CultureGamesNews

क्रीडा भारतीच्या पुढाकाराने ‘पारंपरिक क्रीडा महोत्सवा’चे आयोजन..

‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवा’चे आयोजन; मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार..

शिवकालीन खेळप्रकारांना मिळणार प्रोत्साहन मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पारंपरिक क्रीडा महोत्सवात’ मुंबई विद्यापीठ देखील सहभागी होणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व क्रीडा भारती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव:-

९ डिसेंबर २०२३ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) विविध प्रभागात आयोजित होत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवा’मध्ये विद्यापीठाशी संलग्नित विविध कॉलेजांमधील विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी होणार आहेत.शिवकालीन देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर क्षेत्रात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

या महोत्सवामध्ये लेझीम, लगोरी, मानवी मनोरे, लंगडी, रस्सीखेच, मल्लखांब, पंजा लढवणे, कुस्ती, दंड बैठका, दोरीच्या उड्या, मॅरेथॉन, शरीरसौष्ठव, फुगड्या, ढोल ताशा पथक प्रदर्शन, विटी-दांडू, दांड- पट्टा, लाठी- काठी, ढाल- तलवार, गदा/मुदगल या खेळांचा समावेश असणार आहे.

युवकांमध्ये पारंपारिक खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, त्यातून त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, या उद्देशाने आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अधिकाधीक सहभाग वाढविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

मर्दानी खेळ..

मर्दानी खेळाबाबतचा विषय निघाला की, आपल्या डोळ्यासमोर ” श्री छत्रपती शिवाजीमहाराज” आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेवेळची परिस्थिती प्रसंग व त्यांची युद्धकला उभी राहते.“मर्दानी खेळ” म्हणजेच इतिहासकालीन लढाईचे प्रशिक्षण होय. लढाई करणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे. लढाई करणे हे मर्दाचेच काम, म्हणूनच या जुन्या लढाईच्या खेळाला “मर्दानी खेळ” असे नाव दिले आहे. आपल्याला कोठे लढाई अगर युद्ध करावयास जावयाचे नाही. परंतु आपले स्वतःचे संरक्षण तरी आपल्या जमलेच पाहिजे.

क्रीडा भारती..

“क्रीडा से निर्माण चरित्र का , चरित्र से निर्माण राष्ट्र का…”

क्रीडा भारतीची स्थापना १९९२ मध्ये “फिट इंडिया – हिट इंडिया” (fit india hit india) या संकल्पनेने करण्यात आली. क्रीडा भारती प्रस्थापित खेळांसह पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देऊन सर्व भारतीयांचा सहभाग आणि विकासाचा विचार करते. क्रीडा भारतीचे ध्येय खेळाद्वारे चारित्र्यनिर्मिती आणि चारित्र्यनिर्मितीद्वारे राष्ट्र उभारणीचे सक्षमीकरण करणे आहे.

क्रीडा भारती आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर भारताला एक आघाडीचे राष्ट्र बनवण्यासाठी आणि देशभरात स्वदेशी क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी समर्पितपणे कटिबद्ध आहे.

मर्दानी खेळाचे महत्त्व आणि उद्देश…

आजच्या संगणकाच्या युगात या खेळाचा उपयोग काय असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. प्रत्येक देशाला संस्कृती आहे. प्रत्येक संस्कृतीला इतिहास आहे आणि या इतिहासावर आधारितच आपले वर्तमान आहे. आणि वर्तमानातूनच भविष्य निर्धारित होत असते.आज जरी तलवारीचा काठीचा उपयोग लढाईत होत नसला तरी ही कला शिकताना अंगातील चपळता, उत्साह, चाणाक्षपणा, उत्स्फूर्तता, खिलाडूपणा, सहनशीलतेचा विकास होत असतो.

सुख-दुःख, हार-जीत, चढ-उतार अशा अनेक प्रसंगाची रेलचेल आपल्या जीवनात चालू असते आणि अशा खडतर प्रसंगातून जाताना त्याता तोंड द्यावयाचे म्हणजे मानसिक समतोल असणे गरजेचे असते त्यासाठी शरीर कणखर असणे गरजेचे असते. मनातील अवास्तव भीती तसेच अहंकार नाहीसा करण्यासाठी, जीवनातील प्रसंगांना माघार न घेता सामोरे जाण्यासाठी, जीवन निरोगी सुखी समृद्ध करण्यासाठी, मनाच्या एकाग्रतेसाठी मर्दानी खेळ आवश्यक आहेत.

शिवराज्याभिषेकाची ३५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन खेळाप्रकारांबद्दल जनजागृती निर्माण होऊन, या खेळांचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच आपली परंपरा,संस्कृती टिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने क्रीडा भारतीच्या पुढाकाराने हे अतिशय स्तुत्य पाऊल उचलले आहे..

साभार :- Zee news

https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-university-will-participate-in-chhatrapati-shivaji-maharaj-traditional-sports-festival/758440

Back to top button