![veer savarkar](https://vskmum.s3.ap-south-1.amazonaws.com/wp-content/uploads/2024/02/veer-savarkars-biography-added-to-up-board-syllabus-passing-this-subject-compulsory-232515-16x9-1-780x470.webp)
दि. १० मे १९३७ या दिवशी सावरकरांवरील सर्व बंधने इंग्रजांचा नाईलाज झाल्यामुळे, त्यांनी काढून घेतल्यानंतर, वीर सावरकरांनी आपल्या पुढच्या आयुष्याचे उद्दिष्ट काय ठेवले आणि त्यांनी त्यासाठी कशी वाटचाल केली, याची अजून फारशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे काही लोक १९३७ नंतर सावरकरांनी काय केले? हा प्रश्न विचारात असतात. १९३७ पासून १९६६ पर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा म्हटले, तर हजार पानेदेखील अपुरी पडतील. आज सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने १९३७ नंतरच्या वीर सावरकरांच्या जीवनातील हिंदुत्वनिष्ठ राजकीय पर्वाचे हे स्मरण…
१० मे १९३७ या दिवशी वीर सावरकरांची सर्व बंधनातून मुक्तता झाली. १३ मार्च १९१० या दिवशी त्यांना इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना भारतात पाठवण्यात आले. मार्सेलिसची उडी, हेगच्या न्यायालयातील प्रकरण वगैरे विषय होत, शेवटी इंग्रजांच्या न्यायालयात त्यांच्यावर दोन खटले चालवण्यात आले. त्या दोन्ही खटल्यांत त्यांना एक एक जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना अंदमानच्या काळकोठडीत पाठवण्यात आले. त्या जीवघेण्या तुरुंगात वीर सावरकर दि. २ मे १९२१ पर्यंत होते. पुढे त्यांना भारतातील तुरुंगात ठेवण्यात आले.
![](https://www.vskkokan.org/wp-content/uploads/2024/02/image-43.png)
दि. ४ जानेवारी १९२४ या दिवशी त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. पण, रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध करण्यात आले. वीर सावरकरांचा हा तुरुंगवास तब्बल ५ हजार, ४५ दिवसांचा म्हणजे १३ वर्षे नऊ महिन्यांचा होता. पुढे अनेक निर्बंधात त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ४ हजार, ८७५ दिवस म्हणजेच १३ वर्षे चार महिने राहावे लागले. अशाप्रकारे त्यांना इंग्रज सरकारच्या बंधनात २७ वर्षे एक महिना राहावे लागले होते. वीर सावरकरांचा हा बंदिवास सुरू झाला, तेव्हा त्यांचे वय अवघे २६ वर्षे नऊ महिने होते, तर ते मुक्त झाले, तेव्हा त्यांचे वय ५३ वर्षे दहा महिने होते.
वीर सावरकरांच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याबद्दल बहुतांशी लोकांना माहीत असते. काही सावरकरविरोधी लोकांना १९२४ पर्यंतचे सावरकर मान्यदेखील असतात. १९२४ ते १९३७ या काळात केलेल्या सामाजिक क्रांतीबद्दल देखील लोकांना अधिकाधिक माहिती या काळात मिळू लागली आहे. पण, १० मे १९३७ या दिवशी त्यांच्यावरील सर्व बंधने इंग्रजांचा नाईलाज झाल्यामुळे, त्यांनी काढून घेतल्यानंतर, वीर सावरकरांनी आपल्या पुढच्या आयुष्याचे उद्दिष्ट काय ठेवले आणि त्यांनी त्यासाठी कशी वाटचाल केली, याची अजून फारशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे काही लोक, १९३७ नंतर सावरकरांनी काय केले? हा प्रश्न विचारात असतात. १९३७ पासून १९६६ पर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा म्हटले, तर हजार पानेदेखील अपुरी पडतील. या काळातील त्यांच्या कार्याची दिशा पाहता, त्या काळास हिंदुत्वनिष्ठ राजकीय पर्व म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
वीर सावरकरांची मुक्तता झाल्यावर, रत्नागिरी नगरपालिकेने त्यांचा सत्कार केला. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये ते म्हणाले, “मी कोणतेही कार्य करावयाचे मनात आणले, तरी त्यात राष्ट्राचे हितच पाहीन आणि त्यातल्या त्यात हा हिंदूंचा देश आहे, त्या दृष्टीने मी निरंतर हिंदूंचा पक्ष घेईन. कारण, मी केवळ हिंदूंचा मित्र नव्हे, तर हिंदूचा पुत्र आहे नि हिंदू म्हणवून घेण्यातच, मला नेहमी अभिमान वाटेल.” इतका प्रदीर्घ बंदिवास ज्यासाठी वीर सावरकरांनी भोगला, तेच राष्ट्रकार्य करण्याचा त्यांचा निर्धार वयाच्या ५४व्या वर्षदिखील कायम होता. त्यांच्या जागी अन्य कोणी असतात, तर म्हटला असता की, ‘जेवढं झालं तेवढ पुरे झालं. आता मी माझ्या स्वार्थाचे बघतो.’ त्यांच्या सारखा प्रतिभावान सिद्धहस्त लेखक आणि कवी राष्ट्र कार्य सोडून त्या क्षेत्रात उतरला असता, तर संपन्नतेने त्यांच्या पायावर अक्षरशः लोळण घेतली असती. सावरकरांना इंग्रजांकडून निर्वाह भत्ता मिळत होता, म्हणून गळा काढणारे, या अंगाने कधीच विचार करणार नाहीत. तसेच सावरकरांनी आपले कार्य हे हिंदू हिताला प्राधान्य देणारे असेल, असेही अगदी स्पष्टपणे सांगून टाकले होते.
