नवी दिल्ली, दि. ११ मार्च : ‘भगवद्गीता’ हा औदासिन्याकडून विजयाकडे नेणाऱ्या विचारांचा खजिना आहे. त्यामुळे ‘भगवद्गीते’ चे वाचन आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या ‘भगवद्गीते’च्या ‘किंडल’ आवृत्तीच्या ऑनलाइन प्रकाशनासमयी ते बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘‘संघर्ष आणि नैराश्याच्या परिस्थितीत ‘श्रीमद्भगवद्गीते’चा जन्म झाला आणि सध्या संपूर्ण मानवता त्याच प्रकारच्या संघर्षमय आणि आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहे. अशा परिस्थितीतून सावरण्यासाठी ‘श्रीमद्भगवद्गीते’ने दाखविलेला मार्ग अत्यंत समर्पक आहे. मानवतेसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा सामना करुन, त्यावर विजय मिळविण्यासाठीची शक्ती आणि दिशा ‘श्रीमद्भगवद्गीता’च दाखवू शकते, असेही ते म्हणाले.
‘निष्क्रियतेपेक्षा कृती करीत राहणे हा ‘श्रीमद्भगवद्गीतेने दिलेला मुख्य संदेश आहे,’’ ‘‘त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा गाभा हा फक्त स्वत:साठी नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर मानवतेचे कल्याण साधण्यासाठी संपत्ती आणि मूल्ये निर्माण करण्याचा मार्ग आहे,’ असेही मोदी यांनी नमूद केले.
आचार्य विनोबा भावे यांनी भगवदगीतेचे वर्णन मुलांच्या चुका पोटात घालणाऱ्या आईच्यारुपात केले आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महाकवी सुब्रह्मण्य भारती सारख्या महान नेते गीतेने प्रेरित झाले होते. गीता आपल्याला विचारशील बनवते, आपल्या जिज्ञासेला प्रेरणा देते. गीतेने दिलेली शिकवण अत्यंत व्यावहारिक आणि सगळ्यांना जोडून ठेवणारी आहे, असेही पंतप्रधानांनी बोलताना सांगितले.