कोरोनाचे सावट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. त्यात जव्हार, मोखाडा तालुक्यात रुग्णालयात पुरेशा साधनसुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच कोविड सेंटरमधील अव्यवस्था, अस्वच्छता आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्यामुळे भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे. रुग्णालयात जाण्यास येथील लोक सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे घरच्या घरी उपचार करण्यावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा भर दिसून येतो. अशातच १३ मे, २०२१ रोजी एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्याकडून एका कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेवल ६० च्या आसपास आली असल्याचे पालघर जिल्हा कार्यवाह वीरेंद्र चंपानेरकर यांना कळले. त्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी ऍम्ब्युलन्सची सोयही उपलब्ध करण्यात आली. मात्र त्या रुग्णाला रुग्णालयात न नेता त्याचे कुटुंबीय त्याची तब्येत सुधारण्यासाठी रात्रभर येशूची प्रार्थना करीत होते.
अशा प्रसंगी जर रुग्णावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्याचे जगणे अशक्य आहे, हे लक्षात आल्याने चिंताग्रस्त झालेल्या वीरेंद्र दिनानाथ चंपानेरकर यांनी तेथे जाऊन त्या रुग्णाला भेटण्याचे ठरविले. त्या रुग्णाचे गाव जव्हारपासून जवळ जवळ ३० किलोमीटर अंतरावर म्हणजेच दादरा नगर हवेलीच्या सीमेवरती दाभलोन येथे होते, असे चंपानेरकर यांना समजले. तेथील गावांतील लोकांचाही हाच धक्कादायक अनुभव होता की, आमच्याकडचे जे रुग्ण ऍम्ब्युलन्समधून रुग्णालयात जातात ते परत कधी जिवंत येतच नाही.
जव्हार मध्ये दिव्य विद्यालय येथे २०-२५ दिवसांपासून कोविड रुग्णांसाठी आधार केंद्र चालविण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून कोविड रुग्णांना धीर देणे, समुपदेशन करणे आणि मानसिक खच्चीकरण झालेल्या रुग्णांसाठी ५० बेड्सचे विलगीकरण केंद्र चालविण्यात येते. सुमारे पंचेचाळीस रुग्ण या केंद्रातून व्यवस्थित बरे होऊन स्वस्थानी परत गेले आहेत. कोविड रुग्णांना सरकारी औषधांबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषध सुद्धा देण्यात येत असून या औषधांचा परिणामही खूप चांगला दिसून येत असून रुग्ण व्यवस्थितपणे यातून बरे होत आहेत. त्यानुसार वीरेंद्र चंपानेरकर यांनी ही औषधे सदर रुग्णाला दिल्यास त्याच्याही तब्येतीत सुधारणा होईल, याविचाराने त्यांनी लगेचच आधार केंद्रांमध्ये जाऊन तेथून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीची औषधे घेतली, एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेऊन पुढच्या प्रवासास सुरुवात केली. दाभलोन गावामध्ये सुदाम उंबरसाडा हे संघाचे कार्यकर्ता राहतात. ते त्या रुग्णाला ओळखत होते, तसेच तो रुग्ण दादरा नगर हवेली मध्ये चिखलदा या गावी राहतो, हे कळल्यावर ते त्या दिशेने निघाले. रुग्णाचे दूरचे एक नातेवाईक जयराम काकड हे संघाचेच कार्यकर्ते होते आणि तेही तेथे उपस्थित होते. येशूच्या आणि सेवेच्या नावाने ज्यांनी आमच्या लोकांमध्ये भेद निर्माण केले, गावाची संस्कृती, एकता तोडली ती मंडळी या महामारीत गावात आलीच नव्हती, ते कुठेही दिसत नव्हते, असा त्यांचा एकंदरीत अनुभव होता.
त्या रुग्णाची ऑक्सिजन लेवल त्यावेळी ६० होती. त्या रुग्णाचे यापूर्वी सिटीस्कॅन करण्यात आले होते. सिटीस्कॅनच्या त्या रिपोर्टवरून त्यांचा स्कोर होता २५ पैकी २२ होता. त्यातच त्या रुग्णास श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच्यावर उपचारांची नितांत गरज होती. पण त्या रुग्णाचे नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार नव्हते. त्यावर चंपानेरकर यांनी आपल्याजवळील ऑक्सीजन मशीन आणि काही आयुर्वेदिक औषधे रुग्णासाठी वापरू शकतो, असे त्यांना सांगितले. पण रुग्णाची एकंदरीत अवस्था पाहता तो रुग्ण खात्रीशीर वाचू शकेल, असे सांगू शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
आता नातेवाईकांसमोर दोन पर्याय उपलब्ध होते एक म्हणजे रुग्णालय आणि दुसरे म्हणजे रुग्णाला घरीच ऑक्सिजन लावून त्याच्यावर उपचार करणे. जवळजवळ दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना त्या रुग्णाच्या नातेवाईकांचे मन बदलण्यास यश आले. त्यातूनही प्रथम चंपानेरकर यांनी ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वतःला लावून दाखवले त्या नंतर जयराम यांना लावून दाखवले. त्यावेळी तो रुग्ण राजी झाला. कॉन्सन्ट्रेटर लावल्यानंतर त्याची ऑक्सिजन लेवल हळूहळू वाढत ८१ पर्यंत पोहोचली होती. नंतर त्याच्या छातीला लावण्यासाठीच तेल आणि काही आयुर्वेदिक औषध देण्यात आली, ती कशी घ्यायची हे त्यांना समजवून सांगण्यात आले. त्या रुग्णाच्या निगराणीसाठी तेथील संघ कार्यकर्त्यांनी चार-पाच दिवस तिथेच राहून त्याच्या औषधोपचारावर नीट होत आहेत का, ते पाहत होते.
हळूहळू त्या रुग्णाची तब्बेत स्थिरस्थावर होत होती. त्याची ऑक्सिजन लेवल ८५ पर्यंत पोहोचली आहे, खोकला आणि दम लागणे ही कमी झाले होते, तेल आणि औषध नियमितपणे चालू होते. आयुर्वेदिक औषधे त्यांची कामे योग्यरितीने करीत होती. इतक्या अवघड अवस्थेत असलेला माणूस कुठल्याही प्रकारची ऍलोपथीची औषधे न घेता केवळ आयुर्वेदिक औषधांवर व्यवस्थित बरा होऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याची रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल आता ९५ झाली होती आणि तो मरणातून वाचला होता.
अनेक ठिकाणी खोटे-नाटे सांगून अफवा पसरून भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल मोठ्या प्रमाणात केली जात आहे. स्वस्वार्थासाठी धर्माच्या नावाखाली तर त्यांना खूप सहजपणे लुबाडले जात आहे. त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. पण कोरोनाच्या अशा कठीण प्रसंगी हेच लोक आता कुठे दिसेनाशी झाली आहेत. पण तरीही रा.स्व.संघ नेहमीच सेवेसाठी आपली तत्परता दाखवत असतो. त्यातीलच हे एक जिवंत उदाहरण. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णांची सेवा केली आहे, त्यांना खऱ्या अर्थाने धीर देण्याच काम केले आहे. हा समाज माझा आहे याच भावनेतूनच हे होण शक्य आहे. हा भाव ज्या संघटनेने आमच्या सारख्या सामान्य माणसात तयार केला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होण्याचे भाग्य मला मिळाले हीच पूर्व पुण्याई असल्याचे समाधान वीरेंद्र चंपानेरकर व्यक्त करतात.