News

लताताईंचा परिसस्पर्श

Swarnalata Bhishikar Dnyan Prabodhini..

महाविद्यालयात आल्यापासून लताताईंना मी त्यांच्या वर्तमानपत्रांतील लेखांमधुन ओळखत होते. जसे बापुसाहेब भिशीकरांचे लेख वर्तमानपत्रात येत असत तसे लताताईंचेही येत असत. महाविद्यालयात असल्यापासूनच संध्याकाळी कुठे ना कुठे तरी व्याख्याने ऐकावयास जाणे होत असे. एम एस्सी झाल्यावर १९९६ साली रामकृष्ण मठाची लायब्ररी लावली होती. त्या अनुषंगाने रामकृष्ण परमहंस, शारदामाता आणि स्वामीजी यांची चरित्रे, स्वामीजींची पत्रे, रामकृष्ण संकिर्तन, कोलंबो ते अल्मोरा, गीतारहस्य अशी पुस्तकेही वाचून झालेली होती. दरम्यान रोज संध्याकाळी सिंहगड रोड वरील शारदामठात सायं आरतीसाठी जात असे.

रविवारी सकाळी मोक्षप्राणा माताजींच्या प्रवचनालाही जात असे. त्यातच खूप आतून वेद-उपनिषदे यांचा अभ्यास शारदा मठात राहून (त्या वातावरणात राहून) करण्याची इच्छा होती. तसं त्यावेळी माताजींना बोलुनही दाखवलं की मला शारदा मठ जॉईन करायचा आहे. घरी बोलुन दाखवलं तर सहाजिकच विरोध झाला होता. ते देखील माताजींना सांगीतलं. मग त्या म्हणाल्या की काही काळ तू अरुणाचल प्रदेशच्या आमच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम कर मग बघ तुला काय वाटतंय ते. त्यांनी मला दीक्षा घेण्यास सांगीतलं. सगळी तयारीही केली होती पण नियतीच्या मनात वेगळंच असल्याने ऐनवेळी काही ना काही अडचणी उपस्थित झाल्या आणि मी दीक्षा घेण्यास जाऊ शकले नाही.

मनात अस्वस्थता होतीच. तशातच डिसेंबरमध्ये रामकृष्णमठात लताताईंची सलग तीन दिवस संध्याकाळची व्याख्यानमाला होती. मी तीनही दिवस व्याख्यान ऐकायला गेले होते. शेवटच्या दिवशी सगळं झाल्यावर मी लताताईंशी बोलले. मला वेद आणि उपनिषदांचा अभ्यास शारदा मठात राहून करायचा आहे. पण मला घरचे नाही म्हणताहेत. मी काय करु? तशी माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती पण मी एकदम त्यांच्याशी हे बोलल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या अगं मलाही वेद आणि उपनिषदं अभ्यासायची आहेत. तू सोलापूर प्रबोधिनीत ये आपण दोघी मिळुन अभ्यासही करु आणि प्रबोधिनीचं कामही करु. त्या म्हणाल्या की वेद आणि उपनिषदे वाचून आणि ध्यानधारणा करुन त्या साधनेला एकप्रकारे रूक्षपणा येईल. त्याला प्रत्यक्ष कृतीची, सामाजिक कार्याची जोड दिली तर सगळ्याचं सार्थक होईल. त्यांनी जानेवारीत (१९९७) होणार्या आध्यात्मिक शिबीरासाठी मला सोलापूरला बोलावले. मी गेलेही.

सोलापूर ज्ञान प्रबोधिनीत आध्यात्मिक शिबीराला जाण्यास आई-बाबांचा काहीच विरोध नव्हता. ते शिबीर स्वामी माधवानंद म्हणजेच डॉ. माधवराव नगरकर हे घेणार होते. लताताईंनी त्यांना आधीच माझ्याविषयी सांगीतले होते आणि त्यांना माझ्याशी बोलण्यास सांगीतले. तसे ते माझ्याशी बोलले सुद्धा. सगळे त्यांना डॅडी म्हणत. डॅडींनी मला दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगीतल्या आणि त्या मला पटल्या. त्यातील एक म्हणजे आत्ता दोन पावलं मागे ये म्हणजे भविष्यात चार पावलं पुढे जाता येईल. दुसरी म्हणजे कायम बुद्धिमान लोकांमध्ये रहा कारण त्यांनाच तुझी किंमत कळेल.

