संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका..
कीर्तनात ‘तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ या तुकोबांच्या वचनानुसार, पारंपारिक भक्तीमार्गाच्या प्रसारासह दारूबंदी, पशुबली, अस्पृश्यता निवारण, हुंडापद्धती, निरूपयोगी गुरे कसायाला विकणे, अंगात देव संचारणे यांसारख्या समाजघातक गोष्टींची लक्तरे, हा बाबा आपल्या खास रोखठोक शैलीत समाजापुढे टांगून लोकांना त्यापासून परावृत्त करी. निरक्षर राहिल्यामुळे होणारी जीवनाची फरपट सांगून शिक्षणाचाही प्रसार करी.
परखड आणि निर्भिड वाणीमुळे त्याची कीर्तनाची जागा सभामंडपाऐवजी कुरूक्षेत्रासारखी युद्धभूमी बने! फरक इतकाच, की येथे संहार अज्ञानाचा आणि अनिष्ट प्रथांचा होई. कोणत्याही समस्येवर त्याचे युक्तीवाद इतके बिनतोड असत की तथाकथित धर्ममार्तंडांनी आणि कायदेपंडितांनीही तोंडात बोटे घालावी!
होता होता डेबूला डोक्यावरच्या खापराच्या तुकडयामुळे ‘गाडगेबाबा‘ असे नाव पडले आणि लोक त्यांच्या स्वच्छ आचरणशैलीमुळे त्यांना साधुसारखा मान देऊ लागले. बघता बघता त्यांना हजारो अनुयायीही येऊन मिळू लागले. पण एखाद्याला जवळ करण्यापूर्वी बाबा त्याची कठोर परीक्षा घेत आणि मगच त्याच्यावर जबाबदारी सोपवत. बाबा गावोगावी भजन कीर्तनाचे सप्ताह पार पाडून समाजप्रबोधन करू लागले.कीर्तनसप्ताहात वर्णभेद न पाळता रोज हजारो भुकेलेल्यांना अन्नदान होऊ लागले. सप्ताहाचा शेवट बाबांच्या कीर्तनाने होई. श्रोत्यांची संख्या किती तर कमीतकमी पांच हजार !
पण हजारोंना जेऊ घालणारा हा निःसंग मनुष्य , त्या पंगतीतले सुग्रास अन्न न खाता, हातात गाडगे घेऊन स्वतःची भाकर त्याच गावात चार घरी भिक्षा मागून खाई! कुणा धनिकाच्या घरात मुक्कामाची उत्तम सोय झाली असली तरी सोफा, गादी, गालीचा बाजूला सारून फाटक्या पटकुरावर आणि तेही संडासाजवळ पहुडे. परत हातात खराटा घेऊन हा बाबा समारंभ झालेले पटांगण झाडायला सकाळी सर्वांच्या आधी उभा राही!
गाडगेबाबा आणि त्यांच्या अनुयायांनी आपल्या प्रबोधनांनी सन १९३० ते ५५ पर्यंत सगळा महाराष्ट्र अक्षरशः ढवळून काढला. काही काळातच याचे परिणाम दिसू लागले. शेकडो ठिकाणच्या अनिष्ट रूढी, हुंडा, दारू व पशुबलीच्या प्रथा थांबल्या. मुलांसाठी शाळा आणि वसतीगृहे सुरू झाली. शेतकऱ्यांनी निरूपयोगी गुरे कसायाकडे पाठविण्याचे बंद केले. सावकारी कर्जाच्या प्रथा बंद पडल्या, आजारपणात भोंदूंऐवजी वैद्यकीय उपचारांकडे लोक वळू लागले, अन अस्पृश्यताही निवळली. या अखंड भ्रमंतीत गाडगेबुवांना महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणारी यात्रेकरूंची निवासाची व अन्नाची आबाळ, अस्वच्छता, देवाच्या नावाखाली चाललेली लुटालूट दिसली.
गाडगेबाबांनी आणखी एक गोवर्धन उचलण्याचा संकल्प केला. स्वतःच्या गावाजवळच्या ऋणमोचन या तीर्थाला घाट बांधण्यापासून सुरूवात करून, महाराट्रातील प्रत्येक तीथक्षेत्राच्या ठिकाणी यात्रेकरूंसाठी प्रशस्त घाट, पाणपोया, धर्मशाळा, अन्नछत्रे, सदावर्ते,रोग्यांसाठी निवासस्थाने, गोरक्षण, रूग्णांसाठी औषधोपचार व्यवस्था सुरू केल्या. कोणत्याही देवस्थानांचा आमूलाग्र कायपालट करणारे बाबा, देवदर्शनास मात्र जात नसत. अगदी पंढरपूर जाऊनही त्यांनी पांडुरंग विश्वेश्वराच्या देवळाची पायरीही चढली नाही, त्यांनी दर्शन,आशीर्वाद घेतले ते कनवाळू जनताजनार्दनाचे !!
बाबांचा देव गाभाऱ्यात कोंडलेला नव्हता, देवळाबाहेरच्या रंजल्यागांजल्यांमध्ये होता. बाबांच्या विधायक कार्याचे महत्व जनमानसाला पटताच परिस्थिती पालटली. आता गाडगेबाबांनी नवीन कार्याचा संकल्प करण्याअगोदरच धनिक मंडळी मदत करण्यासाठी त्यांच्यापुढे हात जोडून उभी राहू लागली.
अनेक समाजधुरीण, कार्यकर्ते, लोकोत्तर पुरूष, पत्रकार, साधुसंत, बाबांचे कार्य पाहून त्यांना येऊन मिळाले. बाळासाहेब खेरांसारखे मुख्यमंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांसारखी दिग्गज मंडळी बाबांना देवासारखे मानत आणि आपापल्या माध्यमातून बाबांच्या कार्याला हातभार लावण्यात धन्यता मानत. बाबाही त्यांना जिवलगासारखे जपत. अडीअडचणीप्रसंगी त्यांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहात !
क्रमशः