली आपल्या ‘अस्मितेची’.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, बालकवी, गदिमा, भा रा तांबे, कुसुमाग्रज, इंदिरा संत, बहिणाबाई, गदिमा, पुलं, ना. धो. महानोर, इरावती कर्वे, बा.भ. बोरकर, आचार्य अत्रे, शांताबाई शेळके, विंदा, पाडगावकर, शिवाजी सावंत, जीए कुलकर्णी, ग्रेस, आरती प्रभू अश्यांसारख्या जुन्या, नव्या असंख्य लेखक, कवींनी त्यांच्या योगदानाने मराठीची श्रीमंती मणामणांनी वाढवत नेली आहे.

भक्ती गीतं, भाव गीतं, लावण्या, भारुड, गोंधळ, आरत्या, चित्रपट, नाटके, मालिका, श्रुतिका, प्रहसने, किर्तने, निरूपणे, कथा कथन… अश्या असंख्य कलाप्रकारांनी मराठी भाषेला अधिकच खुलवलं आहे.. फुलवलं आहे.

मराठी भाषा ज्ञानभाषा बनणे आवश्यक आहे. ती नुसती गप्पांची भाषा नाही, नुसती घरामध्ये बोलण्याची नाही; तर नव्या ज्ञानाची निर्मितीसुद्धा ज्या भाषेत होते अशी ज्ञानभाषा बनणे आज आवश्यक आहे. आज नवीन शिक्षण धोरणानुसार मराठीतून देखील वेगवेगळ्या विद्या शाखांचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. किमान प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी ) मातृभाषेतूच व्हावयास हवे साहजिकच महाराष्ट्रात मराठीतुनच व्हायला हवे, या बाल वयातच जिज्ञासा, शंका समाधान आपण मातृभाषेतून करू शकतो. मुलांमध्ये, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता, चांगल्या संस्कारांचे रोपण करायला मातृभाषाच कामी येते. मातृभाषा ही संस्काराचा आणि संस्कृतीचा आदर्श मानबिंदू आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची संभाषणासाठी वापरली, राज्यकारभारातील अरबी व फारसी भाषेचे स्तोम महाराजांनी मोडून काढले. राज्यकारभारातील १३८० अरबी व फारशी शब्द बदलून त्या जागी देवनागरी भाषेतील शब्द आणले. राज्यव्यवहारकोश तयार केला. याच भाषेतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे व्यक्त झाले, याच मराठी भाषेत अभिव्यक्त होणारी मोठी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. त्यामुळे ही भाषा सामर्थ्यशाली आहे, हे सांगण्यासाठी कुणाचे प्रमाणपत्र कशाला हवे?

आज जरी आपण मराठी भाषा देवनागरीत लिहीत असलो तरी गेल्या शतकापर्यंत आपण मोडी लिपीतच आपण मराठी लिहीत होतो त्यामुळे आज मोडी लिपीतील लक्षावधी दस्तऐवजाचा ज्ञानसागर तरुणाईला आव्हान स्वरूपात खुणावतो आहे.

इतकेच नव्हेतर महाराष्ट्रातील कुठलाही स्वतंत्रता सेनानी डोळ्यासमोर आणा उदाहरणच द्यायचे झाले तर, बाबासाहेब आंबेडकर, महादेव रानडे , लोकमान्य टिळक,स्वातंत्रवीर सावरकर यांचे शिक्षण मराठीतूनच झाले आहे.. सावरकरांनी तर भाषा शुद्धी चळवळ देखील राबवली..मराठी भाषेमध्ये प्रभावी लेखन आपल्या पूर्वसूरींनी अजरामर करून साहित्यात पूर्वापार त्यात पिढीगणिक लेखकांनी भर घालून वाचकांसाठी अनमोल ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे..

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान बाळगताना मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारीही आपणा सर्वांची आहे, याचा विसर पडता कामा नये. आज इंग्रजीच्या प्रभावाखाली मायमराठीची अवस्था काय झाली आहे, हे आपण पहात आहोत.अभिजात भाषेच्या दर्जामुळे केंद्रसरकार भरगोस अर्थसहाय्य प्रदान करणार आहे, भारतभरातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध होणार आहे त्याचवेळी बंद पडत चाललेल्या मराठी माध्यमाच्या शाळा अश्या बातम्या वाचनात येतात हे चित्र विदारक आहे, त्यावर मात करणे हे आपल्या समोरील सगळ्यात मोठे आव्हान आहे.

https://www.loksatta.com/mumbai/mumbai-records-drop-in-number-of-marathi-schools-despite-govt-promoting-language-kvg-85-4909540

आजपर्यंतची आपली आपली शिक्षण पद्धती कारस्थानी ब्रिटिश व्यवस्थेवर म्हणजेच गुलामगिरीवर आधारित राहिली आहे.जुलमी ब्रिटिशांना भारतावरील आपले निरंकुश शासन अबाधित ठेवण्यासाठी गुलाम आवश्यकच होते. कपटी ब्रिटिश राजसत्तेला अनुकूल ठरणारी रंगाने काळी परंतु विचारांनी इंग्रजाळलेली कारकून व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने मेकॉले शिक्षणपद्धती अमलात आणली. भारत राष्ट्राला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली आज देखील आपण मानसिक दृष्ट्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलो आहोत का? याचा सखोल विचार प्रत्येकाने करायला हवा.

