९ ऑगस्ट (श्रावण शु. ५) विष्णु बुवांचे द्विशताब्दी जयंती वर्ष प्रारंभ होत आहे त्या अनुषंगाने विष्णुबुवांची महती सांगणारी ५ भागांची विशेष मालिका..
विष्णुबुवा वादविवाद सभांमध्ये मिशनऱ्यांना संकटात टाकणाऱ्या आणि निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती करत. विष्णुबुवांनी मिशनऱ्यांना विचारलेले मर्मभेदी प्रश्न खाली दिले आहेत. ,
जुना व नवा करार ईश्वरप्रणीत आहे काय ? (५ फेब्रुवारी १८५७),
येशूस ‘ईश्वरी पुरुष’ संबोधणे कितपत योग्य (१२ फेब्रुवारी),
ख्रिस्तामध्ये लीनता, सौम्यता होती काय ? (१९ फेब्रुवारी),
येशू चमत्कार करू शकत होता काय ? (१ मार्च),
मारया ही जोसेफची बायको होती काय ? (१२ मार्च),
येशूला प्रकृतिधर्म, थकवा, विश्रांती होता काय ? (१९ मार्च),
ख्रिस्तधर्म ईश्वरप्रणीत आहे यासाठी प्रमाणे कोणती ?
येशू आणि लाजरसाची बहीण यांचेमध्ये कोणत्या प्रकारचे संबंध होते ? (२६ मार्च),
येशू जोसेफचा पुत्र ठरतो काय ? (२ एप्रिल),
देवाकडे जाण्यासाठी मध्यस्थाची गरज आहे काय ? (१६ एप्रिल),
पशूस आत्मा आहे किंवा नाही ? (२३ एप्रिल),
मोशा (मोझेस) आणि एलिया सदेह आकाशातून खाली उतरले आणि सदेह आकाशात गेले असे मानले जाते तर त्यांचे शरीर कसे होते ? (७ मे ),
ख्रिस्ताच्या शरीराचे काय झाले ? (२१ मे १८५७).
बायबलमधील ओव्यांचा आधार घेऊन विष्णुबुवा आपले निष्कर्ष मिशनऱ्यांपुढे मांडत – येशू शांतता प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर तलवार चालवण्यासाठी आला होता, येशू देवाचा पुत्र नसून मनुष्याचा पुत्र होता, येशू आणि त्याचे शिष्य खोटे बोलत, येशूच्या १२ प्रेषितांपैकी पेत्रस हा मच्छिमारी करीत असे, येशू आणि त्याचे प्रेषित मांसाहारी होते, येशूने आपले शरीर जगाच्या पापाची क्षमा करण्यासाठी अर्पण केले हे सिद्ध होऊ शकत नाही, जीव वाचवण्यासाठी येशू जीवापाड धावपळ करत होता असे निष्कर्ष मांडल्यानंतर पुन्हा विष्णुबुवा प्रश्न उपस्थित करतात. ‘शत्रूवर प्रीती करा’ असे म्हणणारा येशू ‘वस्त्रे विकून तलवारी विकत घ्या’ असे का म्हणतो ? जर ईश्वर इहलोकी आम्हास शिक्षा करतो तर त्याने परलोकी आमचा न्याय का करावा ? आणि जर तो ख्रिस्ती मतानुसार परलोकी न्याय करील तर त्याने इहलोकी का शिक्षा करावी ? जुना करार आणि नवा करार यात विसंगती का आहे ? जुना करार खरा की नवा करार ?
