NewsSeva

श्रीगुरुजी रुग्णालयातील नर्सने घडविले माणुसकीचे दर्शन

जळगाव, दि. १७ डिसेंबर –  जामनेर तालुक्यातील तोंडापूर ह्या लहानशा गावातून आलेला एक मजूर रुग्ण हॉस्पिटल बंद झाल्यावर एका पडक्या इमारतीत उघड्यावर रुग्णाला घेऊन झोपलेला कळल्यावर आपल्या घरात त्यांच्या निवासाची सोय केली. कोविड संक्रमणाच्या भीतीचे सर्वत्र सावट असताना श्रीगुरुजी रुग्णालयातील परिचारिका (नर्स) मनिषा रौंदाळ यांनी एक अनोळखी रुग्णसेवा करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यांची असामान्य मदत, रुग्णसेवा आणि नि:स्वार्थी वर्तनाबद्दल कौतुक सोहळा श्रीगुरुजी रुग्णालयात गेल्या शनिवारी, १२ डिसेंबर रोजी संपन्न झाला. 

इंदुबाई सुरडकर यांना छातीमध्ये मोठी गाठ येऊन त्रास झाल्यामुळे त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे तपासणी केली, तिथे कॅन्सरचा संशय आल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना  नाशिक येथील वाजवी दरात रुग्णसेवा देत असलेल्या श्रीगुरुजी रुग्णालयात जाण्याचा  सल्ला देण्यात आला. नाशिकला पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने रुग्ण व त्यांच्या मुलाने ती रात्र एका पडक्या बांधकामाच्या साईटवर उघड्यावर झोपून काढली व सकाळी ते श्रीगुरुजी रुग्णालयात आले.  प्रवेशद्वाराजवळच रुग्णांची तपासणी (Screening) करणाऱ्या सिस्टर मनिषा रौंदाळ यांनी त्यांची आस्थापूर्वक चौकशी केली आणि योग्य त्या डॉक्टराकडे नेऊन तपासणी करून घेतली. कॅन्सर तपासणीचा रिपोर्ट येण्यासाठी २-३ दिवसांचा अवधी होता आणि तेवढ्या वेळात गावी जाऊन परत येण्याइतके पैसेही त्यांच्याकडे नव्हते.  त्यांच्याशी बोलत असताना सिस्टर मनिषा यांना ही अडचण लक्षात आली आणि एका नर्समधील माणुसकी जागी झाली.  ह्या काळासाठी त्यांच्या राहण्याची कुठे  सोय करता येईल याचा विचार करताना सिस्टर मनिषा यांनी घरी आपल्या पतीला फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि रिपोर्ट येईपर्यंत आपल्याच घरी ठेवता येईल का याची चर्चा केली.  अडचणीत सापडलेल्या ह्या गरीब, गरजू रुग्णाची परिस्थिती बघून त्यांच्या सह्रदय पतीनेही त्यास आनंदाने होकार दिला.

दरम्यान, दिलेल्या अवधीत त्या रुग्णाचा कॅन्सरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण दुसऱ्या आजारामुळे आलेली ती गाठ काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. रुग्ण इंदुबाई सुरडकर डॉक्टरांच्या उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात सुमारे सहा दिवसांसाठी दाखल झाल्या.  कांही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे उपचार शासकीय योजनेत होऊ शकत नाही हे कळल्यावर सिस्टर मनीषा यांनी पुढाकार घेऊन रुग्णालय प्रशासनाला विनंती करून त्यांच्या उपचारांसाठी सवलत मिळवून दिली.

पहिल्या दिवशी डॉक्टरांकडे तपासण्यापासून ते पूर्ण बरे होऊन सुट्टी मिळेपर्यंतच्या काळात रुग्ण इंदुबाई सुरडकर आणि कुटुंबियांची राहण्याची, जेवणाची, हॉस्पिटलमध्ये डबे पुरविण्याची पूर्ण जबाबदारी मनीषा सिस्टर, त्यांचे पती राहुल शेळके आणि सर्व कुटुंबियांनी घरातील सदस्याप्रमाणे आपुलकीने सांभाळली.  आज कोविडच्या काळात संसर्गाचा धोका पत्करून, आर्थिक आणि कष्टाचा सर्व भार उचलून कोविड परिस्थितीचाही विचार न करता मनीषा सिस्टर, त्यांचे पती राहुल शेळके आणि सर्व कुटुंबियांनी जी मदत केली ती आजही माणुसकी जिवंत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

ह्या त्यांच्या असामान्य मदतीचा रुग्णसेवेचा आणि नि:स्वार्थाचा कौतुक सोहळा श्रीगुरुजी रुग्णालयात शनिवार १२ डिसेंबर रोजी संपन्न झाला.  रुग्णालयातील कौटुंबिक वातावरण, विचारप्रणाली यामुळेच ही प्रेरणा मिळाल्याचे आणि यापूर्वी रुग्णालयातील अनेक डॉक्टरांना, कर्मचार्यांना अशा  प्रकारची आपुलकीची वागणूक देताना बघून ही मदत करण्याचे सुचल्याचे सिस्टर मनिषा यांनी कार्यक्रमात सांगितले. ह्या कौटुंबिक  छोटेखानी  कार्यक्रमात रूग्णालयातर्फे सिस्टर मनीषा सोबत त्यांचे पती राहुल शेळके यांचाही पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

असे कर्मचारी आणि त्यांनी आपल्या वर्तनातून घालून दिलेली रुग्णसेवेची उदाहरणे हाच श्रीगुरुजी रुग्णालयाचा ठेवा असल्याचे प्रतिपादन रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद धर्माधिकारी यांनी बोलताना सांगितले.  याप्रसंगी रुग्णालयाचे सहसचिव डॉ.गिरीश चाकूरकर आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button