काळ कसोटीचा आहे, कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे…
कोरोना दो दिन की बात है दोस्तों, जिंदगी अभी बाकी है, ये तो बस मामुली जंग है….
या कुठल्याही काव्यसंग्रहातील ओळी नाहीत. या ओळी आहेत सेवांकुरच्या मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना रुग्णांना लिहिलेल्या पत्रातल्या. सेवांकुर संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सेवांकूर या संस्थेच्या माध्यमातून कोविडच्या पहिल्या टप्प्यापासूनच स्क्रीनिंग, जनजागरण, समुपदेशन अशा विविध प्रकारचे कार्य केले जात आहे. पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अन्यत्र अनेक भागात हे कार्य सुरु होते. आजही ते सुरू आहे. सध्या डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही माध्यमातून सध्या लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे कार्य सेवांकुरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे विद्यार्थी रोज डॉ. हेडगेवार रुग्णालयात जातात व नंतर सेवावस्त्यांमध्ये जनजागरणासाठी जातात.
कोविडच्या संसर्गात विशेषतः दुसऱ्या टप्प्यात नागरिकांचे मनःस्वास्थ्य हा एक मोठाच प्रश्न वैद्यकीय क्षेत्रासमोर उभा राहिला आहे. हेडगेवार रुग्णालयाच्या कोविड कक्षात राहणाऱ्या रुग्णांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी काय करता येईल अशी चर्चा सेवांकुरच्या सदस्यांमध्ये सुरू होती, असे हेडगेवार रुग्णालयातील डॉ. नितीन गादेवाड यांनी सांगितले.
सेवांकुरचे महाराष्ट्राचे बौद्धिक प्रमुख डॉ. यतिंद्र अष्टपुत्रे यांना ही पत्रांची कल्पना सुचली. पत्रे पाठवायची असतील तर ती सरसकट पाठवून चालणार नाही हे ही लक्षात आले. मग वॉर्डातील रुग्णाचे वय, स्त्री आहे की पुरुष, शहरी आहे की ग्रामीण, शिक्षित आहे की जेमतेम वाचू शकणारा अशी माहिती घेऊन पत्रे लिहिली गेली. त्या माणसाची मानसिक स्थिती काय आहे ते लक्षात घेऊन, उभारी देणारा मजकूर लिहिला जाऊ लागला. वयस्कर स्त्रीला आजी म्हणून तर कोणाला काका, मामा म्हणून साद घातली जाऊ लागली. तुमचे नाव वाचून मला माझ्या आजीची आठवण झाली, तिच्या हातच्या स्वयंपाकाची आठवण झाली, असे म्हटले तर कधी बाबा म्हणून हाक मारली गेली. तुम्हाला नक्की बरे वाटेल अशा शब्दात आश्वस्तही केले गेले.
ही पत्रे वाचून रुग्णांना भरून आले असेही डॉ. नितीन सांगतात. कोरोना वॉर्डातील रूक्ष एकटेपणाच्या सक्तीच्या शिक्षेत ही पत्र म्हणजे आपुलकीचा हलका शिडकावा ठरला. त्यांचे मानसिक स्वास्थ्यी सुधारले असेही ते म्हणाले. आपलेपणाने लिहिलेल्या या पत्रांचे आणि ते लिहिणाऱ्या सेवांकुरच्या भावी डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पत्र हाही माणसाला निराशाग्रस्त मानसिकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा एक सेतू ठरू शकतो हे या उपक्रमामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.