एक भाषा म्हणून इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकून ‘इंग्रजाळलेलं’ होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भाषा शिकायची आहे, त्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे, यासाठी इंग्रजीचा अभ्यास करण्यात गैर काही नाही; पण सर्व वृत्ती, भावना आणि मनामधील विविध मोजमापं हे सगळं इंग्रजाळलेलंच होणं हे मात्र चुकीचं आहे. मराठी शब्द उपलब्ध असूनही कारण नसताना फुकटचं इंग्रजी झाडणं, याचा सन्मान वाटणं ही खरी सांस्कृतिक समस्या आहे. आज एखादा आकडा, उदाहरणार्थ एकोणसत्तर असं कुणी उच्चारलं तर घरातील मूल विचारतं की एकोणसत्तर म्हणजे किती? मग त्याला सिक्स्टी नाईन म्हटल्यावर कळतं. आपला भाषिक आणि सांस्कृतिक प्रवास इथपर्यंत येऊन ठेपलाय.

इंग्रजी भाषा अवगत असण्याचे फायदे कोणीही नाकारू शकत नाहीत. इंग्रजी भाषेमुळे संधी विस्तारतात ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे. असे असताना देखील जागतिक पातळीवर इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांचे प्रमाण हे साधारणतः २०-२५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. फ्रान्स, जर्मनी, रशिया या विकसित देशांनी त्यांची भाषा टिकवून प्रगती केली आहे. आधुनिक चीनचे उदाहरण तर आपण पाहतच आहोत. भारतात आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकारी यांची जर यादी पाहिली तर त्यातील ९५ टक्के अधिकार्‍यांचे शिक्षण मातृभाषेतून झालेले आहे. मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचीच आहे. भारताचे नवे शैक्षणिक धोरण हे इंग्रजी भाषेच्या विरोधात नाही, तर भारतीय भाषा जागतिक पातळीवर आणखी बळकट करण्याचा मानस त्यात आहे.

खरं तर दीर्घकाळ भाषा जिवंत राहते, याचा अर्थ ती भाषा प्रवाही, परिवर्तनशील आणि भाषिक देवाणघेवाणीतून समृद्ध झालेली असते, असं मानायला हवं आणि ते मानून आपण अधिक योग्य दृष्टीने भाषेचा विचार करून पुढे जायला हवं.

सोशल मीडियावर फेरफटका मारताना I DON’T NEED “AI” MY “आई (AAI)” KNOWS EVERYTHING… अश्या आशयाची पोस्ट वाचनात आली.. आधुनिकता आणि चिरंजीवी संस्कृतीची मार्मिक सांगड घालूनच आपल्याला विश्वगुरू पदापर्यंत मार्गक्रमण करायचे आहे.

म्हणतात ना.. “माता, मातृभूमी आणि मातृभाषेचा आदर व सन्मान आपण केला तरच जग करेल.”..

भविष्यात मराठी भाषेला असे अनेकविध बहुमान मिळतील. त्यासाठी आपल्या भाषेचा अभिमान बाळगून आपल्याला सतत सतर्क राहून भाषेचा उपयोग करावा लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया दीर्घकालीन तरी अतिशय संथपणे चालणारी आहे. त्यात ‘पी हळद आणि हो गोरी’ असा उतावळेपणा करून चालणार नाही. भाषेचं हे संथ तरी प्रवाही असणं, हेच खरं तिचं सौंदर्य आहे आणि तिचं हे प्रवाहीपण वाढवायची जबाबदारी आपली आहे. त्या जबाबदारीकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. त्यासाठीचे काही प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर, काही प्रयत्न सामाजिक पातळीवर, काही प्रयत्न शासकीय पातळीवर केले, तर ‘अभिजाततेच्या वलयामागची जबाबदारी’ ही रुक्ष न वाटता तो ‘जनांचा प्रवाह होईल’ आणि आपल्याला भाषिकदृष्ट्या अधिक समृद्ध होता येईल; पण या सगळ्यासाठी आपल्याला गरज आहे ती आत्माभिमानाची आणि सकारात्मक प्रयत्नांची.

“वाणी ही भारतात तिसरी, जगात तेरावी असे अढळ तिचे स्थान,

डर नसे तिज, देऊनी झुंज अमृतातही पैजा जिंकेन हा सार्थ अभिमान ,

करुनी वंदन, करुनी प्रणाम जगभर पोहचवुया तिचा सन्मान,

जतन करूया आपल्या ज्ञानभाषेचे, उंचावू मराठीचे अभिजात स्थान !!”

Back to top button