![](https://www.vskkokan.org/wp-content/uploads/2024/02/image-44.png)
१९३७ साली वीर सावरकर रत्नागिरीहून निघाल्यावर, त्यांचे कित्येक गावांमध्ये सत्कार समारंभ पार पडत होते. हजारो लोक त्याच्या मिरवणुकींमध्ये सामील होत होते. लोकांना त्यांचे विचार ऐकायचे होते. ज्या काळात स्वातंत्र्य हा शब्द उच्चारणेदेखील गुन्हा ठरत होता, त्या काळात ज्या युवकाने संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, सशस्त्र क्रांतीचा मार्ग शत्रूच्या देशात जाऊन स्वीकारला होता, तो प्रदीर्घ काळानंतर संपूर्ण मुक्त झाल्यावर काय बोलणार? काय करणार? याकडे अवघ्या भारतीय जनतेचे लक्ष लागले होते. लोक भावना लक्षात घेऊन, वीर सावरकरांनी कोल्हापुरात असताना सर्वांसाठी एक संदेश दिला. तो असा होता की,
“ २७-२८ वर्षांच्या बंदिवासातून आज माझी सुटका होताच, मला माझ्या हिंदू राष्ट्राला पहिलाच संदेश देण्याचा, काही विधायक कार्यक्रम सांगण्याचा अनेक जण आग्रह करीत आहेत. पण, मी कोणताही मोठा तात्त्विक गहन संदेश काव्य रुपाने वा प्रवचन रुपाने देणार नाही. माझे सांगणे इतकेच आहे की, देशाला आता तत्त्वज्ञान, काव्य वा प्रवचनांचा कार्यक्रम आवश्यक नसून आपल्यापैकी प्रत्येकाने शक्य तेवढे प्रत्यक्ष कार्यच करू लागले पाहिजे.
आज जर या देशाचे कशावाचून अडले असेल, तर ते कार्यक्रमांवाचून नव्हे तर कार्यावाचून होय. देश स्वतंत्र कसा करावा, याचा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थीदेखील चटकन लिहून देईल. पण, त्या कार्यक्रमातील कोणतेही काम करावयाचे म्हटले, तर ते करणारा मात्र हजारात एक सापडणे दुर्घट. राजकीय कृतीचा प्रश्न निघाला की लोक म्हणतील, बापरे तेवढे नको राजोबा रागावतील. बरं तर सहभोजनाचा किंवा सामाजिक क्रांतीचा प्रश्न निघाला, तर ते म्हणतील, बापरे तेवढे नको आजोबा रागावतील. आजोबा रागावो वा राजोबा रागावो, माझ्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यार्थ अवश्य ते कार्य वा त्याग करण्यास मी सिद्ध आहे, असे म्हणणारा कृतिशील मला हवा आहे. वाचिवीरांचा काथ्याकूट सोडून देऊन, तसे कृती शूर व्हा, हाच माझा अखिल भारताला संदेश आहे.” लगेच त्याच वर्षी म्हणजे १९३७ साली वीर सावरकरांनी हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले.
![](https://www.vskkokan.org/wp-content/uploads/2024/02/image-45.png)
त्यावर्षीचे अधिवेशन कर्णावती येथे आयोजित करण्यात आले होते. पुढे ते सहा वर्षे हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हिंदू महासभेच्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी केलेली भाषणे त्या-त्या काळात चर्चेचा विषय ठरत होती. ती सावरकरांची सहाही भाषणे आजही आपल्याला ‘हिंदू राष्ट्र दर्शन’ या पुस्तकात वाचायला मिळू शकतील. या काळात इंग्रजांना लक्षात आले होते की, आता आपण भारतावर अधिक काळ राज्य करू शकणार नाही. स्वातंत्र्य मिळणारच होते, भारतीय ते आता मिळवणारच होते. फक्त कधी हे महत्त्वाचे होते. इंग्रज वेळकाढूपणा करत होते. मोहम्मद अली जिना स्वतंत्र राष्ट्राची मागणी करू लागले होते.
