बदलत्या काळातील नौदलाची आगेकूच
“फक्त आणि फक्त सुसंघटित दलेच शांत आणि दुर्बळांना त्यांच्या उलाढाली चालू ठेवण्याची आणि त्यांना अंतर्गत अथवा बाह्य आक्रमणाच्या चिंतेपासून मुक्त अशी झोप घेण्याची संधी देतात” – आल्फ्रेड थायर महान
अमेरिकेचे सर्वोत्तम सामरिक तज्ज्ञ म्हणून गणल्या जाणाऱ्या अडमिरल महान यांचे शतकभरापूर्वीचे हे उद्गार आजही जगभरातल्या सामरिक दलांना लागू पडतात आणि भविष्यातही ते त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. भरतीय नौदलही याला अपवाद नाही. महासागरांच्या पोटातून, पृष्ठभागावरून आणि त्यांच्यावरून आपली लक्ष्ये साध्य करण्याचे उद्दिष्ट्य समहजपणे साध्य करण्याची क्षमता असलेल्या त्रिमितीय नाविक क्षमतेमुळेच भारताला तीन बाजूंनी वेढून असलेले सागर सुरक्षित आहेत. पण, २०३०, २०४० किंवा त्यानंतरच्या काळातली स्थिती काय असेल, किंवा आजच्या तुलनेत भारतीय नौदलाची आदर्श स्थिती काय असायला हवी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतरच्या गेल्या सहा-सात वर्षांच्या कालावधीमध्ये सेनादलांच्या अद्ययावतीकरणावर भर देण्यात आलेला आहे आणि या बदलाची गती वाखाणण्याजोगी आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे समर्थ नाविकदलासाठीची साधनसामग्री विकत घेण्यापेक्षा देशातच तयार करण्यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. सामर्थ्यपूर्ण नौदलासाठी हे बदल अत्यंत आश्वासक आहेत.
२०२० च्या मध्यावर भारतीय नौदलासाठी विमानवाहू नौका, विनाशिका, फ्रिगेटस्, कॉर्वेटस् तसेच पारंपरिक आणि आण्विक पाणबुड्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ४२ युद्धनौका निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यांत होत्या. २०१३ मध्ये संरक्षण दल आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पुढील दहा वर्षांच्या कालावधीत २००-२५० नौका व ५०० विमानांचा समावेश असलेले नौदल उभारण्याची योजना आखली होती. सद्यस्थितीत ही क्षमता सुमारे १५० नौका व पाणबुड्या आणि २५० विमाने अशी आहे आणि येत्या काळात त्यात भरच पडावी यासाठीच्या योजना पूर्ण झालेल्या आहेत.
मुंबईत मुख्यालय असलेले वेस्टर्न नेव्हल कमांड, विशाखापट्टणम येथे मुख्यालय असलेले इस्टर्न नेव्हल कमांड आणि कोच्ची येथे मुख्यालय असलेले सदर्न नेव्हल कमांड अशा तीन मुख्य विभागांपैकी नौदलाचे पूर्व व पश्चिम विभाग हे ऑपरेशनल कमांड म्हणून ओळखले जातात, ज्यांच्यायोगे अनुक्रमे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील कारवायांचे नियंत्रण व अंमलबजावणी केली जाते. नौदलाचा दक्षिण विभाग हा प्रामुख्याने प्रशिक्षण विभाग आहे.
