कट्टर इस्लामिक देशात योगासनांचे महत्व पटवून देणाऱ्या महिलेची गोष्ट..
भारतीय संस्कृतीमध्ये योगाभ्यास महत्वाचा मानला जातो. आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने फायदेशीर ठरतात. ही गोष्ट भारतीयांना माहीत आहे. अलीकडच्या काळात योगाभ्यासाबद्दल भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येदेखील आकर्षण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने २१ जून २०१५ पासून जगभरात योग दिवस साजरा होऊ लागला (International Day of Yoga) आता हळू हळू जगभरात योगासनांचा प्रचार आणि प्रसार होत आहे.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण सौदी अरेबिया या इस्लामिक कट्टर देशातील एका स्त्रीने त्या देशातील जनतेला योगाभ्यासाबद्दल जागृत केलं आहे. एका इस्लामिक देशात योगासनांचे महत्व पटवून देणाऱ्या या महिलेचं नाव आहे, ‘’नौफ मारवई’’. या सौदी अरेबियातील पहिल्या प्रमाणित योग प्रशिक्षक आहेत. त्यांची कहाणी फक्त सौदी अरेबियातच नाही तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी आहे.
नौफ मारवई( nauf al marwai) लहानपणापासूनच सिस्टीमिक ल्युपस या आजाराने त्रस्त होत्या. या आजाराचा परिणाम शरीराच्या सांध्यांवर होतो. यामुळे नौफ बराच काळ शाळेत जाऊ शकल्या नाहीत. या आजारावर औषधोपचार सुरु असताना त्यांना निसर्गोपचार आणि योगाभ्यासाची माहिती मिळाली. त्यांचे वडील जपान मधून मार्शल आर्ट शिकले होते. त्यांना योगासनाबाबत माहिती होती. यातूनच नौफ यांनी योगाभ्यास सुरू केला. हळू हळू त्यांची तब्बेत सुधारू लागली, त्या शाळेत जाऊ लागल्या. त्यानंतर योगाभ्यास सुरू ठेवत त्यांनी क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात आपले शिक्षण पूर्ण केले.
सौदी अरेबिया हा एक कट्टरतावादी देश आहे. त्यामुळे २००४ पर्यंत तिथे योगाभ्यासाबद्दल मोकळेपणाने बोलता देखील येत नव्हते. त्यानंतर हळू हळू सौफ मारवई यांनी तेथील लोकांना याबाबत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तिथल्या लोकांना याबाबत काहीच माहिती नव्हती, म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता. कट्टरतावादी मानसिकतेमुळे या कार्याला तिथे अडथळा येत होता.
२००६ पासून नौफ यांनी योगसाधनेला कायदेशीर मान्यता मिळावी, म्हणून प्रयत्न सुरु केले ते प्रयत्न बराच काळ असफल ठरत होते. योगाभ्यास स्वीकारण्याची तिथल्या लोकांची मानसिकताच नव्हती. २०१५ नंतर मात्र या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. महिला मात्र याकडे अजिबात लक्ष्य घालत नव्हत्या. २०१७ मध्ये नौफ मारवई ‘राजकुमारी रीमा बिंट बंदर अल साउद’ यांना भेटल्या त्या क्रिडा प्राधिकरण नियोजन आणि विकासाच्या उपराष्ट्रपती होत्या. त्यांच्या सहकार्याने सौदी अरेबियात योग दिवस साजरा करण्यास पाठिंबा मिळाला.
नौफ मारवई सांगतात, ‘’योग आणि धर्म याबद्दल कल्पित कथा आहे. फक्त इस्लाम धर्मच नाही, तर कोणत्याही प्राचीन प्रथेप्रमाणे त्याचा जन्म विशिष्ठ काळ आणि सभ्यतेत झाला. सगळेच खेळ तिथे सुरू झाले. त्या पार्श्वभूमीचे तिथल्या परंपरेचे, संस्कृतीचे शिक्के दिले गेले. हीच गोष्ट योगाभ्यासाबाबत घडली. मानवी आरोग्यासाठी ही साधना नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एका विचाराला धरून चालतो म्हणून इतर धर्मातील किंवा प्रदेशातील आरोग्याला उपयुक्त गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चूक आहे’’.
आता सौदी अरेबियातील अनेक लोकं योगाभ्यासासाठी आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी भारतात येत आहेत. भारतातील आयुर्वेदाचे( ayurveda) ज्ञान सौदी अरेबियात पोहोचावे, अशी नौफ मारवई यांची इच्छा आहे. त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्कार( padma shri award) देऊन गौरव केला आहे. त्यांच्या कार्यामुळे सौदी अरेबिया सारख्या कट्टरतावादी देशात योगासनांचा प्रचार आणि प्रसार झाला. अश्याच प्रकारे जगभरातील लोकांपर्यंत भारतीय संस्कृती आणि योगासनांचे महत्व पोहोचायला हवे.
साभार :- विश्व संवाद केंद्र (देवगिरी प्रांत)