या काळात भारतात अनेक ठिकाणी निवडणुका घेतल्या जाऊ लागल्या होत्या. काँग्रेस, हिंदू महासभा, मुस्लीम लीग इत्यादी त्या लढवत असत. १९४२ मध्ये सिंध प्रांतात झालेल्या निवडणुकींमध्ये ‘मुस्लीम लीग’ला मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी, हिंदू महासभेच्या सहकार्याची गरज होती. या संदर्भात सिंध प्रांताचे हिंदू महासभेचे कार्यवाह भोजराज अजवानी आणि गोकुळचंद यांना वीर सावरकर पत्राने कळवतात की, ‘सिंधमध्ये जरी मुस्लीम लीगच्या मंत्रिमंडळात हिंदू सभेला काही मंत्रिपदे मिळत असतील, तर सिंध हिंदू सभेने साध्यानुकूल सहकार्य या तत्त्वाने स्वीकारावीत आणि त्यायोगे हिंदू हित संबंधांचे होईल तितके रक्षण करावे.’ यावर टीका करणाऱ्या नेत्यांना देखील वीर सावरकर फटकारून म्हणतात की, “जिनांना सर्व सत्ता दिली, तरी चालेल असे म्हणणाऱ्या किंवा मुसलमानांना पाकिस्तान देण्यास कोणीही विरोध करणार नाही, असे म्हणणाऱ्या गांधीजींचा आणि काँग्रेसचा त्यांनी आधी धिक्कार करावा.”
पुढे दि. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला खंडित स्वरुपात का होईना; पण स्वातंत्र्य मिळाले. काहींचे मत होते की, दि. १५ ऑगस्ट हा केवळ ‘मुक्ती दिन’ म्हणून पाळावा. पण, वीर सावरकरांनी मात्र स्वतंत्र भारताच्या घटना समितीने मान्य केलेला धर्मचक्रांकित तिरंगा ध्वज स्वीकारला आणि आपल्या घरावर उभारलादेखील. त्याच बरोबर अखंड हिंदुस्थानच्या प्रस्थापनेचा निर्धार व्यक्त करणारा, भगवा ध्वजदेखील उभारला. त्यावेळी भगवा ध्वज उभारला म्हणून अनेकांना अटकदेखील झाली होती. पुढे वीर सावरकरांनी स्वतंत्र भारताला पूरक अशीच भूमिका स्वीकारली होती.
![](https://www.vskkokan.org/wp-content/uploads/2024/02/image-46.png)
या अशा महान भारतमातेच्या पुत्राला व्यक्तिगत राजकीय मतभेद असल्यामुळे, स्वतंत्र भारताच्या सरकारात स्थान देण्यात आले नाही, या इतके मोठे दुर्दैव ते कोणते. वीर सावरकरांशी वैचारिक मतभेद असलेला व्यक्तीदेखील त्यांचा राष्ट्रासाठी आणि समाजासाठी केलेला त्याग नाकारू शकत नाही. गांधी हत्येच्या खटल्यात देखील त्यांना अनावश्यक आणि मुद्दाम गोवण्यात आले होते. त्या काळात जर वीर सावरकरांना असा कोणता कट करायचा असता, तर त्यांनी जिनाच्या हत्येचा केला असता. पुढे पाकिस्तानी पंतप्रधान भारतात येणार होता. वीर सावरकर त्याच्या विरुद्ध काही कट करतील, या भीतीने त्यांना बेळगावात बंदिवासात ठेवणे, या इतके मोठे पाप ते कोणते असेल.
पुढच्या काळात वीर सावरकरांची तब्येत अनेक वेळेस बिघडत असे, तरीही त्यांना शक्य तितके कार्य ते करत राहिले. आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता पूर्ण झाली, या भावनेतून त्यांनी फेब्रुवारी १९६६ मध्ये प्रायोपवेशन करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर दि. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदूंनी आपल्या पाठीराख्याला, पालकाला गमावले.
वीर सावरकरांच्या राजकीय क्लृप्तीला माफीनामा म्हणणाऱ्यांना, इंग्रजांकडून निर्वाह भत्ता घेऊन, त्यातून सामाजिक कार्य करत, याला पेन्शन घेतली म्हणणाऱ्यांना, प्रायोपवेशन करण्याला आत्महत्या म्हणणाऱ्यांना वीर सावरकरांचे कार्य, त्यांची प्रतिभा, त्यांचा त्याग कळायला किमान दहा जन्म घ्यावे लागतील. अशा विरात्म्याला पुण्यतिथी निमित्य शतशः वंदन.
लेखक :- आदित्य रुईकर..
(लेखक पेशाने वकील असून ‘बखर सावरकरांची’, ‘स्वराज्य विस्तारक बाजीराव चिमाजी’, ‘मिशन भगीरथ’, ‘विजनवास’ इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)
साभार- तरुण भारत (मुंबई)
![](https://www.vskkokan.org/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-25-at-8.57.42-PM-1024x1024.jpeg)