मुंबईस्थित वेस्टर्न फ्लीट आणि विशाखापट्टणम स्थित इस्टर्न फ्लीट हे दोन आरमारी नौकांचे ताफे भारतीय नौदलाची ताकद दाखवतात, तर त्या व्यतिरिक्त मुंबई, विशाखापट्टणम आणि पोर्टब्लेअर (अंदमान आणि निकोबार) येथे तैनात युद्धनौकांचे संच (फ्लोटिला) हे त्या-त्या आघाड्यांवर सागरी सीमा संरक्षणाचे काम पार पाडत असतात. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील अन्य बंदरांमध्ये तैनात युद्धनौकांवर तसेच क्षेत्रीय प्रभारी नौदल अधिकाऱ्यांवर त्या-त्या क्षेत्रांच्या रक्षणाची जबाबदारी असते. अंदमान-निकोबार बेटांवर असलेला विभाग हा तिन्ही सेनादलांचा संयुक्त विभाग असून एक नौदल अधिकारीच त्याच्या प्रमुखपदी असतो. एकूण ७,६०० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आणि २.३७ लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आर्थिक स्वामित्व क्षेत्र अशा प्रचंड मोठ्या पसाऱ्याचे विविध प्रकारच्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सारे घटक नौदलाच्या अद्ययावतीकरणाच्या आराखड्यात समाविष्ट आहेत.
विमानवाहू नौका हे नौदलाचे एक प्रमुख अंग समजले जाते. भारताच्या आरमारी आवश्यकतांचा विचार करता आपल्याकडे किमान तीन विमानवाहू नौका असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या केवळ एक – आयएनएस विक्रमादित्य – ही विमानवाहू नौका नौदलात कार्यरत आहेत. याआधीच्या दोन – आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विराट – मोडित काढण्यात आलेल्या आहेत, तर विक्रांत हेच नाच धारण करणारी संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू नौका सध्या नौदलात समावेश होण्यापूर्वीच्या चाचण्यांच्या टप्प्यात आहे. आणखी एक विमानवाहू नौका नियोजनाच्या टप्प्यात आहे. अमेरिकी आरमारामध्ये डझनावारी विमानवाहू नौका आहेत आणि जगभरात कुठेहू काहीही खुट्ट झालं की त्यांच्या ताफ्यासह एखादी अमेरिकी युद्धनौका त्या परिसरात पोहोचते व आवश्यक त दबाव निर्माण करते. अशा प्रकारच्या सामर्थ्यासाठी पूर्व किनारपट्टीवर एक, पश्चिम किनारपट्टीवर एक आणि एक देखभल-डागडुजी-प्रशिक्षणाच्या कामात गुंतलेली अशा किमान तीन विमानवाहू नौका, ही भारतीय नौदलाची किमान आवश्यकता आहे. पाकिस्तानी नौदलातील पाणबुड्यांचे वाढते प्रमाण, बंगालच्या उपसागरातील चीनचा वाढता हस्तक्षेप आदी आव्हानांच्या पार्श्वभूमीवर ही आवश्यकता अधिकच ठळक होते.
भारतीय नौदल जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नौदल आहे. हिंदी महासागरातील भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा, तसेच लोकसंख्या व अर्थव्यवस्था यांमुळे जागतिक उलाढालींमुळे भारताला प्राप्त होत असलेले महत्त्व, यांचा विचार करता भारतीय नौदलाचे सामर्थ्य येत्या काळात वाढते राहणे याला काहीही पर्याय नाही. अमेरिका, फ्रान्स, रशिया व अन्य देशांच्या नौदलांचा हिंदी महासागरातील संचार ही आवश्यकता अधोरेखित करतो. एखाद्या देशाच्या नावाने महासागर ओळखला जाण्याचे तसेच सात देशांच्या सागरी सीमांशी आपल्या सागरी सीमा भिडलेल्या असणे अशी आणखी दोन वेगळी वैशिष्ट्ये आहेत जी जपण्यासाठीही भारतीय नौदलाने सामर्थ्यसंपन्न होणे अत्यावश्यक बनले आहे.
एडनच्या आखातातून मलाक्का सामुद्रधुनीमार्गे जाणारे तसेच, केप ऑफ गुड होपला वळसा घालून मलाक्काच्या सामुद्रधुनीमार्गे जाणारे असे जगातले महत्त्वाचे प्राचीन सागरी व्यापारी मार्ग सारे हिंदी महासागरातून जातात. त्यांची सुरक्षितताही अखेरीस भारतीय नौदलावरच अवलंबून असणार आहे.