देवाला निराकार मानणारे ख्रिस्ती देवाच्या शरीराची कल्पना करतात की नाही ? मनुष्यांनी येशूचा तिरस्कार का केला ? देव आणि पश्चात्ताप यासंबंधी ख्रिस्ती धर्मग्रंथात संदिग्धता दिसते, तेव्हा नेमके ख्रिस्ती मत कोणते ? शिष्यांनी ख्रिस्ताचे शरीर चोरले त्यावेळी लाचलुचपतीचा प्रकार घडला असा उल्लेख ग्रंथात आला आहे त्यावर आपण कोणता खुलासा करू शकाल ? मात्थी (१८:६) ओवीवरून येशूने आपल्या धर्माचा प्रसार जुलुमाने केला हे सिद्ध होते की नाही ? एलिझाबेथ राणी प्रोटेस्टंट होती की नाही ? तिच्या कारकिर्दीत धर्मप्रसारासंबंधी जुलूम झालेत की नाही ? हिंदू धर्माचा नाश करणाऱ्या मोशावर येशूने भरवसा ठेवला होता परंतु मोशा हा ठक होता हे येशूला का कळले नाही ? बायबल हे कल्पनेवर आधारलेले पुस्तक नव्हे काय ? चंद्र हा परप्रकाशी आहे याचे ज्ञान येशूला नव्हते, याची मिशनऱ्यांना माहिती आहे काय ? असे असंख्य प्रश्न विष्णुबुवांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांना विचारले.
मिशनऱ्यांचे ‘ बॉम्बे गार्डियन ‘ नावाचे इंग्रजी साप्ताहिक मुंबईतून प्रत्येक शनिवारी प्रकाशित होत असे. रेव्हरंड जॉर्ज बोवेन तेथे संपादक होता. समुद्रकिनारी होणाऱ्या वादविवाद सभांचा वृत्तांत बोवेन या साप्ताहिकात प्रसिद्ध करीत असे. त्याने सर्व वादविवाद सभांच्या वृत्तांताचे संकलन ‘Discussions By The Seaside’ (१८५७) ह्या पुस्तकात केले आहे.
ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आक्रमक धर्मप्रसारामुळे ख्रिस्तीमताचे स्तोम माजले होते, पांढरपेशा सुशिक्षित समाजाला सुद्धा या ख्रिस्तीमताने भुरळ घातली होती. नारायण शेषाद्री, दाजी पांडुरंग, हरी केशवजी, बाबा पदमजी अशा अनेक मंडळींनी नुसता ख्रिस्तीमताचा नुसता स्वीकार केला नाही तर ख्रिस्ती धर्माची भलावण करून सनातन धर्मावर गरळ ओकायला सुरुवात केली.
विष्णुबुवांच्या विचारप्रवर्तक बैठका,सभा आणि व्याख्यानांच्या प्रभावाने हिंदू आणि पारशी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आणि त्यांचा धर्माभिमान जागृत झाला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रचाराला आळा बसला, मिशनऱ्यांचा चौखूर उधळलेला वारू रोखला जाऊन हिंदू आणि पारशी समाजाची धर्मांतरे थांबली. धर्मांतरित समाज आपल्या मूळ हिंदू आणि पारशी धर्मात परतू लागला.
विष्णुबुवांनी संस्कृती रक्षणाची गरज ओळखून मुंबई शहर कार्यक्षेत्र म्हणून निवडले होते. हिंदू धर्मीयांसाठी मुंबई हे शहर धर्मभ्रष्टतेचे केंद्र बनलेले आहे असे असताना मुंबई सोडून जाण्याऐवजी मुंबईत का राहावेसे वाटते असा प्रश्न विचारणाऱ्याला त्यांनी उत्तर दिले – “ आम्ही वेदप्रतिपाद्य धर्माची माहितगारी करून देऊन भ्रष्टता दूर करणारे वस्ताद आहो या कारणामुळे जेथे फार भ्रष्टता असेल तेथेच आमचे आगमन, तेथेच आमचे काम, तेच आमचे स्थळ.”
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या उठावाचे निमित्त करून विष्णुबुवांच्या सभांवर बंदी घालण्यात आली. या सभांच्या वृत्तांताचा मराठी अनुवाद ‘समुद्रकिनारीचा वादविवाद’ (१८७२) या नावाने प्रकाशित झाला.
क्रमशः
लेखक : – सुरेश गोखले
अधिक माहितीसाठी :