प्राचीन काळापासून वाटसरूंना आधार/आश्रय देण्याचे काम करीत आलेल्या मंदीरांचा देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार राहिलेला आहे, हे लक्षात आलं की मंदिरांकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून जाते…
एप्रिल-मे २०२० च्या रणरणत्या उन्हात, लॉकडाउनमुळे लाखो मजूर आपापल्या घरांच्या दिशेने पायपीट करीत असताना, अचानक (पूर्वी अनेकदा झालीये त्याच पद्धतीने) मंदिरांच्या निधीचा वापर करण्यासाठीची सेक्युलर कावकाव सुरू झाली. ही मागणी अगदी अनाकलनीय होती, कारण, केंद्र अथवा राज्य, कोणत्याच सरकारने आपल्याकडे पुरेसा निधी नसल्याचे म्हटले नव्हते.
यावरुन दोन गोष्टी स्पष्ट होतात.
१) या स्थलांतरित मजुरांना आपल्या कुटुंब व सामानासकट शेकडो किलोमीटर पायी अंतर कापण्याचा आत्मविश्वास कुठून आला?
२) केवळ मंदिरांमधील देणग्यांबद्दलच विचारणा का केली जाते?
आता या प्रत्येकाचे स्पष्टीकरण पाहूया
१) स्थलांतरित मजुरांना आपल्या कुटुंब व सामानासकट शेकडो किलोमीटर पायी अंतर कापण्याचा आत्मविश्वास कुठून आला?
तीर्थयात्रा या हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहेत. अमरनाथ यात्रेपासून शबरीमाला, वैष्णोदेवीपासून गंगा सागर, कावड यात्रेपासून पंढरपूरच्या वारीपर्यंत शेकडो-हजारो पदयात्रा आपल्याकडे वर्षानुवर्षे सुखेनैव चालत आल्या आहेत. हिंदू कधी एकेकट्याने, तर कधी कुटुंबासमवेत, सामानसुमान सोबत घेऊन पदयात्रा करीत असतात. अनादी काळापासून हिंदू समाजात पदयात्रांची ही परंपरा चालत आली आहे. त्यात कधी कोणाला कशाची भीती वाटल्याचे दाखले नाहीत. हा आपलाच देश आहे आणि आपल्या देशात पायी चालण्यात भिती किंवा लाज कशाची? त्यामुळे पदयात्रा आजही उत्साहात चालू आहेत. सरकारवरील नाराजी व्यक्त करण्यासाठी, त्याविरुद्धचा राग व्यक्त करण्यासाठी हिंदू सरकारी किंवा खाजगी मालमत्तांचे नुकसान करीत नाहीत. ते केवळ पुढे पुढे चालत राहतात कारण त्यांना खात्री असते, की आपल्याला आपल्यातील एखाद्या हिंदूची मदत होणार आहे. आणि असे अनेकदा घडलेही आहे. रस्त्यावर एकत्र आलेले अनेक हिंदू किंवा अनेक ठिकाणी मंदिरांच्या आसपास एकत्र आलेल्या अशा हिंदूंनीच या वर्षीच्या उन्हाळ्यात स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांसाठी भोजनाची व्यवस्था केली. आपल्या धर्माबद्दलच्या याच आत्मविश्वासाच्या बळावर स्थलांतरित मजुरांनी पायी चालण्याचा निर्णय घेतला होता.
२) केवळ मंदिरांमधील निधीबद्दलच विचारणा का केली जाते?
भारतात लाखांहून अधिक चर्च आणि मशिदी आहेत. अनेक नवीन चर्च आणि मशिदींची उभारणीही वेगाने सुरू आहे. असं असताना, मला प्रश्न पडतो की, या उपासनास्थळांकडे जमा होणाऱ्या निधीबद्दल कोणीच काही अवाक्षर का काढत नाही? फक्त मंदिरातल्या देणग्यांवर लक्ष ठेवून त्यावरच का प्रश्न निर्माण केले जातात?
मंदिरांतच्या निधीमधून आतापर्यंत शंभर कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत कोविड-१९ च्या साथीदरम्यान करण्यात आली आहे. पण मंदिरे (त्यात गुरुद्वारा आलेच) वगळता अन्य कोणा उपासनास्थळांद्वारे मदतीचा एखादा छदामही दिला गेल्याचे मला आठवत नाही. (धर्म आणि रिलिजन यांमधला हा मोठा फरक असल्याचे मला वाटते)
मंदिरे नेहमीच अर्थव्यवहारांच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. अर्थशास्त्राचे चक्र मंदिरांच्या निर्मितीपासूनच सुरु होते. अगदी प्राचीन काळातही कट्टरपंथिय परकिय आक्रमकही मंदिरांच्या संपत्तीकडेच आकर्षिले गेले होते.
मंदिरांची अर्थशास्त्रीय महत्ता खाली नमूद केलेल्या उदाहरणांवरुन लक्षात येते :
वाराणसी, उज्जैन, पुष्कर, रामेश्वरम ही जगातली अत्यंत जुनी शहरे आहेत. या शहरांत एकही उद्योगधंदा नाही. ही सर्व धार्मिक स्थळे आहेत. “रस्ट बेल्ट” ही संज्ञा इंटरनेटवर शोधली की अमेरिकेतल्या डेट्रॉइ्ट शहराचे नाव समोर येते. एकेकाळचे उद्योगधंद्यांनी संपन्न असलेले आधुनिक शहर, जगातील वाहन उद्योगाचे केंद्र असलेले हे शहर आज गंजून गेले आहे. आशियाई देशांमध्ये वाहननिर्मिती स्वस्त असल्याचे लक्षात आल्याबरोबर डेट्रॉइ्टमधील संपूर्ण वाहन उद्योग आशियाई देशांत स्थलांतरित झाला आणि डेट्रॉइट वैराण झाले. आज ते अमेरिकेतील “रस्ट बेल्ट” बनले आहे.
कुठलेही संकट, मग ते मनुष्यनिर्मित उदा. युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती उदा. पूर, वादळ इ., त्याच्या निवारणासाठी मंदिरांनी सदैव भरीव कामगिरी केली आहे. संकट मग ते हिंदूंवरचे असो वा मुसलमानांवरचे मंदिरांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मंदिर आणि मंदिरांचे अर्थशास्त्र समजून घेणे, ही काळाची गरज बनली आहे.
संदिप सिंग हे लेखक असून ते मंदिरांचे अर्थशास्त्र आणि जमा होत असलेला निधी या विषयावर पुस्तक लिहित आहे. संपर्क : templeeconomics@gmail.com or @Sandeep_author