गेल्या दशकभरात देशाच्या संरक्षणा अर्थसंकल्पात नौदलाच्या वाट्याला अधिक निधी उपलब्ध होत असला तरी लष्कर आणि हवाई दलाच्या तुलनेत तो अद्याप किरकोळच आहे.
भारतीय आरमाराची सागरी क्षमता संवर्धन आराखडा (मेरिटाइम केपेबिलिटी पर्स्पेक्टिव्ह प्लान – एमसीपीपी)
भारतीय नौदलात सध्या १५० जहाजे आणि पाणबुड्या आहेत. गेल्या काही वर्षांतला एक महत्त्वाचा बदल म्हणजे नौदलाच्या आरमारी क्षमतांचा विचार हा युद्धनौका, विमाने आदींच्या संख्येसंदर्भात न केला जाता त्यांच्या क्षमतांच्या तसेच उपयोजनाच्या संदर्भात केला जाऊ लागला आहे. अर्थात, आरमारी ताफ्यांतील युद्धनौकांची संख्या वाढविली जाईलच. ती २०२७ पर्यंत २०० पर्यंत पोहोचैवी अशी अपेक्षा आहे. मात्र, यातील महत्त्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे विकसित देशांकडून तयार युद्धनौका वा अन्य सामग्री घेण्याऐवजी ती आपल्या देशात तयार करण्यावर दिला जाऊ लागलेला भर. नौदलासाठी लागणाऱ्या नौकांच्या बांधणीसाठी आता खासगी उद्योगक्षेत्राकडेही आशेने पाहिले जाऊ लागले आहे. हा नौदलाच्या दृष्टिकोनात घडून आलेला मोठाच बदल म्हणावा लागेल. इंडियन नेव्हल इंडिजिनायझेशन प्लान २०१५-२०३० (नौदलाच्या भारतीयीकरणाची योजना २०१५-२०३०) नुसार अगदी सूक्ष्म, मध्यम व लघू (एमएसएमई) उद्योग क्षेत्राला नौका बांधणी व अन्य नौदल उत्पादन निर्मितीच्या प्रक्रियेत सामावून घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
मुंबईतील माझगाव गोदी ही पूर्णपणे भारतीय बनावटीच्या नौकांच्या निर्मितीचे एक प्रमुख केंद्र राहिलेली आहे. गोदावरी श्रेणीच्या फ्रिगेटस्, खुकरी श्रेणीच्या कॉर्वेटस्, दिल्ली व कोलकाता श्रेणीच्या विनाशिका, तट रक्षक दलाच्या गस्ती नौका, १२४१ श्रेणीच्या मिसाइल बोटी, शिवालिक श्रेणीच्या स्टेल्थ फ्रिगेटस्, एसएसके व पी-७५ पाणबुड्या आदी वेगवेगळ्या प्रकारच्या नौकांच्या निर्मितीमुळे नौदल उत्पादनांच्या भारतियीकरणाशी माझगाव गोदीचे नाव अभिन्नपणे जोडले गेलेले आहे. येत्या काळात पी १५ बी श्रेणीच्या विनाशिका आणि पी १७ ए श्रेणीच्या फ्रिगेटस् याच गोदीत बनणार आहेत.
अगदी ऋग्वेद काळापासून भारताला नाविक व आरमारी संपन्नतेचा मोठा इतिहास आहे. आपल्या पुरातन ग्रंथांत समुद्र, नद्या, महासागर यांच्याशी संबंधित अनेक संदर्भ विखुरलेले आहेत. आपल्या नाविक परंपरांच्या अभ्यासावरून तेराव्या शतकापर्यंत सागरांवरील प्रभुत्त्व कसे होते याचे दर्शन घडते. लढाऊ आरमार आणि व्यापारी नाविक संबंध अशा दोन्ही अंगांनी भारत त्या काळात पुढारलेला होता. नौदलाच्या अद्ययावतीकरणाच्या नव्या प्रयत्नांतून पुन्हा एकदा तसेच सागरी प्रभुत्त्व साध्य करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, हे निश्चित.
—