भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली, मात्र वनवासी लोक अजूनही आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. मूलभूत सुखसोयी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता सामाजिक विकासात अग्रेसर असणारी केशवसृष्टी ही समाजसेवी संस्था ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांतले प्रकल्प राबवित असते. आपल्या समाजबांधवांच्या उद्धारासाठी झटणारी केशवसृष्टी प्रत्येक महिन्यात कामे ठरवून ती पूर्णत्वास नेत असते. त्याच अनुषंगाने केशवसृष्टीने जून २०२१ मध्येही अशीच काही महत्वपूर्णे कामे मार्गी लावली.या कामांचा (हा) संक्षिप्त आढावा.
जून महिन्यात राबविण्यात आलेल्या निरनिराळ्या उपक्रमांमध्ये, “अक्षय सहयोग” प्रकल्प, गुळवेलीची लागवड, हँडग्लोव्हसचे वितरण, आरोग्य रक्षक दाम्पत्य प्रशिक्षण सत्र, वाडा ग्रामीण रुग्णालयात शेड उभारणे तसेच लसीकरणाकरिता आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी १०० खुर्चांचे वाटप, ‘नेतृत्व विकास’ च्या वतीने माहुली किल्ल्यावर स्वच्छता अभियान, डाहे गावात ११ शौचालयांची निर्मिती, बावली येथे केळीच्या खोडाच्या तंतूपासून हस्तकला वस्तूंच्या निर्मिती आणि कापड निर्मितीचे महिलांना प्रशिक्षण, तसेच जव्हार तालुक्यात सौरदिव्यांचे वितरण आदी उपक्रमांचा समावेश आहे.
कोरोना प्रभावित कुटुंबियांच्या सशक्तीकरणाकरिता ‘अक्षय सहयोग‘ योजना
केशवसृष्टीच्या ‘अक्षय सहयोग’ या उपक्रमानुसार कोरोना प्रभावित कुटुंबियांचे सशक्तीकरण करण्यात येत आहे. अशा कुटुंबांसाठी जी मदत केली जात आहे त्यामध्ये शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर सहाय्य्य, करिअर समुपदेशन, मानसिक आरोग्य सल्ला, विवाह मदत, मासिक शिधावाटप, निवारा, सरकारी योजनेचा लाभ आदी महत्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव आहे. आतापर्यंत १५० प्रभावित कुटुंबाशी संपर्क करण्यात आला असून त्यापैकी ३९ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. लवकरच सर्व कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वाडा तालुक्यात ३ हजार गुळवेलींची लागवड
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. या अनुषंगाने वाडा तालुक्यातील १५ गावांमध्ये औषधी वनस्पतींच्या शेतीवर भर देण्यात येत असून ‘अमृता फॉर लाईफ’ योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ३ हजार गुळवेल रोपांची लागवड करण्यात आली. तर इतर दहा गावांमध्ये २ हजार गुळवेलींच्या लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे.
८ हजार हँडग्लोव्हसचे वितरण
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनामार्फत लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विभिन्न सरकारी लसीकरण आणि आरोग्य केंद्रांच्या मागणीनुसार ८ हजार हँडग्लोव्हसचे वितरण करण्यात आले. यामध्ये वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात २ हजार, परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १ हजार, गोऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ हजार, पोशेरी येथील कोविड सेंटर मध्ये १ हजार तसेच वाडा तहसील वैद्यकीय अधिकारी २ हजार अशा एकूण ८ हजार हँडग्लोव्हसचा अंतर्भाव आहे.
आरोग्य रक्षक दांपत्यांचे प्रशिक्षण सत्र
केशवसृष्टी ग्राम विकास योजना, वाडा कार्यालयात आरोग्य रक्षक दांपत्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. निवडण्यात आलेल्या १० दांपत्यांपैकी ७ दांपत्यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. आरोग्य प्रमुख डॉ. सुरेश सरवडेकर आणि डॉ. विशाल झा यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान डॉ. सरवडेकर यांनी आरोग्यासंबंधी विविध मुद्द्यांवर माहिती दिली. तसेच आरोग्य रक्षक दांपत्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
वाडा ग्रामीण रुग्णालयात शेडची निर्मिती
वाडा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय हे एकमात्र सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयात उपचाराकरिता मोठ्या संख्येने रुग्णांची ये-जा सुरु असते. ऊन-पावसात त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता रुग्णालयात शेड बांधण्यात आली असून त्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेसाठी १०० खुर्च्यांचीही सोय करण्यात आली आहे.
‘नेतृत्व विकास‘ आयामाच्या माध्यमातून तरूणांचे माहुली किल्ल्यावर स्वच्छता अभियान
शिवराज्याभिषेक आणि हिंदू साम्राज्य दिनाच्या औचित्याने ‘नेतृत्व विकास’ आयामाशी संलग्न असलेल्या तरूण सदस्यांनी माहुली किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी गडावरील शिवकालीन वस्तूंची साफसफाई करण्यात आली. माधव संस्कार केंद्रातून आणलेल्या बियांचे रोपणही यावेळी करण्यात आले. तसेच इतस्ततः फेकलेले ६ किलो प्लास्टिक जमा करून योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
डाहे येथील बोचलपाडा गावांत ११ शौचालयांची निर्मिती
डाहे येथील बोचलपाडा गावांत शौचालयांची सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांना, विशेषकरून महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी गावात ११ शौचालयांची निर्मिती करण्यात आली.
केळीच्या खोडाच्या तंतूपासून हस्तकला वस्तूंच्या निर्मितीचे महिलांना प्रशिक्षण
केळीच्या खोडापासून मिळत असलेला तंतू मऊसूत असतो तसेच तो चांगल्याप्रकारे फोल्डही करता येतो. या तंतूंपासून दोरी, पायपुसणी, राखीसाठी धागा बनविणे आदी विविध प्रकारच्या हस्तकला वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण बावली गावातील महिलांना देण्यात आले. यामुळे येथील महिलांना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर या तंतूपासून कापड निर्मिती करण्यासाठीचे प्रशिक्षणही महिलांना देण्यात येत आहे.
२६० कुटुंबियांना सौरदिव्यांचे वितरण
पालघर जिल्ह्यात वनवासी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यातील काही भागांत अजूनही नियमीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे येथील घरांत राहणारी अनेक कुटुंबे अजूनही अंधारातच आपले आयुष्य काढत आहेत. या अनुषंगाने जव्हार तालुक्यातील पिंपळशेत ग्रामपंचायतीतील हुंबरण, माडविहारा आणि सुकीचा माळ या गावांतील २६० कुटुंबियांना सौरदिव्यांचे वितरण करण्यात आले.
५ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबईतील विलेपार्ले आणि अंधेरी येथे १८ ते ४४ वयोगटातील ५ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
परिस्थिती बिकट असली तरीही त्याला न डगमगता, आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केशवसृष्टी सदैव तत्पर असते. आपल्या अगतिक समाजबांधवांना या भीषण परिस्थितीवर मात करायला शिकवण्यास मदत करणाऱ्या केशवसृष्टीच्या या कार्यास खूप शुभेच्छा!!
- तृप्ती पवार, विश्व संवाद केंद्र, मुंबई