पाच दिवसात तिथे अनेकांच्या ओळखी मैत्री झाल्या त्यात अण्णा ताम्हनकर, गायत्रीताई सेवक, प्रज्ञा जेरे आणि आमोल गांगजी हे चौघं होते. अजुनही काही जण होते पण मला आता नावे आठवत नाहीत. त्यांचा रो संध्याकाळी स्वाध्याय चालत असे. ते मला खूप आवडलं. सोलापूरहून परत आल्यावर मी अण्णांना आणि लताताईंना पत्रं लिहीले. अण्णांचे आणि लताताईंचे मला पत्रोत्तर आले. लताताईंची दोन आणि अण्णांचे एक अशी तीन पत्रे माझ्याकडे अजुनही आहेत. त्यातील अक्षर म्हणजे अतिशय सुंदर छापील वाटावे असे. जवळ जवळ पुढचे दीड दोन वर्षे आमचा संपर्क होता.

बी एड केल्यावर (हे दोन पावले मागे येणं होतं कारण मला ते करायचं नव्हतं) मी विवेकानंद केंद्राच्या शाळेत अरुणाचल प्रदेश मध्ये जायचा निर्णय घेतला (हे चार पावलं पुढे जाणं होतं). या दोन पावलं मागे येऊन चार पावलं पुढे जाण्यात लताताई, अण्णा, गायत्रीताई, डॅडी, पोंक्षे सर, आमचे बाबा, विलासजी कुलकर्णी, रेखादिदि अशा अनेकांचा वाटा होता. ते माझं आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर रहाणं होतं. त्यामुळेच माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली. दोन वर्षे विवेकानंद केंद्राचे समर्पीत जीवनव्रती, त्यानंतर चार वर्षे पुणे ज्ञान प्रबोधिनीतील विद्वान अभ्यासू व्यक्तीमत्वे यांचा माझ्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव पडला. आत्ताच्या माझ्या एकूण प्रवासात या सगळ्यांचा तसेच आयुष्यातील धडसाने घेतलेले विविध निर्णय व त्याण्च्या अनुभवांचा खूप मोठा वाटा आहे. २०२१ मध्ये पुण्यात परत आल्यावर माझं प्रोफेशनल आयुष्य सोडून विविध विषयांचा अभ्यास आणि सामाजिक काम हे करण्यासाठीची मानसिक तयारीही या सगळ्यांमुळेच मिळाली. याची सुरुवात लताताईंच्या त्या पहिल्या संपर्कामुळे झाली.

तसा मला त्यांचा सहवास खूप मिळाला असे नाही पण पुणे प्रबोधिनीत असताना आणि नंतरही त्या जेव्हा जेव्हा भेटल्या तेव्हा तेव्हा एकदम आत्मियतेने भेटायच्या. त्यांचा तो सदा प्रसन्न, तेजस्वी चेहरा एकदम सात्विकतेचा आणि शांततेचा अनुभव देत असे. खरंतर १९९७ मध्ये अण्णा आणि लताताई यांना माझ्याकडून मी सोलापूर प्रबोधिनीत काम करण्यास जाईन अशी खूप आशा होती. त्यांच्या प्रत्येक पत्रात, फोन मध्ये, प्रत्यक्ष भेटीत ते नमूद करत असत. पण नियतीने माझ्या नशीबात वेगळंच लिहून ठवलेलं होतं त्यामुळे ते घडू शकलं नाही. लताताईंच्या परिसस्पर्षाने या सगळ्याला सुरुवात झाली आणि जे घडलं ते ठीकच आहे. पण त्यांचा कोमल आणि मातृहृदयी सहवास नाही मिळू शकला याची मात्रं खंत आहे. आता स्वतंत्रपणे वेद-उपनिषदे यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास आणि जोडीला सामाजिक कार्य करणे हा त्यांचा संदेश आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सोबत काही पत्रे आणि नैनिताल शिबीराचे परिपत्रक जोडते आहे…नियोजनाचा वरचा स्तर पाहण्यासाठी.

लेखिका :- डॉ. अपर्णा लळिंगकर

Back to top button